Thursday, 16 May 2019

सोशल मीडिया

🗓 सोशल......
           'सोशल' आजच्या काळातील एकदम परवलीचा शब्द. अगदी उठल्यापासून रात्री डोळ्यातील झोपेमुळे हातातील फोन तोंडावर पडेपर्यंत आपण 'सोशल' असतो म्हणजेच 'सोशल मीडियावर' असतो. शाळेत असताना सामाजिक शास्त्र विषयात एक प्रसिद्ध वाक्य होते. 'Man is social animal.' त्यावेळी त्याचा अर्थ होता 'माणूस हा समाजाशिवाय राहू शकत नाही.' पण गेल्या काही वर्षात आपण समाजशास्त्रज्ञांनी ती व्याख्या बदलून ,Man is social media animal.' अशी केली आहे. ही शब्दातील गंमत नव्हे तर  आजची आपली वास्तविकता आहे. तुम्ही आणि मी आपल्यात डोकावले तरी ही नवीन व्याख्या आपल्याला तंतोतंत लागू पडते.
           सकाळी झोपेतून जागे झाल्यावर पहिल्यांदा आपण सोशल कट्टा तपासतो, जो आपण काही तासापूर्वी सोडला होता. व्हाट्सअप उघडल्यावर सुविचाराचे इतके मेसेज आलेले असतात की कधीकधी प्रश्न पडतो व्हाट्सअप नसते तर कदाचित जीवन जगण्याचा मार्गच चुकलो असतो. त्यातच व्हाट्सअप ने लावलेला नवीन नाद म्हणजे 'स्टेटस'. माझ्यासह आपल्या बऱ्याच जणांचा वेळ दुसऱ्याचे स्टेटस पाहण्यात, आपले स्टेटस ठेवण्यात आणि ठेवलेली स्टेटस किती जणांनी पाहिले यातच जात असतो.
         फिरायला गेलेले आपले फोटो, फॅमिली फोटो, सिनेमा बघायला गेलेले, गोइंग टू पुणे, कमिंग टू होम, हॉटेल ला लंच, डिनर, पार्टी आशा सर्वच गोष्टी आपण हल्ली शेअर करतो. वाढदिवस, लग्न, अभिनंदन यांच्या शुभेच्छा बद्दल आभार ठीक आहे पण हल्ली दुःखद घटना या प्रसंगी सहभागी झाल्याबद्दल ही आभार मानले जातात.
        फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, टिकटॉक या सारख्या सोशल गंमती आहेतच. फेसबुकची अवस्था व्हाट्सअप सारखीच आपले ठेवायचे पसरून आणि दुसर्‍याची बघायचं वाकून. तिथेही लाईक, कमेंट चे प्रेशर असतेच. मला जास्त कौतुक वाटते ते फेसबुक वर एखाद्या पोस्टवर कमेंट लिहून भांडणाऱ्याचे. यातून काहीच साध्य होत नाही पण, विनाकारण आपण आपले शब्द, ज्ञान आणि आपली पातळी या सर्वांचा पसारा जगापुढे मांडून मोकळे होतो.
           एक व्यंगचित्र पाहिले असेल. एक व्यक्ती ICU मध्ये असते. त्याच्या जवळ त्याची पत्नी व मुलगा असतो. बाहेरील व्यक्ती बोलत असतात याचे  फेसबुक वर 2000 फ्रेंड्स, व्हाट्सअप च्या 50 ग्रुप मध्ये आहे म्हणे पण इथे एकटाच. पण हीच वास्तविकता आहे. आपले सर्व जगणे आता व्हर्चुअल झाले आहे. मी हे पडताळण्यासाठी यावर्षी माझी जन्मतारीख फेसबुकवरून डिलीट केली, तर घरचे चार लोक सोडले तर माझा वाढदिवस कोणाच्याही लक्षात राहिला नाही. हेच फेसबुक वर गेल्या वर्षी 500 च्यावर शुभेच्छा संदेश आले होते. व्हाट्सअपवरचे वेगळेच याचा अर्थ काय घ्यायचा हे माझ्यासह तुमच्याही लक्षात आले असेल.
           एकंदरच आपण सर्वच बाबतीत एकदम उत्साही झालो आहोत.आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट आपल्याला जगापुढे मांडायचे आहे, पण हे जगापुढे मांडण्याच्या धडपडीत आपण आपल्या खऱ्या जगापासून एकटे पडत चाललो आहोत. आठवणी या साठवण्यासाठी असतात. पूर्वी एखाद्या व्यक्तीला जाणून घ्यायचे असेल तर त्याच्याशी भेटून, जवळीक साधून बोलावे लागे पण आता मात्र एखाद्याच्या वैयक्तिक गोष्टी जाणून घ्यायच्या असेल तर त्याची सोशल अकाउंट बघितली  तरी त्या व्यक्तीची सर्व माहिती  समजते. ग्लोबली कनेक्ट होण्याच्या नादात आपला संवाद हरवत चालला आहे. समोर बसून भावना व्यक्त करण्याऐवजी इमोजी, स्टिकर आणि फोटोवरच आपण व्यक्त होतो.
         जगाशी संपर्क असायला हवा आणि त्यासाठी सोशल मीडिया वापरायला हवा याबाबत माझे दुमत नाही पण हा सोशल मीडिया आपल्याला सोसेल तितकाच वापरला पाहिजे.
            तंत्रज्ञानाच्या साथीने काळाच्या एक पाऊल पुढे राहण्यापेक्षा भूतकाळाच्या सुखद आठवणी बरोबर वर्तमानात ती माणसे जपली तर पुढच्या काळात तीच आपल्याला सोबत देेतील. पण हे सर्व सांगण्यासाठी ही सोशल मीडियाच वापरावा लागतो  कारण या सोशल मीडिया व्यतिरिक्त आपण कशावरच विश्वास ठेवत नाही हीच मोठी शोकांतिका आहे. विश्वास वाटत नसेल तर बघा गुगल करून.....

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

©संदीप कोळी
9730410154
sandip.koli35@gmail.com


No comments:

Post a Comment

आज : Today

📝 आज.......       आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...