वातावरणात बदलाचे वारे वाहू लागले आहे. आजूबाजूला उत्साहाचे उधाण आले आहे आणि मनामनात आनंदाच्या लहरी उमटत आहे. दिवाळी तोंडावर आली आहे. आपल्या घरात लगबग सुरू झाली असेल. झाडलोट, पसारा आवरणे या गोष्टी ' शास्त्र असते ते' असे मानून आपली इच्छा असो अथवा नसो तरी निष्ठेने सुरू असते. जुने काढून नव्याला नवीन जागा केली जात आहे. आवश्यक गोष्टीची दुरुस्ती करून अनावश्यक गोष्टीला हळुवारपणे घराच्या बाहेरचा रस्ता दाखवल्या जात आहे. नवीन गोष्टीसाठी आवश्यक जागा मोकळी केली जात आहे.
हे सर्व झाल्यावर किती छान वाटत हो ना? अगदी मोकळं मोकळं आणि नव्याच्या उत्सुकतेची वाट पाहणारी रिकामी जागा.
ही सर्व साफसफाई झाल्यावर घर किती छान व नीटनेटक वाटतो हो ना? अनावश्यक गोष्टी बाहेर गेल्याने नव्या गोष्टींसाठी खूप जागा रिकामी झाल्याने घराचे रूप अजून खुलून येत. पण हे झालं घराचं पण आपल्या मनाचं काय?
या सणाच्या निमित्ताने आपले मन ही आवरायला घेऊया...
वाचून थोडे गोंधळात पडलात? घराच्या साफ-सफाईला आपण जेवढे महत्त्व देतो तितका वेळ आपण आपल्या मनासाठी काढत नाही.
या सणाच्यानिमित्ताने आपण ही आपल्या मनाचे कोपरे आवरायला घेऊया. माणसांच्या मेळात आणि विचाराच्या घोळात दररोज वावरत असताना आपल्या मनाचे अनेक कोपरे अनेक गोष्टींनी भरून गेलेले असतात. त्यातल्या अनेक गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आणि आयुष्यभरासाठी जपण्यासारख्या असतात. त्याचे महत्त्व अमूल्य असते. त्यांना पुन्हा उजाळा देऊन मनाच्या खास कोपऱ्यात पुन्हा दिमाखाने ठेवायच्या असतात.
पण या मनाच्या घरात अशा अनेक अनावश्यक व आपल्याला त्रास देणाऱ्या गोष्टी खोल कुठेतरी रुतून बसलेले असतात. त्यांना वेळीच बाहेरचा रस्ता दाखवला नाही तर ते आपल्या दुःखाचे कारण बनतात. "साचून राहिले की कुजते" या निसर्गाच्या नियमाने अनावश्यक गोष्टी खूप दिवस मनात साठवून राहिल्या की त्या त्रासाशिवाय आपल्याला काही देऊ शकत नाही. याप्रसंगी आपण आपल्या मनातील अशा गोष्टी बाहेर काढूया. वाईट विचार बाजूला ठेवूया. ज्या व्यक्तींनी आपल्याला त्रास दिला आहे त्यांना माफ करून त्यांचा विचार सोडून देऊया. ज्या गोष्टी झाल्या नाहीत किंवा त्यांचा त्रास होतो त्या गोष्टी let go करूया. अनावश्यक गोष्टींची जागा रिकामी करूया. ज्यांच्याशी भांडण झाले, ज्यांच्याशी वाद झाले, मतभेद झाले अशा गोष्टी खूप वेळ मनात ठेवण्यापेक्षा तर सोडून दिलेल्या कधी चांगल्या. त्रास देणारी प्रत्येक गोष्ट व्यक्ती, परिस्थिती व ठिकाण आपण सोडून द्यायला शिकले पाहिजे.
चांगल्या आठवणी, चांगले लोक, चांगले संवाद यांना पुन्हा उजाळा देऊन ती जपून ठेवूया. चांगली नाती, चांगले विचार, चांगले लोक यांना अडगळीत जाऊ न देता त्यांना महत्त्व देऊया. त्यांच्याशी संवाद साधूया. चांगल्या व आपल्या व्यक्तींशी वेळ काढून संवाद वाढवूया.
टाचणी कितीही हलकी व छोटी असली तरी आपण ती फार वेळ हातात धरू शकत नाही. त्याप्रमाणे त्रास देणारी गोष्ट किती लहान असली तरी ती फार काळ मनात राहिली तर त्याची आडगळ होते. या मनाच्या आवारावरीत या गोष्टी बाहेर काढून नवीन क्षण, नाती, विचार व व्यक्ती यासाठी जागा करूया.
या सणाच्या निमित्ताने घराबरोबर मन ही आवरायला घेऊन दुःखाची, त्रासाची, वेदनेची, अपराधीपणाची जळमटे अडगळीच्या कोपऱ्यातून बाहेर काढून चांगल्या क्षणांची, विचारांची, व्यक्तींची जागा सक्षम करून नवीन गोष्टीसाठी मनाची कवाडे पुन्हा एकदा उघडू या.
धन्यवाद!!!!!
© संदिप कोळी
9730410154
sandip.koli35@gmail.com