"कौन कहता है, रोशनी के लिये घर घर मे चिराग ही हो, ये जमाने वालो बेटिया भी घर को रोशन करती है।" या ओळी म्हणजे भारताचे राष्ट्रकुल स्पर्धेतील कामगिरीचे वर्णन आहे. ऑस्ट्रेलियातील 'गोल्ड कोस्ट' येथे ४ एप्रिल २०१८ पासून सुरू झालेल्या राष्ट्रकुल अर्थात कॉमन-वेल्थ गेम्समध्ये भारताने पदकांची लूट केली आहे. पदकांना घातलेल्या गवसणीमध्ये भारतीय महिला खेळाडूंचा सिंहाचा वाटा आहे. ७१ देश ६ हजार खेळाडूंचा समावेश असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने आपला दमदार खेळ दाखवला आहे. भारतातर्फे या स्पर्धेमध्ये २२५ खेळाडू वेगवेगळ्या क्रीडाप्रकारात सामील झाले आहेत. दर चार वर्षांनी होणाऱ्या या कॉमनवेल्थ गेम्समध्ये ऑलम्पिक व आशियाई क्रीडा स्पर्धांचा विचार करता भारताची कामगिरी चांगली राहिली आहे. आणि याचे पूर्ण श्रेय आपल्या महिला ब्रिगेडला आहे.
'भारतीय नारी सारी दुनिया पे भारी' म्हणत आपल्या गर्ल्स स्क्वाडने पदके खेचून आणली आहेत. नेमबाजी, वेटलिफ्टिंग, बॉक्सिंग, टेबल टेनिस, कुस्ती, बॅडमिंटन, नेमबाजी, टेनिस, ॲथलेटिक्स यासारख्या क्रीडा प्रकारांमध्ये पोरींनी आपल्या गुणवत्तेचे नाणे खणखणीत वाजवलं आहे. नेमबाजीमध्ये तेजस्विनी सावंत, श्रेयसी सिंह, हिना सिंधू, अंजुम मुदील, मनु भाकर यांनी भारताला पदके मिळवून दिली. 'मनु भाकर' तर १६ वर्षाची आहे. ज्या वयात पोरांना कोणते करिअर निवडायचे हे कळत नाही त्या वयात 'मनूने' देश का नाम बडा किया है। वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानू, संचिता चानू , पूनम यादव यांनी आपली ताकद दाखवली आहे. बॉक्सिंगची क्वीन सुपर मॉम मेरी कोम, कुस्तीच्या राण्या साक्षी मलिक, बबिता कुमारी फोगट, विनेश फोगट यांनी प्रतिस्पर्ध्यांना चितपट करत बाजी मारली आहे. मनिका बत्रा आणि मौम दास यांनी टेबल टेनिसमध्ये देशाचे नाव उंचावले आहे. सायना नेहवाल व पी व्ही सिंधू या भारताच्या बॅडमिंटन फुलराण्यांनी पदकाचा हिट शॉट मारला आहे. तर सीमा पुनिया, नवजीत कौर ढिल्लन यांनी ॲथलेटिक्समध्ये चमक दाखवली आहे. एकंदर या स्पर्धेमध्ये महिला ब्रिगेडने 'हम किसी से कम नही' म्हणत जबरदस्त कामगिरी केली आहे. पदक विजेत्या या सर्व महिला खेळाडूंची पार्श्वभूमी पाहिली तर अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यांनी ही कामगिरी नोंदवली आहे. साहित्याचा अभाव, वैद्यकीय मदतीची कमतरता, दुखापती अशा अनंत अडचणींवर मात करत यांनी सुवर्णवेध साधला आहे.
आपल्या देशात सध्या सर्वच क्षेत्रात महिलांची कामगिरी दमदार आहे. शालेय गुणवत्ता यादी, विद्यापीठाच्या परीक्षा असो वा स्पर्धा परीक्षा यामध्ये मुलीच आघाडीवर आहेत. याबरोबर खेळातही मुलींनी आपली गुणवत्ता व वर्चस्व सिद्ध केले आहे. त्यामुळे भाज्यां आणण्यापासून ते पदक मिळवून देऊन देशाची मान अभिमानाने उंचावण्यापर्यंत सर्व कामे महिलांना करावी लागत आहेत.
पुरुषप्रधान असलेल्या आपल्या देशात महिला खेळाडूंची ही कामगिरी मुलींना कमी समजणाऱ्या सर्वांसाठी मोठी चपराक आहे. त्यामुळे आता हे समजून घेतले पाहिजे की "लडकीयो को मत समझो भार
यही है देश का आधार।"
राष्ट्रकुल स्पर्धा २०१८ मध्ये पदक विजेत्या सर्व खेळाडूंचे खूप खूप अभिनंदन! राष्ट्राला व आम्हाला तुमचा अभिमान आहे.
-----------------------------------------------------------
संदीप कोळी
sandip.koli35@gmail.com
No comments:
Post a Comment