Friday, 8 May 2020

सायकल Cycle

सायकल
अभी अभी कुछ गुजरा है लापरवाह सा
धूल में दौडता हुआ,जरा पलट कर देखा
बचपन था शायद1”
                               सायकल आपल्या प्रत्येकाचे  पहिले प्रेम. किमान 2000 साला पूर्वी जन्मलेल्या प्रत्येकाला वयाच्या कोणत्यातरी टप्प्यावर सायकलचे आकर्षण नक्कीच होते, किंबहुना आजही मनाच्या एका कोपऱ्यात तिच्याविषयीचा जिव्हाळा नक्कीच अबाधित आहे. आईच्या कमरेवरून आणि बाबांच्या खांद्यावरून खाली उतरून स्वतःच्या पायावर उड्या मारताना आकर्षित करणारे सायकल हे पहिले वाहन होते. त्यावेळी आतासारखी रस्त्यावर दुचाकीची रेलचेल नव्हती. त्यामुळे सायकलचे महत्त्व कित्येक पटीने जास्त होते. सर्वसामान्यांना परवडणारी त्या वेळचे एकमेव वाहन होते. चालण्यापेक्षा वेगाने प्रवास, शिवाय शारीरिक व्यायाम यामुळे सायकल सर्वसामान्य मध्यमवर्गात अतिशय लोकप्रिय होती.
                           सायकल वापरण्यासाठी आधी ती चालवायला शिकावी लागेआणि सायकल शिकणे म्हणजे काय होते हे मागच्या चाकाला आधाराची दोन चाके लावून न पडता मिरवणाऱ्या आजच्या मुलांना करणार नाही. पडल्याशिवाय आणि कोपर-गुडघा फुटला शिवाय सायकल शिकता येत नाही अशी आमची श्रद्धा होती आणि बहुतेक वेळा पडणे हे ठरलेले होतेकारण त्यावेळी तीनच प्रकारच्या सायकली होत्या२२ इंची२४ इंची आणि लेडीज सायकल ज्या फक्त मोठ्या व्यक्तींना वापरता येतील अशाच उपलब्ध होत्या. त्यामुळे शिकताना धडपड ही व्हायचीच.
                     सायकल शिकणे हा आमच्या वेळी खूप मोठा कोर्स होता. सुरुवातीला काही दिवस आम्ही फक्त सायकल धरून फिरवत असू. झेपते की नाही हे बघण्यासाठी. नंतर सायकलच्या पॅडल वर एक पाय ठेवून दुसर्‍या पायाने जमीन ढकलून पुढे जाण्यात काही दिवस जायचे. मग तिसऱ्या टप्प्यात नळीतून पाय घालून दोन्ही पॅडल अर्धे-अर्धे मारणे हा खूप मोठा टास्क असे. सायकल शिकताना पडण्याचा हा खरा टप्पा, कारण सायकलचा तोल सांभाळणे, पुढे बघणेपॅडल मारणे, या तीन क्रिया एका वेळी कराव्या लागत त्यामुळे बहुतेक जणांचे कोपर-गुडघे याचवेळी फुटत होते. हे करताना घरातील मोठे कोणीतरी किंवा मित्र सायकल पाठीमागून धरत व तू चालव बिनधास्त म्हणून हळूच सोडून देत. ही क्रिया यशस्वीरित्या पार केल्यानंतर पुढचा टप्पा म्हणजे पॅडल पूर्ण गोलाकार फिरवणे. हे जमले की सायकल चालवायला शिकलो, पण किती दिवस असे नळीतून चालणार मग आता नळीवरून पाय टाकून सायकल चालवणे ही पुढची पायरी. मला आठवते मी सायकल चालवायला न गुडघा-कोपर फुटता शिकलो, पण ज्यावेळी नळीवरून पाय टाकून शिकण्याचे धाडस केले. त्यावेळी वरून पाय दुसऱ्या बाजूला जाईना आणि मी तसाच डायरेक्ट एका खड्ड्यात जाऊन उतरलो. म्हणूनच म्हणतोय सायकल शिकताना पडावे हे लागत होते. शास्त्र होत ते.................
                           त्यानंतर मग फायनल टच, सीटवर बसून सायकल चालवणे हे झाले, की तुम्ही यशस्वीरित्या सायकल शिकला हे सगळ्या गल्लीला कळायचे. परीक्षेत नंबर आल्यासारखे सायकल शिकलोहे आम्ही सर्वाना सांगत सुटायचो. मग यात स्वतःची कलात्मक सुधारणा म्हणून कॅरेजवरून सायकल चालवणे, हात सोडून सायकल चालवणे, टिब्बल सीट सायकल चालवणे असले आगाऊपणा करत होतो.
                           आता मुलांना दोन-तीन वर्षापासून विविध आकारात  रूपात सायकल उपलब्ध होतात. आम्हाला मात्र आयुष्यात लाईफ टाईम एकच सायकल मिळायची त्यामुळे तिचे महत्त्व खूप होते. काही जणांना ती ही मिळत नसे अशा वेळी आम्ही १-२ रुपयाला एक तास अशी भाड्याने सायकल घेऊन फिरत असू. त्यासाठीही सायकल दुकानदाराकडे वेटिंग असे. १ रुपयात मिळालेली सायकल फिरवताना ना उन्हाचा त्रास होता ना तहान-भूकेची जाणिव. सायकल ची उपयुक्तता आमच्यासाठी खूप होती. शाळेत जाणे, मित्रांसोबत फिरायला जाणे, शेतातून ओझे बांधून आणणे, बाजार, दुकानचे साहित्य आणणे यासारख्या अनेक कामात ती सदैव सोबत होती. पंपाने चाकात हवा मारताना जो त्रास व्हायचा तो नंतर सायकल चालवण्याच्या आनंदात विरून जात होता.
                       आताही मुले सायकल वापरतात पण त्यासाठी त्यांना एवढी कसरत करावी लागत नाही, शिवाय १२-१३ वर्षांची झाली ती घरातील मोटरसायकलमुळे सायकलवरचे प्रेम घट्ट व्हायच्या आधीच ती अडगळीच्या जागेत पडते व तीची  जागा दुचाकी घेते.
                        असो प्रत्येक पिढीतील प्रगतीची वैशिष्ट्ये वेगवेगळी असतात. आज आपण वेगवेगळ्या प्रकारची वाहने वापरतो पण रस्त्यावर २२/२४ इंची सायकल चालवणारा व्यक्ती दिसतो त्यावेळी जुन्या आठवणी ताज्या होतात. पाठीच्या आणि मानेचा पट्ट्यासह एसी गाडीत बसून गुळगुळीत रस्त्यावरून जाताना खडबडीत कच्या  रस्त्यावर भर उन्हात दचके खात चालवलेली सायकल आजही भारी वाटते.

🖋️संदिप कोळी.....
📱9730410154


                       



5 comments:

आज : Today

📝 आज.......       आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...