Saturday, 30 May 2020

सेवानिवृत्ती लेख Retirement

सेवानिवृत्ती लेख

आदरणीय गुरुवर्य……

प्राध्यापिका कु. कुन्ने पुष्पा श्रीकांत.

ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन, पेटाळा, कोल्हापूर.

 --------------------------------------------------------------------------------

 “गुरु माझा ज्ञानाचा झरा, गुरू माझा आसमंत सारा,

  गुरु माझा उन्हात सावली, गुरु माझा साक्षात माऊली.”

                 आज ३१ मे २०२० ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन पेटाळा, कोल्हापूरच्या प्राध्यापिका, आमच्या आदरणीय गुरुवर्य कु. कुन्ने पुष्पा श्रीकांत या आपल्या ज्ञानदानाच्या पवित्र सेवेतून आपल्या विहित वयोमानानुसार आज सेवानिवृत्त होत आहे.

                 ३ डिसेंबर १९६२ रोजी श्रीकांत व लतिका या सुशिक्षित दांपत्याच्या घरी यांचा जन्म झाला. आई शिक्षिका व वडिलांचा व्यवसाय अशा वातावरणात त्यांची व भाऊ संजय यांची जडण-घडण सुरू झाली. प्राथमिक शिक्षण ताराराणी विद्यापीठ कोल्हापूर येथे झाले. त्यानंतर आईच्या नोकरी व वडिलांच्या व्यवसायामुळे कुन्ने कुटुंबीय जयसिंगपूर येथे स्थायिक झाले. इ. ६ वी पासून १० वीपर्यंतचे शिक्षण जयसिंगपूरच्या, जयसिंगपूर हायस्कूल येथे झाले. अभ्यासातील प्रगती व शिक्षणाची आवड या गोष्टीमुळे घरच्यांनीही त्यांचे शिक्षण सुरू ठेवले. ११ वी ते एम.ए पर्यंतचे शिक्षण त्यांनी सांगलीच्या, चंपाबाई ठाकरसिंह विद्यापीठ येथे पूर्ण केले. मराठी व इतिहास विषयात पदवी, तर मराठी या विषयातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. दरम्यानच्या काळात मोकळ्या वेळेत शिवण व टायपिंगचे कोर्से आवडीने पूर्ण केले. बी.ए पूर्ण केल्यानंतर त्यांनी सांगली आकाशवाणी येथे आपल्या सुमधुर आवाजात २ वर्षे निवेदनाचे काम केले. बी.ए व एम.ए पूर्ण करत असताना कॉलेजचे तत्कालीन प्राचार्य संत साहित्य अभ्यासक रेळेकर सर यांच्या वैचारिक समृद्धतेचा त्यांना खूप फायदा झाला. अभ्यासाबरोबर या वर्षात त्यांनी वर्गाचे बिनविरोध प्रतिनिधित्वही केले.

                  शालेय वयापासून एअरफोर्स किंवा शिक्षिका ही दोनच स्वप्न जगणाऱ्या कुन्ने  मॅडम यांनी आईच्या पाऊलावर पाऊल ठेवत शिक्षिका होण्याचे निश्चित केले. त्यासाठी त्यांनी सांगलीच्या, पुतळाबेन शहा कॉलेजमधून बी.एड आणि एम.एड या शिक्षकी पेशासाठी आवश्यक उच्च पदवी प्राप्त केली.

                  सुरुवातीला काही स्थानिक शाळा, जुनिअर व सीनिअर कॉलेजमध्ये शिक्षिका म्हणून काम केल्यानंतर जयसिंगपूर, येथील कल्पवृक्ष शिक्षणशास्त्र महाविद्यालय येथे  प्राध्यापिका म्हणून २ वर्षे सेवा केली. दरम्यान आईच्या वैद्यकीय कारणामुळे त्यांचे हे कार्य काही काळासाठी खंडित झाले. त्यानंतर १९९८ ते २००२ ही ४ वर्ष त्यांनी वारणा कोडोलीच्या यशवंतराव शिक्षणशास्त्र महाविद्यालयात ज्ञानदानाचे कार्य केले. २००२ पासून ते आज अखेर त्यांनी दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या ज्यु. कॉलेज ऑफ एज्युकेशन पेटाळा कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून यशस्वीरीत्या कार्यरत आहेत.

                     शिक्षक हा राष्ट्रनिर्माणाचा मजबूत स्तंभ आणि याच मजबूत स्तंभाला आणखी मजबूत, शिस्तप्रिय, क्षमाशील व कर्तव्यदक्ष बनवण्याचे काम मॅडम २४ वर्ष करत आहेत. आपले ज्ञान, मधुर वाणी, सर्वांशी मिळून मिसळून वागणे, क्षमाशील, उपक्रमशीलता, गुणग्राहकता, नाविन्याची आवड या गुणांनी त्या विद्यार्थीप्रिय व प्रेरणादायी ठरल्या आहेत. ‘आम्ही बी घडलो तुम्ही बी घडा’ या वाक्याचा खऱ्या जीवनाशी संदर्भ लावायला त्यांनी शिकवले. ज्ञानदानाच्या या दोन तपात आदर्श शिक्षक घडवण्याचे कार्य त्यांच्या शब्दांनी केले आहे व हे हजारो आदर्श शिक्षक लाखो आयुष्य घडवण्यासाठी आज धडपडत आहेत. ज्ञानाच्या या प्रवासात त्यांनी अनेक संमेलन, शिक्षण परिषदा, प्रशिक्षणे याठिकाणी तज्ञ मार्गदर्शिका म्हणून मार्गदर्शन केले आहे.

               आदर्श शिक्षक घडवणाऱ्या मॅडम यांची आदर्श शिक्षिका म्हणून अनेक ठिकाणी सन्मान झाला आहे.  महाराष्ट्रातील अनेक नामवंत शैक्षणिक व सामाजिक संस्थांनी त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव व सन्मान केला आहे.

               ज्ञानदानाचे पवित्र कामाबरोबर समाजसेवेचा वसाही त्यांनी घेतला आहे. ‘आडात असेल तरच पोहर्‍यात येणार’ त्याप्रमाणे समाजसेवेचे व्रत त्यांना आपल्या आई-वडिलांकडून संस्कारांनी मिळाले आहे. आपल्या मुलीच्या शिक्षणावर होणाऱ्या खर्चा एवढा खर्च अनाथ व गरीब मुलांच्या शिक्षणावर करणाऱ्या त्यांच्या आईने स्वतःच्या हृदयाची शस्त्रक्रिया झाली असतानाही कारगिल रिलीफ फंडासाठी आपले २ महिन्याचे सेवानिवृत्ती वेतन दिले होते. हा वसा मॅडमनी पुढे चालवला आहे. कॉलेज जीवनापासून प्रत्येक वाढदिनी रक्तदान करणार्‍या मॅडमनी, शेकडो मुलांच्या शिक्षणासाठी प्रत्यक्ष आर्थिक रूपात हातभार लावला आहे. प्रत्येक वर्षी अपंग दिनादिवशी मुकबधिर विद्यालयात वस्तू स्वरूपात भेट देऊन सामाजिक उत्तरदायित्व पार पाडले आहे. त्यांनी आपल्या स्वतःची संग्रही सर्व पुस्तके ग्रंथालयाला दान करण्याचा संकल्प सोडला आहे. याशिवाय उमेद फाउंडेशन मध्ये त्या सक्रिय सहभागी आहेत.  त्यांच्या विचारावर महात्मा गांधी व साने गुरुजी यांचा पगडा आहे, तर  डॉ. प्रकाश आमटे डॉ. अभय बंग, डॉ.रविंद्र कोल्हे  यांच्या समाजसेवेने त्या प्रेरित आहेत. मिळणाऱ्या उत्पन्नातील 50%  रक्कम समाजसेवेसाठी वापरावी हा त्यांच्या आईचा संस्कार त्यांनी जपला आहे.

                  मराठीच्या प्राध्यापिका असणाऱ्या कुन्ने मॅडम यांना वाचन करणे, लेखन करणे,  कविता करणे याची गोडी आहे. विविध ठिकाणे पाहणे, पर्यटन करणे ह्याची त्यांना आवड आहे. मोकळ्या वेळेत टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करण्याचा त्यांना छंद आहे.

                  सेवानिवृत्तीच्या या एका छोट्या विश्रांतीनंतर लेखन व प्रवासासाठी वेळ देण्याचा त्यांचा मनोदय आहे. ‘आई’- या हळव्या कोपऱ्यात बद्दल लिखाण करण्याचा त्यांचा मानस आहे. नोकरीच्या धावपळीत त्यांनी आलेल्या प्रत्येक संकटाला धैर्याने तोंड देऊन कुटुंब भक्कमपणे चालवले आहे.

                  शिक्षक म्हणजे ज्ञानाच्या सागरात मुक्तपणे वावरणारा राजहंस. आपल्या ज्ञानाच्या, कौशल्याच्या व प्रगल्भतेचा जोरावर राष्ट्रासाठी सुज्ञान पिढी घडवणारा दीपस्तंभ. ज्ञानाचा हा दीपस्तंभ सदैव तेवत असतो पण या प्रवासात टप्पा येतो सेवानिवृत्तीचा. विहित वयोमानानुसार व सरकारी नियमानुसार थांबण्याचा संकेत.......

                   आमच्या गुरुवर्य प्राध्यापिका कुन्ने मॅडम आज सेवेतून निवृत्त होत असल्या तरी विद्यार्थी “ बी घडवण्याचे” त्यांचे कार्य आजन्म सुरू राहील. येणाऱ्या काळात त्यांना उत्तम आरोग्य लाभो, त्यांचे संकल्प व त्यांचे समाजसेवेचे व्रत अखंड सुरु राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. या सेवानिवृत्ती प्रसंगी त्यांना खूप खूप शुभेच्छा.....  

------------------------------------------------------------------------------------------------------------------

संदिप कोळी 

97360410154
sandip.koli35@gmail.com


2 comments:

  1. खुपच छान,मॅडमच्या आयुष्याचा जणू आलेखच मांडला, खूप छान लेखन,मॅडमना पुढील वाटचालीसाठी,त्यांचे छंद जोपासण्यासाठी शुभेच्छा
    -अरुणा सोनवणे 2001 -2003ची बॅच

    ReplyDelete

आज : Today

📝 आज.......       आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...