I am Special....
हो आपण स्पेशल आहोत. आपण म्हणजे "मी" आपल्या प्रत्येकातील "मी".
आपण स्पेशल आहोत कारण पृथ्वीवरील लाखो सजीवांच्यामध्ये आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो आहोत. या पृथ्वीवरील प्रत्येकापेक्षा वेगळे आणि युनिक आहोत. आपण जगतोय आपल्या शैलीत, आपल्याकडे काही गुण आहेत आणि बरेच दोषही आहेत पण ते इतर कोणातही सापडणार नाहीत. इतरांच्याकडे काय आहे आणि काय नाही याची तुलना आपण करायची नाही. आणि त्यात आयुष्यातला लाखमोलाचा वेळ वाया घालवायचा नाही. कारण आपले आयुष्य हा आपला प्रवास आहे, इतरांशी लावलेली शर्यत नाही.
आपण प्रयत्न करणार आहोत. यशाबरोबर अपयशही बऱ्याच वेळा वाट्याला येईल. पण अनुभवाचा साठा नक्कीच वाढेल. आलेल्या अपयशाने खचायचं नाही, स्वतःवर चिडायचं नाही, आणि आलाच राग स्वतःचा तर सांगायचं कायम स्वतःला मी स्पेशल आहे.
दुसऱ्याच्या फुटपट्टीवर आपण स्वतःला मोजणार नाही. आंब्याची तुलना फणसाशी होऊ शकणार नाही. दोन्हीही फळ असली त्यांची आपापली वैशिष्ट्ये वेगळी आणि महत्त्वाची आहेत. तसे आपण ही आहोत आपल्यासाठी महत्त्वाचे.....
दररोजचा दिवस आपला आहे. काहीतरी शिकवणारा, उगवणारा सूर्य आपल्यासाठी नवीन आशा घेऊन येणार आहे, तर मावळणारा सूर्य आपल्याला काहीतरी देऊन जाणारा. आपल्याला कोणाची सहानुभूती नको आहे. आपण बिचारे वगैरे तर अजिबात नाही. आपण जसे आहेत तसे आपल्याला स्वीकारले आहे आणि यासाठी कोणाच्या सर्टिफिकेटची गरज असनार नाही.
स्वामी विवेकानंद म्हणतात "आपण दररोज स्वतःशी बोलत नसाल तर तुम्ही जगातील एका चांगल्या व्यक्तीशी भेटण्याची संधी गमवाल." त्याप्रमाणे आपण स्वतःशीच बोलायचं. मनाला योग्य वाटेल ते करायच. रस्ता जरी चुकला तरी पुन्हा वळणावर येऊन थांबून विचार करायचा. आनंदी राहण्याचा रास्त प्रयत्न करायचा. नवीन नवीन वाटा शोधायच्या. नवीन नाती जोडायची. स्वतःला स्वतःमध्येच गुंतवायला शिकायच. स्वतःचं कौतुक करायचं आणि वेळप्रसंगी स्वतःचा कानही ओढायचा. आरशासमोर उभे राहून सांगायचं स्वतःला होय मी आहे स्पेशल.....
हे जमेल आपल्या प्रत्येकाला आणि जमणार आहे आपल्याला कारण आपण स्पेशल आहोत. येणाऱ्या प्रत्येक क्षणात सांगा स्वतःला, आपल्यातील "मी" ला मी स्पेशल आहे. I am Special.....
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
संदीप कोळी
9730410154
Sandip.koli35@gmail.com
No comments:
Post a Comment