Tuesday, 27 December 2022

आयुष्य समृद्ध करणारा अनुभव....

🌈 आयुष्य समृद्ध करणारा अनुभव....
         मंगळवार 27 डिसेंबर, दुपारी 1 ची वेळ. खिशातला कंगवा कुठेतरी हरवल्याने वाऱ्याने विस्कटणाऱ्या केसांना जागा दाखवण्याची जबाबदारी बोटांवर घेतली होती, पण दोन-तीन दिवसात हाताची अक्षमता व केसांची धडपड वाढल्याने शेवटी आज कंगवा घेण्याची सवडी काढावीच लागली.
         खरेदी म्हटलं की दुकान शोधण्याऐवजी सहज खरेदी करावी म्हणून रस्त्याच्याकडेच्या सुपरमॉलकडे गाडी वळवली. त्या छोट्या मॉलमध्ये आपल्या गरजेच्या अनेक वस्तू खुणावत होत्या, पण माझी गरज कंगवा होती व त्याचीच मागणी केली.
        सत्तरीच्या आसपास वय असणाऱ्या एका आजोबांनी आपल्या मांडणीतून नजर हटवत "कोणता रंग देऊ?" असा प्रश्न केला.
      " तुम्हाला आवडणारा द्या" असे म्हटल्यावर, सुरकुत्या पडलेल्या चेहऱ्यावर मध्ये हास्य आणत एक रंग काढून माझ्या हातात दिला. मी किंमत विचारल्यावर 5 रुपये सांगितले. मी 20 रुपयाची नोट काढून पुढे धरली तर आजोबा म्हणाले, "सुट्टे 5 रुपये पाहिजे. मी पुन्हा पाकीट तपासले 2 रुपयाची 3 नाणी मी आजोबांना दिली. कंगवा खिशात घातला व गाडी वळवणार इतक्यात आजोबा म्हणाले "तुम्ही 6 रुपये दिले, हा घ्या 1 रुपया" मी पण तो नम्रपणे स्वीकारला.
          तो 1 रुपया हातात घेताना मनात आले, किती सहजतेने त्यांनी तो प्रामाणिकपणा जपला आहे. त्या 1 रुपयाची किंमत त्यांना नक्की ठाऊक आहे.
         जगण्यात इतका सहजपणे असला की जीवनावरचे अनावश्यक ओझे आपोआप विरून जाते.

🖋️© संदिप

Wednesday, 30 November 2022

आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी काय ठेवणार आहोत?? - जपानकडून शिकूया

🌈 आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी काय ठेवणार आहोत??
         माणूस हा उत्सवप्रिय प्राणी. आपल्याला अनेक गोष्टी साजरा करायला आवडतात. नुकतीच आपण दिवाळी साजरी केली, त्यातच t20 चा वर्ल्डकप साजरा केला. ती पार्टी संपते तोपर्यंतच फुटबॉलचा वर्ल्ड कप सुरू झाला. 
           फुटबॉल हा जगाचा लोकप्रिय व सर्वाधिक खेळला जाणारा खेळ. त्यामुळे क्रीडा प्रेमींच्या नजरांबरोबर इतरांचे डोळे त्याकडे लागलेले. या फुटबॉल वर्ल्डकप मध्ये अनेक रंजक आणि महत्त्वाच्या गोष्टी घडतायत. त्यातीलच एक गोष्ट 23 नोव्हेंबर 2022 ची. कतार मध्ये घडलेली.
           मॅच होती जपान आणि जर्मनीची, जपानने मॅच 2-1 ने जिंकली.  साहजिकच जपानी लोकांनी जल्लोष आणि धिंगाणा करायला हवा होता, पण झालं भलतच. मॅच संपली खेळाडू अजून मैदानावरच होते. जिंकलेले आनंदी प्रेक्षक व इतर नाराज प्रेक्षक हळूहळू आपली जागा सोडून मैदान रिकामे करू लागले होते. आपल्याबरोबर आणलेल्या  खाद्यपदार्थांच्या पिशव्या व पेयांच्या बाटल्या तिथेच टाकून काढता पाय घेत होते. त्यांचं पण बरोबर होतं, कारण स्वच्छता हे काय त्यांचं काम होतं??
           या सर्व गडबडीत जिंकलेले जपानी फॅन मात्र वेगळ्याच कामात व्यस्त होते. जिंकलेल्या जपानी फॅन्सनी या खाद्य पदार्थाच्या रिकाम्या पिशव्या व बॉटल्स गोळा करायला सुरुवात केली. अगदी कुणी न सांगता आणि कोणत्याही फोटोसाठी नव्हे.
          काही मिनिटात या जपानी लोकांनी पूर्ण स्टेडियम मागणी केली. ज्यावेळी या जपानी लोकांना त्यांच्या सत्कार्यासाठी याबद्दल विचारले त्यावेळी ते नम्रपणे उत्तरले. आम्ही पाठीमागे असा कचरा ठेवत नाही व ते कार्यमग्न राहिले.

          जपानी लोकांची ही कृती कोणत्याही प्रसिद्धीसाठी, कौतुकासाठी किंवा मोठेपणासाठी नव्हती. ती होती चांगुलपणाची, ती होती संस्काराची, ती होती शिस्तप्रियेतेची, ती होती स्वतःच्या नजरेत मोठी होण्याची, ती होती पुढच्या पिढीला समृद्ध वारसा देणारी.
         पुढच्या पिढीसाठी आपण काय ठेवून जाणार आहोत?? हा प्रश्न ज्या वेळेला आपल्याला पडेल त्यावेळी जपानी माणसांचे हे उदाहरण कायम लक्षात राहील. आपल्या कृतीतून जगाला कौतुक आणि हेवा वाटणारी संस्काराची शिदोरी ते न बोलता पटवून गेले.
धन्यवाद.!.!.!


🖋️संदिप कोळी
sandip.koli35@gmail.com

Sunday, 23 October 2022

संयम = विराट कोहली

🌈 संयम = विराट कोहली
 "सब्र कर बंदे, मुसिबत के दिन भी गुजर जायेंगे।
आज जो तुझ पर हसते है, कल वो तुझे देखते रह जायेंगे।"
           What a knock,  जब भी पाकिस्तान भीड है, विराट कोहली अकेला ही लढा है, I am your Dad,  बाप बाप होता है, King is Always King,  अपना किंग अकेला लडा है, असे अनेक स्टेटस आज सर्वांच्या व्हाट्सअप स्टेटस आणि इंस्टा स्टोरी ला आहेत.
         पण, अगदी काहीच दिवसांपूर्वी हाच विराट कोहली संपला. तो कसा t20 साठी पात्र नाही. त्याची जागा कशी टीम मध्ये होऊ शकत नाही. तो कसा t20 साठी योग्य राहिला नाही. त्याच्यात क्रिकेट शिल्लक किती? अशा अनेक बातम्या,लेख व कमेंट गेली काही काळ विराटच्या बाबतीत सतत चर्चेत राहिल्या. अगदी काही माजी क्रिकेटपटूनी विराटला मिळणाऱ्या अतिरिक्त संधी बाबत बोट दाखवले होते.
         पण, या ठिकाणी हा पण महत्त्वाचा भाग आहे. कारण या सर्व टीका, बातम्या, अफवा याबाबत विराट स्थिर राहिला. त्याने या सर्वामुळे खचून न जाता आपला खेळ उंचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. आपल्या होणाऱ्या चुका टाळल्या व आज त्याने नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा आपणच किंग 👑 आहोत हे सिद्ध केले.
          या सर्व Bad Patch मध्ये विराटने दाखवलेला सर्वात मोठा गुण म्हणजे संयम होय. विराटकडे प्रचंड क्षमता आहे याबाबत कोणाला शंका नाही. त्याचे खेळाचे ज्ञान व फटके मारण्याची कौशल्य याबाबत त्याचे प्रतिस्पर्धी सुद्धा फॅन आहेत. विराटला गरज होती ती संयमाची व 'आपना टाईम आयेगा' याची वाट पाहण्याची आणि विराटने ते लिलया करून दाखवले.
            विराटकडे अजून क्रिकेट किती शिल्लक आहे? या प्रश्नाला त्याने पैकीच्या पैकी मार्क पाडून 'अभी तो मंजिले - ए - सफर मे बहुत कुछ बाकी है, हे सिद्ध केले. गेल्या काही डावापासून तो हे दाखवून देत होता, पण आजच्या भारत- पाक मॅचने त्याने स्वतःची जागतिक क्रिकेट मधील दहशत पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.
          कधी हार मानू नका. परवाचा दिवस कठीण होता. कालचा आणखीन वाईट होता. पण आजचा दिवस सोनेरी क्षणाने आपली वाट बघत होता, हे विराटच्या संयमाने शिकवले. आपल्याला ही जगण्यातला संयम किती महत्वाचा आहे हे विराट ने जागून दाखवले आहे.
You Are the Boss Man
Virat ❤️

🖋️ संदिप कोळी

Tuesday, 18 October 2022

🌈 स्व:अवलोकन : Self Observation

              30 सप्टेंबर महिना अखेरची गोष्ट... महिना अखेर म्हणजे नोकरदाराच्या कामातील तसा धामधुमीचा दिवस. महिनाभराच्या कामातील काही अहवाल, आकडेवारी सादरीकरणाचा हा दिवस. हा नियमित ठरलेला कार्यभाग असला, तरी थोडा जास्त वेळ द्यावा हा लागतोच. 
               याप्रमाणे त्या दिवशी नियोजित कार्यभाग संपवला. बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता. अजून घड्याळाचा काटा बरीच वेळ शिल्लक दाखवत होता. वर्षाच्या अखेरच्या एका कामाचा भाग म्हणून आपल्याच कामाचे स्व:अवलोकन करावे म्हणून सहज मागची पाने पलटली. मुद्दाम याठिकाणी हा स्व: अवलोकन शब्द वापरला आहे. सिंहावलोकन, वगैरे शब्द मनात घुटमळत होते, पण विषय इतका गंभीर नव्हता, म्हणून ते पुन्हा झाकून ठेवले. 
              मागच्या पानावरील पडताळणी घेत असताना एका ठिकाणी, गफलत झाली हे सहज लक्षात आले. चूक खूप मोठी नव्हती व मागच्याच महिन्यातील होती, पण जर ती लक्षात आली नसती व दुरुस्त केली नसती तर वर्षा अखेरीच्या अहवालापर्यंत ती तशीच राहिली असती. दोन्ही कामे मीच केली होती व थोडीफार त्रुटी ही माझ्या नजर चुकीमुळे राहिले, पण ती लवकर पाहिली म्हणून ती लवकर दुरुस्ती झाली.
             त्या दिवशी घडलेला हा छोटासा प्रसंग मला काही गोष्टी सहज शिकवून गेला. जीवनाच्या प्रवासात आपल्या आयुष्यात अनेक वेळा खूप गोष्टींच्या बाबतीत ही बाब लागू होते. मैत्री, प्रेम, नातेसंबंध, काम अशा बाबतीत काही कालावधी सरला की सिंहावलोकन नाही पण स्व: अवलोकन आपण नक्की करायला हवे. कारण मैत्री, प्रेम, नातेसंबंधात अनेक वेळा आपल्या नकळतपणे काही गोष्टींची गफलत, गैरसमज किंवा अपेक्षा यांचा गोंधळ झालेला असतो व हीच छोटी गोष्ट पुढे त्या नात्याला अडचणीत व आपल्याला त्रासदायक ठरू शकते. आपल्या या जगण्याच्या धावपळीत आपण इतके पुढे जातो की ती गोष्ट दुरुस्त करण्यासाठी आपण पुन्हा माघारी येत नाही व यातच त्या नात्याचा श्वास गुदमरतो. म्हणून वेळोवेळी असे स्व: अवलोकन केले तर आपण या छोट्या गोष्टी समजून छोटासा गुंता वेळीच सोडवू शकतो.     
                 सो फ्रेंड्स.... जगण्याचा हा छोटासा फंडा त्या दिवशी मी नकळत शिकलो. चला तर मग स्व: अवलोकन करून आपली काही चुकलेली गणिते वेळीच दुरुस्त करून उरलेल्या जीवनाची बाकी समृद्ध करूया.🌸

🖋️संदिप.....
sandip.koli35@gmail.com 

Wednesday, 1 June 2022

And the nest is empty again : आणि घरटं पुन्हा रिकामं झालं.....

आणि घरटं पुन्हा रिकामं झालं.....

                      १९ फेब्रुवारी २०२२ पहिल्यांदा गवताची काडी घेऊन ती आली. तसे तर घराच्या अंगणात आम्ही तयार केलेले लाकडी घरे आहेत, पण ती मोठी स्वाभिमानी, स्वतःचा संसार स्वतः उभा करायचा हा तिचा निश्चय मोठा...

                   दररोज काड्या, गवत, कापूस अशा तिच्या गरजेचे व घरट्यासाठी  लागणाऱ्या वस्तूने त्या दोघांची धडपड सुरू झाली. दररोज दिवसभर ती दोघे साहित्य आणून आपले नवीन घरटे गुंफत होते. बघता- बघता ६-७ दिवसात काडी - काडी जोडून त्यांनी छोटीसे इमले बांधले. एकटी चिमणी बसू शकेल एवढ्या आकाराचे ते छोटेसे घरटे आतून मात्र अगदी कापसासारखे होते.

                   चिमणी आता आमच्या घरची झाली होती. दिवसभर बाहेर फिरायची व संध्याकाळ झाली की एकटीच घरट्यात येऊन बसत होती. या दरम्यान तिने घरट्यात दोन अंडी घातली. हाच दिनक्रम काही दिवस चालू होता. घरट्यात बसल्यावर चिमणीचे फक्त तोंडच बाहेर दिसत असे.

                 अचानक एक दिवस पिल्लांचा चिव-चिवाट ऐकू येऊ लागला. दोन छोटी-छोटी पिल्लं घरट्यातून हळूच डोकावू लागली. छोटे शरीर, गुलाबी रंग, छोटी चोच, ती उघडल्यावर लाल रंगाचे दिसणारे अंतरंग...... पिल्लांचे आई व बाबा दोघे आळीपाळीने येऊन पिलांना भरवून जात होते.

                 दिवसभर फक्त पिल्लांचा चिव-चिवाट सुरू असे. आई-बाबा आल्यावर तर अगदीच गोंधळ.... ओरड.... संध्याकाळी त्या दोन पिल्लांसह चिऊताई त्या इवल्याशा घरट्यात अगदी निवांत बसायची. सकाळ झाली की रोजचा दिनक्रम सुरू.....

                दिवसामागून दिवस पुढे सरकत होते. पिल्ले मोठी होऊ लागली आणि 20 एप्रिल च्या दरम्यान अचानक सगळं बंद झालं. एक-दोन दिवस बघितलं पण शांतता.......

               ती चिमणी आपल्या दोन लेकरांच्या पंखांना बळ देऊन घरटं रिकामं सोडून निघून गेली. अवघ्या दोन महिन्यात घरटं रिकामं झालं...

               निसर्गाचा काय करिष्मा आहे ना? त्या इवल्याशा चिमणीने इवलसं घरटं बांधून त्या इवल्याशा घरात दोन इवल्याशा पिलांना जन्म देऊन, वाढवून त्यांच्या इवल्याशा पंखात आकाश कवेत घेण्याचे स्वप्न दाखवून त्या इवल्याशा पिल्लांना घेऊन  घरटं पुन्हा रिकामं करून ती कायमची निघून गेली.

 -------------------------------------------------------------------------------------------------------------

 संदिप...

Sandip.koli35@gmail.com

 

Tuesday, 11 January 2022

राष्ट्रीय युवक दिन : National Youth Day

आज राष्ट्रीय युवक दिन...

स्वामी विवेकानंद यांचा जन्म दिवस....

                 "दिवसभरात तुमच्या पुढे एकहि समस्या उद्भवली नाही किंवा तुम्हाला एकहि प्रश्न पडला नाही तर तुमच्या आयुष्याच्या प्रवास चुकीच्या रस्त्यावरुन सुरु आहे अस समजायला हरकत नाही"....

                  हे स्वामी विवेकानंद यांचे वाक्य पण आजच्या आमच्या पिढीला हे आवडत नाही कारण आम्हाला समस्या नको असतात सगळ्या गोष्टि झाल्या पाहिजेत आणि त्याही सहज आणि कोणत्याही त्रासाशिवाय मग ती कोणतीही गोष्ट असो…..

       आमच्या तरुण्याला आणखी एक शाप आहे तो म्हणजे वाट न बघण्याचा. आम्हाला सगळ्या गोष्टी इंस्टेंट लागतात. "सब्र का फल मीठा होता है।" पण हे 'सब्र' नावाच फळ पण आम्हाला लगेच हव असते. आणि या साठी आम्ही काहीही करू शकतो( काहीही चा अर्थ कहिहिच ) मग तो मार्ग so called सन्मार्ग असो वा नसों.

          आजचा युवक  हा देशाचा भावी आधारस्तंभ असतो. आणि भारतात युवकांची संख्या सर्वाधिक आहे. या शक्तीचे केंद्रीकरण होणे गरजेचे आहे. केंद्रीकरण झाले तर आणि तरच त्या शक्तीचे विधायक कार्यात रूपांतर होऊ शकते. नाही तर सध्या आपण बघतो की हीच  शक्ती कुठल्या मार्गाने आणि कशी वापरली जाते.

       असो आजचे आम्ही तरुण हुशार आहोत, शिक्षित आहोत, (संस्कारित आहोत) त्यामुळे आम्हाला या गोष्टी कळतात पण 'वळत नाहीत'. आम्हाला फ़क्त त्या वळवुन घ्यायाचा प्रयत्न करायचा आहे.

                             स्वामी विवेकानंद यांना विनम्र अभिवादन व सुधारण्याचे अभिवचन.....

-------------------------------------------------------

© संदिप

Sandip.koli35@gmail.com




आज : Today

📝 आज.......       आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...