हाय फ्रेंड्स!.... टायटल वाचून गोंधळात पडलात ना? तरुण म्हणजे 'देश की धडकन', लाथ मारेन तिथे पाणी काढणारा समूह, आकाशाला गवसणी घालणारी स्वप्ने घेऊन फिरणाऱ्या जिंदा-दिल लोकांचा गट. आपल्या कर्तृत्वाने दुनिया को झुकानेवाला बडे दिल वाले लोक, राष्ट्राच्या जडणघडणील महत्त्वाचा आधारस्तंभ, माँ की आँखो का तारा, घरातल्या लोकांचा आशेचा दिवा, गल्लीतल्या लोकांच्या नाकाचा शेंडा, कॉलेजची आण, बान आणि शान......
पण खरेच असे आहे का? दुसऱ्याकडे नको स्वतःकडे बघूया आपण आपल्या करियर बाबतीत खरंच सिरिअस आहोत काय? हा प्रश्न पडला असेल, पडत असेल किंवा येणाऱ्या काही दिवसात पडेल. पण या प्रश्नाच्या उत्तरा आधी आपण काही गोष्टींचा विचार करूया. दिवसाला मिळणारा 1.5 GB मोबाइल डेटा आपल्याला करिअरबद्दल विचार करू देत नाही. हा डेटा संपवायच्या विचारात दिवसभर व्हाट्सअप्प, फेसबुक, इन्स्टाग्राम, यु-ट्यूब अशा अनेक सोशल साईट चाळत बसतो. यात आपलेच नुकसान होत आहे. इंटरनेटच्या दुनियेत कदाचित एक आभासी जग आपल्या सभोवती निर्माण होते आपल्याला जे आवडते तेच दाखवते. यात आपण चांगलेच रमलो आहे. तरुणाईला मोबाईल हे साधन आणि पुस्तक हे जीवन आहे हे कळायला हवे.
आपल्या पुढचा दुसरा मोठा अडथळा म्हणजे "टिनेज प्रेम" सध्याचा सिनेमा व एकंदर मोकळे वातावरण यामुळे प्रत्येकजण स्वतःला परशा समजून आपल्या आर्चीच्या शोधात असतो. गाडीवरून फिरणे, खरेदी, सहवास, आकर्षण या गोष्टी ओघाने येतात. आतून वेळ व पैसा दोन्ही गोष्टी भरपूर खर्च होतात पण हे लक्षातही येत नाही. वयातील बदलाच्या आकर्षणाला प्रेम समजून करिअरची व आयुष्याची होळी करून आयुष्यभर चटके सोसणारी अनेक उदाहरणे आपण अनुभवतो.
सध्या आपली पिढी असण्यापेक्षा दिसण्यावर आणि दाखवण्यावर भर देते त्यामुळे प्रत्येक गोष्ट हटके करण्यात आपली बरीच ऊर्जा वाया जाते. नवनवीन ठिकाणी जाऊन गाडी, डोंगर, टेकड्या यावर फोटोग्राफी करण्याचा ट्रेंड सध्या जोरात आहे. हे फोटो काढून सोशल मीडियावर चांगल्या पंच-लाईन सह फिरवले जातात. लाईक कमेंट व टॅग चा पाऊस पडतो आणि भाऊ खुश होतो.
गट, ग्रुप, कट्टे, गँग हे ही आहेतच. यात ट्रिप,सिनेमा, वाढदिवसाचे सेलिब्रेशन, पार्टी, बाहेर हँग आऊट, रात्री उशिरापर्यंतच्या गप्पा हे तरुणाईच्या अंगवळणी पडले आहे. घरातून मिळणारे स्वातंत्र्य, पैसे, फिरायला गाडी या गोष्टी आता कॉमन झाले आहेत. त्याबरोबर व्यसने, जाती-धर्माची गणिते, राजकीय कट्टर समर्थक यामध्ये तरुणाईचे पाय खोल रुतले आहेत.
तुम्ही म्हणाल हे सगळे कौतुक कशासाठी? पण हे करिअरच्या प्रश्नाचे सविस्तर उत्तर. या सगळ्या विचलित करणाऱ्या गोष्टीमध्ये आपण करिअरकडे दुर्लक्ष करू लागलो आहोत. वयवर्षे 16 ते 24 म्हणजे आयुष्यातली सर्वात महत्त्वाची. लहानपणापासून रचलेल्या संस्काराच्या पायावर आयुष्याची सुंदर इमारत उभी करण्याची सुवर्णसंधी. या वयात दोन्ही पहायला मिळते. थोडा संयम ठेवला तर आयुष्य सुंदर होऊ शकते अन्यथा या वयातील चुका आयुष्यभर आपल्याला आपल्या अपयशाची जाणीव करून देत सलत राहतात. आज मध्ये जगणाऱ्या आपल्या पिढीने थोडा भविष्याचाही विचार करायला हवा. नाहीतर आज जगण्यात उद्या अंधारात जाऊ शकतो. आजचा तरुण स्मार्ट आहे व असलाच पाहिजे. स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचे कमी-जास्त प्रमाणात भान असले तरी व्यक्तिमत्व फुलवण्यासाठी करिअर हे महत्त्वाचे आहे. स्मार्टनेस व झगमगाट यातील फरक ओळखता आला पाहिजे. आज फोटोजेनिक पेक्षा 'प्रतिभावान' असेल तरच प्राधान्य मिळते हे वास्तव आहे.
गुढीपाडव्याच्या सणाच्या निमित्ताने तुमची करिअरची व यशाची गुढी उंच उभारूया. आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या प्रेरणादायी शुभेच्छा.....
----------------------------------------------------------
संदीप कोळी