Sunday, 5 August 2018

दोस्त आपला विषय संपला

"शुक्रिया दोस्तो मेरी जिंदगी मे आने के लिए,
हर लम्हे को कितना खूबसूरत बनाने के लिए,
आप है तो हर खुशी पर मेरा नाम लिखा है,
शुक्रिया मुझे इतना खुशनसीब बनाने के लिये।"
          कस! काय? भावांनो आणि मैत्रिणींनो...... आज एकदम शायरीने सुरुवात केली आहे म्हणजे मौहोल तुमच्या लक्षात आलाच असेल..... यस 'फ्रेंडशिप डे' आपल्या हक्काचा दिवस दोस्ती के नाम. तसं बघायला गेलं तर ऑगस्ट महिना सुरू झाला की मैत्रीचे वारे अगदी वादळाच्या रूपात धडकू लागतं.  आपणही यात मागे नाही आणि असणार पण नाही कारण 'दोस्त आपला आपला विषय संपला'
          जन्माला आल्यापासून आपण अनेक नात्यांनी वेढलेले असतो. पण ही सर्व सर्व नाती आपल्याला जन्माबरोबर मिळालेली असतात. पण मैत्री हे असे एकच नातं कि जे निवडायचा अधिकार फक्त आणि फक्त आपला स्वतःचा असतो. जस्ट इमॅजिन मित्र किंवा दोस्ती असे शब्द जरी उच्चारले तरी मनाच्या सागरात आनंदाची लाट निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. डोळ्यासमोर उभी राहतात शाळा कॉलेजमधले कट्टे, आपले खास अड्डे, सबमिशन साठी मारलेल्या नाइट्स, एक प्लेट मिसळ पाच जणांनी वरपल्याच्या खास आठवणी, कटींग चहा सोबत थापांचे उडवलेले पतंग, उडवलेल्या गाड्या, तुड़वलेले रस्ते, तासन-तास मारलेल्या गप्पा, उसनवारीवर घेतलेले पैसे, वडापावच्या पैजा, कॉलेज ला दांडी मारुन पाहिलेले सिनेमे, अंगलट आलेल्या कुरापती, घरी मारलेल्या थापा, रात्र-रात्र भर केलेला कल्ला, खुळचट गैरसमज, नकोसे अबोले, डोकं  भडकून केलेली भांडण,  मग लावलेला किलो-किलो मस्का, होलसेल मध्ये खाल्लेला भाव, मित्र-मैत्रिणीच्या नसत्या भानगडीत खुपसलेले नाक, ग्रुप मधल्या लैला-मजनूच्या प्रेमाची केलेली राखण, आपल्यामुळे झालेली ब्रेकअप्स आणि आपण मध्यस्थी करून केलेली पैचअपस्....
            मैत्रीच मोल कसं लावणार. यशाच्या पायऱ्या चढताना आणि अपयशाचे घाव सोसतानाही आपला मित्र-मैत्रीण सोबत आहे. जगाने पाठ फिरवली तरी आपले मित्र आपल्याबरोबर असतील. आपल्यावर विश्वास ठेवतील ही भावना मोठ-मोठ्या संकटातून सहज बाहेर नेते. आपला छोट्यातला छोटा आनंद मित्र मैत्रिणीबरोबर वाटला की तो कित्येक पटीने मोठा होतो. मैत्रीची सर जगातल्या कोणत्याही नात्याला येणार नाही. मैत्री हे नात्याचं नाव असलं तरी त्याच्या छटा प्रत्येकाबरोबर बदलत जातात त्यामुळे मैत्रीला नात्यात कधी बसवता येत नाही ती असते फक्त एक भावना.....
           लई पाश्चर हा शास्त्रज्ञ.... त्याच्या मित्राचा मृत्यू पिसाळलेल्या कुत्र्याच्या चावण्यामुळे झाला. आपल्या मित्राच्या मृत्यूचे प्रचंड दुःख त्याला झाले. आपल्या मित्राच्या वाट्याला जो मृत्यू आला तो कोणाच्याही वाट्याला येऊ नये यासाठी त्यांने काम सुरू केले. आसपासच्या कुत्र्यांना पकडून त्यांचा अभ्यासास सुरुवात केली. कुत्रे  पकडून त्याच्या रेबीज पसरवणाऱ्या अवयवांच्या अभ्यासाचे काम सुरू केले. अशा वागण्यामुळे परिसरातील लोकांनी त्याची गणना वेडयात करायला सुरुवात केली होती. दरम्यानच्या काळात त्याच्या प्रियसीच्या वडिलांनी अशा वेड्या माणसाशी लग्न लावून देण्यास ठाम नकार दिला होता. भागात कुत्रे पिसाळले की लोक त्याच्याकडे आणून सोडत. लुई मात्र काम आनंदाने करत होता. ३ वर्षे सतत काम केल्यानंतर त्याच्या असे लक्षात आलं की कुत्र्याच्या लाळेतील घटकांमुळे  रेबीज नावाचा रोग होऊन मृत्यू ओढवतो. संशोधन सुरू झाले लाळेमधील विषाणू शोधून त्याने रेबीज वर लस  शोधली. आपली मैत्री सिद्ध केली. आपल्या मैत्रीखातर त्याने जगाच्या कल्याणाचा एक महान शोध लावला. अशी असते मैत्री अशक्य ते शक्य करायला लावणारी.
             मैत्रीला ना नात्याची मर्यादा बांधते, ना वयाचे बंधन, मैत्री कोणाची, कोणाशी, कधी व्हावी याचे काही नियम नाहीत. मैत्रीत ना कसल्या अटी असतात, ना कसल्या शर्ती, ना कसली अपेक्षा. ना कसले हट्ट. अटींचा हात धरून अपेक्षांच्या  पायऱ्या चढते ती मैत्री असू शकत नाही. तो व्यवहार असतो. मैत्री असते नितळ वाहणाऱ्या झऱ्यासारखी, स्वच्छंद बागडणाऱ्या फुलपाखरासारखी. मोठा मित्र परिवार त्यांची सतत साथ, पाठिंबा आणि त्यांच असणे ही आपल्या आयुष्याची खरी पुंजी असते. 'Great Friendship is not when the perfect people come together. It is when two imperfect people learn to enjoy each other's differences'
         एकीकडे  माणसाच्या नात्यावर अविश्वासाच्या सावल्या गडद होत असताना, नाती तुटत असताना मैत्रीच्या नात्याने मात्र माणसाचा नवीन परिवार तयार केला आहे. साऱ्या भेदाच्या पलीकडे जाऊन मैत्री माणसातला स्नेह व्यापून उरते. आजच्या 'फ्रेंडशिप डे 'च्या निमित्ताने पुन्हा एकदा नव्याने हे नाते जगूया.
Happy Friendships Day

-----------------------------------------------------------
#संदीप
sandip.koli35@gmail.com

2 comments:

आज : Today

📝 आज.......       आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...