आमची उन्हाळी सुट्टी
सध्या
शाळेच्या मुलांना उन्हाळी सुट्या आहेत. त्यामुळे ही मुले निवांत. अशा सुट्टी पडलेल्या व
सुट्टीसाठी आलेल्या मुलांना मोबाईलवर गेम खेळताना, टीव्ही
पाहताना पाहिले आणि आमची उन्हाळी सुट्टी आठवली.
उन्हाळ्याची
सुट्टी म्हंटले कि मजा, मस्ती आणि धमाल...तशी ही वर्षात 40-45
दिवस मिळणारी ही वर्षातली सर्वात मोठी सुट्टी. परीक्षा संपल्याने,
शैक्षणिक वर्ष संपल्याने डोक्यावर कशाचं ओझं नसायचे उलट नवीन
इयत्तेची, वर्गाची उत्सुकता असायची. अन त्यातच हि उन्हाळी
सुट्टी...
तसं वार्षिक
परीक्षेचा शेवटचा पेपर संपल्यापासून सुट्टीला जाण्याविषयी घरच्याकडे तगादा असायचा.
पण कसे तरी करून पालक ते 1 मे पर्यंत ढकलायचे मग त्यात
वेगवेगळी कारणे आणि प्रलोभने असायची. शेवटी सुट्टीला जायचे ठरले कि कितीही गावांचे
पर्याय दिले तरी मामाच्या गावा इतके हॉट फेव्हरेट ठिकाण कोणतेच नसायचे किंवा आजही
नाही.
लहान
असताना 'झुक झुक आगिनगाडी ' या
बालगीताप्रमाणे आपल्या मामाच्या गावाला जायला रेल्वे असावी असे प्रत्येक लहान
मुलांचे स्वप्न असायचे आणि आमच्या मामाच्या गावाला रेल्वे खरोखर जात होती त्यामुळे
आमची दुहेरी मज्जा. मामाचे गाव (आजोळ) म्हणजे आपले हट्ट आणि लाड पुरवणारे हक्काचे
ठिकाण......
मामाच्या
गावाला गेल्यानंतर ते अगदी सुट्टी संपायच्या अगोदर चार दिवसापर्यंत धमाल, मस्ती, मागे वळून पाहायचे नाही हा अँटीट्युड. सकाळी
उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंतचा सगळा बिझी कार्यक्रम आखलेला असायचा. सकाळी
उशिरा उठायचे मग आपले आटपून सगळी गँग घेऊन मोहीम डायरेक्ट विहिरीवर पोहण्यासाठी.
पोहणे म्हणजे काय फक्त अंघोळी पुरते नव्हे तर चांगला
कंटाळा येईपर्यंत किंवा घरातून कोणीतरी ओरडत येत नाही तो पर्यंत पाण्यातच. मध्येच
कोणी आलाच बाहेर तर मग माती अंगावर टाकायचा जालीम उपाय होताच.
पोहण्याच्या
या दिर्घ व्यायामानंतर पाण्यातून बाहेर आले की पोटात भुकेचे ढोल वाजायचे मग काय
सुसाट घराकडे. मामीच्या हातचे जेवायला. घरात गेल्या गेल्या ताट घेऊन भाकरीच
शोधायची. भले घरात पोहण्याबद्दल कितीही ओरडो आपण आपले पोट भरायचे. भाचा म्हंटले कि
मामा-मामीचा आवडता पाहुणा त्यामुळे खाण्याची चंगळ असायची. भरलेल्या पोटावरुन हात
फिरवत दुपारचे नियोजन. बाहेर कडक ऊन असल्याने घरातले ओरडतात म्हणून कुठेतरी
झाडाखाली किंवा सावलीच्या ठिकाणी कॅरम, पत्ते, सापशिडी, व्यापार यासारखे खेळ रंगायचे.
जुन्या वह्यांचे पुट्ठे काढून त्याचे घर, मनोरे
तयार करायचो.खेळताना चिडा-चिडी व्हायची आणि त्याचा शेवट रुसा-फुगीत व्हायचा. पण तो
तेवढ्यापुरताच क्षणात येणारा राग आणि त्यापेक्षाही वेगाने तो विरघळणारा.
चारच्या दरम्यान उन्हाचा जोर कमी झाला की क्रिकेट चा डाव मांडायचो. शंभर
नियम आणि अटी मध्ये हा खेळ खेळायचो. तरीही त्यात मजा असायची. मग संध्याकाळच्या
वेळेला शेतात आंबे, जांभळे, याच्या कडे
विशेष मोर्चा असायचा.संध्याकाळच्या वेळी सुटणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडाला
पिकलेले नैसर्गिक, रसाळ, गोड आंबे
मिळायचे त्यासाठी वारा सुटला कि आमचा ठिय्या झाडाखालीच.यात अंधार कधी पडायचा हे
देखील समजत नसायचे. रात्री सर्वांबरोबर अंगणात जेवायला बसण्याचा आनंद काही औरच.
कापड लावलेल्या कळशीतले थंड पाणी आणि मोकळ्या आभाळाखाली मामीच्या हातचे जेवण याची
सर कशात नाही. जेवल्यानंतर कधी झोप यायची हे समजायचे नाही.
असा
सगळा खटाटोप असायचा दररोजचा, यात कधी बदल असायचा, कधी दिवसातून दोन- तीन वेळा पोहणे व्हायचे, कधी
मामाच्या बरोबर शेतात दिवस जायचा, शिवाय कधी रानमेवा करवंदे,
चिंचा याकडेही दौरा असायचा शिवाय सायकल हेही साथीला असायची. लपाछपी,
सूरपारंब्या, लगोरी, गोट्या
हेही खेळ रंगत वाढवायचे. अशा एक ना अनेक थरारक प्रयोगांनी जर वर्षीची सुट्टी
नटलेली असायची.
आताच्या
मुलांकडे बघितले की कुठेतरी ती मजा, तो आनंद ही मुले मिस
करतायत याची लख्ख जाणीव होते. टी. व्ही , मोबाईल, तंत्रज्ञान आणि काळजी यात मुलांच्या बालपणाचा हा सुखद ठेवा कुठेतरी हरवत
चालले आहे . काळाच्या या बदलत्या ओघात बालपण हरवत चाललंय हे नक्की.......
-----------------------------------------------------------------------------------------------------
©संदीप कोळी
9730410154
sandip.koli35@gmail.com
Golden days
ReplyDeleteमिडीया मुळे सगळ हरवत गेल
माणुस आभासी दुनियेत रमत आहे