पुस्तक परीक्षण- लपवलेल्या काचा – डॉ.सलील कुलकर्णी
‘मनाप्रमाणे जगावयाचे
किती किती छान बेत होते
कुठेतरी मी उभा होतो.......
कुठेतरी दैव नेत होते.’
कविवर्य सुरेश भट यांच्या या सुंदर ओळी
जगण्याचा आणि आयुष्याचा छान अर्थ सांगून जातात. आयुष्य जगत असताना बरे-वाईट अनुभव
सर्वांनाच येत असतात. चांगल्याची आठवण व
वाईटाची शिदोरी घेऊन आयुष्य अखंड सुरु असते. जगण्यातला संघर्ष अगदी जन्मापासून
सर्वांचा सुरू असतो. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आलेल्या अनुभवांना घेऊन
आपण जगत असतो. कितीही प्रयत्न केला, पराकाष्टा केली तरी आयुष्यात काही-ना-काही
पाठीमागे राहतेच, मग त्या आठवणी असो, प्रसंग असो, वा व्यक्ती असो. कर्तुत्वाने आणि
अनुभवाने आपण कितीही मोठे व प्रगल्भ झालो तरी कधी निवांत क्षणी एकटे बसल्यावर
विचारचक्र सुरू होते व नकळत भूतकाळातील आठवणींचा चित्रपट आपल्या डोळ्यासमोरून सरकू
लागतो. जगण्याच्या धावपळीत सुटलेले क्षण आणि राहिलेल्या आठवणी डोळ्यांच्या कडा
ओलावून जातात, मग सहारा उरतो फक्त त्या आठवणींचा आणि त्या आठवणी शब्दरूपात मांडून
वाट करून देण्याचा. ‘लपवलेल्या काचा’ हा डॉ. सलील कुलकर्णी यांचा ललितलेख संग्रह
अशाच गोड आठवणी व विचारांचा ठेवा असलेले छानसे पुस्तक. दमलेल्या बापाची कहाणी आपल्याला सांगत आयुष्यावर
काही बोलायला लावणाऱ्या कवी, गायक, संगीतकार व लेखक डॉ. सलील कुलकर्णी यांचे हे पुस्तक.
पुण्याच्या कॉन्टिनेन्टल प्रकाशनाने 23 एप्रिल 2011 रोजी प्रकाशित केलेला हा ललित लेखांचा
संग्रह. मुळात हे पुस्तक म्हणजे डॉ. सलील यांनी लोकसत्ता दैनिकाच्या चतुरंग पुरवणी
केलेल्या लेखनाचा संग्रह आहे. हे पुस्तक, याची रचना व आकार नेहमीच्या पुस्तकाच्या
धाटणीपेक्षा खूप वेगळा आहे. आयुष्यात ज्यांनी लेखकाला घडवलं, शिकवलं, सावरलं अशा
आई व हार्मोनियम या दोघींना हे पुस्तक समर्पित आहे. डॉ. सलील यांना वाटणाऱ्या 25
लेखांची मांडणी या पुस्तकात केलेली आहे.
प्रत्येक लेखाच्या सुरुवातीला डॉ. सलील यांनी स्वहस्ताक्षरात
लिहिलेला मजकूर आपल्याला प्रत्येक लेखाची उत्सुकता जागृत करतो. या 25 लेखातील
प्रत्येक लेख आपल्याला डॉ. सलील यांच्याबद्दलच्या वेगळ्या रूपाची, प्रतिभेची,
हळव्या मनाची, दडपलेल्या भावनांची ओळख करून देतो.
पुस्तकातील पहिलाच लेख ‘एकदाच खरं खरं’ आपल्याला जगण्याचा अर्थ शिकवून
जातो. “येणारा प्रत्येक क्षण प्रत्येकासाठी अटळ असतो. मग तो बाजूला ठेवून थोडं
हसून मोकळा शास घेऊया’. ‘पुन्हा एकदा पहिल्यापासून..’ या लेखात मोजक्या शब्दात
लहानपणापासूनच्या काही गोड आठवणी लिहिल्या आहेत. पु. ल. देशपांडे आणि छोटा सलील यांच्यातील
सहीचा एक प्रसंग मनाला अत्यंत भावतो. सततचे दौरे, कार्यक्रम यातही लेखकाने मांडलेले
हे छोटे प्रसंग त्यांच्यातील संवेदनशील मन उलगडून दाखवतात. “आयुष्यावर बोलू काही
बघायचंय मला. पण तुमच्यात बसून!” या ओळी त्यांचा साधेपणा दर्शवतात. या ललित लेखांत
लेखकाच्या हृदयाच्या जवळ असणाऱ्या त्यांच्या आई, कवयित्री शांताबाई शेळके, गुरू,
सखा, बंधू, सुधीर मोघे, भावसंगीताचे पितामह दादासाहेबांचे आचरेकर यांची ओळख डॉ.
सलील त्याच्या नजरेतून करून देतात. “लहानपणापासून ती गाढ झोपलीय आणि मी जागा असा
प्रसंग मला आठवत नाही.” “भौतिकशास्त्राच्या कोणत्याही प्रमेयात न बसणारी ऊर्जा
म्हणजे आई.” या वाक्यातून त्यांचे आईविषयीचे प्रेम लेखात व्यक्त होते. 70 वर्षाची मैत्रीण म्हणून शांताबाई शेळके यांचे ऋणानुबंध ‘एक होत्या
शांताबाई’ या लेखातून, तर सुधीर मोघे म्हणजे चौसोपी वाडा हा त्यांचा अनुभव कथन
करतात.
या
पुस्तकातील काही प्रसंग किंवा कथा मनाला स्पर्शून हळव्या करून जातात. ‘तो आणि ती’,
‘राजा आणि बंडू’ आपल्याला भावनिक करतात. या पुस्तकात मध्यावरच ‘मनोरंजन मनोरंजन’
नावाची कविता गंभीर व भावनिक वातावरण हलके करायला मदत करते. “एक दिवस माझा मुलगा
शुभंकरने हाताला ओढून नेले आणि सगळी खेळणी, पुस्तके दाखवून म्हणाला, खूप गमती आहेत
माझ्याकडे, आता नको पैसे, तू घरी थांब. मी निरुत्तर” अशा स्वतःच्या प्रसंगातून ‘दमलेल्या
बापाची कहाणी’ व त्यातून आलेले जिवंत अनुभव शब्दातून आपल्यातील बाप जागा करतात.
कार्यक्रम, गाणे, प्रवास यातून जगायला शिकवलेले प्रसंग डॉ. सलील यांनी मोजक्या
शब्दात मांडले आहेत.
पुस्तकाचे शीर्षक ‘लपवलेल्या काचा’ याची कहाणी
उलगडते 15 व्या लेखात, मनाला भिडणाऱ्या प्रसंगाचे वर्णन या लेखात आपल्यालाही
आपल्या लहानपणी घेऊन जाते. लेखक व त्यांची बहीण यांनी लहानपणी बागेत लपवलेल्या
काचांचा हा भावनिक प्रसंग पुस्तकाचे शीर्षक सार्थ ठरवतो.
पुस्तक
तुम्हाला नवीन काहीतरी मिळेल या विचाराने खिळवून ठेवते. पुस्तकात डॉ. सलील यांच्या
हस्ताक्षरात बरोबर त्यांच्या विविध मुद्रेची रेखाटलेली रेखाचित्रे त्यांच्या भावमुद्रा
दाखवतात. याशिवाय पुस्तकाची रचना, शब्द मांडणी अतिशय सुटसुटीत व बांधणी मजबूत आहे.
त्यामुळे 207 पानाचे हे पुस्तक कंटाळवाणे वाटत नाही. पुस्तकाच्या
मुखपृष्ठावर दस्तुरखुद्द लेखकाचा म्हणजे डॉ.
सलील कुलकर्णी यांचा शांत, संयमी फोटो आहे. तर मलपृष्ठावर महाराष्ट्राला
पुन्हा कवितेच्या प्रेमात पडणाऱ्या संदीप खरे यांनी आपल्या मित्राबद्दल व
पुस्तकाबद्दल लिहिलेला छोटा अर्थपूर्ण अभिप्राय आहे .
या जन्मावर या जगण्यावर, शतदा प्रेम करावे............
कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या ओळीप्रमाणे
आयुष्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने कधीतरी या
लपवलेल्या काचा शोधायला हव्यात. पुन्हा भेटू,कधीतरी! म्हणून डॉ.सलील आपल्या
प्रत्येकाला आपल्या आयुष्यातील याच ‘लपवलेल्या काचा’ शोधण्यास या पुस्तकातून नक्की
प्रवृत्त करतात.
धन्यवाद!!
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
श्री. संदीप भिमराव कोळी
9730410154
sandip.koli35@gmail.com
No comments:
Post a Comment