आपल्या जेवणात नाना प्रकारचे अन्नपदार्थ येतात. वरण, भात, पोळी, कोशिंबीर, भाजी यांनी सजलेले ताट हे आपल्याला सौभाग्य सूचक वाटते. या ताटातील सर्व पदार्थ पोटात एक होतात, पण ताटात त्यांची स्वतंत्रता सांभाळली जाते. त्यावर घडणारी पाकक्रिया वेगवेगळी असते. शिजण्यापासून पचण्यापर्यंत प्रत्येक पदार्थाला लागणारा कालावधी एकसारखा नसतो.
माणसाच्या मनाचे ही असेच आहे. विचार, विकार, संकल्प, बुद्धी, भावना, प्रेरणा अशा विविध रूपाने ती प्रकट होते. मनाचे बदलते रूपे संदर्भ सापेक्ष असतात. कोणत्या वेळी कोणी पुढे यावे याचा विवेक मनाच्या ठायी असतो. मेंदूच्या रूपाने मानवाला प्रचंड बुद्धिमत्ता मिळाली, त्याचप्रमाणे मनाच्या रूपाने मानवाला प्रचंड कल्पनाविश्वही मिळाले आहे. अस्तित्वात असणाऱ्या किंवा आपण मानणाऱ्या गोष्टीतील सर्वात चंचल व सर्वात स्थिर म्हणजे आपले मन. सतत कल्पनाविश्वात व स्वप्न रंजनात रमणारे मन ही माणसाची खूप मोठी सुप्त शक्ती आहे.
विज्ञानाच्या संकल्पनेत आपण 'मन' सिद्ध करू शकत नाही, किंबहुना आपल्या शरीरात मन नावाचा अवयव नाही, पण तरीही मानसशास्त्रात मनाचे सामर्थ्य ठळकपणे अधोरेखित केले आहे. मानवाच्या ठाई असणारी शक्ती ही मनाच्या माध्यमातून एकवटते व त्याचे चांगले अथवा वाईट असे दोन्ही प्रकारचे परिणाम आपल्याला दिसतात.
संत तुकाराम महाराजांचा अभंग आपल्याला सांगतो की,
मनात करा रे प्रसन्न।। सर्व सिद्धीचे कारण ।।
मोक्ष अथवा बंधन।। सुख समाधान इच्छा ते।।१।।
म्हणजेच आपली शक्ती मनात असते. कोणतीही घटना घडल्यावर त्यावर आपले मन व्यक्त होते. कधी रडू येते, कधी राग येतो, कधी वाईट वाटते, कधी आनंद होतो, कधी हेवा वाटतो, कधी अभिमान तर कधी प्रेम या सर्व माध्यमातून आपण व्यक्त होतो.
संवेदनशीलता पण मनाचीच बाजू. एखाद्या प्रसंगात आपण कसे व्यक्त होतो आणि त्यावर काय प्रतिक्रिया देतो याला सोप्या भाषेत संवेदनशीलतेकडे वळवता येईल. आपल्यासोबत किंवा सभोवताली घडणाऱ्या घटनांच्या बाबतीत रिऍक्ट होण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. उदाहरणार्थ: रस्त्यावर बसलेल्या कुत्र्याला दगड मारल्यावर तो वेदनेने ओरडत असेल तर काहीजण हसतील, काही जणांना गंमत वाटेल, काही जणांना वाईट वाटेल, तर काहीजणांना दया येईल हे वाटणे... हा प्रत्येकाच्या मनातील संवेदनशीलतेचा भाग असतो.
आपल्याकडे संवेदनशील माणसाला 'इमोशनल' असे गोड नाव दिले जाते व संवेदनशीलता हा त्या माणसाचा weak Point आहे असे भासवले जाते, पण तसे मुळीच नाही आहे. संवेदनशील मन ही खूप मोठी ताकद आहे. मानवी भावना जाणून त्या हळुवार हाताळण्याची ती देणगी आहे. आपण जर खरंच संवेदनशील असू तर तो आपला weak Point नसून Strong plus point आहे. मानसिक दृष्ट्या आपण हळवे असलो तरी आयुष्याची ती मोठी पुंजी आहे. कारण जगात एकटी पडणारी माणसे ही भावनाशून्य आणि असंवेदनशीलच असतात.
संवेदनशील मनामुळे बऱ्याच वेळेला चिडचिड होते, रडू येत, सगळेच आपल्या विरोधात आहे असे वाटते. सगळे संपले असे वाटते, पण हा आपला चांगुलपणा असतो. सगळे चांगले व्हावे असे वाटणे, आपल्याला किती त्रास झाला तरी समोरच्याबद्दल आपण चांगलाच विचार करतो, कोणी कितीही त्रास दिला तरी आपण चांगल्याच बाजूने विचार करतो हीच आपली ताकद असते.
' जशास तसे' या सूत्राने आपण वागत नाही आणि नात्यात व आपल्या जवळच्याशी वागू ही नये. नाहीतर नाती कुमकत होतात. हळू-हळू आपण या मनाच्या चांगुलपणाचा प्रभावी वापर करायला नक्कीच शिकू...
शेवटी जग हा बाजार आहे. त्यात व्यवहारा वर चालणारी बरीच नाती असतात. त्यामुळे संवेदनशील मनाच्या माणसाची जास्त फसवणूक होत.
किसी ने क्या खूब कहा है, "जो लोग दिल के अच्छे होते हैं।
दिमाग वाले अक्सर उनका जमकर फायदा उठाते हैं।
पण याचा तोटा चांगल्या मनाच्या माणसाला होत नाही, मात्र संवेदनशील मनाच्या माणसाला फसवल्याचे शल्य फसवणाऱ्याच्या मनात वाढते. संवेदनशीलता ही मनाची प्रचंड शक्ती आहे आणि "अक्सर किस्मत वालो को ही नसीब होती है।"
🖊️ संदिप...
sandip.koli35@gmail.com