Saturday, 24 May 2025

Digital Disconnect (डिजिटल डिस्कनेक्ट)

🌸 Digital Disconnect (डिजिटल डिस्कनेक्ट)
               परवा अशीच एक मजेशीर, पण विचार करायला लावणारी घटना घडली. सहज एका जवळच्या व्यक्तीने फोन केला आणि विचारले अरे नेट का बंद आहे तुझे???
                 प्रश्न सोपा, सरळ व साधा होता, पण मला ही काहीतरी मोठी चूक झाली असे वाटले, की अरे मोबाईल चे नेट बंद कसे काय ठेवले मी???
               गंमतीचा विषय बाजूला ठेवला तर हा प्रश्न साधा ही नाही, सरळ ही नाही आणि सोपा तर अजिबात नाही, कारण तो आपल्या दैनंदिन जीवनातील यक्ष प्रश्न म्हणून उभा ठाकला आहे. 
          बारकाईने आपणच मोबाईल नावाच्या आरशात आपल्या स्वतःला पाहिले तर त्या मोबाईलच्या प्रेमात आपण नखशिखांत बुडालेलो आहोत याची लख्ख जाणीव मोबाईलच आपल्याला करून देतो. पूर्वी मोबाईल आपल्या सोबत असत होता, पण आता आपण मोबाईल सोबत आहोत. पूर्वी आपल्याला हवे ते मोबाईलवर आपण पाहायचो, पण आता मोबाईलचा algorithm आपल्याला त्याच्यानुसार किंबहुना आपल्या मूडनुसार काय पाहिजे ते दाखवतो. खरेदी करायच्या विषयात पण आपल्याला पाहिजे असणारी गोष्ट मोबाईल मात्र त्याच्या आवडीने आपल्याला खरेदी करायला लावते. 
                या सर्व गोष्टी आता आपल्या अंगवळणी पडलेल्या आहेत. त्यातील कितीही तोटे व धोके परिचित असले तरी आपल्याला ते धोके पचवून, तोटे सहन करत 'खतरो के खिलाडी' होण्याचा चंग आपण बांधलेला आहे. 
              हे सर्व जरी खरे असले तरी आपण थोडे शांतपणे विचार केला तर आपल्या लक्षात येईल की आपल्या फोनचे इंटरनेट आता दिवसभर व काही जणांचे तर 24 तास सुरू असते. पूर्वी आपण गरजेनुसार इंटरनेट वापरत होतो. आता इंटरनेट आपला गरजेप्रमाणे वापर करत आहे. महिन्याभराचा डेटा पॅक आपण आवश्यकतेनुसार सांभाळून खर्च करत होतो, पण डिजिटल क्रांती झाली आणि 1.5 GB आणि अनलिमिटेड डेटा च्या मोहपाशात आपण अडकलो. आता कितीही व कसे इंटरनेट वापरले तर ते संपतच नाही या धारणेवर आपण इंटरनेट बंदच्या बटनाकडे फिरकायचे बंद केले आहे. 
                 काही वर्षांपूर्वी whatsapp ला एखादा महत्त्वाचा मेसेज जरी पाठवला तरी ती व्यक्ती ऑनलाईन येण्याची वाट पाहत बसावी लागे किंवा त्याला फोन करून मेसेज बघ म्हणून सांगावे लागे, पण आता मेसेज पडला की लगेच डबल टिक येते म्हणजे मेसेज पोहोचला व आपण निश्चित झालो. आता हे सर्व इतक्या अगवळणी पडले आहे की मोबाईलचे इंटरनेट काही काळ जरी बंद केले तर आपण काहीतरी महत्त्वाचे गमावत आहोत याची टोचणी मनाला लागते. 
                 इंटरनेट व मोबाईलच्या तालावर नाचताना खरंच थोडी विश्रांती आपल्याला हवीच की आणि त्यासाठी दिवसभरात काही काळ इंटरनेट बंद ठेवून हा डिजिटल power nap घ्यायला काय हरकत आहे? नाहीतर हे फार वेळ आपल्याला ठेवता येणार नाही. कारण मोबाईल आपल्याला त्याच्या अदानी प्रेमाच्या जाळ्यात खेचायला तयारच आहे. 
             थोड्या वेळासाठी का असेना पण डिजिटल डिस्कनेक्ट व्हायला हरकत काय आहे? आपण दिवसभर जगाच्या अंगणात दरवळत असतो. डिजिटल डिस्कनेक्ट होऊन काही क्षण स्वतःच्या अंतर्मनात स्वतःला वेळ देण्याची बातच काही और आहे. म्हणूनच म्हणतो 'करके देखो अच्छा लगता है।' 
धन्यवाद!!!

🖊️ संदिप...
sandip.koli35@gmail.com

No comments:

Post a Comment

मन ही आवरायला घेऊया

           वातावरणात बदलाचे वारे वाहू लागले आहे. आजूबाजूला उत्साहाचे उधाण आले आहे आणि मनामनात आनंदाच्या लहरी उमटत आहे. दिवाळी तोंडावर आली आह...