Tuesday, 31 December 2024

आज : Today

📝 आज.......
      आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे मानतात तर काही जण आणखी एक नवीन वर्ष, नवी संधी आली असे मानतात. खरी गंमत वेगळीच असते काही गेलं ,काही येणार आहे म्हणण्यापेक्षा आहे ते Enjoy करणारा खरा शहाणा ठरतो. 
          अर्धा ग्लास बघून अर्धा ग्लास रिकामा कि अर्धा ग्लास भरलेला हे ठरवण्यापेक्षा तो ग्लास पिऊन टाकणारा शहाणा ठरतो. तेच आपल्या आयुष्याच्या बाबतीत ठरते कारण भुतकाळ आपल्याला *निराश* करतो तर भविष्यकाळ काळजी करायला लावतो. पण फक्त आज आणि फक्त आजच आपल्याला जगायला, आनंदी राहायला , आनंदी राहायला शिकवतो. भुतकाळ आणि भविष्यकाळ विसरायला लावणारा तो 'आजचा' क्षण असतो. आणि तो 'आजचा' क्षण आपण 'आजच' जगला पाहिजे. 
          आपण नेहमी ठरवतो, हे करायचे, इकडे जायचे, त्याला भेटायचे, त्याला फोन करायचा, इकडे फिरायला जायचे, हा छंद जोपासायचा. पण हे सर्व प्रत्येक्ष करायची वेळ येते त्यावेळी मात्र आपण या सर्वांकडे सोयीस्कर कारणासह अपेक्षित दुर्लक्ष करतो. आणि या सर्वांना योग्य Label  लावून बाजूला करतो. कधी सुट्टी नाही, कधी काम जास्त आहे, आत्ता नको नंतर बघू ,असे म्हणून आपण आपल्याच Emotion चा गळा दाबतो. आणि मग आजच्या सारख्या एखाद्या दिवशी एकटे बसून आठवणी काढून निराश होतो.
         "So कल को मारो गोली, आज अभी आणि आत्ता " जे करायचे ते आत्ता करू, कुणाला भेटायचे आहे ना आत्ता भेटू , कोणाला फोन करायचा ना आत्ता करू, फिरायला जायचे ना आज निघू. थोडक्यात आपले Emotion control करण्यापेक्षा Express करायला आणि आजच करायला शिकले पाहिजे नाहीतर उद्या तो भुतकाळ होईल आणि आपल्या निराशेचे कारण होईल.
               "छोडो कल कि बाते,
                कल कि बात पुराणी।
                छोडो कल कि बाते
                कल कि बात है आनी।
                नए आज में लिखेंगे,
                 हम नई कहाणी।"
           आजच्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी हा थोडासा Thoughtful विचार आज सुचला म्हणून आजच......

आपल्याला नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा💐💐💐
🖋 संदीप.....

Sunday, 30 June 2024

Leave while you are at the top of the game

🏵️ Leave while you are at the top of the game.....🏆🏏

29 जून हा दिवस समस्त भारतीयांसाठी प्रचंड अभिमानाचा आणि कौतुकाचा ठरला. गेल्या अकरा वर्षापासून असलेल्या आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ रोहित आणि टीमने संपवला आणि पूर्ण देशातच एक जल्लोष सुरू झाला. खरेतर सातत्याने इतकं छान क्रिकेट खेळत असताना " हाथ आया लेकिन मुंह ना लगा।" अशी अवस्था भारताची होत होती. गेल्या वर्षभरात भारत तीन वेळा आयसीसी ट्रॉफीच्या फायनल पर्यंत पोहोचला पण यशाला गवसणी घालण्यापासून काही क्षणांनी मात दिली होती, पण आज तो सुवर्णक्षण अवतरला आणि भारतीय टीमने पुन्हा एकदा T20 वर्ल्ड कपच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. 
           भारतीय टीम ही सातत्याने अतिशय उत्तम कामगिरी करून अंतिम सामन्यापर्यंत पोहोचली होती त्यामुळे आजचा सामना हा भारतीयांसाठी प्रचंड महत्त्वाचा होता. एकीकडे भारताने T20 वर्ल्ड कप जिंकल्याचा अभिमान आणि कौतुक होत असताना दुसरीकडे विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोन दिग्गजांनी T20 मधून घेतलेली निवृत्ती ही सुद्धा मनाला कुठेतरी बोचणी लावून जाणारी आहे. भारतीयांची अवस्था एका डोळ्यात आनंदाश्रू आणि दुसऱ्या डोळ्यात दुःखाश्रू. 
        पण का??? दोघेही इतका चांगला खेळ खेळत असताना अचानक अशा निवृत्तीची गरज होती का??? त्यांनी अजून काही वेळ वाट बघायला पाहिजे होती का??? 
         नाही.... त्यांनी घेतलेला हा निर्णय माझ्यामते सर्वोत्तम आहे. तुम्ही अशा वेळेला निवृत्ती घेत आहात की ज्या वेळेला तुम्ही त्या क्षेत्रामध्ये सगळ्यात वरच्या स्थानावर असाल तर निवृत्ती तुमच्यासाठी खूप फलदायी ठरत असते. रोहित व विराट सध्या या प्रकारात सर्वोच्च स्थानावर आहेत. अजून काही काळ ते खेळत राहतील. अतिशय उत्तम ही खेळतील यात शंका नाही, पण आज जो क्षण त्यांच्या आयुष्यात आला आहे तो पुन्हा येईल की नाही सांगता येत नाही आणि अशा वेळेला सर्वोच्च शिखरावर असताना त्यातून बाजूला होणं ही खूप मोठी उपलब्धि दोघांनी साधली आहे. 
          या निर्णयामुळे ज्या- ज्या वेळेला t20 फॉरमॅटचा उल्लेख होईल त्यावेळी या दोघांची नावे तितक्याच अभिमानाने घेतली जातील. त्यांचा हा निर्णय सर्व क्षेत्राला लागू पडतो. तुम्ही ज्या वेळेला यशाच्या सर्वोच्च शिखरावर असतात त्यावेळेला तिथून बाजूला जाणे हेच तुमचे खरोखरच यश असचे. Leave it when you are at peak. 
          रोहित आणि विराट या पुढेही भारतीय क्रिकेटसाठी कसोटी आणि वनडे च्या माध्यमातून योगदान देत राहतील यात शंका नाही. त्यांच्याकडे अजून खूप खेळ बाकी आहे याबद्दल खात्री आहे. दोघांनाही कसोटी व वनडे फॉरमॅटसाठी खूप खूप शुभेच्छा आणि t20 साठी दिलेल्या योगदानाबद्दल खूप खूप धन्यवाद.....
        भारतीय संघ आणि रोहित टीमचे पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन..

✒️ संदिप कोळी
sandip.koli35@gmail.com

Thursday, 13 June 2024

जरा विसावू या वळणावर......

जरा विसावू या वळणावर......

 

                         दररोज आपल्याला जाग येते ती मोबाईलच्या गजरने... डोळे चोळत उठता उठता कधी मोबाईलचा डेटा On होतो कळत ही नाही. मग रात्री 11-12 ला बंद झालेली नोटिफिकेशनची टिक- टिक पुन्हा भरभर वाजू लागते. सगळी शोधा शोध झाल्यावर लक्षात येते की रात्रीत फारसं नवीन काही झालेलच नाही. मग थोडेसे हायसे वाटते. कोणाचा वाढदिवस? कोणाला शुभेच्छा? कोणाचे अभिनंदनाचे स्टेटस ठेवल्यावर आपल्याला प्रवाहात आहे याचे कौतुक वाटते आणि दिवसाचा प्रवास सुरू होतो.

                   सकाळचे आपले आवरून 15 - 20 मिनिटांपूर्वी ठेवलेला फोन पुन्हा हाती येतो व आपण जगाशी जोडले जातो. स्टेटस, मेसेज आणि नोटिफिकेशनच्या माध्यमातून मित्र, परिवार आणि दुनिया आपल्या डोळ्यासमोर दिसते. दिवसभर काम, प्रवास, भेटी, कार्यक्रम या ना अशा अनेक कामात आपण सतत व्यस्त असतो.

                 कोणाची भेट झाली की... काय? काय? च्यापुढे आपला संवाद जात नाही. आपल्याला गडबड असते. नंतर भेटतो. जरा गडबड आहे. अशा सबबी सांगून आपण काढता पाय घेतो.  समोर असणाऱ्या किंवा आपल्याला भेटावेसे वाटणाऱ्या व्यक्तीला आपल्याला वेळ देता येत नाही.

            जगण्याच्या प्रवासात आपण इतके व्यस्त झालोय की समोर आहे त्याकडे इच्छा असूनही दुर्लक्ष करून आपण पुढे जातोय. एक आयुष्य आहे व आपल्याला अनेक गोष्टी करायच्या आहेत हे 100% मान्य, पण हे So Called सगळे मिळवण्यात आपली स्वतःची ओढाताण तर होते, पण ज्याच्यासाठी आपण धावतोय ते सर्व आपल्याला सापडतही नाही आणि सापडलेच तरी आपले समाधान होत नाही. 

               जगण्याच्या धावपळीत कुठेतरी थोडं थांबून, थोडा विसावा हा तितकाच गरजेच आहे. जगाचे चक्र हे कायम सुरूच असणार आहे. कितीही जोरात धावलो तरी सर्वच ठिकाणी असणे व मिळणे कठीणच. फक्त या धावपळीत आपली फरपट होऊ नये इतकेच महत्त्वाचे. 

                पुढे जाणे हे आपल्या आयुष्याचे ध्येय असले तरी आपल्या सोबतच्यांना पुढे घेऊन जाणे किंवा आपल्याबरोबर असणाऱ्यांसाठी वेळ देणं ही तितकच महत्त्व आहे. नंतर फोन करतो. नंतर भेटूया. नंतर बघूया. 

                सध्या गडबडीत आहे, वेळ नाही ही कारणे बाजूला ठेऊया. जगण्याच्या या शर्यतीत नंतर कुणालाच वेळ मिळत नाही व ती वेळ गेल्यावर अपराधीपणाची भावना कायम आपल्या सोबत राहते म्हणून नंतरपेक्षा आत्ता बोलूया, आत्ता भेटूया, आत्ता बघूया हे महत्त्वाचे आहे.

            गीतकार सुधीर मोघेंच्या गीताच्या सुंदर ओळी मला खूप आवडतात...

    'भले बुरे जे घडून गेले'

    'विसरून जाऊ सारे क्षणभर'

    'जरा विसावू या वळणावर....

    'जरा विसावू या वळणावर....

 

                      जगण्याच्या प्रवासात कुठेतरी थोडासा स्वल्पविराम घेऊन थोडसं थांबून स्वतःसाठी व जवळच्यांसाठी विसावा घ्यायला  नक्कीच हरकत नाही.

 

संदीप कोळी

sandip.koli35@gmail.com



 

Sunday, 23 April 2023

थांबा : सिग्नल सायकलसाठीही लागू असतो.

थांबा : सिग्नल सायकलसाठीही लागू असतो.

               कोणत्याही गोष्टीची नवलाई ही चार दिवस असते. त्यानंतर ती गोष्ट सवयीची व नंतर ती अंगवळणी पडते. त्याचप्रमाणे इचलकरंजी शहरातील सिग्नलचे नव्याचे नऊ दिवस संपून आता ते सर्व सिग्नल आपल्या सवयीचे झाले आहेत पण अजूनही ते अंगवळणी पडले नाहीत.
             सिग्नल ही वाहतुकीच्या नियंत्रणासाठी व शिस्तीसाठी आवश्यक गोष्ट आणि इचलकरंजीसारख्या वेगाने वाढणाऱ्या शहरासाठी तर ती अत्यावश्यकच.  त्यानुसार काही महिन्यापासून इचलकरंजीतील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी ही व्यवस्था नियमित कार्यान्वित आहे.  ही व्यवस्था वाहनधारकांच्या सवयीची झाली आहे, पण यात सर्वात महत्त्वाची आणि गंभीर बाब म्हणजेच सिग्नल सायकलसाठी असतो हे बाकी सायकलधारकांना पटतच नाही. यात लहानांपासून- थोरांचा समावेश आहे.
           इचलकरंजीत सायकल नियमित वापरणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. यामध्ये कामगार, विद्यार्थी  हे संख्येने जास्त आहेत, पण सिग्नलला आपल्या लक्षात येते की सायकल वापरणारे कोणत्याही वयातले असले तरी सिग्नलला मात्र कोणीच थांबत नाही. सिग्नल हा सायकलसाठी नसतोच असा एक गोड गैरसमज आपण सोबत घेऊन जगत आहोत. शिवाय सायकलला सिग्नल मोडल्याचा काही दंड पण होऊ शकत नाही. याचा परिणाम वाहतुकीला अडथळा तर निर्माण होतोच, पण सिग्नल संपल्यानंतर प्रत्येक जण वेगाने जात असतो आणि त्यामुळे भीषण अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. असे जर झाले तर दोष कोणाला देणार????
             बाकी सिग्नलच्या एका डाव्या बाजूने जाऊन दुसऱ्या डाव्या बाजूला हळूच निघून जाणे यात वेगळी हुशारी दाखवणाऱ्याची, इतर कारणांनी सिग्नल मोडणाऱ्यांची व वाहतुकीचे नियम विसरणाऱ्याची संख्या कमी नाही.
              ते काही असले तरी नियम हे आपल्या सोयीसाठी व सुरक्षिततेसाठी आहेत आणि ते पाळायला हवेत. सायकल ही एक वाहन आहे व रेड सिग्नलला सायकलही थांबणे हे सुरक्षिततेसाठी व अपघात टाळण्यासाठी गरजेचे आहे. शेवटी कोणत्याही कामापेक्षा आपण स्वतः खूप मौल्यवान आहोत.


🖋️ संदीप कोळी
sandip.koli35@gmail.com


Wednesday, 11 January 2023

प्रेरणादायी जिजाऊ चरित्र

🌈 प्रेरणादायी जिजाऊ चरित्र
            पारतंत्र आणि गुलामगिरीच्या अंध:कारात स्वराज्याची बीजे पेरून सुराज्याचे स्वप्न पाहणाऱ्या आणि पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तुत्वाने उभे करणाऱ्या शिल्पकार म्हणजे शिवमाता, राष्ट्रमाता, मातृशक्तीची प्रेरक प्रतिमा, सुराज्य घडवणारी शिवशक्ती, स्वराजजननी राजमाता जिजाऊ मासाहेब.
              इतिहासाच्या कालपटलावर ज्या स्त्रियांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा ठामपणे उमटवला यात अग्रक्रमाने घ्यावे असे नाव म्हणजे राजमाता जिजाऊ.
'निश्चयाचा महामेरू| बहुत जनासी आधारू|'
 | श्रीमंतयोगी |
             असे ज्यांचे वर्णन केले जाते ती सारी पुण्याई ध्येयवेड्या आईची, निराग्रही मातेची आणि वीरमाता मासाहेब जिजाऊची.
           विदर्भातील सिंदखेड राजा येथे कर्तबगार लखुजी जाधव व गिरीजाबाई यांच्या पोटी  जन्माला आलेले तेजस्वी कन्यारत्न म्हणजे जिजाऊ. पराक्रमी घराणे, सत्ता, अधिकार आणि कर्तव्य यांचा सुरेख समन्वय साधणाऱ्या राजघराण्याचे संस्कार बाल जिजाऊंच्यावर घडले. सैनिकी शिक्षण, राज्यकारभारांची ओळख, युद्ध, न्यायनिवाडा, पराक्रमाच्या घटना यातून जिजाऊंचे बालपण घडले.  न्यायप्रिय, प्रजाहितदक्ष व कर्तबगार राजे लखुजीरावांच्या आदर्श व्यक्तिमत्त्वाचा आणि आईच्या आदर्श मातृत्वाचा वारसा जिजाऊंना लाभला. यातूनच एक धाडसी, जिद्दी, स्वाभिमानी, आव्हान स्वीकारणारी वृत्ती विचारी, अभ्यासू, समंजस बाल जिजाऊ घडत गेल्या.
         शहाजीराजे यांच्याशी विवाह झाल्यानंतर भोसले- जाधव घराण्यातील संघर्ष, मोघल- सुलतान यांचा धुमाकूळ, स्वतःचे बंधू -दीर यांच्या हत्या, मराठ्यांच्या संसाराची, प्रदेशाची, तीर्थक्षेत्रांची दैना अशा प्रसंगात झगडणे व संघर्ष हा त्यांच्या जीवनाचा भागच बनला.
           आसमानी व सुलतानी संकटाची बिकट वाट सगळीकडे असताना आशेची एक ज्योत मनात घेऊन शिवनेरी गडावर त्यांनी तमाम मराठी स्वप्नांना शिवबाच्या रूपाने जन्म दिला.
शिवनेरीच्या अंगाखांद्यावर लहानाचा मोठा करताना, सह्याद्रीच्या कुशीत निर्भयपणे वावराला शिकवताना, शिवरायांना महाभारत आणि रामायणातील श्रीराम आणि श्रीकृष्णाच्या गोष्टीचे बोधामृत पाजताना स्वराज्य निर्मितीचे बाळकडू पाजून "हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे." या मूलमंत्राचा धडा गिरवला. बालपणापासूनचे धडे व अनुभवलेला संघर्ष याची फलश्रुती म्हणून जिजाऊंनी बाल शिवाजींना राजा म्हणून घडवले. व्यायाम, अध्ययन, प्रशासन, कला, साहित्य, स्वावलंबन, युद्धशास्त्र, राज्यशास्त्र, नीतीशास्त्र यांचे धडे देणे सुरू केले.
              पुण्याच्या लाल महालात प्रवेश करून पुणे भूमी सोन्याच्या नांगराने नांगरून त्यांनी आपल्या अस्तित्वाच्या पाऊल खुणा उठवल्या. रांझाच्या पाटलाचा प्रसंग असो वा इतर गुन्हे, न्यायनिवाडा हा निपक्षपातीपणे करावा हे धडे त्यांनी दिले. शहाजीराजांच्या अनुपस्थितीत त्यांच्या मार्गदर्शनाखाली बाल शिवबा व मावळ्यांमध्ये हिंदवी स्वराज्याची बीजे त्यांनी रोवली.
            जिजाऊंच्या प्रत्येक कृतीला वैचारिक आधार असे. जिजाऊ सश्रद्ध होत्या, भावनिक होत्या, पण अंधश्रद्धाळू नव्हत्या. शहाजीराजे गेल्यानंतर जिजाऊ स्वतः सती गेल्या नाहीत तर आईलाही सती जाऊ दिले नाही. जिजाऊंनी सर्व जाती-धर्माच्या प्रजेचे हित सदैव पाहिले. समस्त रयत ही आपली, हे वाक्य त्यांनी कायम जपले. त्यामुळे शिवरायांचे सर्व मावळे समाजातील कर्तबगारीचे प्रतिक होते.
            दूरदृष्टी हा जिजाऊंचा एक महत्त्वाचा गुण होता. कोंढाणा किल्ला, अफजलखानाचा वध यात त्याचा प्रत्यय येतो. आग्रा भेट, लाल महालाचा वेढा, पन्हाळ्याचा वेढा यासारख्या कठीण प्रसंगी जिजाऊंचा कणखरपणा, धाडस, संयम, राजकौशल्य अनुभवास मिळते.  स्वराज्याचे स्वप्न सत्यात उतरवताना किल्ले कसे बांधावे इथपासून ते रयतेची मने कशी घडवावी इथपर्यंत, सहकारी तत्त्वावर शेती कशी करावी इथपासून ते जलव्यवस्थापन कसे करावे इथपर्यंतची एक दृष्टी त्यांच्याजवळ होती.
          जिजाऊ या शिल्पकार होत्या. रयतेच्या कल्याणाला त्यांनी सर्वतोपरी मानले. एक मुलगी म्हणून, पत्नी म्हणून, आई म्हणून व राजमाता म्हणून सर्वच बाबतीत जिजाऊ वेगळ्या होत्या. 
            जिजाऊंचे जीवन म्हणजे संस्कारांचा खजिना. निरंतर टिकणारी मानवी मूल्यांची शिकवण. एक परिवर्तनवादी व्यक्तीत्व. जिजाऊंचे स्मरण व अनुकरण ही 21 व्या शतकातील गरज आहे. जिजाऊच्यासारखे कर्तुत्व, नेतृत्व आणि विवेकी मातृत्वाच्या प्रतीक्षेत समाज आजही आहे.

-------------------------------------------------------------------
संदिप कोळी


Tuesday, 27 December 2022

आयुष्य समृद्ध करणारा अनुभव....

🌈 आयुष्य समृद्ध करणारा अनुभव....
         मंगळवार 27 डिसेंबर, दुपारी 1 ची वेळ. खिशातला कंगवा कुठेतरी हरवल्याने वाऱ्याने विस्कटणाऱ्या केसांना जागा दाखवण्याची जबाबदारी बोटांवर घेतली होती, पण दोन-तीन दिवसात हाताची अक्षमता व केसांची धडपड वाढल्याने शेवटी आज कंगवा घेण्याची सवडी काढावीच लागली.
         खरेदी म्हटलं की दुकान शोधण्याऐवजी सहज खरेदी करावी म्हणून रस्त्याच्याकडेच्या सुपरमॉलकडे गाडी वळवली. त्या छोट्या मॉलमध्ये आपल्या गरजेच्या अनेक वस्तू खुणावत होत्या, पण माझी गरज कंगवा होती व त्याचीच मागणी केली.
        सत्तरीच्या आसपास वय असणाऱ्या एका आजोबांनी आपल्या मांडणीतून नजर हटवत "कोणता रंग देऊ?" असा प्रश्न केला.
      " तुम्हाला आवडणारा द्या" असे म्हटल्यावर, सुरकुत्या पडलेल्या चेहऱ्यावर मध्ये हास्य आणत एक रंग काढून माझ्या हातात दिला. मी किंमत विचारल्यावर 5 रुपये सांगितले. मी 20 रुपयाची नोट काढून पुढे धरली तर आजोबा म्हणाले, "सुट्टे 5 रुपये पाहिजे. मी पुन्हा पाकीट तपासले 2 रुपयाची 3 नाणी मी आजोबांना दिली. कंगवा खिशात घातला व गाडी वळवणार इतक्यात आजोबा म्हणाले "तुम्ही 6 रुपये दिले, हा घ्या 1 रुपया" मी पण तो नम्रपणे स्वीकारला.
          तो 1 रुपया हातात घेताना मनात आले, किती सहजतेने त्यांनी तो प्रामाणिकपणा जपला आहे. त्या 1 रुपयाची किंमत त्यांना नक्की ठाऊक आहे.
         जगण्यात इतका सहजपणे असला की जीवनावरचे अनावश्यक ओझे आपोआप विरून जाते.

🖋️© संदिप

Wednesday, 30 November 2022

आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी काय ठेवणार आहोत?? - जपानकडून शिकूया

🌈 आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी काय ठेवणार आहोत??
         माणूस हा उत्सवप्रिय प्राणी. आपल्याला अनेक गोष्टी साजरा करायला आवडतात. नुकतीच आपण दिवाळी साजरी केली, त्यातच t20 चा वर्ल्डकप साजरा केला. ती पार्टी संपते तोपर्यंतच फुटबॉलचा वर्ल्ड कप सुरू झाला. 
           फुटबॉल हा जगाचा लोकप्रिय व सर्वाधिक खेळला जाणारा खेळ. त्यामुळे क्रीडा प्रेमींच्या नजरांबरोबर इतरांचे डोळे त्याकडे लागलेले. या फुटबॉल वर्ल्डकप मध्ये अनेक रंजक आणि महत्त्वाच्या गोष्टी घडतायत. त्यातीलच एक गोष्ट 23 नोव्हेंबर 2022 ची. कतार मध्ये घडलेली.
           मॅच होती जपान आणि जर्मनीची, जपानने मॅच 2-1 ने जिंकली.  साहजिकच जपानी लोकांनी जल्लोष आणि धिंगाणा करायला हवा होता, पण झालं भलतच. मॅच संपली खेळाडू अजून मैदानावरच होते. जिंकलेले आनंदी प्रेक्षक व इतर नाराज प्रेक्षक हळूहळू आपली जागा सोडून मैदान रिकामे करू लागले होते. आपल्याबरोबर आणलेल्या  खाद्यपदार्थांच्या पिशव्या व पेयांच्या बाटल्या तिथेच टाकून काढता पाय घेत होते. त्यांचं पण बरोबर होतं, कारण स्वच्छता हे काय त्यांचं काम होतं??
           या सर्व गडबडीत जिंकलेले जपानी फॅन मात्र वेगळ्याच कामात व्यस्त होते. जिंकलेल्या जपानी फॅन्सनी या खाद्य पदार्थाच्या रिकाम्या पिशव्या व बॉटल्स गोळा करायला सुरुवात केली. अगदी कुणी न सांगता आणि कोणत्याही फोटोसाठी नव्हे.
          काही मिनिटात या जपानी लोकांनी पूर्ण स्टेडियम मागणी केली. ज्यावेळी या जपानी लोकांना त्यांच्या सत्कार्यासाठी याबद्दल विचारले त्यावेळी ते नम्रपणे उत्तरले. आम्ही पाठीमागे असा कचरा ठेवत नाही व ते कार्यमग्न राहिले.

          जपानी लोकांची ही कृती कोणत्याही प्रसिद्धीसाठी, कौतुकासाठी किंवा मोठेपणासाठी नव्हती. ती होती चांगुलपणाची, ती होती संस्काराची, ती होती शिस्तप्रियेतेची, ती होती स्वतःच्या नजरेत मोठी होण्याची, ती होती पुढच्या पिढीला समृद्ध वारसा देणारी.
         पुढच्या पिढीसाठी आपण काय ठेवून जाणार आहोत?? हा प्रश्न ज्या वेळेला आपल्याला पडेल त्यावेळी जपानी माणसांचे हे उदाहरण कायम लक्षात राहील. आपल्या कृतीतून जगाला कौतुक आणि हेवा वाटणारी संस्काराची शिदोरी ते न बोलता पटवून गेले.
धन्यवाद.!.!.!


🖋️संदिप कोळी
sandip.koli35@gmail.com

आज : Today

📝 आज.......       आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...