इतकी निरागसता टिकायला हवी....
लॉकडाऊन म्हणजे
सक्तीची सुट्टी. वेळ जात नव्हता म्हणून
शेतात फेरफटका मारायचा बेत ठरला. फिरत असताना सायंकाळी 6 च्या सुमारास शेताच्या एका कोपऱ्यात पक्षांचा गलका सुरू
होता. थोडं बारकाईने बघितल्यावर लक्षात आले की ससाणा खाली बसला होता. सुरुवातीला
वाटले त्याला इजा झालीय म्हणून तो बसला आहे पण पक्ष्याच्या गोंधळामुळे तो उडून जाऊ
लागला पण पायात काहीतरी होते त्यामुळे त्याला उडता येईना. शेवटी पक्ष्याच्या
गोंधळा मुळे तो ससाणा उडून गेला.
उत्सुकतेपोटी अर्णव
आणि मी त्या जागेवर पोहचलो. आमचा अंदाज खरा ठरला. त्या ससाण्याने छोटा ससा पकडला
होता पण तो त्याला घेऊन जाता आला नाही. तो ससा तिथेच पडला होता. ते पाहून
अर्णवच्या डोळ्यात पाणी आले. "बाबा तो जिवंत आहे त्याला वाचवूया,
त्याला पाणी देऊया, त्याला घरी नेऊया, मी त्याला गवत देतो" अशी त्याची केविलवाणी धडपड सुरू होती.
मी त्याला समजावले त्या पक्ष्याने चोचीने त्याला इजा केली आहे,
ते पिल्लू छोटे आहे, घरी घेऊनही ते जगणार नाही. आपण त्याला फार काही मदत करू
शकणार नाही.
अर्णव मात्र ऐकायला तयार नव्हता,
शेवटी त्याचा केविलवाणा चेहरा,
त्याची संवेदनशीलता व त्याची निरागसता पाहून त्याला पाणी
पाजून,
हळद लावूया व पुन्हा त्याला त्या ठिकाणी सोडुया यावर या
माझ्या सल्ल्यावर तो जड मनाने तयार झाला.
आम्ही त्याला
थोडे पाणी पाजले, काही ठिकाणी रक्त येत होते तिथे हळद लावली. मात्र त्या सस्याला खूप इजा झाली
होती त्याची मान सरळ होत नव्हती. काही वेळ त्याने धडपड केली पण थोड्या वेळातच
त्याचा जीव गेला.
अर्णवच्या डोळ्यात
त्याला वाचवता आले नाही याचे दुःख व त्या ससाण्याविषयी प्रचंड राग होता. पण हाच
निसर्ग आहे व त्याचे नियम सर्वांना लागू असतात हे त्याला पटत नव्हते. अंधार झाला
तरी तो घरी यायला तयार नव्हता.
एखाद्याला
इतक्या सहज मदत करावी ही त्यांच्यातील भावना पाहून बाप म्हणून अभिमान वाटला.
आयुष्यात प्रत्येक प्रसंगी इतकं निरागस राहून इतरांना मदत करायला यायला हवे. अर्णव
ची इतकी निरागसता वाढत्या वयाबरोबर टिकून
रहावी हीच इच्छा....
( टीप
: छायाचित्र यासाठी की अर्णवच्या
डोळ्यात दिसणारी मदतीची तळमळ सुखावणारी
होती )
संदीप कोळी
sandip.koli35@gmail.com