याप्रमाणे त्या दिवशी नियोजित कार्यभाग संपवला. बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता. अजून घड्याळाचा काटा बरीच वेळ शिल्लक दाखवत होता. वर्षाच्या अखेरच्या एका कामाचा भाग म्हणून आपल्याच कामाचे स्व:अवलोकन करावे म्हणून सहज मागची पाने पलटली. मुद्दाम याठिकाणी हा स्व: अवलोकन शब्द वापरला आहे. सिंहावलोकन, वगैरे शब्द मनात घुटमळत होते, पण विषय इतका गंभीर नव्हता, म्हणून ते पुन्हा झाकून ठेवले.
मागच्या पानावरील पडताळणी घेत असताना एका ठिकाणी, गफलत झाली हे सहज लक्षात आले. चूक खूप मोठी नव्हती व मागच्याच महिन्यातील होती, पण जर ती लक्षात आली नसती व दुरुस्त केली नसती तर वर्षा अखेरीच्या अहवालापर्यंत ती तशीच राहिली असती. दोन्ही कामे मीच केली होती व थोडीफार त्रुटी ही माझ्या नजर चुकीमुळे राहिले, पण ती लवकर पाहिली म्हणून ती लवकर दुरुस्ती झाली.
त्या दिवशी घडलेला हा छोटासा प्रसंग मला काही गोष्टी सहज शिकवून गेला. जीवनाच्या प्रवासात आपल्या आयुष्यात अनेक वेळा खूप गोष्टींच्या बाबतीत ही बाब लागू होते. मैत्री, प्रेम, नातेसंबंध, काम अशा बाबतीत काही कालावधी सरला की सिंहावलोकन नाही पण स्व: अवलोकन आपण नक्की करायला हवे. कारण मैत्री, प्रेम, नातेसंबंधात अनेक वेळा आपल्या नकळतपणे काही गोष्टींची गफलत, गैरसमज किंवा अपेक्षा यांचा गोंधळ झालेला असतो व हीच छोटी गोष्ट पुढे त्या नात्याला अडचणीत व आपल्याला त्रासदायक ठरू शकते. आपल्या या जगण्याच्या धावपळीत आपण इतके पुढे जातो की ती गोष्ट दुरुस्त करण्यासाठी आपण पुन्हा माघारी येत नाही व यातच त्या नात्याचा श्वास गुदमरतो. म्हणून वेळोवेळी असे स्व: अवलोकन केले तर आपण या छोट्या गोष्टी समजून छोटासा गुंता वेळीच सोडवू शकतो.
सो फ्रेंड्स.... जगण्याचा हा छोटासा फंडा त्या दिवशी मी नकळत शिकलो. चला तर मग स्व: अवलोकन करून आपली काही चुकलेली गणिते वेळीच दुरुस्त करून उरलेल्या जीवनाची बाकी समृद्ध करूया.🌸
🖋️संदिप.....
sandip.koli35@gmail.com
Nice one
ReplyDeleteखरंय .... स्व अवलोकन करायला च हवं
ReplyDelete