Thursday, 30 April 2020

महाराष्ट्र दिन Maharshtra Day


1 मे- महाराष्ट्र दिन

मंगल देशा! पवित्र देशा! महाराष्ट्र देशा!
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा।
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा।।
प्रणाम घ्यावा माझा हा, श्रीमहाराष्ट्र देशा ।।
                      आज १ मे महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा दिवस. दिल्लीचे तख्त राखणाऱ्या माझ्या लाडक्या महाराष्ट्राचा वाढदिवस. १ मे १९६० रोजी मराठी बोलणाऱ्या मराठी भाषिक लोकांचे राज्य महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भाषावार प्रांतरचनेची मागणी मोठ्या प्रमाणावर केली जात होती. महाराष्ट्रातही मराठी भाषिक राज्याची मागणी करणारी संयुक्त महाराष्ट्र चळवळ 1946 पासून सुरु झाली होती. अनेक चढ-उतार व स्थित्यंतरातून या चळवळीची वाटचाल होऊन शेवटी मे १९६० रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली.
                    भारताच्या स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राची निर्मिती होणे अपेक्षित होते, पण हा लढा तितका सोपा नव्हता. महाराष्ट्र राज्याची निर्मिती होण्यासाठी अनेकांना मोठा संघर्ष करावा लागला. यात अनेकांना आपले जीव गमवावे लागले. अनेक संप, लढे, आंदोलने करावी लागली. या सर्वांमध्ये मुंबईमधील कामगारांचा खूप मोठा सहभाग होता आणि म्हणूनच तत्कालीन पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी कायद्यानुसार १ मे कामगार दिनाच्या दिवशी महाराष्ट्र राज्याची निर्मिती केली.
                    ६० वर्षांपूर्वी निर्मित्ती झालेल्या महाराष्ट्र राज्याने प्रगतीची घोडदौड अशी केली आहे कि, आज महाराष्ट्र राज्य देशात सर्वाधिक आघाडीचे राज्य आहे. कला, साहित्य, क्रीडा, व्यापार-उद्योग, शिक्षण, आरोग्य सुविधा आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे कृषी क्षेत्रासह अनेक क्षेत्रात महाराष्ट राज्य आघाडीवर  असल्याचा आपल्याला अभिमान आहे.
                    मुंबई या आपल्या राजधानीतून देशाचा आर्थिक कारभार चालतो. देशातील लाखो लोकांना स्वप्ननागरी मुंबईने रोजगार दिला आहे. देशाच्या सर्व राज्यातून डोळ्यात अनेक स्वप्न घेऊन आपले नशीब अजमावयाला महाराष्ट्रात येतात.
'दिल क्या समंदर पाया है हमने।
अपनो को तो अपनाया परायौको अपनाया हमने।'
                  पुणे ही देशातील शैक्षणिक पंढरी म्हणून ओळखली जाते तर कोल्हापूर, नाशिक, सांगली, औरंगाबाद, सातारा, जळगाव यासारख्या सर्व जिल्ह्याची आपापली वैशिष्ट्ये महाराष्ट्राचे महत्व वाढवतात. सह्याद्रीच्या रांगा कणखरपणा दाखवतात तर निसर्गाने नटलेला कोकण महाराष्ट्राचे सौंदर्य वाढवतो. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाने व प्रेरणेने मराठ्यांनी अटकेपार झेंडे फडकवले आहेत. विविधतेने नटलेला माझा महाराष्ट्र देशातील एक प्रमुख राज्य आहे.
                  आपल्या सर्वांचे हे भाग्य आहे की आपण महाराष्ट्राचे आहोत आणि महाराष्ट्र आपला आहे.
भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती, खेळ जीवघेणी
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा ॥
       सर्वाना १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन यांच्या मनःपूर्वक शुभेच्या..!..!


-संदिप कोळी
9730410154



4 comments:

आज : Today

📝 आज.......       आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...