Monday, 11 May 2020

कनोरा Corona

        (वाचताना फार तर्क करून विचार करू नका, फक्त मनोरंजाचा हेतू)
                         कसलं हरकलो  हुतो आमी 2020 आल्यावर, यावर्षी IPL, वर्ल्ड कप सुट्टी नाय म्हणून म्हणलं तर आमालाच सुट्टी मिळाली. त्यो कुठन ईमानातन कनोरा आला अन आमच्या बोकांडी बसला. पहिल्यांदा ऐकलं तवा काय कळलच नाही जाऊ दे जगाची वरात कशाला येतिय आमच्या घरात म्हणून आमी ध्यानच दिलं नाय. पण असं म्हणत म्हणत कनोरा पाक आमच्या दारापर्यंत आला. खालच्या गल्लीच ‘पक्या’ सांगत हुत म्हण लोग काय काय मारून खात्यात. त्यातनच ह्यो कनोरा आलाय. पहिल्यांदा तो बारक्या डोळ्यांच्या माणसांसणी झाला अन त्येनी खिरापत वाटल्यागत सगळ्या जगाला वाटला.  
                तरी बरं आपल्याकडे देश लवकर बंद केलंत्येला नायतर आपल्याकडं धुरळाच उडला असता. उभ्या जन्मात कधी थंड न बसणाऱ्यासनी पण गप घरात बसायला लागलय. त्यातन बी आगाऊपणा केला तर पुलीस सप्पय सुजवत्यात. मागच्या आठवड्यात ‘किश्या’ माव्याची तलब झालती म्हणून मेडिकलच कारण करून गेलं खरं पण येताना मावा नाय, पण पाठीवर मोफतच वळ घिऊन आलंय. मागच्या आळीचं 'परद्या' 'मला कोण काय करतय?'  म्हणून हवा करायला गाडी घिऊन गेलत पुलिसांनी त्याचीच हवा काढलीय. दोनी मांड्या सुजवल्यात अन गाडी बी काढून घेतल्या. घरात आल्यावर गाडी काढून घितली म्हणल्यावर त्येच्या बा न बी लय हाणला. बिचाऱ्याला नीट बसायला येत नाय अन लंगडत चालतय ते येगळचं.
                  ह्या लाक डाउनच्या काळात सगळी घरात खुडूक हायती. सकाळी उठायचं, आवरायचं, जेवायचं, दुपारी झोपायचं, उठायचं, जेवायचं आणि झोपायचं यातच दिवस समतुय. घरातली बी अमास्नी पार वैतागल्यात. आमची गुण बघुन घरातली काय काम बी सांगत नाहित. 'मक्या' तर म्हणत हुता आता लोक डाऊन उठलं की आठ दिस घराकडेच येत नाय.
                  कॅरम खिळून खिळून त्याचा बी रंग गेलाय. तेच्याकड बघुन कधी-कधी वाटतय कि त्यो बी म्हणत असणार "मालक जरा तरी सोडा मला." पत्त्याची पान बी फाटली नवीन पण मिळणात. घरातल्या खिडक्या, पडद, पायऱ्या अन कुंडीतली झाडांची पानं मोजून झाली. एवढं वेळ असून बी पुस्तक उघडल की पेंग अपुआप येतूय. त्यांत परीक्षा छाप-काट्यासारखी एकदा हुनार, एकदा नाय म्हणून टेन्शन. तस परीक्षेचं टेन्शन आमी घेत नसतो, पण घरच्यासनी दाखवायला नाटक करायला लागतय नाहीतर घरात कुठलाबी विषय आमच्यावर इऊन आदळतोय.
                   मास्क-बिस्क लावायच आम्हास्नी काय जमना झालंय. आमची 'म्हातारी आय' तर मास्क घातलेल बघितलं की म्हणतीय “त्येबक माझं खोंड आलं मुसक घालुन.” या मास्क मूळ कोण वळखना झालाय, कोण हात करून जातय ते बी कळत नाय.
                 या कनोरामूळ अफवा तर एवढ्या आल्यात की आता नुसत्या अफवा ऐकून-ऐकून कनोरा हुतुय की काय असं वाटतंय. कोण सांगतय कनोरा हवेतन उडूत येतूय.  कोण म्हणतय वळवाच्या पावसातन येतूय. शेजारची काकू तर म्हणत हुती कनोरा झाला की माणूस मरतुय अन त्याच्याजवळ गेलं की जाळ हुतुय. पलीकडची आजी म्हणत हुती कनोरा झाला की किडच पडत्यात म्हण. या असल्या वाढीव अफवामुळं आमच चिकन- मटण बंद झालय. चिकन खाल्ल की कनोरा हुतुय म्हणून घरातली चिकन बी आणना झाल्यात.जीभला पाक बाबळी आलीय. या कनोरापेक्षा या अफवच्या पतंगाचा वैताग आलाय. 
                  माणूस खोकला तरी गाव भितुय. अन लगेच अफवा. असल्या वाढीव अफवापेक्षा ती मोबाईलवर सांगत्याल्या बाईच ऐकलं तरी बास हुतय.  हात-पाय साबणाण धुवायचं.  कुणाला लय जवळ जायचं नाय अन ताप, खोकला, सर्दी झाली की दवाखान्यात जायचं. एवढं पाळलं तरी लय झालं आपल्याच्यानं. 
                आपली अवस्था पिंजऱ्यात डांबून ठेवलेल्या जनावरासारखी झाली असली तरी ते आपल्यासाठी फायद्याचं  हाय. नायतर 'नाय अडत नाय तटत' म्हणत कनोरा झाल्यावर आपण बाराच्या भावात जायचो. म्हणून सरकार, डॉक्टर, पुलिस आपल्या फायद्यासाठी सांगत्यात ते एकूया अन हे कनोराचं ईमान जिकंडन आलंत तिकडं पठवुया. ' एव्हरीबडी से खच्याक कनोरा ढिचक्याव' 

©संदिप कोळी.
Sandip.koli35@gmail.com




No comments:

Post a Comment

आज : Today

📝 आज.......       आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...