२००६ ची घटना. मी १२ वी होऊन घरच्यांच्या सुरक्षित वातावरणातून पहिल्यांदाच जगाच्या मोकळ्या आकाशात भरारी घेण्यासाठी सज्ज झालो होतो. कोल्हापूरला ऍडमिशन घेतल्यापासून नवीन शहर, नवीन वातावरण आणि दररोजचा नवीन प्रवास.
हातकणंगले पासून कोल्हापूरला जाण्याचा सर्वात लोकप्रिय व खिशाला परवडणारा प्रवास म्हणजे रेल्वेचा प्रवास. त्यामुळे हातकणंगले- कोल्हापूर व पुन्हा कोल्हापूर- हातकणंगले असा दिनक्रम बनला होता. दररोज ९.१५ च्या पॅसेंजर ने जाणे व सायंकाळी ५ किंवा ६.३० च्या पॅसेंजर ने घरी परतत असे. कधी कॉलेज लवकर सुटले तर लवकर घरी येत असे.
कॉलेज सुरु होऊन दोन महिने होऊन गेले होते. त्या दिवशी कॉलेज मधून दुपारी सुट्टी मिळाली. धावत-पळत स्टेशन गाठले. दुपारचे ३ वाजले असतील. नेहमीच्या वेळापत्रकाप्रमाणे महाराष्ट्र एक्सप्रेस २ नंबरच्या प्लँटफॉर्म उभी असते म्हणून मी हि रेल्वेचे नाव न पाहता बसलो. रेल्वेच्या डब्यात नेहमी पेक्षा गर्दी कमी होती पण मी त्याकडे दुर्लक्ष केले. बसल्यावर पाच एक मिनिटात रेल्वे धावू लागली. ३.३० ची रेल्वे इतक्या लवकर कशी जाईल. पुन्हा वाटले कदाचित प्लॅटफॉर्म बदलून लावत असतील. रेल्वेने स्टेशन सोडले व गती वाढली. मग मात्र माझी शंका भीती मध्ये बदलली. मी चुकीच्या रेल्वेत बसलो होतो. ती राणी चन्नम्मा एक्सप्रेस होती जी तिच्या वेळेपेक्षा एक तास उशिरा धावत होती. पण याही पेक्षा माझी मोठी अडचण होती ती म्हणजे हातकणंगले रेल्वे स्टेशन वर ती थांबत नव्हती. शिवाय माझ्याकडे रेल्वेचा कोल्हापूर-हातकणंगले पास होता. खिशात मोजकेच पैसे. समजा टी. सी ने पकडले व दंड केला तर काय करायचे? हि रेल्वे थांबणार कुठे? असे अनेक प्रश्नांनी मनात भीती निर्माण केली होती. मी न बघता रेल्वेत बसलो या माझ्या मूर्खपणाचा रागही येत होता. इतक्यात हनुमानाची वेशभूषा केलेला ११-१२ वर्षाचा मुलगा आला. तो रेल्वेत आपली कला दाखवून पैसे जमा करत असे. मी त्याला नेहमी बघायचो. ओळख नव्हती. पण नेहमी पाहण्यात होता म्हणून तो जवळ आल्यावर मी त्याला माझी अडचण सांगितली. तो दुनियादारी शिकलेला होता दररोज अशा प्रसंगांना तोंड देणारा होता. मला म्हणाला, "काळजी करू नको, दुसऱ्या रेल्वेचे क्रॉसिंग असेल तर ही रेल्वे हातकणंगलेत थांबते आणि नाही थांबली तरी ही रेल्वे मिरज मध्ये गेली की कोल्हापूर ला येण्यासाठी मिरज मधून दुसरी रेल्वे आहे. त्यातून यायचे. मी त्यानेच परत येणार आहे. सोपं आहे." त्यांच्या या शब्दांनी मला थोडं हायसे वाटले. पण टी. सी आला तर? या माझ्या दुसऱ्या शंकेचे त्याने उत्तर दिले कि," या रेल्वेत मिरज पर्यंत चेकिंग होत नाही आणि झालेच तर आपण खरं कारण सांगू तुझ्याकडे पास आहेच की."
मग मात्र माझी हुरहूर कमी झाली. रेल्वे गतीने पुढे धावत होतो १५ मिनीटातच रेल्वे हातकणंगले रेल्वे स्टेशन जवळ आली पण पहिला पर्याय मागे पडला कारण रेल्वे तशीच वेगाने स्टेशन सोडून पुढे गेली. मी थोडा निराश झालो होतो. त्याने दुसऱ्या पर्यायाची पुन्हा आठवण करून दिली. तो हि मिरज रेल्वे जंक्शन येईपर्यंत माझ्याजवळ बसला होता. मिरज आले. मला म्हणाला, "लगेच उतरून माझ्या मागून पळत यायचे." मी मान डोलावून त्याच्या मागून पळत कोल्हापूरकडे जाणाऱ्या दुसऱ्या रेल्वेत बसलो.
मी निवांत झालो असलो तरी माझ्याकडे अजूनही प्रवासाचे तिकीट नव्हते. तो हनुमान माझ्याजवळच उभा होता. त्याच्या असण्याने मला आधार वाटत होता. रेल्वे धावू लागली. जयसिंगपूर स्टेशन गेले व हातकणंगले स्टेशन आले. या प्रवासात माझा झालेला नव्या मित्रचा निरोप घेऊन मी उतरलो.
त्यानंतर रेल्वेच्या प्रवासात तो मला दररोज दिसायचा, भेटायचा. आम्ही त्याला हनुमान म्हणूनच बोलवायचो. भेटल्यानंतर बोलायचो. ३-४ महिन्यांन्यानंतर तो रेल्वेत दिसायचाही बंद झाला. कोठे गेला माहिती नाही. त्यानंतर परत तो कधी दिसलाच नाही. त्या तासाभराच्या प्रवासाने मला तो बहुरूपी मित्र भेटला होता पण नंतर तो जगण्याच्या प्रवासात हरवला. साध्य तो फक्त आठवण म्हणून आठवणीत कायम आहे.
-----------------------------------------------------------
संदीप कोळी
हातकणंगले.
No comments:
Post a Comment