पोहणे.....
“उडने
दो परिंदो को अभी शोख हवा में
फिर
लौट के बचपन के जमाने नही आते ”
आमच्या लहानपणी दोन कोर्स
महत्वाचे. एक सायकल चालवायला शिकणे आणि दुसरे पोहायला. आयुष्यात बाकी काही नाही
जमले तरी चाले पण सायकल व पोहायला येणे must होते. एकंदर
तो इब्रत, प्रेस्टीजचा
विषय होता.
सायकल वर्षभर कधीही शिकता येत होती. त्यासाठी
काळाची, वेळेची अट नव्हती. पण पोहण्यासाठी मात्र उन्हाळ्याची सुट्टी राखीव होती. तसे काही
लोक दररोज पोहतात, पण आमच्यासारख्या हौशी लोकांसाठी उन्हाळाच राखून ठेवलेला असे. वार्षिक परीक्षा संपली की ट्रेनिंग सुरू असा घरातल्या
मोठ्या माणसांनी चंगच बांधलेला असे.
तसही पाणी बघितले की
आधीच भीती वाटे,
त्यात पोहायचे म्हणजे अजून भीती. त्यावेळी आम्हाला पोहायला शिकण्यासाठी दोनच पर्याय होते एक विहीर आणि दुसरी नदी. स्विमिंग
टॅंक (जलतरणतलाव) असतो हेच आम्हाला
फार उशिरा कळाले.
तोपर्यंत आम्ही पोहायला शिकलो होतो. नदी ही प्रत्येकाच्या वाट्याला येत नव्हती
त्यामुळे आमच्यासाठी विहिरीची परीक्षा होती. पोहायला शिकवायला एकापेक्षा एकजण तयार असत पण
आमचेच धाडस होत नसे.
विहिरीत पडलो की आपण लगेच नाकातोंडात पाणी जाऊन मरणार हीच भीती आम्हाला विहितीत उतरू देत नसे. मग काही
दिवस फक्त दुसरे पोहताना काठावर बसून बघण्याचा कार्यक्रम. त्यात पण भीती वाटे अचानक
कोणी ढकलून दिले तर काय? या भितीपाई पाण्यात कमी आणि चौफेर जास्त लक्ष ठेवावे लागे.
फक्त
काठावर बसून काही दिवस ढकल्यावर आता प्रत्यक्ष पोहायचे यावर आमचे सोडून इतरांचे
एकमत झाल्यावर आम्हाला पाण्यात उतरवण्याचा मुहूर्त ठरे. आम्ही चौथीपासून पाचवीच्या उबरठ्यावर होतो. भर उन्हाळ्यात आम्हाला पोहायला
शिकवण्यात आले तेही आमच्या मनाविरुद्ध. त्यावेळी पोहण्यासाठी प्लास्टिकचा कॅन,
वाळलेला भोपळा, कडब्याचा बिंडा नाहीतर दोरी हे चारच पर्याय होते. आमच्या काकांनी
आमच्यासाठी कडब्याच्या बिंडयाचा पर्याय टिक केला होता. पाण्यात पडल्यावर पोहायला येते
त्याप्रमाणे आम्ही पण रडत-खडत
पोहायला शिकलो.
एकदा पोहायला यायला
लागले की पाण्याची भीती पूर्ण गेली. वर्षभराची पोहण्याची कसर उन्हाळ्याच्या सुट्टीत भरून काढली जात
असे. दिवसातून कधी दोन तर कधी तीन वेळा फेरा होई. भरपूर जण
असतील तर 2-3 तास तरी
कोणाला विहिरीतून बाहेर येऊ दिले
जात नसे. अंगावर माती टाकने, साबण लावणे अशा करामती करून बाहेर येऊ दिले जात नसे.
गट्टा, सूर, खोच, वरुन
उडी मारणे, गाळ काढणे. पाठ शिवणीचा
खेळ असे अनेक प्रकार यात होते. कधी-कधी तर एकदा पोहलेली कपडे वळायच्या आत
दुसऱ्यांदा पोहायला जात असू. अंग पांढरे होणे, कानात पाणी गेल्यावर एका बाजूला
उड्या मारून पाणी काढणे अशा गंमतीही चालत.
वाढत्या वयाबरोबर व काळाबरोबर या गंमती
हरवत चालल्या आहेत. सध्या जलतरणतलावाच्या क्लोरीनयुक्त पाण्यात पोहायला शिकताना व
पोहताना तशी अनुभूती, मज्जा येते की माहित नाही. पोहण्याच्या त्या आठवणी गोड
होत्या अगदी उन्हात पाण्यात उडी मारल्यावर पाणी वर उडाल्यावर निर्माण होणाऱ्या
इंद्रधनुष्यासारख्या........
संदिप कोळी
9730 410154
sandip.koli35@gmail.com
No comments:
Post a Comment