आपल्याला ना जेव्हा पाप आणि पुण्य हे दोन शब्द म्हणायला ही येत नव्हते तेव्हा पासून ह्या शब्दाचा अर्थ समजवण्याची प्रोसेस सुरु झाली होती. हे करू नको, ते केलेस तर पाप लागेल, पुण्य लागेल अशा दाखल्यासह स्पष्टीकरण दिले जात होते.
शाळेत गेल्यावर लिहायला वाचायला शिकलो आणि दुसरीला असताना "पुण्य" हे जोडाक्षर लिहायला आणि वाचायला ही शिकलो. पण त्याचा अर्थ काय बालबुद्धीला लागला नव्हता. पण कुटुंबातला व समाजातला प्रत्येक घटक विविध उदाहरणातून पाप-पुण्याचे उपदेश उतरवत होता. हळू-हळू वय वाढेल तशी अक्कल आणि व्यवहारज्ञान दोन्हीही झपाट्याने वाढले व त्यावेळी पाप-पुण्य या शब्दाचे शब्दशः अर्थ समजू लागला. चांगले काम म्हणजे- पुण्य; आणि वाईट काम म्हणजे- पाप. त्यावेळी या जड संकल्पनाचा बोध झाला म्हणून खूप आनंद झाला होता. अगदी "युरेका" टाईप फीलिंग.... त्यादिवशी ठरवले की आपण चांगलेच वागायचे म्हणजे पुण्याचं काम करायचं.... ठरलं मग.....
पण हा आंनद व फीलिंग काही काळचं राहिलं कारण या नंतर प्रश्न पडला की आपण कसं ठरवायचं कोणतं काम पुण्याचं आणि कोणतं पापाचं.... ही गोष्ट बघा...
एक साधू निर्जन ठिकाणी ध्यान, तपश्चर्या करत बसलेला असतो. आपल्या कार्यात अगदी मग्न झालेला असतो. शेजारच्या गावातील एक दूधवाला दूध देण्यासाठी त्या निर्जन वाटेने दुसऱ्या गावात जात असतो. दूधवाला सज्जन मनुष्य असतो. साधूला पाहून तो नमस्कार करून आपल्या कामाला निघून जातो. दूधवाला आपले काम संपवून घरी परतत असतो. तो साधूला पुन्हा पाहतो साधूचे ध्यान सुरुच असते. ऊन वाढत असते. साधूंना उन्हापासून होणारा त्रास कमी व्हावा म्हणून तो आपल्या कडील तूप साधूच्या डोक्यावर ओततो जेणेकरून त्यांना उन्हापासून थोडं बरं वाटावं म्हणून तो त्याला शक्य आहे ते करतो. साधूंना पुन्हा नमस्कार करतो व निघून जातो. उन्हाचा जोर वाढल्यावर साधूच्या डोक्यावरील तूप विरघळते व त्यांच्या अंगावरून खाली येते. रानांत त्या तुपाच्या वासाने मुंग्या जमा होतात व साधूच्या अंगावर चढून त्यांना चावू लागतात. साधूंना त्रास व्हायला लागतो. पण साधू ध्यान सोडत नाहीत. थोड्या वेळाने उनाडक्या करणारा एक मुलगा तिथे ऊस खात येतो. साधूला बघून त्याला खोडी करण्याची लहर येते. तो साधूच्या बाजूला बसून ऊस खातो व ऊस खाऊन राहिलेल्या चुया त्या साधूंच्या दिशेने फेकतो. ऊस संपल्यावर त्यांना दिलेल्या त्रासाच्या आनंदात घरी जातो. पण त्याचा परिणाम असा होतो की त्या उसाच्या चुयाच्या गोडीने साधूच्या अंगावरच्या मुंग्या खाली येतात व साधूंना आराम वाटतो.
मला पडलेला प्रश्न हा कि या गोष्टीत पाप कोणी केले? व पुण्य कोणी.....?
आज इतक्या वर्षांनंतरही या प्रश्नाचे ठोस उत्तर माझाकडे नाही. पाप-पुण्य मोजण्याचे एकक आणि साधन अजूनही सापडले नाही. फक्त येणाऱ्या परिस्थितीत समोरच्याला त्रास न देता किंवा कमीत-कमी त्रास होईल याकडे लक्ष देऊन त्यातून मार्ग काढला पाहिजे. ती गोष्ट करत असताना त्याविषयी मनात चांगला व सकारात्मक विचार महत्वाचा.....भगवतगीतेत सांगितल्या प्रमाणे "कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।" आपण फक्त आपल्याला दिलेले किंवा आपण निवडलेले काम प्रामाणिकपणे केले पाहिजे. बाकी ज्यादा सोच के कुछ फायदा नही.एखादी गोष्ट ही एकाच्या दृष्टीने पुण्याची तर दुसऱ्यासाठी पापाची ठरू शकते. शेवटी
"बंदा खुद की नजर में सही होना चाहिये दुनिया तो साली भगवान से भी दुःखी है।...
📝संदिप....
sandipkoli35.blogspot.in
No comments:
Post a Comment