Wednesday, 1 June 2022

And the nest is empty again : आणि घरटं पुन्हा रिकामं झालं.....

आणि घरटं पुन्हा रिकामं झालं.....

                      १९ फेब्रुवारी २०२२ पहिल्यांदा गवताची काडी घेऊन ती आली. तसे तर घराच्या अंगणात आम्ही तयार केलेले लाकडी घरे आहेत, पण ती मोठी स्वाभिमानी, स्वतःचा संसार स्वतः उभा करायचा हा तिचा निश्चय मोठा...

                   दररोज काड्या, गवत, कापूस अशा तिच्या गरजेचे व घरट्यासाठी  लागणाऱ्या वस्तूने त्या दोघांची धडपड सुरू झाली. दररोज दिवसभर ती दोघे साहित्य आणून आपले नवीन घरटे गुंफत होते. बघता- बघता ६-७ दिवसात काडी - काडी जोडून त्यांनी छोटीसे इमले बांधले. एकटी चिमणी बसू शकेल एवढ्या आकाराचे ते छोटेसे घरटे आतून मात्र अगदी कापसासारखे होते.

                   चिमणी आता आमच्या घरची झाली होती. दिवसभर बाहेर फिरायची व संध्याकाळ झाली की एकटीच घरट्यात येऊन बसत होती. या दरम्यान तिने घरट्यात दोन अंडी घातली. हाच दिनक्रम काही दिवस चालू होता. घरट्यात बसल्यावर चिमणीचे फक्त तोंडच बाहेर दिसत असे.

                 अचानक एक दिवस पिल्लांचा चिव-चिवाट ऐकू येऊ लागला. दोन छोटी-छोटी पिल्लं घरट्यातून हळूच डोकावू लागली. छोटे शरीर, गुलाबी रंग, छोटी चोच, ती उघडल्यावर लाल रंगाचे दिसणारे अंतरंग...... पिल्लांचे आई व बाबा दोघे आळीपाळीने येऊन पिलांना भरवून जात होते.

                 दिवसभर फक्त पिल्लांचा चिव-चिवाट सुरू असे. आई-बाबा आल्यावर तर अगदीच गोंधळ.... ओरड.... संध्याकाळी त्या दोन पिल्लांसह चिऊताई त्या इवल्याशा घरट्यात अगदी निवांत बसायची. सकाळ झाली की रोजचा दिनक्रम सुरू.....

                दिवसामागून दिवस पुढे सरकत होते. पिल्ले मोठी होऊ लागली आणि 20 एप्रिल च्या दरम्यान अचानक सगळं बंद झालं. एक-दोन दिवस बघितलं पण शांतता.......

               ती चिमणी आपल्या दोन लेकरांच्या पंखांना बळ देऊन घरटं रिकामं सोडून निघून गेली. अवघ्या दोन महिन्यात घरटं रिकामं झालं...

               निसर्गाचा काय करिष्मा आहे ना? त्या इवल्याशा चिमणीने इवलसं घरटं बांधून त्या इवल्याशा घरात दोन इवल्याशा पिलांना जन्म देऊन, वाढवून त्यांच्या इवल्याशा पंखात आकाश कवेत घेण्याचे स्वप्न दाखवून त्या इवल्याशा पिल्लांना घेऊन  घरटं पुन्हा रिकामं करून ती कायमची निघून गेली.

 -------------------------------------------------------------------------------------------------------------

 संदिप...

Sandip.koli35@gmail.com

 

आज : Today

📝 आज.......       आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...