🐥 मायेचं घरटं आपल्या पक्षांसाठी.....🌳
या प्रवासाला सुरुवात होऊन आता जवळपास अकरा महिने पूर्ण झाले. हा प्रसंग लिहिण्याची खूप इच्छा होती. पण वर्णन कुठपर्यंत करायचे म्हणून इतका उशिरा झाला शेवटी शेवट सापडलाच नाही म्हणून जेवढे आहे तेवढे तरी लिहूया म्हणून ही सुरुवात........
साधारण मार्च महिन्याच्या सुरुवातीला *एक सामाजिक जाणीव, मनातील निसर्गाविषयीचा हळवा कोपरा आणि लेकराच्या हट्टापायी* अंगणात येणाऱ्या पक्षांसाठी कृत्रिम घरटे बनवण्याचे ठरवले. फार विचार व माहिती न घेता उपलब्ध साधन व सोयीचे पडेल अशा प्रकारे एक छोटे घरटे आम्ही तयार केले. बाहेरून आकर्षक दिसण्यासाठी त्याला सजावटीच्या काही गोष्टी लावून आकर्षक घरटे तयार केले. मुळात येणाऱ्या पक्षांना ते कळणार नव्हते पण आमची हौस, चांगले दिसावे अशी इच्छा या नादात आम्ही ते आकर्षक सजवले. आता तयार केलेले घरटे लावायचे कोणत्या ठिकाणी हा प्रश्न सोडवणे गरजेचे होते. यासाठी आमच्याकडे होता तेवढा शहाणपणा वापरून आमच्या सतत वर्दळी पासून दूर, इतर धोकादायक प्राण्याच्या टप्प्यापासून दूर, पाऊस येण्याची दिशा, निवाऱ्याचा कोपरा यासारख्या अनेक निकष लावून उत्तर दिशेकडे तोंड करून घराच्या बाहेरच्या बाजूला आम्ही ते 12 ते 15 फूट उंचीवर ते कृत्रिम घरटे अडकवले.
ही सर्व कसरत झाल्यावर एकदम भारी वाटत होते, त्यात भर म्हणून आम्ही त्या घरट्याच्या बाहेर पक्षांना आमिष म्हणून ज्वारीची दोन भरलेली कणसे ही बांधली. आम्हाला वाटले आता लगेच चिमण्या घरट्यात येतील. पण एवढ्या सहज आयते मिळाले म्हणून गडबडीने घ्यायला आपल्यासारख्या थोडीच आहेत!.....
आम्ही दररोज चिमण्यांची वाट बघायचो. काही दिवसात चिमण्या व इतर छोटे पक्षी यायला लागले, पण फक्त बाहेर अडकवलेल्या ज्वारीच्या कणीसासाठी..... दाणे खाऊन निघून जातात पण घरट्यात जाण्याचे धाडस करत नव्हत्या. यात एप्रिल व मे महिना संपत आला. बाहेरच्या ज्वारीच्या कणीसातील सगळे दाणे संपले, पण पाहुण्या चिमण्या काही केल्या येत नव्हत्या. आमची उत्सुकता आता निराशेत बदलत चालली होती. जून महिना संपत आला. पाऊस सुरू झाला. आता तरी चिमण्या निवाऱ्यासाठी येतील असा विचार झाला, पण तेही झाले नाही. आता या घरट्यात चिमण्या येतील ही अशा आम्ही सोडली. नेहमी प्रमाणे वेगवेगळ्या चिमण्या घरट्याच्या बाहेरच्या काठीवर बसून चिव-चिव करून निघून जायच्या. त्यातली काही आता त्या घरट्यात जाऊन पाहणी करत होत्या पण घरट्यात राहायला कोणीच आले नव्हते. जुलै महिन्याच्या मध्यावर एके दिवशी सकाळच्या वेळी दोन ठिपके असणाऱ्या लहान चिमण्यांचा चिवचिवाट ऐकू येऊ लागला. बाहेर येऊन पाहिले तर त्या छोट्या चिमण्या गवताच्या काड्या घेऊन घरट्यात जावू लागल्या. त्याची लगबग सुरु झाली होती. क्रमाक्रमाने त्या चिमण्या घरट्यात गवताचा पाला घेऊन येत होत्या. ज्या क्षणाची आम्ही गेली चार-साडेचार महिने वाट पाहत होतो तो क्षण खरा ठरत होता. नवीन पाहुणे घरट्यात राहायला यायला तयार होते.
ते छोटे जीव खूप कष्टाळू होते. तयार असणाऱ्या घरट्यातही त्यांना हवे तशी पाल्याची रचना करून तो अधिक सुरक्षित व उबदार बनवला. आम्ही एकदम खुश झालो होतो कारण ज्यासाठी हा खटाटोप चार महिन्यांपूर्वी केला होता तो पूर्ण होत होता. ऑगस्ट च्या मुसळधार पावसात चिमण्यांनी तातडीने त्याच्या घरट्याचे इंटेरिअर पूर्ण करून घेतले व त्या राहायला ही आल्या. इतर पक्षांना या दोन चिमण्या घरट्याच्या जवळपासही फिरकू देत नव्हत्या. चुकून जरी दुसरा पक्षी घरट्याजवळ आला तरी या दोन चिमण्या गोंधळ घालत....
क्रमशः
(खूप वाचायला लागून कंटाळा येऊ नये म्हणून भागात विभागणी करण्याची ही शक्कल😁)
©संदीप
9730410154
No comments:
Post a Comment