Monday, 1 June 2020

सोबत Companionship



सोबत

‘कभी साथ बैठो तो बताऊ
क्या दर्द है मेरा
अब तुम दूर से पुछोगे तो
खैरियत ही बताऊगा’
                   माणूस समाजशील प्राणी, सतत इतरांच्या व विचारांच्या गराड्यात अडकलेला. जन्मापासून अगदी शेवटीपर्यंत माणूस हा वेगवेगळ्या सोबतीत असतोच पण आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात की त्यावेळी मात्र आपल्याला एका खऱ्या सोबतीची प्रकर्षाने जाणिव व गरज वाटू लागते. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला हवी असलेली सोबत आपल्याला लाभते तर आपण कधी ती शोधतो. ही सोबत आपल्याला कधी आई-वडिलांच्या रुपात, कधी भाऊ-बहिणीच्या रुपात, कधी मित्र-मैत्रिणीच्या रुपात, कधी गुरु-मार्गदर्शकांच्या रुपात, कधी जोडीदाराच्या रुपात तर कधी अशीच अनोळखी रुपात पण महत्वाची.
                   आपल्याला लाभलेली सोबत ही प्रत्येक वेळी वेगवेगळी असते. आपल्या सोबत घडणाऱ्या घटना व प्रसंगावर ही सोबत अवलंबून असते तर कधी काही सोबती आपल्यावर लादलेल्या असतात. विशिष्ट वेळी विशिष्ट सोबतीची जाणिव आपल्याला होते आणि मग माणसांच्या गर्दीत आपण ती खास सोबत शोधायला सुरुवात करतो, पण प्रत्येक वेळी ती लाभतेच असे होत नाही त्यावेळी.....
"जो पास है वो खास नही
और जो पास है ओ खास नही"
                 अशी आपली अवस्था होते. एकंदर विचार केल्यास आपल्याला सोबत ही हवीच असते....
सोबत म्हणजे काय? हे जर समजून घ्यायचे असेल तर रेल्वेच्या रुळाचे उदाहरण अत्यंत समर्पक आहे. रेल्वेचे दोन रूळ नेहमी समांतर चालतात. एकमेकांसोबत कधीही मध्ये साथ सोडत नाहीत अगदी दोघांचाही शेवट होईपर्यंत. आपल्याला ही आयुष्यात अशी सोबत अगदी प्रत्येकाला हवी असते, जी कायम आपल्या सोबत राहील आपली सोबत बनून. इथे ‘सावली’ हा शब्द मुद्दाम टाळला आहे कारण सावली अंधारात सोबत सोडते.
                     आपल्या बाबतीतल्या अनेक प्रसंगात आपल्याला आधारापेक्षा सोबतीची जास्त गरज असते. पण होत उलट. सोबतीच्या नावाखाली प्रत्येकजण आपल्याला आधार द्यायला, आपल्या निर्णयात घुसायला पाहतो आणि हेच आपल्याला नको असते. अवघड व नाजूक प्रसंगात आपण ते टाळू शकत नाही. अशा वेळी त्या रेल्वेच्या रूळाप्रमाणे फक्त आपल्या सोबत. आपल्या बरोबर, आपण घेतलेल्या निर्णयात साथ देणारी सोबत हवी असते. कवी कुसुमाग्रजांच्या शब्दात “पाठीवर हात ठेऊन लढ म्हणणारी”
                       आयुष्याच्या वळणावर अनेक ठिकाणी आपल्याला अशी सोबत हवी असते. पण असे सोबती फार कमी जणाच्या वाट्याला येतात. हा सोबती कोणीही असू शकतो व ही सोबत कोणाचीही असू शकते फक्त त्याची सोबत होणे गरजेचे असते.
                       शेवटी जीवनाच्या या सापशिडीत, प्रगतीची शिडी चढताना आणि अपयशाचे साप उतरताना सोबतीला माणसांची आणि माणसाला सोबतीची गरज ही लागतेच.....
------------------------------------------------------------------------------------------------------------------

संदिप कोळी
9730410154
sandip.koli35@gmail.com


No comments:

Post a Comment

आज : Today

📝 आज.......       आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...