Thursday, 30 April 2020

महाराष्ट्र दिन Maharshtra Day


1 मे- महाराष्ट्र दिन

मंगल देशा! पवित्र देशा! महाराष्ट्र देशा!
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा।
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा।।
प्रणाम घ्यावा माझा हा, श्रीमहाराष्ट्र देशा ।।
                      आज १ मे महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा दिवस. दिल्लीचे तख्त राखणाऱ्या माझ्या लाडक्या महाराष्ट्राचा वाढदिवस. १ मे १९६० रोजी मराठी बोलणाऱ्या मराठी भाषिक लोकांचे राज्य महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भाषावार प्रांतरचनेची मागणी मोठ्या प्रमाणावर केली जात होती. महाराष्ट्रातही मराठी भाषिक राज्याची मागणी करणारी संयुक्त महाराष्ट्र चळवळ 1946 पासून सुरु झाली होती. अनेक चढ-उतार व स्थित्यंतरातून या चळवळीची वाटचाल होऊन शेवटी मे १९६० रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली.
                    भारताच्या स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राची निर्मिती होणे अपेक्षित होते, पण हा लढा तितका सोपा नव्हता. महाराष्ट्र राज्याची निर्मिती होण्यासाठी अनेकांना मोठा संघर्ष करावा लागला. यात अनेकांना आपले जीव गमवावे लागले. अनेक संप, लढे, आंदोलने करावी लागली. या सर्वांमध्ये मुंबईमधील कामगारांचा खूप मोठा सहभाग होता आणि म्हणूनच तत्कालीन पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी कायद्यानुसार १ मे कामगार दिनाच्या दिवशी महाराष्ट्र राज्याची निर्मिती केली.
                    ६० वर्षांपूर्वी निर्मित्ती झालेल्या महाराष्ट्र राज्याने प्रगतीची घोडदौड अशी केली आहे कि, आज महाराष्ट्र राज्य देशात सर्वाधिक आघाडीचे राज्य आहे. कला, साहित्य, क्रीडा, व्यापार-उद्योग, शिक्षण, आरोग्य सुविधा आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे कृषी क्षेत्रासह अनेक क्षेत्रात महाराष्ट राज्य आघाडीवर  असल्याचा आपल्याला अभिमान आहे.
                    मुंबई या आपल्या राजधानीतून देशाचा आर्थिक कारभार चालतो. देशातील लाखो लोकांना स्वप्ननागरी मुंबईने रोजगार दिला आहे. देशाच्या सर्व राज्यातून डोळ्यात अनेक स्वप्न घेऊन आपले नशीब अजमावयाला महाराष्ट्रात येतात.
'दिल क्या समंदर पाया है हमने।
अपनो को तो अपनाया परायौको अपनाया हमने।'
                  पुणे ही देशातील शैक्षणिक पंढरी म्हणून ओळखली जाते तर कोल्हापूर, नाशिक, सांगली, औरंगाबाद, सातारा, जळगाव यासारख्या सर्व जिल्ह्याची आपापली वैशिष्ट्ये महाराष्ट्राचे महत्व वाढवतात. सह्याद्रीच्या रांगा कणखरपणा दाखवतात तर निसर्गाने नटलेला कोकण महाराष्ट्राचे सौंदर्य वाढवतो. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाने व प्रेरणेने मराठ्यांनी अटकेपार झेंडे फडकवले आहेत. विविधतेने नटलेला माझा महाराष्ट्र देशातील एक प्रमुख राज्य आहे.
                  आपल्या सर्वांचे हे भाग्य आहे की आपण महाराष्ट्राचे आहोत आणि महाराष्ट्र आपला आहे.
भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती, खेळ जीवघेणी
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा ॥
       सर्वाना १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन यांच्या मनःपूर्वक शुभेच्या..!..!


-संदिप कोळी
9730410154



Thursday, 23 April 2020

जागतिक पुस्तक दिन World Book Day

               "किताबे  झाँँकती है बंद अलमारी की शिशे से 
                मोबाईल की इस लत में एक झलक के लिये बेकरार है।"
                  ज्यांनी विचार व आचार समृद्ध केले, आयुष्याला ज्ञानाचा मार्ग दाखवला अशा पुस्तकांसाठी. अज्ञानाच्या अंधारात माहितीची ज्योत तेवत ठेवून ज्ञानाचा उजेड पडणारी पुस्तकेे,  माणसाला पशु तून वेगळे करून वैचारिक पातळीवर उच्च बनवणारी पुस्तके, झेप घेणाऱ्या प्रत्येक पंखांना ज्ञानाच बळ देणारी पुस्तके, रंगहीन वाटणाऱ्या जीवनात सप्तरंगी उधळण करणारी पुस्तके, जगण्याच्या दुनियादारीत वाचणाऱ्याला शहाणे बनवणारी पुस्तके, काळाचा विशाल सागरातून घेऊन जाणारी जहाजे म्हणजे पुस्तके, आदर्श वाटणाऱ्या दुनियेत सच्ची मैत्री जपणारी पुस्तके, कोणत्याही अपेक्षेशिवाय  ज्ञानाचा झरा अखंड खळखळणारी पुस्तके,  सहवासात येणाऱ्या प्रत्येकाला विचारांच्या व माहितीच्या लेण्यांणी वृद्धिंगत करणारी पुस्तके, कितीही कठीण प्रसंगात स्वतःवरचा विश्वास ढळू न देणारी पुस्तके, लहानांपासून-वृद्धापर्यंत सर्वांना आपल्या प्रेमात पडणारी पुस्तके, तुमच्यातील एकलव्याला धनुर्धारी एकलव्य बनवणारी पुस्तके, निर्जीव अक्षरांच्या माध्यमातून व्यक्तीच्या विचारांना सजीव करणारी पुस्तके, माणूस नावाच्या लोखंडाला आपल्या परिसस्पर्शाने सुवर्णमय बनवणारी पुस्तके......
          आज 23 एप्रिल जगप्रसिद्ध लेखक विल्यम शेक्सपियर यांचा जन्मदिन आणि मृत्यूदिनही म्हणजेच जागतिक पुस्तक दिन..
           मोबाइलच्या जमान्यात कपाटात ठेवलेल्या पुस्तकावरील प्रेम थोडं कमी झालं असलं तरी वाचन हा आपल्यापैकी अनेकांचा आवडता छंद आहे. इ-बुक, Pdf, ब्लॉग्स, मेसेज या ना-त्या रुपाने आपलं वाचन सुरू असते.
           कोरोनाच्या या संकटात, लॉक-डाउनच्या या संधीचा फायदा उठवत पुन्हा एकदा आपण पुस्तकाच्या प्रेमात पडून पुस्तकांवर आपला हक्क दाखवला पाहिजे. ज्ञानाच्या महायज्ञात  वाचन हाच धर्म आहे. हीच पुस्तके आपल्या जीवनाचा भाग असावीत आणि वाचन हा दिनचर्येचा भाग याच शुभेच्छा....
जागतिक पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा......

©संदिप 
📱9730410154

Tuesday, 21 April 2020

वसुंधरा आईने आपल्या सर्वात लाडक्या बाळाला लिहलेले पत्र

२२ एप्रिल  जागतिक वसुंधरा दिनानिमित्त......
 वसुंधरा आईने आपल्या सर्वात लाडक्या बाळाला लिहलेले पत्र........

प्रिय मानवा.....
               कदाचित तुला प्रिय म्हणावे की नाही हा प्रश्न बऱ्याचवेळा पडतो. आपल्या सूर्यमालेत आपल्याकडेच जीवसृष्टी अस्तित्वात आहे. आपल्यातील जैवविविधतेमुळे सूर्यमालेतील आपले महत्व अधोरेखित करण्यासारखे आहे.  विश्वाची निर्मितीत मी लाखो सजीवांना जन्म दिला, त्यांना सांभाळले, त्यांना वाढवले. माझ्या ठाई जे-जे होते ते-ते माझ्या सर्व लेकरांसाठी खुले केले. कोणताही भेदभाव न करता भरभरून दिले, देत आहे व देत राहील यात तीळ मात्र शंका नाही.
                प्रत्येक आईला आपली सर्वच आपत्य प्रिय असतात. काही शहाणी असतात तर काही खोडकर. पण कधीकधी हा खोडकरपणा इतका वाढतो की त्याचा त्रास व्हायला लागतो आणि अशावेळी मृदू आईलाही कठोर भूमिका घेऊन बाळाचे कान उपटावे लागतात. माझ्या सर्व बाळात तू पहिल्यापासूनच खूप खोडकर होतास.पण तुझ्या हुशार, कल्पक व वेगळ्या भूमिकेमुळे खोडकर असूनही लाडका होतास. पण या अतिलाडामुळे तू खूपच बिघडत चालला आहेस.जन्मदायी  म्हणून तुझा कान धरणे गरजेचे बनले आहे.
       प्रगतीच्या आणि आधुनिकरणाच्या नावाखाली तू माझे आणि पर्यायाने स्वतःचे ही अमाप नुकसान केले आहेत व करत आहेस. याची तुला जाणीव नाही फक्त मी, माझे,मला या स्वार्थी वृत्तीने तुला झपाटले आहे. या वेडापाई तू काय करतोयस याचे तुला भान राहिले नाही. तू इतर सजीवांच्यापेक्षा कित्येक पटीने बुध्दिमान, शहाणा आहेस तुला चांगले-वाईट यातील फरक समजतो पण तसे न करता आपला मनमानी कारभार सुरू ठेवला आहेस. प्रदूषण, बेसुमार वृक्षतोड, पाण्याचा अपव्यय, जैवविविधतेवर अतिक्रमण निसर्गाची चेष्टा यासारख्या गोष्टींमुळे तू स्वतःच तुझ्या पायावर दगड मारून घेत आहेस.  तुझ्या या हव्यासापोटी तू या  निरपेक्ष घटकांची बेमालूम कत्तल केलीस, डोंगर उजाड करून तुझा कथित स्वप्नांचे शहरे उभारलीस. प्राणी व पक्षांचा हक्काचा निवारा काढून घेतलास आणि याच वृक्षांचे महत्त्व सांगायला झाडांची कत्तल करून पुस्तके लिहिली मात्र त्यातले आचरणात काही आणले नाहीस. आजच्या घडीला तुला हे सगळे सांगण्याचे कारण म्हणजे तुझे खायचे व दाखवायचे दात वेगळे आहेत. प्रगतीच्या नावाखाली तू सर्वांना गौण समजून त्यांना दुर्लक्षित करीत  आहेस. तुझ्या वर्तनामुळे माझे व पर्यायाने तुझे खुप मोठे नुकसान करून घेत आहेस. हे सर्व तुला कळते पण वळत नाही.
             या पत्राच्या निमित्ताने तरी तू तुझा गांभीर्याने विचार करावा ही अपेक्षा आता तरी तो बदल करावा बाकी माझे तुझ्यावर प्रेम नेहमी होते व कायम राहील.

                                                   तुझी प्रिय आई....
                                            वसुंधरा  
      

आज : Today

📝 आज.......       आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...