Saturday, 12 January 2019

युवक - क्षमतांची मशाल

🗓   आज १२ जानेवारी राष्ट्रीय युवक दिन......

              ज्या भारतीय संस्कृतीची ओळख व अनुभूती आपल्या वागण्यातून, बोलण्यातून आणि अभिव्यक्तीतून जगाला करून देणाऱ्या स्वामी विवेकानंद यांचा जन्म दिवस......
           स्वामी विवेकानंद म्हणजेच नरेंद्र, लहान असतानाचा प्रसंग. नरेंद्रचे वडील कलकत्याचे प्रसिद्ध व मोठे वकील होते. त्यामुळे त्याच्या घरी प्रतिष्ठित व्यक्तीची नेहमी वर्दळ असे. असेच एके दिवशी पाहुण्याच्या गराड्यात नरेंद्र सापडला. मानवी सवयी व स्वभावाप्रमाणे उपस्थितांपैकी एकाने नरेंद्रना प्रश्न केला. "बाळ नरेंद्र मोठेपणी काय होणार?" त्या काळात नरेंद्र वर त्यांच्या घोडेगाडीवाल्याचा प्रभाव होता. बालवयातील नरेंद्र ने अबोधपणे उत्तर दिले. "मी घोडेगाडीवाला होणार" उपस्थितात हशा पिकला.  नरेंद्रचे वडील यावर प्रचंड नाराज झाले. उपस्थित गेल्यावर विश्वनाथ दत्तांनी नरेंद्र व त्यांच्याआई या दोघांवर प्रचंड रागावले. छोट्या नरेंद्रला काय चुकलं? हे लक्षात आले नाही, पण आईने प्रसंग ओळखला. रडणाऱ्या नरेंद्रला मांडीवर घेत म्हणाल्या "तुला गाडीवान व्हायचे आहे ना, तू नक्की हो पण, तू त्या श्रीकृष्णासारखा सारथी हो. जगाला मार्ग दाखव.'  नरेंद्रच्या आईच्या त्या दोन वाक्यांचा नरेंद्रचा स्वामी विवेकानंद होण्यात आणि जगाला दिशा दाखवण्यात खूप मोठा वाटा होता.
          भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे. इतर देशांपेक्षा आपल्या देशात तरुणांची संख्या खूप जास्त आहे, म्हणून भारत महासत्ता होणार असा ठाम विश्वास डॉ. अब्दुल कलाम यांना होता. प्रत्येक व्यक्ती आयुष्यभर अनेक क्षमता घेऊन जगत असते. ती क्षमता स्थितिज ऊर्जेच्या स्वरूपात असते. व्यक्तीच्या स्थितिज ऊर्जेचे रूपांतर गतिज ऊर्जेत करणारी ती ठिणगी गरजेचे असते. आपल्यामध्ये, आपल्या सभोवती आपल्यापेक्षा लहान अथवा मोठे अशा अनेकांच्यामध्ये असणाऱ्या क्षमतांची जाणीव करून देणारे कोणीतरी भेटणे गरजेचे असते. कधी ते आई-वडील, भाऊ-बहीण, मित्र, मार्गदर्शक, गुरु, शिक्षक किंवा अगदी आपल्याला भेटणारी अनोळखी व्यक्ती असू शकते.   
              अँन्ड्रयू काबोग नावाचा विचारवंत असे म्हणतो की, सामान्य माणूस आपल्या क्षमतेच्या आणि शक्तीच्या फक्त एक चतुर्थांश काम करतो. जी माणसे आपल्या क्षमतेच्या  निम्म्याहून अधिक क्षमतेने काम करतात त्यांना जग सलाम करते. व जी मोजकी माणसे आपल्या पूर्ण क्षमतेच्या 100% काम करतात, त्यांना डोक्यावर घेते.
          प्रत्येक तरुणाच्या आयुष्यात हा क्षमता ओळखण्याचा टप्पा वेगवेगळ्या वेळी व वेगवेगळ्या व्यक्ती व प्रसंगामुळे येतो. संत ज्ञानेश्वरांचा आयुष्यात तो वयाच्या १६व्या वर्षी, न्यूटनचा आयुष्यात २१ व्या वर्षी, भगतसिंगांच्या आयुष्यात तो १२ व्या वर्षे, कल्पना चावला यांच्या आयुष्यात ५ व्या वर्षी तर महेंद्रसिंग धोनीच्या आयुष्यात तो १४ व्या वर्षी आला त्याबरोबर इतरांच्या ही आयुष्यात आला आणि त्यानंतरचा इतिहास सर्वज्ञात व सर्वमान्य आहे.
           आपल्याला जशी प्रेरणा मिळली, तशी आपणही इतरांची  प्रेरणा होऊ शकतो. त्यांच्या क्षमता जागृत करला हातभार लावू शकतो. आपल्या जवळच्या किंवा संपर्कातील व्यक्तींच्या प्रवासात आपलाही वाटा असू शकतो.
            आजच्या या युवक दिनाच्या निमित्ताने मनाने व विचाराने तरुण असणाऱ्या प्रत्येकाने अशी प्रेरणेची ज्योत इतरांच्यातही पेटवून तिची धगधगती मशाल निर्माण करावी जी राष्ट्रसमृद्धी मध्ये कायम तेवत राहील....
राष्ट्रीय युवक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा💐💐

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

©संदीप कोळी
9730410154

sandip.koli35@gmail.com




Sunday, 6 January 2019

नाही

🗓 नाही.....
       संध्याकाळची वेळ..... अचानक दारावरची बेल वाजते. प्रश्नार्थक मनाने आपण दरवाजा उघडतो आणि समोर आपला जुना मित्र, जवळचा नातेवाईक किंवा अगदीच ओळखीचे कुणीतरी उभे असते. आपल्याला खूप आनंद होतो. बरेच दिवसांनी किंवा वर्षांनी ती व्यक्ती आपल्यासमोर उभी असते. आपण आदरातिथ्य करण्यात कोणतीही कसर सोडत नाही. गप्पांचा ओघ सुरू होतो. गप्पा रंगात येतात. आपण भरभरून बोलत असतो. यादरम्यान ती व्यक्ती आपल्या बॅगेतून काही कागद बाहेर काढते व पॉलिसी विषयी माहिती देऊ लागते. परिस्थिती आपल्या लक्षात येते पण आपल्याकडे पर्याय नसतो. मन लावून ऐकण्याचा व समजण्याचा प्रयत्न करत आपण ते ऐकतो. तेवढ्यात तो एक फॉर्मवर सही करायला सांगतो. आपल्याला मनात नकार ओरडून सांगत असतो पण तो बाहेर पडत नाही. इच्छा नसतानाही आपण त्यावर सही करतो व हसतमुखाने एकमेकांचा निरोप घेतो. त्यानंतर खरी गंमत सुरू होते आपल्याला नकार द्यायचा होता पण आपल्याला तो देता येत नाही मग आपण स्वतःला दोष देत बसतो.
              वरील प्रसंग गमतीदार व प्रातिनिधिक असला तरी आपण आपल्या आयुष्यात डोकावून पाहिले तर अनेक वेळा आपण अशा पेचप्रसंगात अडकलेले असतो.
             नाही, नको, नसणार, No, Not, Never असे शब्द कधी वापरू नये असे म्हटले जाते. या शब्दामुळे आपल्यातील नकारात्मकता वाढते हे जरी खरे असले तरी या शब्दांचा योग्य वेळी योग्य वापर आहे तितकाच गरजेचा असतो.
             दैनंदिन अनेक प्रसंगात आपल्यासमोर  होय व नाही हे दोन पर्याय येत असतात. यापैकी आपण कोणताही पर्याय निवडू शकतो पण बहुतेक वेळा आपण 'होय' हाच पर्याय निवडतो. आपल्या मनात नसताना, इच्छा नसताना, आपली क्षमता व काही वेळा आपली योग्यता नसताना फक्त समोरच्या व्यक्तीला नाही कसे म्हणायचे म्हणून आपण 'होय' म्हणतो व आपल्या अडचणी वाढवून घेतो.
            नाही हा असा शब्द आहे, जो आपल्या मनाची कणखरता व खंबीरता दर्शवतो. योग्य वेळी आपल्याला नकारही तितक्याच सहजपणे देता आला पाहिजे. नाहीतर त्या होकाराचा त्रासच आपल्याला जास्त होतो.
              नात्यांमध्ये, वडीलधाऱ्यांना,  आदर असणाऱ्यांना किंवा अगदी आपल्यापेक्षा छोट्यानाही तितक्याच स्पष्ट व नम्रपणे 'नाही' म्हणता आले पाहिजे.
              असे म्हणतात की आपण होय म्हणायला खूप गडबड व नाही म्हणायला खूप उशीर करतो. आपल्याला नको असणाऱ्या गोष्टी नाही म्हणायला शिकायला हवं, कारण काही वेळा नाही म्हणणे खूप सकारात्मक असते आपल्यासाठी व समोरच्यासाठीही....

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

©संदीप कोळी

9730410154

Sandip.koli34@gmail.com

आज : Today

📝 आज.......       आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...