🐥 मायेचं घरटं आपल्या पक्षांसाठी.....🌳
( भाग 2 )
घरट्यात राहायला आलेल्या पाहुण्या चिमण्या आता आमच्या सवयीच्या बनल्या होत्या. त्याही आता सरावल्या होत्या. दररोज त्याचे घरट्यात येणे. बाहेर जाणे. जाताना-येताना व असल्यावरचा गोंधळ आम्ही अनुभवत होतो. आता आम्ही पण त्यांच्या असण्याला गृहीत धरले होते. त्याचा घरट्यातला वावर, गोंगाट सुरूच होता. जानेवारी महिना संपत आला आणि आमच्या लक्षात आले की दररोज दिसणाऱ्या ठीपक्याच्या चिमण्या आता दिसत नव्हत्या. दिवसभराचा क्रम बघितला तरी त्याची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. त्या घरटे सोडून गेल्याचा विचार डोक्यात येत होता पण मन मान्य करत नव्हते. मग एक दिवस त्याच्या घरट्यात पहिल्यांदा डोकावून बघितले. डोक्यातला विचार खरा ठरला होता. घरटे रिकामे होते. ठीपक्याच्या चिमण्या घरटे सोडून निघून गेल्या होत्या. सुरुवातीला कोणी निघून गेल्यावर वाटणारी भावना जाणवली पण नंतर त्यांचे कौतुक वाटले. आपल्या पिलांच्या जन्मासाठी आलेल्या चिमण्या आपली पिल्ले मोठी झाल्यावर घरट्यावर हक्क न सांगता गुपचूप निघून गेल्या निघून गेल्या. माणसांना मात्र अशा प्रसंगात मालकी हक्क सांगितला असता. 4-5 महिने सोबत असणारे ते छोटे जीव अचानक मोकळ्या निसर्गात कशाची ही तमा न करता निघून गेले. कोणती गोष्ट कायमची नसते हे ते छोटे जीव जाता जाता शिकवून गेले.
आता ते रिकामे घरटे आम्ही दररोज बघत होतो, पण आमची ही निराशा काही दिवसातच संपली टिपक्याच्या चिमण्या गेल्या असल्या तरी बुलबुल, साळुंकी, साधी चिमणी, भोरडी यासारखे पक्षी येऊन घरटे बघून जात होते. पुन्हा नवीन पक्षी येणार यामुळे आम्ही पण आनंदित झालो. येणाऱ्या सर्व पक्ष्यांच्यात नंबर मारला तो साध्या चिमण्यांनी. त्यांनी गवताच्या काड्या आणून आपल्या घराच्या कामाला सुरुवात केली. आता त्या दुसऱ्या कोणालाही घरट्याजवळ येऊ देत नाहीत. आसपास येणाऱ्या इतर पक्ष्यांची गरज लक्षात घेऊन, बालहट्टा पाई व आमची हौस म्हणून आणखी दोन नवीन घरटी करून लावली आहेत. आता यावेळी मात्र ती लाकडाची व मजबूत केली. रंगाने रंगवली आहेत. या नवीन घरट्यात पण चिमण्या यायला लागल्या आहेत . त्यामुळे साध्य सर्व घरटी हाऊसफुल्ल झालेली आहेत आणि आमचे लेकरू हरकून टुंम. म्हणून अजून 2 नवीन घरटी करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.
या घरट्याच्या सर्व कार्यक्रमात छोट्या चिमण्यांनी काही महत्त्वाच्या बाबी शिकवल्या.....
कधी ही तयार मिळालेली गोष्ट तशीच वापरू नका. त्यासाठी कष्ट करा. नवीनता शोधा आणि मग तिचा वापर करा.
आपली गरज झाली की आपल्याला मदत मिळालेल्या गोष्टीवर स्वतःचा हक्क सांगू नये किंवा गृहीत धरू नये.
नवीन आव्हाने पेलण्यासाठी व निसर्गाच्या मुक्त वातावरणात झेपावण्यासाठी नेहमी सज्ज राहावे आणि यासाठी कोणाची वाट पाहू नये.
आयुष्यात पुढे जायचे असेल, यशस्वी व्हायचे असेल, तर आपली जागा, आपला कम्फर्ट झोन सोडून धोका पत्करायची तयारी ठेवायला हवी.
आता आपल्याला पडणारा मूलभूत प्रश्न, हा एवढा खटाटोप कशासाठी? निसर्गात त्यांची सोय आहेच की? पण याचे उत्तर सोपे आहे. निसर्गाने त्याच्यासाठी भरपूर सोय केलेली आहे पण आपलाच आगाऊपणा त्यांच्या निवाऱ्यासाठी घातक ठरतो आहे. म्हणून आपल्याच मोठ्या घरात त्यांच्यासाठी छोटी जागा दिली तर त्या सुरक्षित राहतील, अन्नपाणी वेळत मिळेल व आपल्या मनाचा मोठेपणाही वाढेल.
हा 10-11 महिन्याच्या प्रवास खूप प्रेरणादायी व आशादायी होता. एक छोटी गोष्ट काय प्रभाव पाडू शकते हे यातून अनुभवायला मिळाले. बघा आपल्याला शक्य असेल तर निसर्गातील एक महत्वाच्या घटकासाठी आपल्याकडून छोटी मदत व हक्काचा आधार.............
©संदीप.....
sandipkoli35.blogspot.in
📱9730410154
No comments:
Post a Comment