Thursday, 16 May 2019

सोशल मीडिया

🗓 सोशल......
           'सोशल' आजच्या काळातील एकदम परवलीचा शब्द. अगदी उठल्यापासून रात्री डोळ्यातील झोपेमुळे हातातील फोन तोंडावर पडेपर्यंत आपण 'सोशल' असतो म्हणजेच 'सोशल मीडियावर' असतो. शाळेत असताना सामाजिक शास्त्र विषयात एक प्रसिद्ध वाक्य होते. 'Man is social animal.' त्यावेळी त्याचा अर्थ होता 'माणूस हा समाजाशिवाय राहू शकत नाही.' पण गेल्या काही वर्षात आपण समाजशास्त्रज्ञांनी ती व्याख्या बदलून ,Man is social media animal.' अशी केली आहे. ही शब्दातील गंमत नव्हे तर  आजची आपली वास्तविकता आहे. तुम्ही आणि मी आपल्यात डोकावले तरी ही नवीन व्याख्या आपल्याला तंतोतंत लागू पडते.
           सकाळी झोपेतून जागे झाल्यावर पहिल्यांदा आपण सोशल कट्टा तपासतो, जो आपण काही तासापूर्वी सोडला होता. व्हाट्सअप उघडल्यावर सुविचाराचे इतके मेसेज आलेले असतात की कधीकधी प्रश्न पडतो व्हाट्सअप नसते तर कदाचित जीवन जगण्याचा मार्गच चुकलो असतो. त्यातच व्हाट्सअप ने लावलेला नवीन नाद म्हणजे 'स्टेटस'. माझ्यासह आपल्या बऱ्याच जणांचा वेळ दुसऱ्याचे स्टेटस पाहण्यात, आपले स्टेटस ठेवण्यात आणि ठेवलेली स्टेटस किती जणांनी पाहिले यातच जात असतो.
         फिरायला गेलेले आपले फोटो, फॅमिली फोटो, सिनेमा बघायला गेलेले, गोइंग टू पुणे, कमिंग टू होम, हॉटेल ला लंच, डिनर, पार्टी आशा सर्वच गोष्टी आपण हल्ली शेअर करतो. वाढदिवस, लग्न, अभिनंदन यांच्या शुभेच्छा बद्दल आभार ठीक आहे पण हल्ली दुःखद घटना या प्रसंगी सहभागी झाल्याबद्दल ही आभार मानले जातात.
        फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, टिकटॉक या सारख्या सोशल गंमती आहेतच. फेसबुकची अवस्था व्हाट्सअप सारखीच आपले ठेवायचे पसरून आणि दुसर्‍याची बघायचं वाकून. तिथेही लाईक, कमेंट चे प्रेशर असतेच. मला जास्त कौतुक वाटते ते फेसबुक वर एखाद्या पोस्टवर कमेंट लिहून भांडणाऱ्याचे. यातून काहीच साध्य होत नाही पण, विनाकारण आपण आपले शब्द, ज्ञान आणि आपली पातळी या सर्वांचा पसारा जगापुढे मांडून मोकळे होतो.
           एक व्यंगचित्र पाहिले असेल. एक व्यक्ती ICU मध्ये असते. त्याच्या जवळ त्याची पत्नी व मुलगा असतो. बाहेरील व्यक्ती बोलत असतात याचे  फेसबुक वर 2000 फ्रेंड्स, व्हाट्सअप च्या 50 ग्रुप मध्ये आहे म्हणे पण इथे एकटाच. पण हीच वास्तविकता आहे. आपले सर्व जगणे आता व्हर्चुअल झाले आहे. मी हे पडताळण्यासाठी यावर्षी माझी जन्मतारीख फेसबुकवरून डिलीट केली, तर घरचे चार लोक सोडले तर माझा वाढदिवस कोणाच्याही लक्षात राहिला नाही. हेच फेसबुक वर गेल्या वर्षी 500 च्यावर शुभेच्छा संदेश आले होते. व्हाट्सअपवरचे वेगळेच याचा अर्थ काय घ्यायचा हे माझ्यासह तुमच्याही लक्षात आले असेल.
           एकंदरच आपण सर्वच बाबतीत एकदम उत्साही झालो आहोत.आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट आपल्याला जगापुढे मांडायचे आहे, पण हे जगापुढे मांडण्याच्या धडपडीत आपण आपल्या खऱ्या जगापासून एकटे पडत चाललो आहोत. आठवणी या साठवण्यासाठी असतात. पूर्वी एखाद्या व्यक्तीला जाणून घ्यायचे असेल तर त्याच्याशी भेटून, जवळीक साधून बोलावे लागे पण आता मात्र एखाद्याच्या वैयक्तिक गोष्टी जाणून घ्यायच्या असेल तर त्याची सोशल अकाउंट बघितली  तरी त्या व्यक्तीची सर्व माहिती  समजते. ग्लोबली कनेक्ट होण्याच्या नादात आपला संवाद हरवत चालला आहे. समोर बसून भावना व्यक्त करण्याऐवजी इमोजी, स्टिकर आणि फोटोवरच आपण व्यक्त होतो.
         जगाशी संपर्क असायला हवा आणि त्यासाठी सोशल मीडिया वापरायला हवा याबाबत माझे दुमत नाही पण हा सोशल मीडिया आपल्याला सोसेल तितकाच वापरला पाहिजे.
            तंत्रज्ञानाच्या साथीने काळाच्या एक पाऊल पुढे राहण्यापेक्षा भूतकाळाच्या सुखद आठवणी बरोबर वर्तमानात ती माणसे जपली तर पुढच्या काळात तीच आपल्याला सोबत देेतील. पण हे सर्व सांगण्यासाठी ही सोशल मीडियाच वापरावा लागतो  कारण या सोशल मीडिया व्यतिरिक्त आपण कशावरच विश्वास ठेवत नाही हीच मोठी शोकांतिका आहे. विश्वास वाटत नसेल तर बघा गुगल करून.....

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

©संदीप कोळी
9730410154
sandip.koli35@gmail.com


Tuesday, 26 February 2019

राजभाषा मराठी दिन

📝 माय मराठी, माझी मराठी
"लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,
"जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी"
या ओळींचा गोडवा जितका तितकाच आपल्या मातृभाषेचा गोडवा..... ज्ञानोबांच्या शब्दात
"माझा मराठीची बोलू कौतुके। 
परि अमृतातेहि पैजासी जिंके।"
       अशी अमृताशी पैजा घेणारा गोडवा असणारी आपली मातृभाषा मराठी. आज २७ फेब्रुवारी ज्ञानपीठ विजेते वि.वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिन अर्थात मराठी राजभाषा दिवस.....
         इतर भाषा अवगत असूनही बोलताना जाणीवपूर्वक मराठीचा वापर करणाऱ्यांसाठी मराठी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.....
        आपल्या नुकत्याच बोलायला शिकलेले व शिकणाऱ्या पाल्याला इंग्रजी शब्दाची ओळख करून देणाऱ्यांनाही मराठी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.......
         एका साध्या वाक्यात विनाकारण एक-दोन इतर भाषेतील शब्द वापरून आपला वरचा दर्जा दाखवणार्‍यांना ही मराठी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा......
          मराठी भाषा टिकली पाहिजे असे मनापासून वाटणार्‍या पण आपल्या मुलांना मात्र इंग्रजी माध्यमात शिकवणाऱ्याना ही मराठी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा......
           मोबाईल मध्ये मराठी भाषा असतानाही मराठी संदेश इंग्रजीमध्ये लिहून पाठवणाऱ्यांना ही मराठी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.....
          
          आपला मोबाईल नंबर, वस्तूंची किंमत सांगताना इंग्रजीत अंक आठवून सांगणाऱ्याना ही मराठी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.....
           आपली सही इंग्रजीत करून मराठीचा अभिमान बाळगणाऱ्या मराठी बांधवाना ही मराठी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.....
         आपला इतर भाषांना विरोध नाही. प्रत्येक भाषेची वेगळी संस्कृती, समृद्धता आहे. त्याचा आदर आपण केलाच पाहिजे. पण सध्या मराठी सोडून इतर भाषा बोलण्यावर मराठी माणसाचा जोर आहे. यामुळे आपणच आपली सुंदर भाषा दुर्लक्षित करतोय. मराठीत पण सुंदर बोली भाषा आहेत मालवणी, कोकणी, अहिराणी, कोल्हापुरी, पुणेरी, विदर्भ, यासारख्या महाराष्ट्राच्या विविध प्रांतात बोलल्या जाणाऱ्या बोलीभाषेची आपली स्वतंत्र गोडी व नावीन्य आहे. ते आपण जपले पाहिजे. ग्रामीण भाषा बोलले म्हणून कोणी गावंढळ होत नाही तो आपण केलेला गोड गैरसमज आहे.
       आपण बोलताना शक्य तेवढ्या मराठी शब्दचावापर करायला हवा हा आता पर्यायच नसेल तर इतर भाषेतील शब्द वापरणे क्रमप्राप्त ठरते.

असो.....  मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या व मराठीचा अभिमान असणाऱ्या आपल्या सर्वांना आजच्या राजभाषा मराठी दिनाच्या मराठीतून खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

संदीप कोळी
973041015
sandikoli35@gmail. com


Saturday, 12 January 2019

युवक - क्षमतांची मशाल

🗓   आज १२ जानेवारी राष्ट्रीय युवक दिन......

              ज्या भारतीय संस्कृतीची ओळख व अनुभूती आपल्या वागण्यातून, बोलण्यातून आणि अभिव्यक्तीतून जगाला करून देणाऱ्या स्वामी विवेकानंद यांचा जन्म दिवस......
           स्वामी विवेकानंद म्हणजेच नरेंद्र, लहान असतानाचा प्रसंग. नरेंद्रचे वडील कलकत्याचे प्रसिद्ध व मोठे वकील होते. त्यामुळे त्याच्या घरी प्रतिष्ठित व्यक्तीची नेहमी वर्दळ असे. असेच एके दिवशी पाहुण्याच्या गराड्यात नरेंद्र सापडला. मानवी सवयी व स्वभावाप्रमाणे उपस्थितांपैकी एकाने नरेंद्रना प्रश्न केला. "बाळ नरेंद्र मोठेपणी काय होणार?" त्या काळात नरेंद्र वर त्यांच्या घोडेगाडीवाल्याचा प्रभाव होता. बालवयातील नरेंद्र ने अबोधपणे उत्तर दिले. "मी घोडेगाडीवाला होणार" उपस्थितात हशा पिकला.  नरेंद्रचे वडील यावर प्रचंड नाराज झाले. उपस्थित गेल्यावर विश्वनाथ दत्तांनी नरेंद्र व त्यांच्याआई या दोघांवर प्रचंड रागावले. छोट्या नरेंद्रला काय चुकलं? हे लक्षात आले नाही, पण आईने प्रसंग ओळखला. रडणाऱ्या नरेंद्रला मांडीवर घेत म्हणाल्या "तुला गाडीवान व्हायचे आहे ना, तू नक्की हो पण, तू त्या श्रीकृष्णासारखा सारथी हो. जगाला मार्ग दाखव.'  नरेंद्रच्या आईच्या त्या दोन वाक्यांचा नरेंद्रचा स्वामी विवेकानंद होण्यात आणि जगाला दिशा दाखवण्यात खूप मोठा वाटा होता.
          भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे. इतर देशांपेक्षा आपल्या देशात तरुणांची संख्या खूप जास्त आहे, म्हणून भारत महासत्ता होणार असा ठाम विश्वास डॉ. अब्दुल कलाम यांना होता. प्रत्येक व्यक्ती आयुष्यभर अनेक क्षमता घेऊन जगत असते. ती क्षमता स्थितिज ऊर्जेच्या स्वरूपात असते. व्यक्तीच्या स्थितिज ऊर्जेचे रूपांतर गतिज ऊर्जेत करणारी ती ठिणगी गरजेचे असते. आपल्यामध्ये, आपल्या सभोवती आपल्यापेक्षा लहान अथवा मोठे अशा अनेकांच्यामध्ये असणाऱ्या क्षमतांची जाणीव करून देणारे कोणीतरी भेटणे गरजेचे असते. कधी ते आई-वडील, भाऊ-बहीण, मित्र, मार्गदर्शक, गुरु, शिक्षक किंवा अगदी आपल्याला भेटणारी अनोळखी व्यक्ती असू शकते.   
              अँन्ड्रयू काबोग नावाचा विचारवंत असे म्हणतो की, सामान्य माणूस आपल्या क्षमतेच्या आणि शक्तीच्या फक्त एक चतुर्थांश काम करतो. जी माणसे आपल्या क्षमतेच्या  निम्म्याहून अधिक क्षमतेने काम करतात त्यांना जग सलाम करते. व जी मोजकी माणसे आपल्या पूर्ण क्षमतेच्या 100% काम करतात, त्यांना डोक्यावर घेते.
          प्रत्येक तरुणाच्या आयुष्यात हा क्षमता ओळखण्याचा टप्पा वेगवेगळ्या वेळी व वेगवेगळ्या व्यक्ती व प्रसंगामुळे येतो. संत ज्ञानेश्वरांचा आयुष्यात तो वयाच्या १६व्या वर्षी, न्यूटनचा आयुष्यात २१ व्या वर्षी, भगतसिंगांच्या आयुष्यात तो १२ व्या वर्षे, कल्पना चावला यांच्या आयुष्यात ५ व्या वर्षी तर महेंद्रसिंग धोनीच्या आयुष्यात तो १४ व्या वर्षी आला त्याबरोबर इतरांच्या ही आयुष्यात आला आणि त्यानंतरचा इतिहास सर्वज्ञात व सर्वमान्य आहे.
           आपल्याला जशी प्रेरणा मिळली, तशी आपणही इतरांची  प्रेरणा होऊ शकतो. त्यांच्या क्षमता जागृत करला हातभार लावू शकतो. आपल्या जवळच्या किंवा संपर्कातील व्यक्तींच्या प्रवासात आपलाही वाटा असू शकतो.
            आजच्या या युवक दिनाच्या निमित्ताने मनाने व विचाराने तरुण असणाऱ्या प्रत्येकाने अशी प्रेरणेची ज्योत इतरांच्यातही पेटवून तिची धगधगती मशाल निर्माण करावी जी राष्ट्रसमृद्धी मध्ये कायम तेवत राहील....
राष्ट्रीय युवक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा💐💐

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

©संदीप कोळी
9730410154

sandip.koli35@gmail.com




Sunday, 6 January 2019

नाही

🗓 नाही.....
       संध्याकाळची वेळ..... अचानक दारावरची बेल वाजते. प्रश्नार्थक मनाने आपण दरवाजा उघडतो आणि समोर आपला जुना मित्र, जवळचा नातेवाईक किंवा अगदीच ओळखीचे कुणीतरी उभे असते. आपल्याला खूप आनंद होतो. बरेच दिवसांनी किंवा वर्षांनी ती व्यक्ती आपल्यासमोर उभी असते. आपण आदरातिथ्य करण्यात कोणतीही कसर सोडत नाही. गप्पांचा ओघ सुरू होतो. गप्पा रंगात येतात. आपण भरभरून बोलत असतो. यादरम्यान ती व्यक्ती आपल्या बॅगेतून काही कागद बाहेर काढते व पॉलिसी विषयी माहिती देऊ लागते. परिस्थिती आपल्या लक्षात येते पण आपल्याकडे पर्याय नसतो. मन लावून ऐकण्याचा व समजण्याचा प्रयत्न करत आपण ते ऐकतो. तेवढ्यात तो एक फॉर्मवर सही करायला सांगतो. आपल्याला मनात नकार ओरडून सांगत असतो पण तो बाहेर पडत नाही. इच्छा नसतानाही आपण त्यावर सही करतो व हसतमुखाने एकमेकांचा निरोप घेतो. त्यानंतर खरी गंमत सुरू होते आपल्याला नकार द्यायचा होता पण आपल्याला तो देता येत नाही मग आपण स्वतःला दोष देत बसतो.
              वरील प्रसंग गमतीदार व प्रातिनिधिक असला तरी आपण आपल्या आयुष्यात डोकावून पाहिले तर अनेक वेळा आपण अशा पेचप्रसंगात अडकलेले असतो.
             नाही, नको, नसणार, No, Not, Never असे शब्द कधी वापरू नये असे म्हटले जाते. या शब्दामुळे आपल्यातील नकारात्मकता वाढते हे जरी खरे असले तरी या शब्दांचा योग्य वेळी योग्य वापर आहे तितकाच गरजेचा असतो.
             दैनंदिन अनेक प्रसंगात आपल्यासमोर  होय व नाही हे दोन पर्याय येत असतात. यापैकी आपण कोणताही पर्याय निवडू शकतो पण बहुतेक वेळा आपण 'होय' हाच पर्याय निवडतो. आपल्या मनात नसताना, इच्छा नसताना, आपली क्षमता व काही वेळा आपली योग्यता नसताना फक्त समोरच्या व्यक्तीला नाही कसे म्हणायचे म्हणून आपण 'होय' म्हणतो व आपल्या अडचणी वाढवून घेतो.
            नाही हा असा शब्द आहे, जो आपल्या मनाची कणखरता व खंबीरता दर्शवतो. योग्य वेळी आपल्याला नकारही तितक्याच सहजपणे देता आला पाहिजे. नाहीतर त्या होकाराचा त्रासच आपल्याला जास्त होतो.
              नात्यांमध्ये, वडीलधाऱ्यांना,  आदर असणाऱ्यांना किंवा अगदी आपल्यापेक्षा छोट्यानाही तितक्याच स्पष्ट व नम्रपणे 'नाही' म्हणता आले पाहिजे.
              असे म्हणतात की आपण होय म्हणायला खूप गडबड व नाही म्हणायला खूप उशीर करतो. आपल्याला नको असणाऱ्या गोष्टी नाही म्हणायला शिकायला हवं, कारण काही वेळा नाही म्हणणे खूप सकारात्मक असते आपल्यासाठी व समोरच्यासाठीही....

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

©संदीप कोळी

9730410154

Sandip.koli34@gmail.com

Monday, 24 December 2018

होय मी स्पेशल आहे

I am Special....
          हो आपण स्पेशल आहोत. आपण म्हणजे "मी" आपल्या प्रत्येकातील "मी".
           आपण स्पेशल आहोत कारण पृथ्वीवरील लाखो सजीवांच्यामध्ये आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो आहोत. या पृथ्वीवरील प्रत्येकापेक्षा वेगळे आणि युनिक आहोत. आपण जगतोय आपल्या शैलीत, आपल्याकडे काही गुण आहेत आणि बरेच दोषही आहेत पण ते इतर कोणातही सापडणार नाहीत. इतरांच्याकडे काय आहे आणि काय नाही याची तुलना आपण करायची नाही. आणि त्यात आयुष्यातला  लाखमोलाचा वेळ वाया घालवायचा नाही. कारण आपले आयुष्य हा आपला प्रवास आहे, इतरांशी लावलेली शर्यत नाही.
           आपण प्रयत्न करणार आहोत. यशाबरोबर अपयशही बऱ्याच वेळा वाट्याला येईल. पण अनुभवाचा साठा नक्कीच वाढेल.  आलेल्या अपयशाने खचायचं नाही, स्वतःवर चिडायचं नाही, आणि आलाच राग स्वतःचा तर सांगायचं कायम स्वतःला मी स्पेशल आहे.
          दुसऱ्याच्या फुटपट्टीवर आपण स्वतःला मोजणार नाही. आंब्याची तुलना फणसाशी होऊ शकणार नाही. दोन्हीही फळ असली त्यांची आपापली वैशिष्ट्ये वेगळी आणि महत्त्वाची आहेत. तसे आपण ही आहोत आपल्यासाठी महत्त्वाचे.....
       दररोजचा दिवस आपला आहे. काहीतरी शिकवणारा, उगवणारा सूर्य आपल्यासाठी नवीन आशा घेऊन येणार आहे, तर मावळणारा सूर्य आपल्याला काहीतरी देऊन जाणारा. आपल्याला कोणाची सहानुभूती नको आहे. आपण बिचारे वगैरे तर अजिबात नाही. आपण जसे आहेत तसे आपल्याला स्वीकारले आहे आणि यासाठी कोणाच्या सर्टिफिकेटची गरज असनार नाही.
           स्वामी विवेकानंद म्हणतात "आपण दररोज स्वतःशी बोलत नसाल तर तुम्ही जगातील एका चांगल्या व्यक्तीशी भेटण्याची संधी गमवाल." त्याप्रमाणे आपण स्वतःशीच बोलायचं. मनाला योग्य वाटेल ते करायच. रस्ता जरी चुकला तरी पुन्हा वळणावर येऊन थांबून विचार करायचा. आनंदी राहण्याचा रास्त प्रयत्न करायचा. नवीन नवीन वाटा शोधायच्या. नवीन नाती जोडायची. स्वतःला स्वतःमध्येच गुंतवायला शिकायच. स्वतःचं कौतुक करायचं आणि वेळप्रसंगी स्वतःचा कानही ओढायचा. आरशासमोर उभे राहून सांगायचं स्वतःला होय मी आहे स्पेशल.....
        हे जमेल आपल्या प्रत्येकाला आणि जमणार आहे आपल्याला  कारण आपण स्पेशल आहोत. येणाऱ्या प्रत्येक क्षणात सांगा स्वतःला, आपल्यातील "मी" ला मी स्पेशल आहे. I am Special.....

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

संदीप कोळी
9730410154

Sandip.koli35@gmail.com



Wednesday, 19 September 2018

करके देखो - इको-फ्रेन्डली गणपती

कळायला लागल्या पासून दिवाळी नंतर चा सर्वात मोठा सण आणि उत्सव म्हणजे 'गणपती'. तसही गणपती हे समस्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत. त्यामुळे आपल्या घरातील गणपती ही मोठा, आकर्षक व इतरांच्या पेक्षा उठून दिसावा ही सर्वप्रमाणे माझीही अपेक्षा. आमच्या घरीही गणपती व गणपती ची सजावट याकडे विशेष लक्ष दिले जायचे. घरात तशी परंपरा होती. हळू-हळू वय वाढेल तसे व विज्ञानाच्या प्रभावामुळे मोठ्या गणपतीचे आकर्षण कमी झाले व पर्यावरणपूरक गणपती उत्सव असावा अशी इच्छा वाढू लागली. पण त्यावेळी त्यासाठी काय करावे याचे पुरेसे ज्ञान उपलब्ध नसल्यामुळे जरवर्षी मागची प्रथा पुढे चालू या क्रमाने सुरु होते. असे सालाबादप्रमाणे जरवर्षी सुरु होते. पण मनातील इच्छा गप्प बसू देत नव्हती.काळाबरोबर विचार व निर्णयाचे स्वातंत्र व अधिकार स्वतःकडे आले व वाटू लागले की आपण हि गणपतीची मूर्ती घरीच करूया पण या वाटण्याला ' वाटाण्याच्या अक्षता लावून' वेळ नाही, कधी करायचे, कसे करायचे, होईल की नाही, घरातले विरोध करतील, लोक काय म्हणतील अशी अनेक कारणे जोडून तो विषय बस्त्यात गुंडाळत नेहमीचा रिवाज पार पडला जायचा. याला पर्याय म्हणून दोन वर्षी इको- फ्रेंडली गणेश मूर्ती आणून उत्सव साजरा करत होतो.
        शेवटी गेल्या 3 वर्षापासून हे वाटने प्रत्यक्षात उतरवायचे ठरवले. पण माहिती अपुरी होती. शाळेतील मातीच्या वस्तू करायचा तोडका अनुभव व घराजवळ उपलब्ध माती यांच्या जोरावर प्रयत्न करून मूर्ती बनवली. साध्या रंगानी रंगवली. पहिल्याच प्रयत्नात इच्छेसारखी मूर्ती घडली होती. घरातल्या सर्वाना आवडली त्याच आनंदाने मूर्तीची प्रतिष्ठापणा करून घरीच विसर्जित केली होती.
       मागचा अनुभव व आनंद या दोन्ही भांडवलाच्या जोरावर या वर्षी ही मूर्ती आपणच बनवायची हे आता ठरलेच होते.पण या वर्षी सतत चा पाऊस या मुळे आसपास मिळणारी माती उपलब्ध होईना. मग नव्या पर्यायाचा शोध सुरु झाला. शाडू माती विषयी चौकशी केली. पण पुरेशी माहिती मिळाली नाही. शेवटी शाडू मातीच्या मूर्ती तयार करणाऱ्याला गाठले. माहिती मिळाली. माती मिळाली काम सुरु झाले. कोणताही साचा न वापरता हातानेच काम सुरु झाले. मूर्ती तयार झाली. 'चुकातून शिका'  या सूत्राने मागीलवर्षी राहिलेल्या गोष्टी या वर्षी आवर्जून पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. पूर्ण पणे आकर्षक नैसर्गिक रंगात रंगवून तयार झाली आहे.  मनाला भावेल अशी सुंदर मूर्ती तयार झाली.
         पण यासगळ्या प्रक्रियेमध्ये मिळणारा आनंद मोठा होता. आपल्याकडे आता इको-फ्रेंडली मूर्ती उपलब्ध होतात. गोष्ट पैशाची नसते वा असणार ही नाही. ही सर्व प्रक्रिया घडण्यापर्यंतची भावना व स्वनिर्मितीतून मिळणार आंनद हे शब्दात नाही मांडता येत. ते फक्त अनुभवता येते. म्हणून तुम्ही ही प्रयत्न करा.. 'करके देखो अच्छा लगता है....'
-----------------------------------------------------------

🖊संदीप.....

Sunday, 9 September 2018

पोरांची धावपळ तयारी गणपतीची

अरे वर्गणी गोळा झाली की नाही, त्या पलिकडच्या गल्लीतल्या काकांना या वर्षी तरी 101 रूपयाची पावती करा म्हणा. जर वर्षी 11 रूपयाची पावती करत्यात राव.आता तर पेट्रोल पण 100 च्या जवळ पोहचल म्हणाव. ते मंडपच्या कामात पोरांना यायला निरोप दया. ती ढोलची प्रैक्टिस पूर्ण झाली की नाही अजुन जोरात वाजला पाहिजे या वर्षी.... मूर्तीवाल्याकड़े जाऊन मूर्तिची सजावट पूर्ण झाली का ते बघून या रे..... त्या झांझ ग्रुप ला फ़ोन करून सुपारी फाइनल करा..... .
          ही आणि याच संदर्भातली चर्चा सध्या सर्व मंडळात, गल्लीत आणि कॉलेजमध्ये सुरू आहे आपल्याकडे दिवाळीनंतर  सर्वात मोठा सण आणि उत्सव म्हणजे 'गणपती'. तसही आपल्याला मिरवायल मिळणारा एकमेव सण. त्यामुळे लहानांपासून-मोठ्यांपर्यंत, गरिबांपासून-श्रीमंतापर्यंत अशा प्रत्येकाला या सणाचे आकर्षण व उत्सुकता दोन्ही असते. आपल्या घरातला व मंडळातलाही गणपती इतराच्या पेक्षा वेगळा आणि आकर्षक असावा यासाठी आपण प्रत्येकजण झटत असतो.
        गणपती उत्सव दोन दिवसावर आला आहे. आपल्या प्रत्येकाची तयारीची गड़बड़ सुरु असेल. बाजारपेठा गणपतीचीच्या स्वागतसाठी फुल्ल भरल्या आहेत.घरातली मूर्ती ठरवणे, सजावटीचे साहित्य आणणे. सजावट ची थीम यावर विचार सुरु असेल. यंदा थर्माकोल वर बंदी असल्यामुळे इतर पर्यायाचा विचार करावा लागत आहे. काही जणांचे इको- फ्रेंडली गणपतीसाठी हटके सजावटी चे नियोजन सुरु असेल त्यासाठी वेळ आणि साहित्य यांची जुळवाजुळव सुरु असेल. घरातला प्रत्येक जण लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज झालेला आहे.
        पण आपल काम इथे थांबत नाही. आपण कार्यकर्त्यांच्या वर मंडळाची मोठी जबाबदारी असते.  मंडळाची मूर्ती ठरवणे, वर्गणी गोळा करणे, मंडळाचा परिसर स्वच्छ करणे, मंडप घालने, गणपती आणण्यासाठी ट्रॉली सजवणे. मंडळाच्या नावाचे टी शर्ट छापणे, नेत्याची स्पॉन्सरशिप मिळवणे, इतरांच्या मंडळापेक्षा वेगळा आणि भारी महाप्रसादाचे नियोजन करणे. त्यासाठी अन्नदाते यांची भेट घेणे. जोरात लायटिंग ची सजावट करणे. डॉल्बीला बंदी असल्यामुळे झांझ, लेझिम, ढोल, बैंजो यासारख्या पारंपरिक वाद्यांना ठरवण्यासाठीची धावपळ या गोष्टी आपले काम व कॉलेज सांभाळून प्राधान्यक्रमाने सुरु आहेत.
           एकूणच आपल्या लाडक्या बाप्पासाठी आपल्या सर्वसह निसर्ग ही सज्ज झाला आहे. चला या वर्षी आपल्या बाप्पाचे स्वागत आनंदात, उत्साहात, शांतातेत, सर्वाच्या सहकार्यने व सुरक्षिततेने करूया.
गणपती बाप्पा मोरया....

-------------------------------------------------------------------
संदीप
sandip.koli35@gmail.com

मन ही आवरायला घेऊया

           वातावरणात बदलाचे वारे वाहू लागले आहे. आजूबाजूला उत्साहाचे उधाण आले आहे आणि मनामनात आनंदाच्या लहरी उमटत आहे. दिवाळी तोंडावर आली आह...