Monday, 15 July 2019

गुरुपौर्णिमा Gurupornima

 गुरुपौर्णिमा 

 आदरणीय गुरुवर्य......

                           गुरु, कोणाला म्हणणार आपण गुरु? आपलं जगणं घडवणारा.....पावलांना बळ देणारा, कठीण वाटेवर मुद्दाम नेऊन सोडणारा...... पण गुरु म्हणजे आधाराची कुबड़ी नव्हे, हात पसरुन मदत मागत बसण्याची जागा नव्हे......तो जगायला शिकवतो, तो लढ़ायला शिकवतो.....त्यांनी पाठीवर हात ठेऊन नुसतं म्हंटल तरी अंगात दहा हत्तीच् बळ येतं.......आणि मनाच्या गाभाऱ्यात चैतन्याचा संचार होऊन प्रेरणाना उधान येत......
      गुरु कोठे भेटावा...... आपल्याच माणसात... आपल्याच सभोवती....
                        दोन देशात युद्धाची तयारी सुरु असते.समोरच्या देशातील सैनिकाची युद्धाची तयारी बघुन सैनिक आपल्या सेनापतीला विनंती करतात की आपण नाही जिंकू शकणार त्याच्या विरोधात. सेनापती नाईलाजाने आपले मत राजा समोर मांडतो. राजा   विचारात पडतो. अशा पेच प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी राजा आपल्या गुरुचे मार्गदर्शन घेतात. गुरुआज्ञेप्रमाणे राजा आपल्या सर्व सैनिकाना घेऊन गुरुकड़े जातात. गुरु सर्व सैनिकांकडे बाघतात व सर्वाना उद्देशून सांगतात की आपल्या अडचणी मला माहित आहेत फ़क्त आपण एकदा देवाचा कौल घेऊया मग आपण लढाई करायची की नाही ते ठरवू. देऊळात थोडा वेळ घालवून गुरु बाहेर येतात व सांगतात की कौल आपल्या बाजूने आहे. आपणच जिकणाऱ.......सैनिक जोमने लढतात व बलाढ्य शत्रुची दाणादाण उडवतात. जिंकल्यावर राजा गुरुला भेटायला जातो व विजयाचे गुपित विचारतो. या वर गुरु स्मित हास्य करुण म्हणतात की मला तरी कुठे माहित होत मी फ़क्त प्रेरणा दिली त्याचा आत्मविश्वास वाढवला. लढाई तर तुम्हीच जिंकली तुमच्या कर्तुत्वावर.......
                      आपण ही माझ्या आयुष्यात असेच आलात. आपली भेटही अशाच एका वळणावर झाली. आपण मला वाट दाखवली. विचारांची पद्धति शिकवलीत. आपण मला प्रश्नाच्या गर्दीत सोडलतं. उत्तरे माहित असूनही ती मला शोधायला लावलीत. विचाराच्या विशाल जगात आपण मला स्वतंत्र पायवाट शोधायला शिकवलीत. प्रसंगी आधार दिलात व जबाबदारीही. ठेच लागून पडलो तर आधारही आपणच दिलात व पुन्हा उठून मार्ग चालण्याचे बळ ही आपणच दिलेत. वाटेत अडचणी आहेत, धोके आहेत म्हणून मागे न फिरता धेय्या पर्यंत चालायचे हे ही आपणच शिकवलत. स्वतःचे निर्णय स्वतः घेऊन स्वताच्या मनासारखे जगायला आपण शिकवलत. कष्ट करूनही आनंदात जगायला आपण शिकवलत. 
                   जग बदलले, काळ बदलला, वेळ बदलली तरी आपले मोल कमी होणार नाही. कोणतेही यश एकट्याच नसतं. आयुष्यात प्रत्येक वळणावर भेटणाऱ्याकडून काही ना काही चांगल घ्यावे हे आपण शिकवलंत.
          म्हणून गुरुपौर्णिमेच्या मंगलदिनी आपल्या ऋणात राहून आपल्यविषयी  कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सुवर्णयोग........
आपल्याला गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा


--------------------------------------------------------------------------------------------------------------------

संदिप....
9730410154
sandipkoli35@gmail.com


 

Monday, 8 July 2019

Keep it Simple

Keep it Simple.....
       काही दिवसांपूर्वीच आयपीएल संपले. आपण सर्वांनी कमी-जास्त प्रमाणात मॅचेस बघितले असतील. आपण कोणत्याही टीमचे सपोर्टर असलो तरी एका टीमची कायम चर्चा राहिली ती म्हणजे चेन्नई सुपर किंग्स. कोणी सपोर्टला असो, विरोधात असो किंवा फक्त क्रिकेट शौकीन असो, सिनिअर लोकांची टीम म्हणून चिडवलेली टीम 2019 च्या आयपीएल फायनल पर्यंत आली याचे एकमेव कारण म्हणजे टीमचा कॅप्टन एम एस धोनी. कागदावर मजबूत असूनही  जे इतर टीम करू शकल्या नाही ते CSK ने करुन दाखवले. या यशाचे रहस्य कॅप्टन धोनी ला विचारले त्यावेळी त्याने सांगितलेली दोन वाक्य खूप महत्त्वाची होती. त्यातील पहिले वाक्य होतं एवढ्या मोठ्या स्पर्धेत प्रत्येक खेळाडूला त्याची जबाबदारी व भूमिका माहीत आहे आणि दुसरं वाक्य म्हणजे Keep it Simple. धोनीने  सांगितलेली ही दोन वाक्य CSK च्या यशाची गमक असली तरी आपल्या ही बाबतीत ही वाक्य तंतोतंत लागू पडतात. धोनीचा यशाचा हा फॉर्म्युला आपल्या जीवनाच्या गणितालाही तितकाच समर्पक बसतो.
              आपल्या दररोजच्या उलाढालीत आपल्याला आपली जबाबदारी व भूमिका माहित असणे गरजेचे असते. नाहीतर आपली स्थिती ही भरकटलेल्या शिडाच्या होडीची सारखी होते की जिला किनारा हे सापडत नाही आणि सहारा ही सापडत नाही. त्यामुळे आपली जबाबदारी व भूमिका प्रत्येकाने ठरवली पाहिजे.
         धोनीच्या यशाच्या सूत्राची सर्वात मोठी Key म्हणजे धोनीचे दुसरे वाक्य Keep it Simple.  गोष्टी सरळ, साध्या आणि सोप्या ठेवा. म्हणायला, ऐकायला, समजायला एकदम सोपी वाटणारे हे तीन शब्द प्रत्यक्ष जगायला तितकेच कठीण असतात म्हणून आपला गुंता वाढत जातो.
           आपल्या बाबतीत घडणार्‍या अनेक गोष्टी आपण घडलेली किंवा घडणारी गोष्ट आहे तशी न स्वीकारता, ती आपल्याला हवी तशी स्वीकारतो आणि यातच आपली फसगत होते. आपल्यासमोर येणाऱ्या गोष्टी किंवा परिस्थिती प्रत्येक वेळी वेगवेगळी असू शकते. त्यावेळी त्याकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन आपली दिशा ठरवतो, की त्यामध्ये आपण फसणार आहोत की हसणार आहोत. हाच ॲटीट्युड परिस्थिती बदलणार असतो.
         आपल्या समोर असणारा सहा अंक दुसऱ्या बाजूला असणाऱ्याला नऊ दिसतो याचा अर्थ तो चुकीचा आहे असा होत नाही. तो त्याच्या बाजूने आणि आपण आपल्या बाजूने शंभर टक्के बरोबर असतो.
         कोणत्याही स्थितीत तीन बाबी खूप गरजेच्या असतात. प्रथम ती स्थिती शांतपणे समजून घेणे ही खूप मोठी बाब असते. अशावेळी आपण काय करू शकतो हे निश्चित ठाऊक असले पाहिजे. त्यानंतर दुसरी गोष्ट काही वेळा समोरच्या स्थितीनूसार समजावून देणे ही जबाबदारी ही पार पाडावी लागते आणि तिसरी गोष्ट म्हणजे माघार घेणे. योग्य वेळी back out  करणे हे ही गरजेचे असते. ती माघार आपल्या फायद्याचे असते. या बाबींने आपण सारासार विचार केला तर आपण ती स्थिती सोपी होऊ शकते. आपल्या बाबतीत अनेक वेळा बोलून सुटणारे प्रश्न आपण ग्रह करून ऑप्शनला ठेवून त्या प्रश्नांचा त्रास करून घेतो.
          काही तरी वेगळे करण्याच्या प्रयत्नात आणि स्वतःच्या काही स्थिर धारणांच्यामुळे सरळ गोष्टीचा आपण गुंता करून ठेवतो आणि मग तो गुंता सोडवण्यात आपली दमछाक होते, म्हणून तो गुंता होण्याआधीच आपण त्याला सामोरे जायला हवे, आणि त्यासाठी महत्त्वाची चावी म्हणजे Keep it Simple.....

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

© संदीप कोळी.
📱9730410154
sandip.koli35@gmail.com


Saturday, 8 June 2019

मोबाईल बंदी

मेरे प्यारे देशवासीयो, आज मध्य रात्री यानी ८ जून २०१९ की रात्री को बारा बजे से वर्तमान में जारी सभी मोबाईल फोन बंद होंगे। यानी आज रात्री से आपके फोन में किसीं भी प्रकार का नेटवर्क या इंटरनेट उपलब्ध नहीं होगा। आपके फोन में उपलब्ध सभी जानकारी हम तकनीकी मदत से मिटा देंगे और आपका फोन केवल एक प्लास्टिक का डिब्बा रह जायेगा। फोन का आना-जाना लीगल है, लेकिन उसके लिए आपको दुसरा एक फोन लेना पडेगा। जिस में सिर्फ बात करने और सूनने की सुविधा आपको मिलेगी और ये फोन कल से आपके नजदिकी दुकानो में उपलब्ध होंगे। ये कदम हम ने समाज और देश के विकास, उनकी ऊर्जा को बढाने के लिए उठाए है। मैं आप सभी को आश्वस्त करता हूँ की समाजहित और आपके हक्क की पुरी रक्षा की जायेगी। ये लढाई इस देश हर एक सामान्य नागरिक की लढाई है। आपको कोई चिंता करने की जरूरत नहीं है।
          ही ब्रेकिंग न्यूज टीव्हीवर पहिली आणि पायाखालची जमीन सरकली. आपल्या जवळचे अचानक आपल्या आयुष्यातून निघून गेल्यावर होते ती अवस्था झाली. हातातील लाडका मोबाईल आणि टीव्हीवरील बंदीची बातमी या दोन्हीकडे बघत वेळ बघितली तर रात्रीचे ८ वाजले होते, म्हणजे माझा मोबाईल आता फक्त चार तासाचा सोबती होता. मी मोबाईल बघितली तर त्याची स्क्रीन केविलवाणी वाटत होती. उरलेल्या चार तासात काय करायचे हेच मला सुचत नव्हते. सिनेमात Hour glass मधून वाळू निसटावी तसा वेळ संपत होता.
           टीव्हीवर ऐकलेली बातमी ची सत्यता पडताळणीसाठी एका-दोघांना फोन केला तर त्यांची अवस्था माझ्याहून बिकट होती. बोलायलाही त्यांना वेळ नव्हता. माझ्यापुढेही करायच्या गोष्टीचा डोंगर होता. आपला फोन वाचणार नाही पण त्यातील काही गोष्टी वाचवण्याचे आव्हान होते. आपला फोन म्हणजे आपला पाऊण मेंदूचं असतो आणि येणाऱ्या चार तासानंतर ते सर्वच संपणार होते. फोटो, व्हिडीओ, कॉन्टॅक्ट, मेसेज, व्हाट्सअप्प चॅट असे काय-काय आणि किती-किती करायचे यातच बारा वाजण्याचा ठोका जवळ आला. मोबाईल मध्ये ११.५९ मिनिटे झाली आणि फोन बंद झाला तो पुन्हा चालू न होण्यासाठी. आता तो फक्त एक प्लास्टिकचा डब्बा होता.
             त्या रात्री मला झोपच आली नाही. फोन शिवाय आता काय होणार? या अस्वस्थेमुळे झोपच आली नाही. सकाळ झाली पण मोबाईलमध्ये गजर झाला नाही. सकाळी सर्वात आधी फोन बघायची सवय हाताला झाल्यामुळे हात आपोआप त्या दिशेला गेला पण हाताला काही लागले नाही. वेळ बघण्यासाठी घरातील भिंतीवरील घड्याळ शोधावे लागले.
           आज कित्येक वर्षाने सकाळची सेल्फी मिस झाली. दररोज चहा बरोबर मोबाईल असे पण आज चहा बरोबर घरातल्याच्याशी बोलताना चहाची चव ताजी वाटली. मोबाईल नसल्याची बैचेनी जात नव्हती. हेच दुःख सांडण्यासाठी मित्रांनी बाहेर जाण्याचा प्लॅन केला. जवळच्या निसर्गरम्य ठिकाणी गेलो पण फोटो,व्हिडीओ साठी फोन नव्हता. आम्ही फिरायला गेली, धमाल-मस्ती केली हे इतरांना कळणार कसे? पण मस्त वाटले. निसर्ग फोटोत साठवण्यापेक्षा अनुभवण्याचा आनंद मोठा होता. दुपारच्या जेवणाचा फोटो सोशल मीडियावर टाकता आला नाही पण जेवणाची चव अप्रतिम होती.
           परत आल्यानंतर बोलण्यासाठी तरी फोन घेऊया म्हणून बाहेर पडलो तर दुकानांच्यासमोर इतकी मोठी लाईन होती की माझा नंबर येणे अशक्य होते. नाराज मनाने घरी आलो. कशातच मन लागत नव्हते . घरातील पुस्तकाचे कपात उघडले. पुस्तक वाचायला घेतले. मनाला आधार वाटू लागला. दिवसभर चॅटिंग नसल्यामुळे बोटांना आराम होता. झोप येण्याची वाट न बघता झोपी गेलो. घरच्यांच्या चेहऱ्यावर समाधान तर माझ्या चेहऱ्यावर नाराजी होती.
        दिवस सरकू लागले. व्हाट्सअँप, फेसबुक,इंस्टाग्राम, टिक-टॉक,ट्विटर, PUBGयांच्या आठवणीतून बाहेर पडू लागलो. आता मोबाईल नसण्याची सवय झाली. मोबाईल नसण्याचे दुःख विसरून गेलो होतो. मोबाईलमुळे  आठवणी जगण्यापेक्षा साठवण्याची जडलेली सवय आता आठवणी भरभरून जगण्यात बदलली होती.
            इतक्यात मोबाईलमध्ये गजर वाजला. सकाळचे आठ वाजले होते. मी झोपेतच गजर बंद केला, पण हाताला मोबाईलच्या स्पर्शाने डोळे लख्ख उघडले. माझा फोन माझ्या हातात होता, अगदी सुस्थितीत. मी जे पाहिले ते एक भयंकर स्वप्न होते. मनात जग जिंकल्याचा भाव होता. फोन दोन्ही हातात घेऊन बराच वेळ बसलो. आईच्या चेहऱ्यावर 'आग लाव त्या फोन ला' चे भाव होते पण मी मात्र भरून पावलो होतो.
पण खरोखर असे घडले तर....

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
© संदीप...
📱9730410154
sandip.koli35@gmail.com


Thursday, 16 May 2019

सोशल मीडिया

🗓 सोशल......
           'सोशल' आजच्या काळातील एकदम परवलीचा शब्द. अगदी उठल्यापासून रात्री डोळ्यातील झोपेमुळे हातातील फोन तोंडावर पडेपर्यंत आपण 'सोशल' असतो म्हणजेच 'सोशल मीडियावर' असतो. शाळेत असताना सामाजिक शास्त्र विषयात एक प्रसिद्ध वाक्य होते. 'Man is social animal.' त्यावेळी त्याचा अर्थ होता 'माणूस हा समाजाशिवाय राहू शकत नाही.' पण गेल्या काही वर्षात आपण समाजशास्त्रज्ञांनी ती व्याख्या बदलून ,Man is social media animal.' अशी केली आहे. ही शब्दातील गंमत नव्हे तर  आजची आपली वास्तविकता आहे. तुम्ही आणि मी आपल्यात डोकावले तरी ही नवीन व्याख्या आपल्याला तंतोतंत लागू पडते.
           सकाळी झोपेतून जागे झाल्यावर पहिल्यांदा आपण सोशल कट्टा तपासतो, जो आपण काही तासापूर्वी सोडला होता. व्हाट्सअप उघडल्यावर सुविचाराचे इतके मेसेज आलेले असतात की कधीकधी प्रश्न पडतो व्हाट्सअप नसते तर कदाचित जीवन जगण्याचा मार्गच चुकलो असतो. त्यातच व्हाट्सअप ने लावलेला नवीन नाद म्हणजे 'स्टेटस'. माझ्यासह आपल्या बऱ्याच जणांचा वेळ दुसऱ्याचे स्टेटस पाहण्यात, आपले स्टेटस ठेवण्यात आणि ठेवलेली स्टेटस किती जणांनी पाहिले यातच जात असतो.
         फिरायला गेलेले आपले फोटो, फॅमिली फोटो, सिनेमा बघायला गेलेले, गोइंग टू पुणे, कमिंग टू होम, हॉटेल ला लंच, डिनर, पार्टी आशा सर्वच गोष्टी आपण हल्ली शेअर करतो. वाढदिवस, लग्न, अभिनंदन यांच्या शुभेच्छा बद्दल आभार ठीक आहे पण हल्ली दुःखद घटना या प्रसंगी सहभागी झाल्याबद्दल ही आभार मानले जातात.
        फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, टिकटॉक या सारख्या सोशल गंमती आहेतच. फेसबुकची अवस्था व्हाट्सअप सारखीच आपले ठेवायचे पसरून आणि दुसर्‍याची बघायचं वाकून. तिथेही लाईक, कमेंट चे प्रेशर असतेच. मला जास्त कौतुक वाटते ते फेसबुक वर एखाद्या पोस्टवर कमेंट लिहून भांडणाऱ्याचे. यातून काहीच साध्य होत नाही पण, विनाकारण आपण आपले शब्द, ज्ञान आणि आपली पातळी या सर्वांचा पसारा जगापुढे मांडून मोकळे होतो.
           एक व्यंगचित्र पाहिले असेल. एक व्यक्ती ICU मध्ये असते. त्याच्या जवळ त्याची पत्नी व मुलगा असतो. बाहेरील व्यक्ती बोलत असतात याचे  फेसबुक वर 2000 फ्रेंड्स, व्हाट्सअप च्या 50 ग्रुप मध्ये आहे म्हणे पण इथे एकटाच. पण हीच वास्तविकता आहे. आपले सर्व जगणे आता व्हर्चुअल झाले आहे. मी हे पडताळण्यासाठी यावर्षी माझी जन्मतारीख फेसबुकवरून डिलीट केली, तर घरचे चार लोक सोडले तर माझा वाढदिवस कोणाच्याही लक्षात राहिला नाही. हेच फेसबुक वर गेल्या वर्षी 500 च्यावर शुभेच्छा संदेश आले होते. व्हाट्सअपवरचे वेगळेच याचा अर्थ काय घ्यायचा हे माझ्यासह तुमच्याही लक्षात आले असेल.
           एकंदरच आपण सर्वच बाबतीत एकदम उत्साही झालो आहोत.आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट आपल्याला जगापुढे मांडायचे आहे, पण हे जगापुढे मांडण्याच्या धडपडीत आपण आपल्या खऱ्या जगापासून एकटे पडत चाललो आहोत. आठवणी या साठवण्यासाठी असतात. पूर्वी एखाद्या व्यक्तीला जाणून घ्यायचे असेल तर त्याच्याशी भेटून, जवळीक साधून बोलावे लागे पण आता मात्र एखाद्याच्या वैयक्तिक गोष्टी जाणून घ्यायच्या असेल तर त्याची सोशल अकाउंट बघितली  तरी त्या व्यक्तीची सर्व माहिती  समजते. ग्लोबली कनेक्ट होण्याच्या नादात आपला संवाद हरवत चालला आहे. समोर बसून भावना व्यक्त करण्याऐवजी इमोजी, स्टिकर आणि फोटोवरच आपण व्यक्त होतो.
         जगाशी संपर्क असायला हवा आणि त्यासाठी सोशल मीडिया वापरायला हवा याबाबत माझे दुमत नाही पण हा सोशल मीडिया आपल्याला सोसेल तितकाच वापरला पाहिजे.
            तंत्रज्ञानाच्या साथीने काळाच्या एक पाऊल पुढे राहण्यापेक्षा भूतकाळाच्या सुखद आठवणी बरोबर वर्तमानात ती माणसे जपली तर पुढच्या काळात तीच आपल्याला सोबत देेतील. पण हे सर्व सांगण्यासाठी ही सोशल मीडियाच वापरावा लागतो  कारण या सोशल मीडिया व्यतिरिक्त आपण कशावरच विश्वास ठेवत नाही हीच मोठी शोकांतिका आहे. विश्वास वाटत नसेल तर बघा गुगल करून.....

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

©संदीप कोळी
9730410154
sandip.koli35@gmail.com


Tuesday, 26 February 2019

राजभाषा मराठी दिन

📝 माय मराठी, माझी मराठी
"लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,
"जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी"
या ओळींचा गोडवा जितका तितकाच आपल्या मातृभाषेचा गोडवा..... ज्ञानोबांच्या शब्दात
"माझा मराठीची बोलू कौतुके। 
परि अमृतातेहि पैजासी जिंके।"
       अशी अमृताशी पैजा घेणारा गोडवा असणारी आपली मातृभाषा मराठी. आज २७ फेब्रुवारी ज्ञानपीठ विजेते वि.वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिन अर्थात मराठी राजभाषा दिवस.....
         इतर भाषा अवगत असूनही बोलताना जाणीवपूर्वक मराठीचा वापर करणाऱ्यांसाठी मराठी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.....
        आपल्या नुकत्याच बोलायला शिकलेले व शिकणाऱ्या पाल्याला इंग्रजी शब्दाची ओळख करून देणाऱ्यांनाही मराठी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.......
         एका साध्या वाक्यात विनाकारण एक-दोन इतर भाषेतील शब्द वापरून आपला वरचा दर्जा दाखवणार्‍यांना ही मराठी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा......
          मराठी भाषा टिकली पाहिजे असे मनापासून वाटणार्‍या पण आपल्या मुलांना मात्र इंग्रजी माध्यमात शिकवणाऱ्याना ही मराठी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा......
           मोबाईल मध्ये मराठी भाषा असतानाही मराठी संदेश इंग्रजीमध्ये लिहून पाठवणाऱ्यांना ही मराठी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.....
          
          आपला मोबाईल नंबर, वस्तूंची किंमत सांगताना इंग्रजीत अंक आठवून सांगणाऱ्याना ही मराठी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.....
           आपली सही इंग्रजीत करून मराठीचा अभिमान बाळगणाऱ्या मराठी बांधवाना ही मराठी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.....
         आपला इतर भाषांना विरोध नाही. प्रत्येक भाषेची वेगळी संस्कृती, समृद्धता आहे. त्याचा आदर आपण केलाच पाहिजे. पण सध्या मराठी सोडून इतर भाषा बोलण्यावर मराठी माणसाचा जोर आहे. यामुळे आपणच आपली सुंदर भाषा दुर्लक्षित करतोय. मराठीत पण सुंदर बोली भाषा आहेत मालवणी, कोकणी, अहिराणी, कोल्हापुरी, पुणेरी, विदर्भ, यासारख्या महाराष्ट्राच्या विविध प्रांतात बोलल्या जाणाऱ्या बोलीभाषेची आपली स्वतंत्र गोडी व नावीन्य आहे. ते आपण जपले पाहिजे. ग्रामीण भाषा बोलले म्हणून कोणी गावंढळ होत नाही तो आपण केलेला गोड गैरसमज आहे.
       आपण बोलताना शक्य तेवढ्या मराठी शब्दचावापर करायला हवा हा आता पर्यायच नसेल तर इतर भाषेतील शब्द वापरणे क्रमप्राप्त ठरते.

असो.....  मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या व मराठीचा अभिमान असणाऱ्या आपल्या सर्वांना आजच्या राजभाषा मराठी दिनाच्या मराठीतून खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

संदीप कोळी
973041015
sandikoli35@gmail. com


Saturday, 12 January 2019

युवक - क्षमतांची मशाल

🗓   आज १२ जानेवारी राष्ट्रीय युवक दिन......

              ज्या भारतीय संस्कृतीची ओळख व अनुभूती आपल्या वागण्यातून, बोलण्यातून आणि अभिव्यक्तीतून जगाला करून देणाऱ्या स्वामी विवेकानंद यांचा जन्म दिवस......
           स्वामी विवेकानंद म्हणजेच नरेंद्र, लहान असतानाचा प्रसंग. नरेंद्रचे वडील कलकत्याचे प्रसिद्ध व मोठे वकील होते. त्यामुळे त्याच्या घरी प्रतिष्ठित व्यक्तीची नेहमी वर्दळ असे. असेच एके दिवशी पाहुण्याच्या गराड्यात नरेंद्र सापडला. मानवी सवयी व स्वभावाप्रमाणे उपस्थितांपैकी एकाने नरेंद्रना प्रश्न केला. "बाळ नरेंद्र मोठेपणी काय होणार?" त्या काळात नरेंद्र वर त्यांच्या घोडेगाडीवाल्याचा प्रभाव होता. बालवयातील नरेंद्र ने अबोधपणे उत्तर दिले. "मी घोडेगाडीवाला होणार" उपस्थितात हशा पिकला.  नरेंद्रचे वडील यावर प्रचंड नाराज झाले. उपस्थित गेल्यावर विश्वनाथ दत्तांनी नरेंद्र व त्यांच्याआई या दोघांवर प्रचंड रागावले. छोट्या नरेंद्रला काय चुकलं? हे लक्षात आले नाही, पण आईने प्रसंग ओळखला. रडणाऱ्या नरेंद्रला मांडीवर घेत म्हणाल्या "तुला गाडीवान व्हायचे आहे ना, तू नक्की हो पण, तू त्या श्रीकृष्णासारखा सारथी हो. जगाला मार्ग दाखव.'  नरेंद्रच्या आईच्या त्या दोन वाक्यांचा नरेंद्रचा स्वामी विवेकानंद होण्यात आणि जगाला दिशा दाखवण्यात खूप मोठा वाटा होता.
          भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे. इतर देशांपेक्षा आपल्या देशात तरुणांची संख्या खूप जास्त आहे, म्हणून भारत महासत्ता होणार असा ठाम विश्वास डॉ. अब्दुल कलाम यांना होता. प्रत्येक व्यक्ती आयुष्यभर अनेक क्षमता घेऊन जगत असते. ती क्षमता स्थितिज ऊर्जेच्या स्वरूपात असते. व्यक्तीच्या स्थितिज ऊर्जेचे रूपांतर गतिज ऊर्जेत करणारी ती ठिणगी गरजेचे असते. आपल्यामध्ये, आपल्या सभोवती आपल्यापेक्षा लहान अथवा मोठे अशा अनेकांच्यामध्ये असणाऱ्या क्षमतांची जाणीव करून देणारे कोणीतरी भेटणे गरजेचे असते. कधी ते आई-वडील, भाऊ-बहीण, मित्र, मार्गदर्शक, गुरु, शिक्षक किंवा अगदी आपल्याला भेटणारी अनोळखी व्यक्ती असू शकते.   
              अँन्ड्रयू काबोग नावाचा विचारवंत असे म्हणतो की, सामान्य माणूस आपल्या क्षमतेच्या आणि शक्तीच्या फक्त एक चतुर्थांश काम करतो. जी माणसे आपल्या क्षमतेच्या  निम्म्याहून अधिक क्षमतेने काम करतात त्यांना जग सलाम करते. व जी मोजकी माणसे आपल्या पूर्ण क्षमतेच्या 100% काम करतात, त्यांना डोक्यावर घेते.
          प्रत्येक तरुणाच्या आयुष्यात हा क्षमता ओळखण्याचा टप्पा वेगवेगळ्या वेळी व वेगवेगळ्या व्यक्ती व प्रसंगामुळे येतो. संत ज्ञानेश्वरांचा आयुष्यात तो वयाच्या १६व्या वर्षी, न्यूटनचा आयुष्यात २१ व्या वर्षी, भगतसिंगांच्या आयुष्यात तो १२ व्या वर्षे, कल्पना चावला यांच्या आयुष्यात ५ व्या वर्षी तर महेंद्रसिंग धोनीच्या आयुष्यात तो १४ व्या वर्षी आला त्याबरोबर इतरांच्या ही आयुष्यात आला आणि त्यानंतरचा इतिहास सर्वज्ञात व सर्वमान्य आहे.
           आपल्याला जशी प्रेरणा मिळली, तशी आपणही इतरांची  प्रेरणा होऊ शकतो. त्यांच्या क्षमता जागृत करला हातभार लावू शकतो. आपल्या जवळच्या किंवा संपर्कातील व्यक्तींच्या प्रवासात आपलाही वाटा असू शकतो.
            आजच्या या युवक दिनाच्या निमित्ताने मनाने व विचाराने तरुण असणाऱ्या प्रत्येकाने अशी प्रेरणेची ज्योत इतरांच्यातही पेटवून तिची धगधगती मशाल निर्माण करावी जी राष्ट्रसमृद्धी मध्ये कायम तेवत राहील....
राष्ट्रीय युवक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा💐💐

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

©संदीप कोळी
9730410154

sandip.koli35@gmail.com




Sunday, 6 January 2019

नाही

🗓 नाही.....
       संध्याकाळची वेळ..... अचानक दारावरची बेल वाजते. प्रश्नार्थक मनाने आपण दरवाजा उघडतो आणि समोर आपला जुना मित्र, जवळचा नातेवाईक किंवा अगदीच ओळखीचे कुणीतरी उभे असते. आपल्याला खूप आनंद होतो. बरेच दिवसांनी किंवा वर्षांनी ती व्यक्ती आपल्यासमोर उभी असते. आपण आदरातिथ्य करण्यात कोणतीही कसर सोडत नाही. गप्पांचा ओघ सुरू होतो. गप्पा रंगात येतात. आपण भरभरून बोलत असतो. यादरम्यान ती व्यक्ती आपल्या बॅगेतून काही कागद बाहेर काढते व पॉलिसी विषयी माहिती देऊ लागते. परिस्थिती आपल्या लक्षात येते पण आपल्याकडे पर्याय नसतो. मन लावून ऐकण्याचा व समजण्याचा प्रयत्न करत आपण ते ऐकतो. तेवढ्यात तो एक फॉर्मवर सही करायला सांगतो. आपल्याला मनात नकार ओरडून सांगत असतो पण तो बाहेर पडत नाही. इच्छा नसतानाही आपण त्यावर सही करतो व हसतमुखाने एकमेकांचा निरोप घेतो. त्यानंतर खरी गंमत सुरू होते आपल्याला नकार द्यायचा होता पण आपल्याला तो देता येत नाही मग आपण स्वतःला दोष देत बसतो.
              वरील प्रसंग गमतीदार व प्रातिनिधिक असला तरी आपण आपल्या आयुष्यात डोकावून पाहिले तर अनेक वेळा आपण अशा पेचप्रसंगात अडकलेले असतो.
             नाही, नको, नसणार, No, Not, Never असे शब्द कधी वापरू नये असे म्हटले जाते. या शब्दामुळे आपल्यातील नकारात्मकता वाढते हे जरी खरे असले तरी या शब्दांचा योग्य वेळी योग्य वापर आहे तितकाच गरजेचा असतो.
             दैनंदिन अनेक प्रसंगात आपल्यासमोर  होय व नाही हे दोन पर्याय येत असतात. यापैकी आपण कोणताही पर्याय निवडू शकतो पण बहुतेक वेळा आपण 'होय' हाच पर्याय निवडतो. आपल्या मनात नसताना, इच्छा नसताना, आपली क्षमता व काही वेळा आपली योग्यता नसताना फक्त समोरच्या व्यक्तीला नाही कसे म्हणायचे म्हणून आपण 'होय' म्हणतो व आपल्या अडचणी वाढवून घेतो.
            नाही हा असा शब्द आहे, जो आपल्या मनाची कणखरता व खंबीरता दर्शवतो. योग्य वेळी आपल्याला नकारही तितक्याच सहजपणे देता आला पाहिजे. नाहीतर त्या होकाराचा त्रासच आपल्याला जास्त होतो.
              नात्यांमध्ये, वडीलधाऱ्यांना,  आदर असणाऱ्यांना किंवा अगदी आपल्यापेक्षा छोट्यानाही तितक्याच स्पष्ट व नम्रपणे 'नाही' म्हणता आले पाहिजे.
              असे म्हणतात की आपण होय म्हणायला खूप गडबड व नाही म्हणायला खूप उशीर करतो. आपल्याला नको असणाऱ्या गोष्टी नाही म्हणायला शिकायला हवं, कारण काही वेळा नाही म्हणणे खूप सकारात्मक असते आपल्यासाठी व समोरच्यासाठीही....

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

©संदीप कोळी

9730410154

Sandip.koli34@gmail.com

मन ही आवरायला घेऊया

           वातावरणात बदलाचे वारे वाहू लागले आहे. आजूबाजूला उत्साहाचे उधाण आले आहे आणि मनामनात आनंदाच्या लहरी उमटत आहे. दिवाळी तोंडावर आली आह...