Thursday, 30 January 2020

मायेचं घरटं आपल्या पक्षांसाठी (भाग 1)

🐥 मायेचं घरटं आपल्या पक्षांसाठी.....🌳
          या प्रवासाला सुरुवात होऊन आता जवळपास अकरा महिने पूर्ण झाले. हा प्रसंग लिहिण्याची खूप इच्छा होती. पण वर्णन कुठपर्यंत करायचे म्हणून इतका उशिरा झाला शेवटी शेवट सापडलाच नाही म्हणून जेवढे आहे तेवढे तरी लिहूया म्हणून ही सुरुवात........
               साधारण मार्च महिन्याच्या सुरुवातीला *एक सामाजिक जाणीव, मनातील निसर्गाविषयीचा हळवा कोपरा आणि लेकराच्या हट्टापायी* अंगणात येणाऱ्या पक्षांसाठी कृत्रिम घरटे बनवण्याचे ठरवले. फार विचार व  माहिती न घेता उपलब्ध साधन व सोयीचे पडेल अशा प्रकारे एक छोटे घरटे आम्ही तयार केले. बाहेरून आकर्षक दिसण्यासाठी त्याला सजावटीच्या काही गोष्टी लावून आकर्षक घरटे तयार केले. मुळात येणाऱ्या पक्षांना ते कळणार नव्हते पण आमची हौस, चांगले दिसावे अशी इच्छा या नादात आम्ही ते आकर्षक सजवले. आता तयार केलेले घरटे लावायचे कोणत्या ठिकाणी हा प्रश्न सोडवणे गरजेचे होते.  यासाठी आमच्याकडे होता तेवढा शहाणपणा वापरून आमच्या सतत वर्दळी पासून दूर, इतर धोकादायक प्राण्याच्या टप्प्यापासून दूर, पाऊस येण्याची दिशा, निवाऱ्याचा कोपरा यासारख्या अनेक निकष लावून उत्तर दिशेकडे तोंड करून घराच्या बाहेरच्या बाजूला आम्ही ते 12 ते 15  फूट उंचीवर ते कृत्रिम घरटे  अडकवले. 
            ही सर्व कसरत झाल्यावर एकदम भारी वाटत होते, त्यात भर म्हणून आम्ही त्या घरट्याच्या बाहेर पक्षांना आमिष म्हणून ज्वारीची दोन भरलेली कणसे ही बांधली. आम्हाला वाटले आता लगेच चिमण्या घरट्यात येतील. पण एवढ्या सहज आयते मिळाले म्हणून गडबडीने घ्यायला आपल्यासारख्या थोडीच आहेत!.....
            आम्ही दररोज चिमण्यांची वाट बघायचो. काही दिवसात चिमण्या व इतर छोटे पक्षी  यायला लागले, पण फक्त बाहेर अडकवलेल्या ज्वारीच्या कणीसासाठी..... दाणे खाऊन निघून जातात पण घरट्यात जाण्याचे धाडस करत नव्हत्या. यात एप्रिल व मे महिना संपत आला. बाहेरच्या ज्वारीच्या कणीसातील सगळे दाणे संपले, पण पाहुण्या चिमण्या काही केल्या येत नव्हत्या. आमची उत्सुकता आता निराशेत बदलत चालली होती. जून महिना संपत आला. पाऊस सुरू झाला. आता तरी चिमण्या निवाऱ्यासाठी येतील असा विचार झाला, पण तेही झाले नाही.  आता या घरट्यात चिमण्या येतील ही  अशा आम्ही सोडली. नेहमी प्रमाणे वेगवेगळ्या चिमण्या घरट्याच्या बाहेरच्या काठीवर बसून चिव-चिव करून निघून जायच्या. त्यातली काही आता त्या घरट्यात जाऊन पाहणी करत होत्या पण घरट्यात राहायला कोणीच आले नव्हते. जुलै महिन्याच्या मध्यावर एके दिवशी सकाळच्या वेळी दोन ठिपके असणाऱ्या लहान चिमण्यांचा चिवचिवाट ऐकू येऊ लागला. बाहेर येऊन पाहिले तर त्या छोट्या चिमण्या गवताच्या काड्या घेऊन घरट्यात जावू लागल्या. त्याची लगबग सुरु झाली होती. क्रमाक्रमाने त्या चिमण्या घरट्यात गवताचा पाला घेऊन येत  होत्या. ज्या क्षणाची आम्ही गेली चार-साडेचार महिने वाट पाहत होतो तो क्षण खरा ठरत होता. नवीन पाहुणे घरट्यात राहायला यायला तयार होते.
         ते छोटे जीव खूप कष्टाळू होते. तयार असणाऱ्या घरट्यातही त्यांना हवे तशी पाल्याची रचना करून तो अधिक सुरक्षित व उबदार बनवला. आम्ही एकदम खुश झालो होतो कारण ज्यासाठी हा खटाटोप चार महिन्यांपूर्वी केला होता तो पूर्ण होत होता. ऑगस्ट च्या मुसळधार पावसात चिमण्यांनी तातडीने त्याच्या घरट्याचे इंटेरिअर पूर्ण करून घेतले व त्या राहायला ही आल्या. इतर पक्षांना या दोन चिमण्या घरट्याच्या जवळपासही फिरकू देत नव्हत्या. चुकून जरी दुसरा पक्षी घरट्याजवळ आला तरी या दोन चिमण्या गोंधळ घालत....
क्रमशः
(खूप वाचायला लागून कंटाळा येऊ नये म्हणून भागात विभागणी करण्याची ही शक्कल😁)

©संदीप
9730410154

📌 टीप- व्हिडीओ🎥 व फोटो📸 चिमण्या येण्यापूर्वी व आल्या नंतरचे आहेत

Wednesday, 8 January 2020

सोशल मीडियाचा धुरळा

सोशल मीडियाचा धुरळा
               शाळेत वर्ग सुरू होता. वर्गात विषय सुरू होता. शिक्षकांनी मुलांना प्रश्न विचारला माणसाच्या मूलभूत गरजा कोणत्या? मुलांनी पटकन हात वर केले व चटकन उत्तर सांगायला सुरुवात केली. शिक्षकांनी काही जणांची उत्तरे स्विकारली, पण या सर्वांच्यात एका विद्यार्थ्याने शिक्षकांचे लक्ष वेधून घेतले, कदाचित त्याला त्याचा उज्ज्वल भूतकाळ कारणीभूत असेल, पण शिक्षकांनी त्याला प्रश्नाचे उत्तर विचारले. त्यांने ही नम्रपणे उत्तर दिलेले अन्न, वस्त्र, निवारा आणि मोबाईल या माणसाच्या मूलभूत गरज आहेत. त्याच्या या उत्तराने सर्व वर्गात हशा पिकला. शिक्षकांनी दरडावून विचारले तरी त्याने पुन्हा निरागसपणे उत्तर दिले, हो सर आमच्या घरी अन्न, वस्त्र, निवारा या बरोबर आमच्या घरातील सर्वांना मोबाईल लागतोच.मग मोबाईल ही झाली ना मूलभूत गरज.  शिक्षकांच्या प्रसंग लक्षात आला. हा जरी एक प्रसंग असला तरी  आपल्या सर्वांच्या घर-घर की कहाणी हीच बनलेली आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये स्मार्ट-मोबाईल ही गरजेची किंबहुना अत्यावश्यक बाब बनलेली आहे.
                  माकडापासून माणसाची उत्पत्ती होत असताना माणसाच्या मूलभूत गरजा बरोबरच माणसाने वेगवेगळ्या गोष्टी शिकण्यास सुरुवात केली. त्यातूनच मनोरंजनाच्या माध्यमातून काही गोष्टी आपण आत्मसात करत आलो. २० व्या शतकाच्या शेवटी आणि २१ व्या शतकाच्या सुरुवातीला तंत्रज्ञानाने कात टाकली आणि इतर तंत्रज्ञानाच्या गोष्टीला वाकुल्या दाखवत उज्ज्वल भविष्यावर स्वार होऊन मोबाईल आपल्या हाताला आला. सुरुवातीला फक्त बोलणे हे उद्दिष्ट घेऊन आलेला मोबाईल हळू बाळसे धरू लागला. बोलण्याबरोबर गाणी, घड्याळ, रेडिओ, कॅमेरा, इतर वैशिष्ट्यासह मोबाईल आपला सच्चा यार बनला,  पण २००८ मध्ये मोबाईल मोठा झाला. मोबाईल मध्ये अँड्रॉइड आले आणि आपला सच्चा यार मोबाईल मोठा झाला. मोबाईल मोठा झाला आणि त्याचे फार मोठे फायदे आपल्याला होऊ लागले. अँड्रॉइड फोन च्या विश्वात प्रचंड मोठी क्रांती केली. मनोरंजनाच्या साधनाबरोबर अनेक सोशल ॲपच्या माध्यमातून आपण सोशल व्हायला सुरुवात झाली आणि हा खूप मोठा बदल होता. अँड्रॉइड फोन मुळे विविध अँप आपल्या सर्वसामान्यांच्या आवाक्यात आली. फेसबुक, व्हाट्सअँप,  इंस्टाग्राम, ट्विटर, टिक-टॉक यासारख्या सोशल मीडिया अँप नी धुमाकूळ घातला आहे.
               सोशल मीडिया म्हणजे तरी काय? इंटरनेटवर उपलब्ध असणारा विविध व्यक्तींशी संपर्क साधून देणारा व ती जपून ठेवणारा मंच म्हणजे म्हणजे सोशल नेटवर्क सेवा.  सोप्या भाषेत सामाजिक जाळे म्हणजे सोशल मीडिया.  मग मोबाईल, फेसबुक, ट्विटर हे येण्यापूर्वी आपण सोशल नव्हतो का?  तर याचे उत्तर आहे 'नाही'. आपण आधीही सोशल होतो पण ते फक्त आपल्या गटासाठी, मित्रासाठी, कॉलेजसाठी, गल्लीसाठी नाहीतर फार-फार तर गावासाठी म्हणजे 'सरड्याची धाव कुंपणापर्यंत' तशी आपली सोशल धाव 'गावाच्या वेशीपर्यंत', पण नव्याने आलेल्या या सोशल मीडियामुळे आपली धाव दिल्लीपर्यंत अगदी अमेरिकेपर्यंत गेली आहे. आपल्यापैकी काहीजण अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही या माध्यमातून सल्ला देतात. म्हणजे मोबाईल, सोशल मीडिया यामुळे आपल्या भावाची रेंज थेट जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचली आहे.
                 सोशल मीडिया काय आहे?  कोणत्या माध्यमातून होते? हा ही भाग खूप इंटरेस्टिंग आहे. आपण जगाचा नाही पण भारताचा विचार केल्यास आपल्याकडील सर्वात जास्त वापरले जाणारे सोशल मीडिया अँप म्हणजे व्हाट्सअँप. भारतात जवळपास ४० कोटी लोक व्हाट्सअप चा वापर करतात. वापरायल एकदम सोपे असणारे मेसेंजर ॲप, साधारणपणे २०११ च्या सुरुवातीला व्हाट्सअप भारतात आले आणि तितक्याच वेगाने लोकप्रिय ही झाले. फोटो ,व्हिडिओ, डॉक्युमेंट, लोकेशन यासारख्या गोष्टींची सहज देवाणघेवाण होते. त्यामुळे व्हाट्सअप ची लोकप्रियता वाढत गेली. दिवसातून आपण सर्वात जास्त वेळ वापरणारे हे अँप.  एखादी गोष्ट वाऱ्यासारखी पसरवण्यात व्हाट्सअप चा वापर खूप मोठ्या प्रमाणावर होतो. यातील ग्रुपच्या माध्यमातून आपण सतत सक्रिय राहतो.
              व्हाट्सअँप नंतरचे दुसरे लोकप्रिय म्हणजे 'फेसबूक.' नवीन मित्र बनवणे आणि जुने मित्र शोधण्यासाठी फेसबुक हे हक्काचे व्यासपीठ आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात ही आपले फेसबुकच्या माध्यमातून मित्र असू शकतात. तसे बघायला गेले तर फेसबुक व्हाट्सअप च्या आधीचे, पण त्याला लोकप्रियता मिळवायला वेळ लागला. तरी भारतात जवळपास 24 कोटी लोक फेसबुक वापरतात. फोटो, व्हिडिओ, माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी,गोष्टी व्हायरल करण्यात आणि आपला एखादा विचार ग्लोबल करण्यासाठी फेसबुक हे हक्काचे व्यासपीठ. आपले मत व्यक्त करण्यासाठीचे एक प्रभावी माध्यम म्हणजे फेसबुक.
                  फेसबुक नंतर भारतातील तिसरे प्रसिद्धी पावलेले  सोशल माध्यम म्हणजे 'इंस्टाग्राम'. अगदी फेसबुक, व्हाट्सअप नंतर आलेले पण 'कानामागून येऊन तिखट झालेले' अँप म्हणजे इंस्टाग्राम. सध्या जवळपास १५ कोटी लोक भारतात इंस्टाग्राम वापरतात. फक्त फोटो, व्हिडिओ साठी तयार केलेले हे अल्पावधीतच लोकप्रिय झाले. विशेषतः आपल्या फोटोच्या प्रसिद्धीसाठी हे अँप खूप उपयुक्त.
                भारतात वापरले कमी जाते पण ज्याची चर्चा जास्त होते ते अँप म्हणजे 'ट्विटर'. तसा याचा वापर भारतात कमी आहे. सध्या भारतात जवळपास ८ कोटी लोक ट्विटर वापरतात, पण अजून हे अँप सामान्य झालेले नाही. सध्या हे फक्त प्रसिद्ध लोकांसाठी आणि त्यांच्या ट्विटर वॉरसाठी आहे असा आपल्याला वाटते, पण फोटो ,व्हिडिओ, माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी हे ही तितकेच प्रभावी आहे.  त्यानंतर आणखी एक विशेष अँप चा उल्लेख करणे गरजेचे आहे ते म्हणजे 'टिक-टॉक.  सप्टेंबर २०१६ साली भारतात आलेल्या या अँपचा भारतात जवळपास ३० कोटी लोक वापर करतात. यावरून टिक- टॉक ची लोकप्रियता आपल्याला कळू शकते. छोटे- छोटे व्हिडिओ, फोटो, शेअरिंग यामुळे तरुण वर्गात व फक्त गंमत पाहणाऱ्या हे अँप विशेष लोकप्रिय आहे. याचा प्रभाव एवढा आहे की लोक या व्हिडिओ काम करून टिक- टॉक स्टार झालेले आहेत. लाखो लोक त्यांना फॉलो करतात. याशिवाय शेअरचॅट, टेलिग्राम, ब्लॉगर, यासारखे अनेक अँप आपल्याला सोशल कनेक्ट ठेवतात.
             व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर यासारख्या माध्यमातून आपण जगाशी कनेक्ट होऊ शकतो. या माध्यमाच्या वापरामुळे माहितीचा स्फोट झाला आहे. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील माहिती काही क्षणात आपल्यापर्यंत पोहचते. यापूर्वीच ज्या गोष्टी फक्त पुस्तकातून किंवा तज्ञ माणसाकडून कळत होत्या त्या आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून सोप्या भाषेत समजू लागल्या आहेत. गेल्या महिन्यात महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या घडामोडी राष्ट्रपती राजवट, राज्यपाल, विश्वासदर्शक ठराव, बहुमत, आमदार या सर्व गोष्टी संविधानातील कलमासह आपल्याला माहीत शाळेत आपण नागरिकशास्त्र शिकून समजले नव्हत्या त्या गोष्टी फेसबुक आणि व्हाट्सअप ने शिकवल्या. व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक कार्य, वृक्षारोपण, रक्तदान, स्वच्छता शिबिर, चाांगल्या गोष्टींना प्रसिद्धी मिळते.   फेसबुक च्या माध्यमातून लाखो लोक एकत्र येऊ लागले आहेत. तुमचा एखादा जुना मित्र फेसबुक वर आपल्या भेटतो.  तुमचा एखादा विचार, तुमचे लेखन फेसबुकच्या माध्यमातून सर्वांच्या समोर जाते, त्याच्या पसंतीला येते. सोशल माध्यमांच्यामुळे  समाजोपयोगी माहिती पोहचवली जाऊ शकते. हॅशटॅग च्या उपयोगाने चळवळी उभ्या राहतात. सोशल मीडियावर समाजातील सर्वच घटक सहभागी आहेत. 'होय आम्ही शेतकरी' नावाचा फेसबुक ग्रुप आपल्या ऐकण्यात असेल, दिड लाख शेतकरी यात समाविष्ट आहेत व त्या माध्यमातून शेतीचे अद्यावत ज्ञान दिले जाते. त्यातून त्यांची चर्चासत्रे होतात. हे एक उदाहरण झाले अशा प्रकारचे, अनेक विषयाचे व उद्देशाचे ग्रुप अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतात. म्हणजे सोशल मीडियाचा हा अत्यंत चांगला वापर आहे.  एखाद्या गरजू व्यक्तीला मदत पोहोचण्यासाठी त्याचा प्रभावी वापर आपण महापुराच्या वेळी अनुभवला आहे. चांगल्या विषयांची, चांगल्या गोष्टींची शेअरिंग नक्कीच फायदेशीर ठरते. एखाद्या मदतीच्या, कौतुकाच्या ट्विट चे किती फायदा होतात याची अनेक उदाहरणे आपण पहिली आहेत.
                 Each coin has two sides या उक्तीप्रमाणे सोशल मीडियाच्या बाबतीतही चांगल्या बाबीबरोबर काही त्रासदायक गोष्टी सोबत येतात.  ज्याप्रमाणे चांगल्या माहितीची देवाणघेवाण होते त्याप्रमाणे कधीकधी भावनेच्या भरात न पडताळता चुकीची माहिती मोठ्या प्रमाणावर पसरवली जाते. त्यामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात. अंधश्रद्धा, अपघात, जातींमध्ये तेढ निर्माण करणारी माहिती समाजकंठकांच्याकडून जाणीवपूर्वक पसरवली जाते. सोशल मीडियावर पाठवले जाणारे सर्वच माहिती खरी असते असे नाही त्यामुळे त्याचा चुकीचा वापर, चुकीचा समज होऊ शकतो.  काही वेळा तीच-तीच माहिती वर्षानुवर्ष फिरत असते. काही गोष्टींची पूर्ण माहिती न घेता अर्धवट माहिती पसरवली जाते उदा. उंबराचे फूल, हिमालयातल्या फुल  याचे फोटो आपल्याला नेहमी येतात. सोशल माध्यमातून तुमची माहिती चोरी होऊ शकते. त्यातून तुमची फसवणूक होऊ शकते. तुम्हाला त्रास होऊ शकतो.  सोशल माध्यमांमध्ये आपण इतके सोशल  होतो की आपण बऱ्याच  व्यक्तिगत गोष्टी या ठिकाणी शेअर करतो कदाचित या गोष्टींचा गैरफायदा घेऊन तुम्हाला त्रास होऊ शकतो. सोशल मीडियाच्या अतिरिक्त  वापराचा आपल्या आरोग्यावर परिणाम होत आहे.  अनेक तरुणांना डोळ्याचे, मानेचे व हाताच्या बोटाचे विकार जडू लागले आहेत. याशिवाय मानसिक स्वास्थ्य बिघडणे हा मोठा परिणाम या सोशल मीडियामुळे होऊ लागलेला आहे. याचे गंभीर परिणाम समोर आले आहेत. आपण सतत या सोशल मीडियाच्या आभासी जगात जगतो, त्यामुळे प्रत्यक्ष आपल्या आसपास, परिवारात काय चालले ते कळत नाही.
             काळाबरोबर राहण्यासाठी आपल्याला सोशल माध्यमांचा वापर करायला हवा, पण तो या सर्व फायद्या- तोट्यांचा विचार करून.  कारण सोशल मीडियाचा वापर आपण करावा, सोशल मीडियाने आपला वापर करू नये आणि म्हणून या सोशल मीडियाचा वापर झेपेल तेवढा आणि सोशल तितकाच करायला हवा बाकी आपण सोशल आहोतच. चला मला ही या लेखाची फेसबुक अपडेट द्यायची  आहे.
-------------------------------------------------------------------
संदीप कोळी.
कारंदवाडी ता.वाळवा.
sandip.koli35@gmail.com


गणपती उत्सव

कळायला लागल्या पासून दिवाळी नंतर चा सर्वात मोठा सण आणि उत्सव म्हणजे 'गणपती'. तसही गणपती हे समस्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत. त्यामुळे आपल्या घरातील गणपती ही मोठा, आकर्षक व इतरांच्या पेक्षा उठून दिसावा ही सर्वप्रमाणे माझीही अपेक्षा. आमच्या घरीही गणपती व गणपती ची सजावट याकडे विशेष लक्ष दिले जायचे. घरात तशी परंपरा होती. हळू-हळू वय वाढेल तसे व विज्ञानाच्या प्रभावामुळे मोठ्या गणपतीचे आकर्षण कमी झाले व पर्यावरणपूरक गणपती उत्सव असावा अशी इच्छा वाढू लागली. पण त्यावेळी त्यासाठी काय करावे याचे पुरेसे ज्ञान उपलब्ध नसल्यामुळे जरवर्षी मागची प्रथा पुढे चालू या क्रमाने सुरु होते. असे सालाबादप्रमाणे जरवर्षी सुरु होते. पण मनातील इच्छा गप्प बसू देत नव्हती.काळाबरोबर विचार व निर्णयाचे स्वातंत्र व अधिकार स्वतःकडे आले व वाटू लागले की आपण हि गणपतीची मूर्ती घरीच करूया पण या वाटण्याला ' वाटाण्याच्या अक्षता लावून' वेळ नाही, कधी करायचे, कसे करायचे, होईल की नाही, घरातले विरोध करतील, लोक काय म्हणतील अशी अनेक कारणे जोडून तो विषय बस्त्यात गुंडाळत नेहमीचा रिवाज पार पडला जायचा. याला पर्याय म्हणून दोन वर्षी इको- फ्रेंडली गणेश मूर्ती आणून उत्सव साजरा करत होतो.
        शेवटी गेल्या 4 वर्षापासून हे वाटने प्रत्यक्षात उतरवायचे ठरवले. पण माहिती अपुरी होती. शाळेतील मातीच्या वस्तू करायचा तोडका अनुभव व घराजवळ उपलब्ध माती यांच्या जोरावर प्रयत्न करून मूर्ती बनवली. साध्या रंगानी रंगवली. पहिल्याच प्रयत्नात इच्छेसारखी मूर्ती घडली होती. घरातल्या सर्वाना आवडली त्याच आनंदाने मूर्तीची प्रतिष्ठापणा करून घरीच विसर्जित केली होती.
       मागचा अनुभव व आनंद या दोन्ही भांडवलाच्या जोरावर या वर्षी ही मूर्ती आपणच बनवायची हे आता ठरलेच होते.पण या वर्षी सतत चा पाऊस या मुळे आसपास मिळणारी माती उपलब्ध होईना. मग नव्या पर्यायाचा शोध सुरु झाला. शाडू माती विषयी चौकशी केली. पण पुरेशी माहिती मिळाली नाही. शेवटी शाडू मातीच्या मूर्ती तयार करणाऱ्याला गाठले. माहिती मिळाली. माती मिळाली काम सुरु झाले. कोणताही सा
चा न वापरता हातानेच काम सुरु झाले. मूर्ती तयार झाली. 'चुकातून शिका'  या सूत्राने मागीलवर्षी राहिलेल्या गोष्टी या वर्षी आवर्जून पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. पूर्ण पणे आकर्षक नैसर्गिक रंगात रंगवून तयार झाली आहे.  मनाला भावेल अशी सुंदर मूर्ती तयार झाली.
         पण यासगळ्या प्रक्रियेमध्ये मिळणारा आनंद मोठा होता. आपल्याकडे आता इको-फ्रेंडली मूर्ती उपलब्ध होतात. गोष्ट पैशाची नसते वा असणार ही नाही. ही सर्व प्रक्रिया घडण्यापर्यंतची भावना व स्वनिर्मितीतून मिळणार आंनद हे शब्दात नाही मांडता येत. ते फक्त अनुभवता येते. म्हणून तुम्ही ही प्रयत्न करा.. 'करके देखो अच्छा लगता है....'

🖊संदीप.....
📱9730410154

आज : Today

📝 आज.......       आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...