🌈 प्रेरणादायी जिजाऊ चरित्र
पारतंत्र आणि गुलामगिरीच्या अंध:कारात स्वराज्याची बीजे पेरून सुराज्याचे स्वप्न पाहणाऱ्या आणि पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तुत्वाने उभे करणाऱ्या शिल्पकार म्हणजे शिवमाता, राष्ट्रमाता, मातृशक्तीची प्रेरक प्रतिमा, सुराज्य घडवणारी शिवशक्ती, स्वराजजननी राजमाता जिजाऊ मासाहेब.
इतिहासाच्या कालपटलावर ज्या स्त्रियांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा ठामपणे उमटवला यात अग्रक्रमाने घ्यावे असे नाव म्हणजे राजमाता जिजाऊ.
'निश्चयाचा महामेरू| बहुत जनासी आधारू|'
| श्रीमंतयोगी |
असे ज्यांचे वर्णन केले जाते ती सारी पुण्याई ध्येयवेड्या आईची, निराग्रही मातेची आणि वीरमाता मासाहेब जिजाऊची.
विदर्भातील सिंदखेड राजा येथे कर्तबगार लखुजी जाधव व गिरीजाबाई यांच्या पोटी जन्माला आलेले तेजस्वी कन्यारत्न म्हणजे जिजाऊ. पराक्रमी घराणे, सत्ता, अधिकार आणि कर्तव्य यांचा सुरेख समन्वय साधणाऱ्या राजघराण्याचे संस्कार बाल जिजाऊंच्यावर घडले. सैनिकी शिक्षण, राज्यकारभारांची ओळख, युद्ध, न्यायनिवाडा, पराक्रमाच्या घटना यातून जिजाऊंचे बालपण घडले. न्यायप्रिय, प्रजाहितदक्ष व कर्तबगार राजे लखुजीरावांच्या आदर्श व्यक्तिमत्त्वाचा आणि आईच्या आदर्श मातृत्वाचा वारसा जिजाऊंना लाभला. यातूनच एक धाडसी, जिद्दी, स्वाभिमानी, आव्हान स्वीकारणारी वृत्ती विचारी, अभ्यासू, समंजस बाल जिजाऊ घडत गेल्या.
शहाजीराजे यांच्याशी विवाह झाल्यानंतर भोसले- जाधव घराण्यातील संघर्ष, मोघल- सुलतान यांचा धुमाकूळ, स्वतःचे बंधू -दीर यांच्या हत्या, मराठ्यांच्या संसाराची, प्रदेशाची, तीर्थक्षेत्रांची दैना अशा प्रसंगात झगडणे व संघर्ष हा त्यांच्या जीवनाचा भागच बनला.
आसमानी व सुलतानी संकटाची बिकट वाट सगळीकडे असताना आशेची एक ज्योत मनात घेऊन शिवनेरी गडावर त्यांनी तमाम मराठी स्वप्नांना शिवबाच्या रूपाने जन्म दिला.
शिवनेरीच्या अंगाखांद्यावर लहानाचा मोठा करताना, सह्याद्रीच्या कुशीत निर्भयपणे वावराला शिकवताना, शिवरायांना महाभारत आणि रामायणातील श्रीराम आणि श्रीकृष्णाच्या गोष्टीचे बोधामृत पाजताना स्वराज्य निर्मितीचे बाळकडू पाजून "हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे." या मूलमंत्राचा धडा गिरवला. बालपणापासूनचे धडे व अनुभवलेला संघर्ष याची फलश्रुती म्हणून जिजाऊंनी बाल शिवाजींना राजा म्हणून घडवले. व्यायाम, अध्ययन, प्रशासन, कला, साहित्य, स्वावलंबन, युद्धशास्त्र, राज्यशास्त्र, नीतीशास्त्र यांचे धडे देणे सुरू केले.
पुण्याच्या लाल महालात प्रवेश करून पुणे भूमी सोन्याच्या नांगराने नांगरून त्यांनी आपल्या अस्तित्वाच्या पाऊल खुणा उठवल्या. रांझाच्या पाटलाचा प्रसंग असो वा इतर गुन्हे, न्यायनिवाडा हा निपक्षपातीपणे करावा हे धडे त्यांनी दिले. शहाजीराजांच्या अनुपस्थितीत त्यांच्या मार्गदर्शनाखाली बाल शिवबा व मावळ्यांमध्ये हिंदवी स्वराज्याची बीजे त्यांनी रोवली.
जिजाऊंच्या प्रत्येक कृतीला वैचारिक आधार असे. जिजाऊ सश्रद्ध होत्या, भावनिक होत्या, पण अंधश्रद्धाळू नव्हत्या. शहाजीराजे गेल्यानंतर जिजाऊ स्वतः सती गेल्या नाहीत तर आईलाही सती जाऊ दिले नाही. जिजाऊंनी सर्व जाती-धर्माच्या प्रजेचे हित सदैव पाहिले. समस्त रयत ही आपली, हे वाक्य त्यांनी कायम जपले. त्यामुळे शिवरायांचे सर्व मावळे समाजातील कर्तबगारीचे प्रतिक होते.
दूरदृष्टी हा जिजाऊंचा एक महत्त्वाचा गुण होता. कोंढाणा किल्ला, अफजलखानाचा वध यात त्याचा प्रत्यय येतो. आग्रा भेट, लाल महालाचा वेढा, पन्हाळ्याचा वेढा यासारख्या कठीण प्रसंगी जिजाऊंचा कणखरपणा, धाडस, संयम, राजकौशल्य अनुभवास मिळते. स्वराज्याचे स्वप्न सत्यात उतरवताना किल्ले कसे बांधावे इथपासून ते रयतेची मने कशी घडवावी इथपर्यंत, सहकारी तत्त्वावर शेती कशी करावी इथपासून ते जलव्यवस्थापन कसे करावे इथपर्यंतची एक दृष्टी त्यांच्याजवळ होती.
जिजाऊ या शिल्पकार होत्या. रयतेच्या कल्याणाला त्यांनी सर्वतोपरी मानले. एक मुलगी म्हणून, पत्नी म्हणून, आई म्हणून व राजमाता म्हणून सर्वच बाबतीत जिजाऊ वेगळ्या होत्या.
जिजाऊंचे जीवन म्हणजे संस्कारांचा खजिना. निरंतर टिकणारी मानवी मूल्यांची शिकवण. एक परिवर्तनवादी व्यक्तीत्व. जिजाऊंचे स्मरण व अनुकरण ही 21 व्या शतकातील गरज आहे. जिजाऊच्यासारखे कर्तुत्व, नेतृत्व आणि विवेकी मातृत्वाच्या प्रतीक्षेत समाज आजही आहे.
-------------------------------------------------------------------
संदिप कोळी