🌈 आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी काय ठेवणार आहोत??
माणूस हा उत्सवप्रिय प्राणी. आपल्याला अनेक गोष्टी साजरा करायला आवडतात. नुकतीच आपण दिवाळी साजरी केली, त्यातच t20 चा वर्ल्डकप साजरा केला. ती पार्टी संपते तोपर्यंतच फुटबॉलचा वर्ल्ड कप सुरू झाला.
फुटबॉल हा जगाचा लोकप्रिय व सर्वाधिक खेळला जाणारा खेळ. त्यामुळे क्रीडा प्रेमींच्या नजरांबरोबर इतरांचे डोळे त्याकडे लागलेले. या फुटबॉल वर्ल्डकप मध्ये अनेक रंजक आणि महत्त्वाच्या गोष्टी घडतायत. त्यातीलच एक गोष्ट 23 नोव्हेंबर 2022 ची. कतार मध्ये घडलेली.
मॅच होती जपान आणि जर्मनीची, जपानने मॅच 2-1 ने जिंकली. साहजिकच जपानी लोकांनी जल्लोष आणि धिंगाणा करायला हवा होता, पण झालं भलतच. मॅच संपली खेळाडू अजून मैदानावरच होते. जिंकलेले आनंदी प्रेक्षक व इतर नाराज प्रेक्षक हळूहळू आपली जागा सोडून मैदान रिकामे करू लागले होते. आपल्याबरोबर आणलेल्या खाद्यपदार्थांच्या पिशव्या व पेयांच्या बाटल्या तिथेच टाकून काढता पाय घेत होते. त्यांचं पण बरोबर होतं, कारण स्वच्छता हे काय त्यांचं काम होतं??
या सर्व गडबडीत जिंकलेले जपानी फॅन मात्र वेगळ्याच कामात व्यस्त होते. जिंकलेल्या जपानी फॅन्सनी या खाद्य पदार्थाच्या रिकाम्या पिशव्या व बॉटल्स गोळा करायला सुरुवात केली. अगदी कुणी न सांगता आणि कोणत्याही फोटोसाठी नव्हे.
काही मिनिटात या जपानी लोकांनी पूर्ण स्टेडियम मागणी केली. ज्यावेळी या जपानी लोकांना त्यांच्या सत्कार्यासाठी याबद्दल विचारले त्यावेळी ते नम्रपणे उत्तरले. आम्ही पाठीमागे असा कचरा ठेवत नाही व ते कार्यमग्न राहिले.
जपानी लोकांची ही कृती कोणत्याही प्रसिद्धीसाठी, कौतुकासाठी किंवा मोठेपणासाठी नव्हती. ती होती चांगुलपणाची, ती होती संस्काराची, ती होती शिस्तप्रियेतेची, ती होती स्वतःच्या नजरेत मोठी होण्याची, ती होती पुढच्या पिढीला समृद्ध वारसा देणारी.
पुढच्या पिढीसाठी आपण काय ठेवून जाणार आहोत?? हा प्रश्न ज्या वेळेला आपल्याला पडेल त्यावेळी जपानी माणसांचे हे उदाहरण कायम लक्षात राहील. आपल्या कृतीतून जगाला कौतुक आणि हेवा वाटणारी संस्काराची शिदोरी ते न बोलता पटवून गेले.
धन्यवाद.!.!.!
🖋️संदिप कोळी
sandip.koli35@gmail.com