जागतिक पालक दिन
आज 1 जून जागतिक पालक दिन यानिमित्त हा थोडासा शब्दरूपी संवाद...........
मूल होण्यापूर्वी आपण स्त्री-पुरुष असतो. नवरा-बायकोच्या नवीन नात्याची
ओळख होईपर्यंत आणखी एक वेगळ्या भूमिकेची जबाबदारी आपल्यावर येते. मूल हे
नवरा-बायकोला आई-बाबा होण्याची संधी देते. बाळ होणे व ते मोठे होऊ लागणे यातूनच
आपले पालकत्व घडू लागते. हा अनुभव खूप हळुवार आणि तरल असतो. हे निसर्गातही घडत
असते. प्रत्येक आई-वडिलांना होणाऱ्या बाळा मुळे नवनिर्माणाच्या आनंदाबरोबर
पालकत्वाची मोठी जबाबदारी येते.
पालकत्व, सजग पालकत्व,
सुजाण पालकत्व, मुलांवरील संस्कार, बालमानसशास्त्र या विविध संकल्पना सध्या आपल्याला आपल्या पालकत्वाच्या
मोठ्या जबाबदारीची जाणीव करुन देतात, पण जुनी -वयस्क माणसं
नेहमी म्हणतात “आमच्या वेळी नव्हतं असं काही, मुलात मूल मोठं व्हायचं.” त्यांच्या भूमिकेतून ते ही
खरे आहे की, तो काळ, त्यावेळीची
कुटुंबरचना, समाजरचना महत्त्वाची होती.
मुख्यता: मुलांना सोबत होती. सध्याच्या परिस्थितीप्रमाणे मुलांना अपेक्षांच्या
ओझ्याखाली अपेक्षापूर्तीसाठी झगडावे लागत नव्हते, पण काळ
बदलला आणि ‘Change is the rule of nature’ याप्रमाणे
पालकत्वातही बदल झाला. पूर्वीच्या ‘मुलं म्हणजे भगवंताचा
प्रसाद’ मानण्याला अपेक्षा व जबाबदारीची किनार लाभली व सजग
पालकत्व व मुलांवरील संस्कार याची गरज निर्माण झाली.
लहान मुलांच्या बाबतीत नेहमी वापरले जाणारे एक वाक्य म्हणजे ‘लहान मुले म्हणजे मातीच्या गोळ्यासारखी असतात. कुंभार ज्याप्रमाणे
मातीच्या गोळ्याला आकार देतो, तसा मुलांनाही आकार देता येतो.’
पण थोडा बारकाईने विचार केला तर हे थोडे
न पटणारे आहे. माती निर्जीव असते. आपण दिलेल्या आकारावर तिची कोणती प्रतिक्रिया
नसते, पण आपला पाल्य सजीव आहे. त्याला स्वतःचं अस्तित्व आहे.
भावना आहेत. विचार आहेत. संवेदना आहेत आणि म्हणून आपण आपल्याला हवा तसा आकार
देण्यापेक्षा पाल्याचा विचार करून त्याला हवे त्याप्रमाणे घडवणे ही पालकत्वाची
जबाबदारी आहे. यासाठी आपल्या बाळावरील संस्कार हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे.
मूळात संस्कार कशाला म्हणायचे? हाच मोठा गोंधळ आहे. काही
पालकांच्या मते रिवाज पाळणे, रिती-भाती पाळणे, पाठांतर, काही म्हणता येणे, आपल्या
आई-वडिलांचे ऐकणे म्हणजे संस्कार, पण यातच आपण चूक करतो.
संस्कार हा खूप व्यापक शब्द आहे. स्वच्छता,
नीटनेटकेपणा, संवेदनशीलता, आदर, स्वातंत्र्य, अभिव्यक्ती,
दुसऱ्याला मदत करणे, विनम्रता, प्रेम, कौतुक, हे सर्व
संस्कारच आहेत. थोडक्यात आपल्याला आपल्या मुलाला माणूस म्हणून घडवणे म्हणजे खरा
संस्कार होय .पालक म्हणून आपण तो कशा पद्धतीने करतो हे महत्त्वाचे.........
सध्याच्या २१ व्या युगात
जबाबदार पालक म्हणून आपल्या मुलांच्या सर्व गोष्टीत सकारात्मक लक्ष देणे ही काळाची
गरज बनली आहे. मुलांना समजून घेणे व त्यांना समजून देणे हा सतत चालणारा प्रवास
आहे. मुलाचे त्याचे असे विश्व असते. ‘जसे फुल उमलताना त्याचा
सुगंधाचा गाभा असतो तिथपर्यंत जायचे नसते.’ त्याप्रमाणे
मुलांना आशय असतो तो आपण ढवळायचा नसतो. नाहीतर मुलांमधील अस्वस्थता कधी नकारातून,
कधी निराशेतून तर कधी आक्रमकतेमधून व्यक्त होऊ लागते. यासाठी पालक
म्हणून आपण ही काळजी घ्यायला हवी. आपण झाड लावतो. झाडाला पाणी घालतो. कीड लागू नये
म्हणून शक्य तेवढी काळजी घेतो. बाकी सगळे प्रयत्न झाडाचे असतात. म्हणजे झाडाचा
आकार, पानाचे फुटवे, फुलांचे उमलणे,
फळांचा गोडवा या सर्व गोष्टी झाडावर अवलंबून असतात. आपण फक्त योग्य
काळजी घ्यायची असते. मुलांचेही तसेच असते. आपण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी
ती म्हणजे, आपली मुले ही आकार घेणारा एक सजीव आहे.
जगण्याच्या या संघर्षात त्याला सक्षम बनवणे हे आपले कर्तव्य आहे.
‘Give a Man a
Fish, and You Feed Him for a Day.
Teach a Man to
Fish, and You Feed Him for a Lifetime’
ही छोटीशी चीनी म्हण
आपल्याला सांगते की आपल्या मुलांना आयुष्यभराच्या
गोष्टीसाठी तयार ठेवा आणि यासाठी आपण केलेले हे संस्कार त्यांना नक्की उपयोगी
पडतील.
शेवटी आपण आपल्या मुलांचे
मालक नसून पालक आहोत याची मनाशी कायम खूण गाठ बांधून त्यांना सदैव एकाच चेहऱ्याने
वावरायला व जगायला शिकवले पाहिजे. पालक म्हणून आपल्या मुलांला घडवताना त्यांना
आयुष्यभर पुरेल व जगण्याच्या प्रवासात नेहमी साथ देईल अशा संस्कारांची शिदोरी
मुलांना देणे हीच आपली जबाबदारी व आद्य कर्तव्य आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
© संदीप कोळी.
📱9730410154
sandip.koli35@gmail.com
Very nice 👌
ReplyDelete