Saturday, 9 September 2017

सोशल मोरया

मोरया....ज्याची वर्षभर आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो आपल्या सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे एकदम थाटात जल्लोषी आगमन झाले आहे. सारा महाराष्ट्र या बुद्धीच्या आणि कलेच्या अधिपती असणाऱ्या गणपतीच्या पूजनात मग्न झाला आहे. मूर्ती ठरवणे, मग ती नेहमीप्रमाणे की इकोफ्रेंडली यांचा निर्णय, सजावट, सजावटीच्या साहित्याची खरेदी, मग सगळ्याच्यापेक्षा वेगळी व आकर्षक सजावटीसाठी वेगवेगळ्या आयडिया लढवून खूप वेळा बदल करून केलेली निराळी आरास, बाप्पाचे आगमन, त्या दिवशीची लगबग, गोंधळ, स्पेशल ड्रेस कोड, सेल्फी, बाप्पाचे स्वागत ,आरती , खीर-मोदक वगैरे वगैरे सगळे अगदी भक्तिभावाने व मंगलमय वातावरणात पार पडले असेल. या वर्षी बाप्पा हि अगदी सात दिवस आपल्या घरी मुक्कामाला आहेत. बाप्पा घरी आले की अगदी उत्साहाचे वातावरण असते. घरातले सगळे या सणाच्या निमित्ताने एकत्र जमतात त्यामुळे घरातही धमाल असते. यावर्षी घरगुती गणपतीत पर्यावरणपूरक मूर्ती व सजावट यावर जास्त भर दिलेला दिसून येतो. सण-समारंभाबरोबर सामाजिक भान जपण्यासाठीही आपण कमी नाही हे आपण सर्वांनी दाखवून दिले आहे.
             घरगुती गणपतीच्या आगमनानंतर आपल्याला वेध लागतात ते मंडळाच्या गणपतीचे. या वर्षी नवनवीन तालासह ढोल-ताशा पथक, लेझीम, झांज, हालगी यासारख्या पारंपरिक वाद्यांनी स्वागताचा मिरवणुका गाजवल्या आहेत. सार्वजनिक गणपतीच्या देखाव्यात सजीव देखावे व तयार देखाव्याबरोबर विद्युत रोषणाई ही या वर्षीचे आकर्षण आहेत. यासाठी शहराबरोबरच ग्रामीण भागातूनही बहुसंख्य भाविक शहरात येतात. काहीजण बाप्पासाठी पुण्या-मुंबई ला ही जातात.आपल्या लाडक्या बाप्पा बरोबर सेल्फी काढण्याचीही मोठी क्रेझ आहे. बाप्पा बरोबरचा प्रत्येक क्षण कॅमेराबध्द करण्यात आपण सर्वजण व्यस्त आहोत.
              घरोघरी होणाऱ्या या गणेश पूजनाबरोबर सार्वजनिक पातळीवरील गणेश उत्सवाने सामाजिक अभिसरण घडवून आणले आहे. सुमारे सव्वाशे वर्षाच्या काळात सार्वजनिक गणेश उत्सवाने समाजाला एकत्र आणून सामाजिक सलोखा राखण्याचे जेवढे काम केले आहे तेवढेच काम एकमेकांची दुःखे समजून घेण्याचेही केले आहे. जाती, धर्म व पंथाच्या भिंती पाडून सर्व समाज एकत्र आणण्याचे काम या सणाच्या निमित्ताने झाले आहे. समाजाच्या सर्व स्तरातील माणसे या निमित्ताने एकमेकांच्या सानिध्यात येतात. सार्वजनिक गणपती उत्सव सुरु झाल्यापासून झालेल्या विविध सामाजिक उपक्रमामुळे समाज घडला आहे. गणपती उत्सव म्हणजे विद्येच्या देवतेचा, विचारांचा आणि कलांचा उत्सव असायला हवा. सामाजिक क्षेत्रात भरीव सकारात्मक बदल घडायला हवेत. पण काही घटनांमुळे या उत्सवाला वेगळीच किनार लाभते. उत्सवाच्या काळात समाज व लोकांना अडचणी येऊ नये याची काळजीही घ्यायला हवी. व्यसन, वर्गणीसाठी अडवणूक, वाहतुकीला अडथळा, कर्णकर्कश आवाज यासारख्या गोष्टी टाळायला हव्यात. बुद्धीच्या या नायकाला शरण जाताना लीन व्हायला हवे. समाजाचे तेजोवर्धन होण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणाऱ्या या बाप्पाच्या उत्सवाचे पावित्र्य सर्वांनी जपले पाहिजे. तरच बाप्पा आपल्यातील अनिष्टाला दूर करून आपल्याला सर्वच क्षेत्रात निखरायला व यशस्वी व्हायला सुबुद्धी देईल.
मोरया......

No comments:

Post a Comment

आज : Today

📝 आज.......       आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...