नात्याची घट्ट गाठ
दोन सामान्य शेतकरी. सख्खे शेजारी. आपल्या कामात प्रचंड प्रामाणिक उत्साही. दोघे एक दिवस ठरवतात की आपण आपल्या परसबागेत एकाच जातीचे फळाचे रोप लावूया. ठरलेल्या गोष्टीवर अंमल करण्यासाठी दोघांनी नामवंत रोपवाटिकेतून जातिवंत रोपाची निवड करून आपापल्या परसबागेत योग्य पद्धतीने त्याची लागण केली. दोन्ही रोपांचा फुलण्याचा प्रवास सुरू झाला.
निसर्ग नियमाने दोन्ही रोपे मोठी होऊ लागली. पहिला शेतकरी दररोज त्या रोपाला वेळ द्यायचा. त्याच्या प्रत्येक गोष्टीचे बारकाई निरीक्षण करून त्याची दखल घेत होता. प्रत्येक वेळी अनावश्यक गोष्टी बाजूला काढणे. एखादी फांदी जरी वाकडी आली असेल तर ती काढून टाकत असे. रोग पडू नये म्हणून आधीच त्यावर सर्व प्रकारचे औषध फवारणी. भुंगे, किडे, फुलपाखरू यांचा त्रास होऊ नये म्हणून त्या भोवती बारीकशी जाळी त्याने लावली. एकंदरच शक्य तितके त्यांनी त्या झाडाची काळजी घेऊन त्याला हवे तसेच त्या रोपाचे झाड त्यांने घडवले.
याउलट दुसरा शेतकरी रोपांची काळजी घेत होता. त्याला पाणी, खत आवश्यकतेनुसार पुरवत होता. रोग आल्यावर आवश्यक तेच औषध फवारणी करत होता. त्याचेही झाड मोठे झाले.
शेवटी तो हंगाम आलाच. ज्यासाठी या दोघांनी अट्टाहास केला होता. दोघांचीही झाडे मोहराली . दोघेही आनंदी झाले, पण प्रत्यक्ष फळ लागले व त्याचा दर्जा पाहिला तर पहिल्या शेतकऱ्याच्या झाडाला मोजकीच व अत्यंत सामान्य दर्जाची फळे लागली. उलट दुसऱ्या शेतकऱ्याचे झाड फळांनी वाकले होते व फळांचा दर्जा अपेक्षित दर्जापेक्षा चांगला होता.
गोष्ट फळांच्या झाडाची असली तरी आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. नात्यांची वीण घट्ट करत असताना आपल्याकडून नकळत त्या पहिल्या शेतकऱ्यांसारखे तर होत नाही ना? हे तपासायला हवे. कोणतेही नाते टिकते ते काळजी, विश्वास आणि स्वातंत्र्य यावर आणि ती फुलण्याची शक्यता या तीन गोष्टींच्या तीव्रतेवर अवलंबून असते. कोणती गोष्ट कितीही चांगली असली तरी ती अधिक प्रमाणात झाली तर तिची परिणामकारकता कमी होते किंवा त्याचा परिणाम उलटा व्हायला लागतो.
कोणतेही नाते असो त्यामध्ये काळजी, विश्वास व स्वातंत्र्य हे प्रमाणात असेल तर ते फुलते, नाहीतर अतिकाळजी किंवा दुर्लक्ष, अतिविश्वास किंवा अविश्वास, स्वातंत्र्य किंवा शिस्तीच्या नावाखाली लावलेली निर्बंध यामुळे नाते कदाचित सोबत राहील पण ते फुलेलच असे नाही. आणि ही गोष्ट दोन्ही बाजूंकडून होणे गरजेचे आहे. नात्यात प्रयत्नांची तीव्रता कमी जास्त झाली तरी दोन्हीकडून मिळून 100% प्रयत्न होणे गरजेचे आहे. अन्यथा त्यातला आपलेपण निघून मिरवण्यापूर्ती औपचारिकतेची कोरडी झालर शिल्लक राहते.
पहिल्या शेतकऱ्यांने नाते जपले, पण ते अतिकाळजी, अविश्वास व शिस्तीच्या नावाखाली निर्बंध लावले. दुसऱ्या शेतकऱ्याने जपलेले नाते काळजी, विश्वास व स्वातंत्र्य या तिन्ही बाबीवरून तोल सांभाळून होते. म्हणून त्याला त्यात अपेक्षेपेक्षा भरपूर मिळाले. उलट पहिल्या शेतकऱ्याला अपेक्षित गोष्टीही मिळाल्या नाहीत.
शेवटी नाते कोणतीही असो ते जिवंत घटकांशी संबंधित असते आणि ते टिकवण्यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न व दोघांचा समजूतदारपणा गरजेचं असतो. शेवटी टिकवणाऱ्याकडे हजार कारणे असतात नाते टिकवण्याची व न टिकवण्यासाठी एकच पुरेसे असते निघून जाण्यासाठी...
🖊️ संदिप...
sandip.koli35@gmail.com
No comments:
Post a Comment