Wednesday, 20 December 2017

गरुडभरारी.....

प्रेरणादायी पुस्तके, वक्त्यांची       भाषणे किंवा अगदी घरात आपल्या मोठ्यांच्या कडून "गरुडभरारी" या शब्दाचा उल्लेख वारंवार होतो. पण आपण माणूस आहोत या पृथ्वीवरील सर्वात प्रगत आणि सर्वात बुद्धिमान प्राणी मग आपल्याला या इतर प्राणी किंवा पक्ष्यांच्या विशेषनाची गरज काय? खर आहे ना!.. असा प्रश्न कधीतरी पडला असेलच की आपल्याला. पण आपल्या प्रश्नातच आपले उत्तर दडलेले आहे. आपण प्रगत आणि बुद्धिमान आहोत म्हणून आपण सर्वांकडून ज्ञान मिळवतो
                 गरुड पक्षी आपल्या सरासरी वयाच्या साधारण निम्मे आयुष्य जगल्यावर त्याच्या आयुष्यात देखील एक बॅड पॅच येतो. ज्या पंखांच्या जोरावर निळाशार आकाशावर अधिराज्य करत असतो. आपल्या ज्या अणकुचीदार चोच आणि नख्याने भक्ष टिपत असतो .तेच अवयव त्यांची साथ सोडू लागतात. पंख जड होऊ लागतात. चोच वाकडी होऊ लागते. नख्या बोथट होऊ लागतात. आपल्या भरारीने जंगलावर राज्य करणाऱ्या या भारदस्त पक्षाची अवस्था केविलवाणी होते. त्यांच्यावर उपासमारीची वेळ येते.
          पण हार मानेल तो गरुड कसला. त्याचं काळीजचं वेगळे... तो एकटाच डोंगरावर उंच ठिकाणी जातो. तिथल्या कठीण खडकावर चोच आपटून नको असलेला भाग काढून टाकतो. दगडावर चोच घासून अणकुचीदार करतो. मग त्या अणकुचीदार चोचीने अापली बोथट झालेली नखे उपसून टाकतो. प्रचंड वेदना सहन करून आपल्या नव्या नख्या येण्याचा मार्ग मोकळा करतो. नवीन चोचीच्या साहाय्याने तो आपली जुनी,जड पिसे ओढून काढतो. असा  बिनपंखांचा गरूड वेदना सहन करत एकटाच राहतो. काळ लोटतो हळू-हळू नवीन पंख व नख्या येऊ लागतात तोपर्यंत चोचपण अजून बळकट होते. गरुडाचा रुबाबदारपणा पुन्हा दिसू लागतो हा जीवनसंघर्ष तब्बल १५० दिवस चालतो. पण हा संघर्ष पुढचे अर्ध आयुष्य त्याचा रुबाब टिकवून ठेवण्यास पुरेसा असतो. यानंतर गरुड आपल्या जगप्रसिद्ध गरुडभरारीसाठी पुन्हा सज्ज् होतो. पुन्हा त्याच ताकदीने, आत्मविश्वासाने व शौर्याने पुढील आयुष्य जगतो.
                आपल्या जीवनातही असा बॅड पॅच येतो. एखाद्या अपयशाने आपली अवस्था केविलवाणी होते. प्रचंड निराशा आपल्या पदरी येते. सगळं असह्य होत. सगळे मार्ग बंद झालेत असे वाटते. त्यावेळी गरूड प्रमाणे आपल्या कामगिरीची वस्तुनिष्ठ मूल्यमापन आपण करायला हवे. आपले कुठे चुकले व कशामुळे अपयश आले याचा शोध घ्यायला पाहिजे. त्यानंतर गरुड ज्याप्रमाणे आपले नको असलेले भाग काढून टाकतो त्याप्रमाणे आपण आपल्या चुकीच्या सवयी बदलल्या पाहिजेत. अवगुण दूर केले पाहिजेत. आपल्यात असलेल्या गुणांचे, कौशल्यांचे आत्मपरीक्षण करायला हवे. याबरोबर गरुडाप्रमाणे आपल्या गुणांना व प्रयत्नांना पुन्हा एकदा नव्याने धार लावली पाहिजे. आपला आळस व नैराश्यामुळे आलेल्या नाकर्तेपणा झटकून नाविन्याची संजीवनी जागवायला हवी. नवीन परिवर्तनाला वेदना सहन करून हसतमुखाने सामोरे जायला हवे तरच उद्याची गरुडभरारी आपण घेऊ शकतो
         एखाद्या योद्धाचं शौर्य आणि ऋषींचे तप अंगी बाळगणाऱ्या या राज पक्षाची ही भरारी जगभर गरूडभरारी म्हणून मानाने ओळखली जाते व गरुडाचा हा जीवनसंघर्ष आपल्या आयुष्याची नवी प्रेरणा बनू शकतो.
----------------------------------------------------------
संदीप कोळी
sandip.koli35@gmail.com
sandipkoli35@blogspot.in

No comments:

Post a Comment

आज : Today

📝 आज.......       आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...