Sunday, 24 June 2018

प्लास्टिक बंदी

च्यामारी अलीकडं आनं पलीकडं बी बंदी म्हणलं की अंगावर सारकण काटाच येतुया. त्यात भर म्हनून आता ही पॅस्टिक बंदी. तसं पॅस्टिक बंदीला आपला इरोध नाय हाय पण पॅस्टिक बंद झाल्यामुळं लय गोची हुतीय बगा. गेल्याचं आठवड्यात आमचं बंड्या दुकानात जाऊन लाज काडून आलंय. गोडं तेल आणायला हात हालवत मोकळच गेलंय. १५ मिंट झालं तरी दुकानदार ध्यानं दिना म्हणून तेला कावालत. दुकानदार शांत पण म्हणलं पॅस्टिक पिशवी बंद हाय वंजळीत भरून नेतूस. तोंडात मारल्यावाणी पोरगं परतं. तवा पसन नाराज हाय. बंड्या म्हणतंय पॅस्टिक बंद हुतयच कसं. कारण तेनं कवाच घरातन पिशवी नेली नाय आनं अचानक असं म्हणजी? तेचं बी खरं हाय म्हणा पॅस्टिक म्हंजी घरातल्याचं माणसासारखा हाय. कुठ्ल्याबी कामात गरज पडतीयाच की. आमच्या आय नं तर घरात चांगल्या चांगल्या पिशव्या घडी घालून ठेवल्या हुत्या आमी मागितलं तरी बी चांगली पिशवी कवा देत नाय. येवढा जीव हुता तिचा पॅस्टिक पिशवीवर.
        काल लईच वाईट वेळ आली आमच्यावर, ते खालच्या गल्लीच 'विक्या', तेचा हॅप्पी बडडे हुता. मग काय पार्टी, आमी बी फुकटच जेवायला भाया माग सारून हजर. जेवायला बसल्यावर पंचायत झाली राव पॅस्टिक बंदीमूळ पॅस्टिकच्या ताट, वाट्या, गलास बंद त्यामुळं पत्रावळीवर वाढलं. रस्सा भातात वतला की दुसऱ्या बाजूनं डायरेकट्ट मातीत. तवा आता कुणाच्यात जेवायला आपली ताट-वाटी घिऊन जावा नाहीतर उपाशीच बसायला लागलं. 'परशा' न तर पॅस्टिक बंदीची हापकीच खाल्लीय. ते हाय ढापन तेचा चस्मा हाय पॅस्टिकचा. बंदीमुळं ते चस्मा बी घालनां तेला वाटतंय सापडलं तर दंड व्हायचा.
पॅस्टिक बंदीच्या नादात 'पम्या' न घरात मार खाल्ला. तोंडात कायम चघळायची पुडी खिशात राहिली आनं पॅस्टिकची पिशवी नसल्यानं खिशावर डाग. मग काय काकून धू-धू धुतला बिचाऱ्याला.गल्लीतली पोरं म्हजी दुसरी SBI. पॅस्टिकच्या पिशवीच्या रंगावरण कुणाच्या घरात काय आणलं ते वळकत्यात पण आता ते बी कळना कारण सगळ्याला एकच पिशवी वापरत्यात आता. तरी बरं दुधाची पिशवी चालत्या म्हणून नायतर पावसाळ्यात मोबाईल ठेवायचा कुठं ही पंचायत झाली असती. सगळा पावसाळा कुंबडी सारखा घरातच गेला असता. आमची तेवढी तरी सोय बघितल्याबद्दल मंडळातर्फे जाहीर आभार.
          या बंदीचा फायदा घेत कोपऱ्यावरच्या दुकानदारानं कापडाच्या पिशव्या २० रु ला एक देतंय. आता २० रु ची पिशवी घ्यायला आमी काय खुळ हाय व्हय. तेच्या पेक्षा आमच्या जुन्या बनियान, शर्टाची पिशवी शिवल आय आमची.
       मराठी शाळ पुढंन येताना ऐकलं, गुरुजी  पॅस्टिक बंदी का महत्वाची हाय ते सांगत हुतं. पर्यावरणाची कि काय ती हानी हुतीय म्हणं. अपल्यासनी तरास हुतुय म्हणं या पॅस्टिकनं. आम्हास्नी कवा कळलं नाय. पण गुरुजी सांगत्यात म्हंजी १०० आण खरं. हे सगळं खरं असलं तरी २ प्रश्न हायती पॅस्टिक बंदीमुळं मटण, चिकण आणायला डबा चाललं पण मासे आणायला केवढा डबा न्यायचा हे कळतंच नाय.आनि गावाला जाताना वल्ली कापडं कशातन न्यायची. बघा तुमाला उत्तर सापडलं तर सांगा आमास्नी बी.
    बाकी पॅस्टिक बंदी झालीच पाहिजे. तुमी बी पॅस्टिक वापरत नाय ना, वापरायलाच नाय पाहिजे. तवा आता बाहेर जाताना आपली कापडाची पिशवी न्या. "पॅस्टिकच्या धोका, अणुयुद्धापरास मोठा."
-----------------------------------------------------------
संदीप कोळी
sandip.koli35@gmail.com

No comments:

Post a Comment

आज : Today

📝 आज.......       आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...