Sunday, 15 April 2018

सुवर्णकन्यांची गोल्डन कामगिरी


    
"कौन कहता है, रोशनी के लिये घर घर मे चिराग ही हो, ये जमाने वालो बेटिया भी घर को रोशन करती है।" या ओळी म्हणजे भारताचे राष्ट्रकुल स्पर्धेतील कामगिरीचे वर्णन आहे. ऑस्ट्रेलियातील 'गोल्ड कोस्ट' येथे ४ एप्रिल २०१८ पासून सुरू झालेल्या राष्ट्रकुल अर्थात कॉमन-वेल्थ गेम्समध्ये भारताने पदकांची लूट केली आहे. पदकांना घातलेल्या गवसणीमध्ये भारतीय महिला खेळाडूंचा सिंहाचा वाटा आहे. ७१ देश ६ हजार खेळाडूंचा समावेश असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने आपला दमदार खेळ दाखवला आहे. भारतातर्फे या स्पर्धेमध्ये २२५ खेळाडू वेगवेगळ्या क्रीडाप्रकारात सामील झाले आहेत. दर चार वर्षांनी होणाऱ्या या कॉमनवेल्थ गेम्समध्ये ऑलम्पिक व आशियाई क्रीडा स्पर्धांचा विचार करता भारताची कामगिरी चांगली राहिली आहे. आणि याचे पूर्ण श्रेय आपल्या महिला ब्रिगेडला आहे.
            'भारतीय नारी सारी दुनिया पे भारी' म्हणत आपल्या गर्ल्स स्क्वाडने पदके खेचून आणली आहेत. नेमबाजी,  वेटलिफ्टिंग, बॉक्सिंग, टेबल टेनिस, कुस्ती, बॅडमिंटन, नेमबाजी, टेनिस, ॲथलेटिक्स यासारख्या क्रीडा प्रकारांमध्ये पोरींनी आपल्या गुणवत्तेचे नाणे खणखणीत वाजवलं आहे. नेमबाजीमध्ये तेजस्विनी सावंत, श्रेयसी सिंह, हिना सिंधू, अंजुम मुदील, मनु भाकर यांनी भारताला पदके मिळवून दिली. 'मनु भाकर' तर १६ वर्षाची आहे. ज्या वयात पोरांना कोणते करिअर निवडायचे  हे कळत नाही त्या वयात 'मनूने' देश का नाम बडा किया है। वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानू, संचिता चानू , पूनम यादव यांनी आपली ताकद दाखवली आहे. बॉक्सिंगची क्वीन सुपर मॉम मेरी कोम, कुस्तीच्या राण्या साक्षी मलिक, बबिता कुमारी फोगट, विनेश फोगट यांनी प्रतिस्पर्ध्यांना चितपट करत बाजी मारली आहे. मनिका बत्रा आणि मौम दास यांनी टेबल टेनिसमध्ये देशाचे नाव उंचावले आहे. सायना नेहवाल व पी व्ही सिंधू या भारताच्या बॅडमिंटन फुलराण्यांनी पदकाचा हिट शॉट मारला आहे. तर सीमा पुनिया, नवजीत कौर ढिल्लन यांनी ॲथलेटिक्समध्ये चमक दाखवली आहे. एकंदर या स्पर्धेमध्ये महिला  ब्रिगेडने 'हम किसी से कम नही' म्हणत जबरदस्त कामगिरी केली आहे. पदक विजेत्या या सर्व महिला खेळाडूंची पार्श्वभूमी पाहिली तर अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यांनी ही कामगिरी नोंदवली आहे. साहित्याचा अभाव, वैद्यकीय मदतीची कमतरता, दुखापती अशा अनंत अडचणींवर मात करत यांनी सुवर्णवेध साधला आहे.
        आपल्या देशात सध्या सर्वच क्षेत्रात महिलांची कामगिरी दमदार आहे. शालेय गुणवत्ता यादी, विद्यापीठाच्या परीक्षा असो वा स्पर्धा परीक्षा यामध्ये मुलीच आघाडीवर आहेत. याबरोबर खेळातही मुलींनी आपली गुणवत्ता व वर्चस्व सिद्ध केले आहे. त्यामुळे भाज्यां आणण्यापासून ते पदक मिळवून देऊन देशाची मान अभिमानाने उंचावण्यापर्यंत सर्व कामे महिलांना करावी लागत आहेत.
           पुरुषप्रधान असलेल्या आपल्या देशात महिला खेळाडूंची ही कामगिरी मुलींना कमी समजणाऱ्या सर्वांसाठी मोठी चपराक आहे. त्यामुळे आता हे समजून घेतले पाहिजे की "लडकीयो को मत समझो भार
यही है  देश का आधार।"
राष्ट्रकुल स्पर्धा २०१८ मध्ये पदक विजेत्या सर्व खेळाडूंचे खूप खूप अभिनंदन! राष्ट्राला व आम्हाला तुमचा अभिमान आहे.

-----------------------------------------------------------
संदीप कोळी
sandip.koli35@gmail.com

Monday, 2 April 2018

माईम थ्रू टाईम' ची धमाल

नमस्ते दोस्तहो,..... सध्या ना आपल्याकडे काय आणि कधी फेमस होईल  हे सांगता येत नाही आता हेच बघा ना, ओ हसिना जुल्फो वाली..... आय एम अ डिस्को डान्सर.....चुरा के दिल मेरा गोरिया चली.....  पापा कहते है बडा नाम करेगा...... मला काय म्हणायचे आहे ते बर्‍याच जणांच्या लक्षात आले असेल आणि अजून लक्षात आले नसेल तर मी 'माईम थ्रू टाईम' संकल्पनेबद्दल बोलतोय, एस 'माईम थ्रू टाईम'.....
           पूर्वी आपल्याकडे खेळाचे वेड होते मग टीव्ही आला व खेळ कमी झाले. सगळे टीव्हीसमोर गालाला हात लावून बसू लागले नंतर मोबाईल आला आणि गालावर हात मोबाईलच्या स्क्रीनवर फिरू लागला. आता आपण तासनतास मोबाईलच्या संपर्कात असतो. त्यामुळे 'कधी वाटते की नेट फ्री आहे का आपण'. असो सध्या सोशल मीडिया हा आपल्या मनोरंजनाचा एक अविभाज्य भाग आहे. त्यात मनोरंजन म्हंटले की युट्युब सर्वात वर येते. वेगवेगळे व्हिडिओ, वेब सिरीज, ट्रेलर, गाणी यांच्या माध्यमातून आपण बराच वेळा तिकडे असतो. यात मराठीपणा थोडा कमी आहे. पण सध्या ती कसर भरून काढली जात आहे आणि ही भर म्हणजे  'माईम थ्रू टाईम' मराठीतला पहिला भन्नाट प्रयोग १७ लुक्स, १५ जबरदस्त गाणी, ५१  कॉस्ट्यूम्स आणि पाच मिनिटाचा व्हिडिओ.
            'माईम थ्रू टाईम' ही संकल्पना तशी जुनीच पण मराठीत हा प्रयोग पहिल्यांदाच होतोय. आधी इंग्रजी, हिंदी, पंजाबी, मल्याळी, तेलगू अशा अनेक भाषांमधून या प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. व ते प्रचंड लोकप्रियही झाले आहेत. मराठीत हा प्रयोग 'मुखवटे ए.सी.जे.एन' या  यूट्यूब चैनल आपल्यासाठी शेअर केला आहे. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर शेअर केलेला हा विडिओ आत्तापर्यंत जवळपास दोन लाख लोकांनी पाहिला आहे. पाच मिनिटाच्या या व्हिडिओ मध्ये १५ गाण्यांचा काही भाग घेण्यात आला आहे. यामध्ये मराठीतील अभिनेत्री नम्रता गायकवाड, स्नेहा चव्हाण, चारू देसले यांनी काम केले आहे. व्हिडिओत या१७ वेगवेगळ्या लुक्स मधे दिसतात. हे सगळे शूटिंग फक्त कार मध्ये करण्यात आली आहे ही याची खासियत.
           'माईम थ्रू टाइम'कार व्हिडिओमध्ये ऐरणीच्या देवा... आश्विनी येणा... दिसला ग बाई दिसला... ऐका दाजीबा.... आता वाजले की बारा.... ही दोस्ती तुटायची नाय.... कोंबडी पळाली... डोळ्यात काजळ... नवीन पोपट हा... हृदयी वसंत फुलताना... मै जिंदगी का साथ... मस्तीची पिचकारी... जय जय महाराष्ट्र पासून ते अलीकडच्या अगदी तुझ्या रूपाच पडले चांदणं.. झिंगाट पर्यंत प्रत्येक जनरेशनमध्ये गाजलेली व प्रत्येक जनरेशनला आवडणाऱ्या गाण्यांचा एकत्रित तडका या व्हिडिओ मधून आपल्याला बघायला मिळतोय.
          विडिओ हटके असल्यामुळे सध्या तो प्रचंड व्हायरल होत आहे. विशेषतः तरुणांमध्ये याची प्रचंड क्रेझ आहे. फेसबुक, व्हाट्सअप्प यावरही हा व्हिडिओ सध्या फिरत आहे. सोशल मीडिया, युट्युब वर सतत नवीन ट्रेण्डिंग शोधणाऱ्यांनी तो आधीच चेक आऊट केला असेल. तुम्ही ही अजून बघितला नसेल तर मराठीतला हा एक वेगळा आणि भन्नाट प्रयोग बघायला हरकत नाही. हा प्रयोग बघितल्यावर तो तुम्हाला नक्की आवडेल. मराठीतल्या कलाकारांचा हा प्रयत्न नक्कीच वेगळा आणि कौतुकास्पद आहे.
-----------------------------------------------------------
संदीप कोळी
sandip.koli35@gmail.com

आज : Today

📝 आज.......       आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...