थांबा : सिग्नल सायकलसाठीही लागू असतो.
कोणत्याही गोष्टीची नवलाई ही चार दिवस असते. त्यानंतर ती गोष्ट सवयीची व नंतर ती अंगवळणी पडते. त्याचप्रमाणे इचलकरंजी शहरातील सिग्नलचे नव्याचे नऊ दिवस संपून आता ते सर्व सिग्नल आपल्या सवयीचे झाले आहेत पण अजूनही ते अंगवळणी पडले नाहीत.
सिग्नल ही वाहतुकीच्या नियंत्रणासाठी व शिस्तीसाठी आवश्यक गोष्ट आणि इचलकरंजीसारख्या वेगाने वाढणाऱ्या शहरासाठी तर ती अत्यावश्यकच. त्यानुसार काही महिन्यापासून इचलकरंजीतील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी ही व्यवस्था नियमित कार्यान्वित आहे. ही व्यवस्था वाहनधारकांच्या सवयीची झाली आहे, पण यात सर्वात महत्त्वाची आणि गंभीर बाब म्हणजेच सिग्नल सायकलसाठी असतो हे बाकी सायकलधारकांना पटतच नाही. यात लहानांपासून- थोरांचा समावेश आहे.
इचलकरंजीत सायकल नियमित वापरणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. यामध्ये कामगार, विद्यार्थी हे संख्येने जास्त आहेत, पण सिग्नलला आपल्या लक्षात येते की सायकल वापरणारे कोणत्याही वयातले असले तरी सिग्नलला मात्र कोणीच थांबत नाही. सिग्नल हा सायकलसाठी नसतोच असा एक गोड गैरसमज आपण सोबत घेऊन जगत आहोत. शिवाय सायकलला सिग्नल मोडल्याचा काही दंड पण होऊ शकत नाही. याचा परिणाम वाहतुकीला अडथळा तर निर्माण होतोच, पण सिग्नल संपल्यानंतर प्रत्येक जण वेगाने जात असतो आणि त्यामुळे भीषण अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. असे जर झाले तर दोष कोणाला देणार????
बाकी सिग्नलच्या एका डाव्या बाजूने जाऊन दुसऱ्या डाव्या बाजूला हळूच निघून जाणे यात वेगळी हुशारी दाखवणाऱ्याची, इतर कारणांनी सिग्नल मोडणाऱ्यांची व वाहतुकीचे नियम विसरणाऱ्याची संख्या कमी नाही.
ते काही असले तरी नियम हे आपल्या सोयीसाठी व सुरक्षिततेसाठी आहेत आणि ते पाळायला हवेत. सायकल ही एक वाहन आहे व रेड सिग्नलला सायकलही थांबणे हे सुरक्षिततेसाठी व अपघात टाळण्यासाठी गरजेचे आहे. शेवटी कोणत्याही कामापेक्षा आपण स्वतः खूप मौल्यवान आहोत.
🖋️ संदीप कोळी
sandip.koli35@gmail.com
No comments:
Post a Comment