Wednesday, 21 March 2018

सापडलेल्या पाकिटाची गोष्ट

#सापडलेल्या_पाकिटाची_गोष्ट

             सुट्टीचा दिवस होता. आता नोकरदारांच्या घरात सुट्टीचा दिवस म्हणजे पर्वणीच.. दुपारपर्यंत घरातले वातावरण सामसुमच. मग मी च विचार केला कदाचित ही वादळापूर्वीची शांतता असावी म्हणून पुढचा प्रसंग ओढवण्याच्याआधीच घोषित केले की चला "पन्हाळ्याला" जाऊ. घरातली शांतता संपून वातावरण निवळले. जाण्याची तयारी सुरू झाली. मी ही तह जिंकल्यासारखा निश्चिंत झालो.  तयारी आटपून परिवारसह पन्हाळा गडाचा दिशेने कूच केले. चार-साडेचारची वेळ असेल आमची मोहीम गडाच्या दिशेने वेगाने सुरू होती. अजून उन्हाचा जोर असल्याने वाहनांची संख्या रस्त्यावर तुरळकच.हालोंडी ते हेरले दरम्यान रस्तात पाकीट पडले होते. गाडी चालवता आजूबाजूला नजर ठेवायच्या आमच्या चांगल्या म्हणा किंवा वाईट सवयीमुळे रस्त्यात पडलेले पाकीट दिसले. कुतुहलापोटी ते उचलून घेतले मागेपुढे नजर फिरवली तर कुणी त्याचे शोधत आहे किंवा कोणाचे पडले आहे याचा अंदाज नव्हता. आता ते पाकीट  रस्त्यात टाकणेही बरोबर नाही म्हणून सोबत घेऊन पुन्हा आम्ही मार्गस्थ झालो. कोल्हापूर सोडले मात्र पाकिटाचा विचार डोक्यात चालूच होता. या विचारात पन्हाळगडावर पोहचलो. 
               आमच्या घरच्यांना त्या विषयात फारसा रस व उत्सुकता ही नव्हती.  पण माझी सद्सद्विवेकबुद्धी मला थांबू देत नव्हती. दुसऱ्याची वस्तू उघडून पाहणे हा बॅड मॅनर्स आहे पण ते पाकीट उघडल्याशिवाय त्याच्या मालकाचा पत्ता लागणार नव्हता. घरचे मिळालेल्या क्षणाचा आनंद घेण्यात दंग होते. मी मात्र ते पाकीट द्यायच्या विचार डोक्यात घेऊन फिरत होतो. शेवटी शेवटचा सेवेत स्टॉप म्हणून 'तबक उद्यान' गाठले. तिथे गेल्यावर मात्र आपले शिष्टाचार आणि सभ्याचारपद्धती काढून बाजूला ठेवले आणि ते पाकिट उघडले. पाकिटाचा आकार बघून सगळा पसारा त्यातच ठेवलाय ठेवलाय इतके ते भरलेले होते. उघडल्यावर वाटने खरं ठरले. अलिबाबाची गुहा उघडावी तसे ते पाकीट. पॅन कार्ड, आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, HDFC बँकेची ३ ATM कार्ड( घरातल्याची पण यांच्याकडेच), SBI बँकेचे ATM, २०-३० व्हिजिटिंग कार्ड, काही चिट्ट्या, आयडेंटि फोटो, छोटी डायरी, पैसे, कॉलेजची फी भरलेली पावती इत्यादी मुद्दे माल  ठासून भरलेला होता. एकूणच भावाचे सगळे बिऱ्हाड पाकिटात होते.या सगळ्या साहित्यावरून पाकीट मालकाचे नाव व गाव  समजले होते पण त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी फोन नंबर हवा म्हणून मी त्यातली डायरी काढली. डायरी पण अजीब होती त्यात स्वतःची काहीच माहिती  लिहिली नव्हती शिवाय एकदम मोडकळीस आलेले मी पाने पलटून नंबर शोधू लागलो पण त्या नावाचा किंवा त्यांच्याशी संबंध असणारा कोणताही नंबर सापडेना शेवटी सुरुवातीपासून नंबर लावायला सुरुवात केली.सध्या पोहचू शकत नाही, बंद आहे, रॉंग नंबर असे उत्तर मिळाल्यावर मी फोन आणि आशा  दोन्ही बाजूला ठेवले व घरच्यांचा रोष यायच्याआधी त्यांच्यात सामील झालो.
           पन्हाळा गड स्वारी यशस्वी झाली. पण ते पाकीट पोचवायचे कसे हा प्रश्न निरुत्तरित होता. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या डायरीतील काही नंबर ला फोन केले पण काही फायदा झाला नाही. माझ्याकडे नाव व पत्ता होता म्हणून शेवटचा पर्याय म्हणून पोस्टकार्ड पाठवायचा भन्नाट पर्याय सुचला. पोस्टकार्ड आणले पण त्या आधी आणखी एक प्रयत्न करावा  म्हणून पाकीट पुन्हा मोकळे केले. त्यातला प्रत्येक कागद, कार्ड बघितले त्या पसाऱ्यात एक घडी घातलेला कागद सापडला त्यावर बरेच नंबर होते पुन्हा फोन लावले  पहिल्या ६-७ नंबरला काल सारखे रिप्लाय येत होते. त्यानंतर मात्र एक फोन लागला त्याने नाव सांगितल्यावर ओळख पटली. मला हायसे वाटले पण तो म्हणाला या नावाचे चार मित्र आहेत गावात. मग वडिलांचे व कॉलेज चे नाव सांगितल्यावर त्याच्या लक्षात आले. त्याने निरोप पोहचवला ४-५ मिनिटांतच पाकीट मालकाचा फोन आला. कोठे, कधी, कसे सापडले या प्रश्नातून बाहेर पडल्यावर मी विचारले पाकीट घ्यायला येतोस ना? त्यावर वाघाचे उत्तर ऐकून माझ्या डोक्यात जाळ झाला. म्हणाला "आज राहु दे उद्या येतो की मी"  भावनांवर ताबा ठेवत मी शांतपणे म्हणालो अर्ध्यातासात इचलकरंजीत ये व  पाकिट घेऊन जा. नाही-होय करत तासाभरात येतो म्हणाला. मी ठिकाण सांगून फोन ठेवला पण माझ्या डोक्यात विचाराची मारा-मारी सुरु होती. च्यामारी पाकिटाची गरज कोणाला?  कालपासून पाकीट मला सापडून मी अस्वस्थ आहे आणि हा फाकड्या निवांतच. मग मीच मनाची समजूत घालून "छोड यार" म्हणून ठरलेल्या ठिकाणी पोहचलो. सांगितलेल्या वेळेपेक्षा ५-१० मिनिट झाले तरी त्याचा पत्ता नाही म्हणून पुन्हा फोन केला. तर पठ्ठ्या येतोच, आलोच म्हणत २०-२५ मिनिटे घालवली. इकडे माझा पारा चढत होता व मी उलटे अंक मोजून तो खाली आणत होतो. मनात आपल्या चांगले काम करायची हौस होती ना मग धीर धर याबद्दल द्वंद्व चालू  होते. शेवटी बिचारा आला. सॉरी म्हणाला. मी पाकीट काढले आणि त्याच्या हातात दिली सगळे साहित्य आहे का बघ म्हणून सांगितले. त्यांने ही पाकीट शोधण्यासाठी केलेले प्रयत्न सांगितले. एवढी कागदपत्रे कशाला ठेवायची पाकिटात म्हणून मी फुकटचा सल्लाही दिला त्याला तो पटला की नाही कुणास ठाऊक.मी निघतोय  म्हटल्यावर त्याने प्रश्न केला तुम्हाला हे द्यायचे काय? या प्रश्नावर मी काय म्हणावे हे मला समजले नाही मी त्याकडे बघून हसून गाडीला किक मारली आणि  वाटेला लागलो.
           मनात प्रचंड समाधान पसरले होते. एखाद्याची महत्त्वाची वस्तू पोचल्याचा तो आनंद होता. तो कसा वागला याचे काहीच वाटत नव्हते कारण "नेकी कर  और दरिया मी डाल" हे शिकलो आहे. शेवटी एकच फीलिंग होते " कुछ अच्छा करके देखो, बढीया लगता है।"

📝संदीप......

1 comment:

आज : Today

📝 आज.......       आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...