🌸भावनाशून्यतेच्या जगात..
आकाशगंगेच्या मनात आले नि ग्रहांच्या फिरण्याबरोबर त्यांना नवनिर्मितीचा नाद लागला. मंदाकिनीमधील आठ ग्रहांपैकी पृथ्वीने जगाच्या कल्याणाचे फारच मनावर घेतलं व स्वतःला सजीवांचे निर्मितीसाठी सज्ज केले. वातावरणातील अनेक बदलाचे प्रयोग करून शेवटी पृथ्वीने पाण्यात आपल्या पहिल्या अपत्याला जन्म दिला आणि पृथ्वीच्या लेकरांचा गोतावळा वाढत गेला. पृथ्वीवरील सजीवांचा गोतावळा लाखोच्या घरात गेला व या सर्वांना पृथ्वीने मायेने सांभाळले आहे.
आपली म्हणजे पृथ्वीच्या सर्वात हुशार लेकराची निर्मिती साधारण 2 ते 5 दशलक्ष वर्षांपूर्वी झाली. आपण पृथ्वीवर आलो तेच सर्वांच्यापेक्षा वेगळे आणि त्यात निसर्गाने आपल्यावर इतकी कृपादृष्टी दाखवली की आपण इतर सजीवांच्या तुलनेत बौद्धिक, भावनिक व सामाजिकदृष्ट्या खूप संपन्न झालो.
डार्विनच्या उत्क्रांतीच्या सिद्धांत : नैसर्गिक निवड (Survival of the fittest) हा इतर प्राण्याप्रमाणे आपल्याला लागू होतो. जो सक्षम असेल तो जगण्यास पात्र आहे असे सांगणारा हा नियम जरी असला तरी इतर सजीव व आपल्यामध्ये या नियमाचे अनेक वेगळे पैलू आहेत.
भावनिकतेच्या जगात इतर सजीवांच्यापेक्षा अतिउच्च टोकावर असणारे आपण इतर प्राण्याप्रमाणे भावनाशून्य अजिबात नाही. सामाजिक आणि भावनिक पातळीवरील जडणघडण आपल्याला इतर प्राण्यांच्यापेक्षा वेगळे व वैशिष्ट्यपूर्ण करत आहे, पण काळाच्या ओघात आपल्यात ही खूप बदल झाले आहेत. माकडापासून माणूस झाल्यानंतर सुरु झालेल्या प्रगतीचा आलेख प्रचंड वेगाने वरती जात आहे. या आलेखानुसार बौद्धिक व सामाजिक स्तरावर आपण डोळे दीपवणारी प्रगती केली आहे, पण भावनिक स्तरावर झालेली अधोगती डोळे शरमेने झुकवणारी ठरत आहे.
प्रगतीच्या नावाखाली भावनिकतेची होणारी हेळसांड मानव म्हणून आपल्या प्रगतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरू लागली आहे. पूर्वी आपण वस्तू वापरत होतो व माणसांवर प्रेम करून भावना जोडत होतो, पण तंत्रज्ञानाच्या प्रगतीत यंत्रामध्ये भावना फुंकता- फुंकता आपल्या माणसातील भावनिकता, माणुसकी कुठे उडून गेली हे आपल्या लक्षातही आले नाही. त्यामुळे आपण सध्या माणसे वापरतोय आणि वस्तूवर प्रेम करू लागलो आहोत.
प्रगती, प्रतिष्ठा, आत्मनिष्ठ, स्वअभिमान याच्या नावाखाली आपण किती मोठ्या प्रमाणावर भावनिक अध: पतनाकडे निघालो आहे याची जाणीव आपल्याला होत नाही आहे. समाजात सुरू असलेले द्वेष, धर्मात सुरू असलेले कलह, देशांच्यामध्ये सुरू असलेले वाद- विवाद, खोट्या प्रतिष्ठासाठी होणारे गुन्हे, अमानुष छळांचे होणारे समर्थन आणि उदात्तीकरण हे कोणत्या प्रगतीची लक्षणे आहे याचा आपण बारकाईने ठाव घ्यायला हवा.
सध्या आपल्याकडे बौद्धिक क्षमतेची अजिबात कमतरता नाही, पण माणूस म्हणून आवश्यक असणारी भावनिक क्षमता व सामाजिक क्षमता आपण तपासायला हवी. आधुनिकीकरणात तंत्रज्ञानाच्या अतिउच्च प्रगतीत आपण सजीव म्हणून किंवा माणूस म्हणून असणारी मूलभूत भावनिक कौशल्य विसरायला लावणाऱ्या अनेक घटना दररोज मनाला हेलावून टाकत असतात. त्या घटना वाचत असताना किंवा ऐकताना खरच हे माणसाचे कृत्य आहे का? याचा प्रश्न पडतो.
प्राणी ही गरज नसताना व आवश्यकतेपेक्षा जास्त शिकार करत नाही, पण आपण माणूस नावाचा प्राणी आपल्या भावनिक विकलांगतेचे दर्शन दाखवून अमानुष अत्याचाराचे उदात्तीकरण सध्या करत आहोत. हा तोच माणूस आहे का, की ज्याच्या समोर हृदयद्रावक प्रसंगाचे वर्णन जरी केले तरी डोळ्याच्या कडा नकळत पाणवतात हा प्रश्न सध्या उभा राहत आहे.
तंत्रज्ञानाच्या विकासावर मानवाच्या प्रगतीचा आलेख मोजत असताना समाजातील भावनाशून्यता दाखवणाऱ्या घटना आपल्या भावनिक अधोगतीचे लक्षण आहे. माणूस म्हणून या पृथ्वीचे लाडके अपत्य म्हणून आपल्याला कौतुकाने मिरवायचे असेल तर भावनिकता व सामाजिकतेच्या कसोटीवर खरे उतरून माणुसकीचा आलेख उंचवावा लागेल.
🖊️ संदिप...
sandip.koli35@gmail.com
No comments:
Post a Comment