Friday, 1 June 2018

पालक आणि पालकत्व Parent and Parenthood

पालक आणि पालकत्व

  जागतिक पालक दिनानिमित्त......
                फोन ठेव आणि पुस्तक घे.... बास कर आता ते गेम खेळणे....! बंद कर ते युट्युब....! फोन ला हात लावू नकोस....! फोन बाजूला ठेवा आणि जेव आता....! तुमच्या आमच्या घरात मुलांशी संवाद हल्ली याच त्रासिक वाक्याने सुरू होतात व त्याचे पर्यावसन रागात व आदळ-आपटीे होते. पण प्रश्न काही सुटत नाही.
              मोबाईल चे व्यसन हे  आजच्या कुटुंबापुढचा यक्ष प्रश्न बनला आहे. आपल्या घरातील जन्मलेल्या बाळापासून ते शाळा-कॉलेजच्या पाल्यापर्यंत हे व्यसन तितकेच गंभीर बनले आहे.यात लहान मुलांच्यामध्ये प्रचंड आकर्षण आहे. मग ते गेम खेळण्याविषय असो, फोटो पाहण्याविषयी असो, गाणी, व्हिडिओ पाहण्याविषयी असो, वा काही मनोरंजनात्मक अँपविषयी असो.... आपल्या घरातल्या चिमुरड्यांना उठल्यापासून झोपेपर्यंत हा स्मार्टफोन लागतोच. झोपेतून उठल्यावर मुड ठीक करण्यासाठी, जेवण करताना, दुपारी गेम खेळायला, काही खाताना मोबाईल शेजारी हवा असतो. शेवटी  झोप यावी म्हणून ही मोबाईल उशाशी हवाच असतो.
         मुले लहान असताना त्यावेळी पालक म्हणून आई-वडिलांना त्यांचे फार कौतुक वाटते. इतक्या लहान वयात आपलं बाळ किती सहजपणे मोबाईल हाताळते याविषयी कुतूहल वाटते. बाळाचं फोन वापरणे, फोटो पाहणे, गाणी, व्हिडिओ चालू करणे. पासवर्ड किंवा पॅटर्न लॉक सहज लक्षात ठेवून काढणे ही आपल्या पाल्याची बुद्धिमत्ता प्रत्येक आई-वडिलांसाठी काही काळ अभिमानाची गोष्ट ठरते. पण जस-जसे आपल्या मुलांना मोबाईलची सवय पडून त्याचे व्यसन लागते तशी तशी पालक म्हणून अभिमानाची वाटणारी बाब आता डोकेदुखी ठरू लागते. व काळजीचा विषय बनते. आपल्यातील सुज्ञ पालक जागा होतो मोबाईल चे दुष्परिणाम दिसू लागतात. मग पालक म्हणून आपण बैचेन होतो. मोबाईल चे प्रमाण कमी करायला हवे याचा विचार करतो. एकमेकांना दोष देतो. तुझ्या लाडामुळे झाले म्हणून एकमेकांकडे बोट दाखवतो.आपण झटक्यात मोबाइल बंद करतो. पण ते तितके सोपे राहत नाही. मुले हट्ट करतात, चिडचिड करतात, रडतात, आदळा-आपट करतात, रुसतात, जेवत नाहीत, मग आपण पुन्हा वात्सल्यापोटी माघार घेतो. कमी-जास्त प्रमाणात हर घर की यही कहाणी है।
         आपल्या घरातील ही चिमुरडी हल्ली या फोन समोरून उठतच नाहीत. त्यांना प्रत्येक गोष्टीत फोन हवा असतो. अगदी घरातील खेळण्यांना ही मुले हात लावत नाहीत. मोबाईल हे एक खेळणे हातात असते व बाकीच्या खेळण्यांना अडगळीची जागा दाखवलेली असते. १०-१५ वर्षांपूर्वी लहान मुलं इतकी खेळायची की आई-वडिलांना त्यांना घरात ओढून घेऊन जावे लागत होते. पण आता मुले बाहेरच पडत नाही. ही मोबाईल ची ओढ असली तरीही यात पालकाची भूमिका महत्त्वाचीं आहे.
          २१ व्या शतकात आपल्याबरोबर फोन पण स्मार्ट झाला व बोलण्याबरोबर फोनचे अनेक उपयोग समोर आले. त्यामुळे आपल्याला त्याचा मोह झाला व गरजही बनली. घरात ही पालक म्हणून आपला फोनचा वापर खूप वाढला आहे. आपल्या पाल्यांच्या समोर आपण मोबाईल, सोशल मीडिया यासाठी आपण बऱ्याच वेळ देतो. नकळत आपल्या पाल्यांनाही त्याचे आकर्षण वाढते. व मोबाईल ची सवय होते. पालकांच्या बरोबर घरातील इतर ही व्यक्ती मोबाईल ला अधिक महत्त्व देतात. शिवाय मोबाईल चे स्वतःचे खिळवून ठेवणारे गुण आहेतच. त्यामुळे मुले सहज आकर्षित होतात.
            याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो हे संशोधन सांगते. पालक म्हणून आपण काही बंधने पाळणे गरजेचे आहे. बऱ्याच वेळा मुले फार त्रास देतात म्हणून त्यांना शांत करण्यासाठी त्याच्या हातात मोबाईल दिला जातो. कधी घरात फोनची संख्या जास्त असेल तर मुलांना फोन उपलब्ध होतात. घरात असताना आपल्या फोनची इंटरनेट बंद ठेवायला हवे. मुलांना घडवणे ही फक्त आईची जबाबदारी नसून दोघांची आहे हे पाळणे तितकेच गरजेचे आहे. मुलांना वेळ द्यायला हवा. गोष्टी, छोटे खेळ, नवीन ठिकाणे यांची माहिती द्यायला हवी. त्यांच्याशी बोलायला हवे. त्यामुळे मुले वेगळ्या गोष्टीत गुंतून राहतात. व यातून बाहेर पडायला मदत होईल.
                आपले पाल्य आपला अंश असतात. वस्तू खरेदी करताना शंभर वेळा चौकशी करणारे आपण पाल्याच्या बाबतीत तितकेच चौकस असणे गरजेचे आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट जर आपण आपल्या पाल्याला द्यायची असेल तर ती आहे 'वेळ' आणि फक्त 'वेळ'.
-----------------------------------------------------------
संदीप कोळी .....
  9730410154
sandip.koli35@gmail.com

No comments:

Post a Comment

मन ही आवरायला घेऊया

           वातावरणात बदलाचे वारे वाहू लागले आहे. आजूबाजूला उत्साहाचे उधाण आले आहे आणि मनामनात आनंदाच्या लहरी उमटत आहे. दिवाळी तोंडावर आली आह...