Monday, 21 May 2018

पत्र

प्रिय पत्र......   
       एक पत्र अलीकडच्या काही वर्षांत न लिहलेल्या किंवा कमी लिहल्या  जाणाऱ्या पत्रासाठी. खरंतर मी किंवा माझ्या सारखे अनेक जण खूप भाग्यवान आहेत असे मी समजतो कारण आम्हाला तुझा सहवास लाभला. तुझ्या रूपाने वाहणारा मायेचा, भावनेचा, आपुलकीचा व प्रेमाचा झरा मी व माझ्यासारख्या कित्येक जणांनी याची देही याची डोळा अनुभवला.....
            प्राचीन काळापासून इतिहासाच्या प्रत्येक पानावर तुझी नोंद आहे. जेव्हापासून मानवाने आपल्या भावना व्यक्त करायला सुरुवात केली होती तेव्हापासून तुझा नि माणसांचा संबंध आला आहे. पण कदाचित त्यावेळी तुझे बारसे घालून तुला 'नाव' देण्यात आले नसावे. त्या काळात गरजेनुसार  तुझ्या नावात, प्रकारात फरक होता. काळ बदलत गेला. पिढ्या बदलल्या मानवाच्या भावनांचे स्वरूप बदलत केले व त्यांच्या कक्षा रुंदावत गेल्या. अशावेळी तुझी सोबत होतीच. संदेश देवाण-घेवाणीचा तू अविभाज्य भाग होतास. तुला पत्र हे अधिकृत नाव कधी मिळाले हे मला निश्चित माहित नाही पण हे मात्र नक्की कि नावापेक्षा तुझे  काम काळाच्या प्रत्येक पिढ्यात वरचढ होते व आहे. प्राचीन काळापासून ते अगदी इंग्रज भारतात येऊन स्थिरस्थावर होईपर्यंत तुझे स्वरूप अनौपचारिक होते. कधी दूतामार्फत, कधी कबुतर मार्फत, कधी घोडेस्वार, कधी सांडणीस्वार, तर कधी इतर पक्षामार्फत या व अशा अनेक प्रकारांनी तुझे काम चालू होते. पण गोरे साहेब आले, त्यांनी पाहिलं आणि त्यांनी आपले हातपाय पसरले. 1857 मध्ये त्यांच्या फायद्यासाठी म्हणा किंवा आपल्या सोयीसाठी म्हणा  अधिकृत 'पोस्टाची' रचना झाली व तुझा अनौपचारिक प्रवास  व नाव अधिकृतपणे सुरू झाले. भारतात टपाल सेवा सुरू झाली आणि तू बाळसं धरायला सुरुवात झाली. गरिबांपासून-श्रीमंतांपर्यंत, लहानापासून-मोठय़ापर्यंत, सुशिक्षितपासून -अडाणीलोकांपर्यंत सर्वांना तुझी ओढ व कुतूहल वाटू लागले. आपल्या भावना जिवंतपणे समोरच्या आपल्या व्यक्तींपर्यंत पोचवणारा तू साक्षीदार होतास. जस-जशे तुझे महत्त्व व गरज लोकांच्या लक्षात यायला लागली तसे लोक तुझ्या अधिकच प्रेमात पडू लागले. प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा तू विषय  झालास. आपल्या भावना, मत प्रत्यक्ष न जाता तुझा तर्फे पोहोचवण्यासाठी प्रत्येक जण पत्र लिहू लागला.
            शिक्षण, नोकरीनिमित्त बाहेर गावी व विदेशी असणाऱ्यांसाठी तू शब्दरुपी मायेची उब निर्माण करून दिलीस.व सीमेवर देशासाठी आपल्या रक्ताचे पाणी करणाऱ्या जवानांना तुझ्या येण्याने दहा हत्तीचे बळ येत होते. तू घेऊन आलेला संदेश वाचताना घरच्या आपल्या माणसाच्या आठवणीने त्यांच्या डोळ्यात पाणी तरळल्याशिवाय राहत नव्हते. सासुरवाशीण मुलीला आपल्या माहेरच्या माणसांची लागलेली ओढ तुझा रूपाने पूर्ण व्हायची. तू घेऊन आलेला प्रत्येक शब्द तिला आपल्या माणसांची आठवण करून द्यायचा. एखाद्या गुरुचा तुझा रुपाने आलेला संदेश शिष्याला व विद्यार्थ्याला नवसंजीवनी देऊन जायचा. एखाद्या विद्यार्थ्याने गुरूला पाठवलेल्या शब्दांमध्ये गुरुदक्षिणा घेऊन तू  यायचास.  आई, वडील, मुलगा मुलगी,  मामा-भाचे, भाऊ-बहीण, मावशी,काका  अशा प्रत्येक नात्याची वीण घट्ट बांधण्याचे काम तू शब्दरूपाने केलेस. तुझ्या बरोबर आलेल्या त्या 100-200 शब्दांमध्ये सर्व भावना, माया, प्रेम, आपुलकी, संस्कार, आत्मियता असे नाना रस तू घेऊन येत होतास.
           दररोज येणारे पोस्टमन काका कधी येतात आणि आपल्यासाठी पत्र घेऊन येतात याची वाट पाहण्यात बराच वेळ जात होता. पण आपले पत्र आहे हे समजल्यावर  होणारा आनंद, ते पत्र कोणाचे, त्यातील व्यक्ती व मजकुर वाचण्याचा आनंद शब्दात व्यक्त  करण्यासारखा नव्हता. तो फक्त अनुभवण्याचा भाग होता.
         मी स्वतः पत्र दिले ते इयत्ता दुसरीच्या वर्गात असताना. आमच्या गुरुजींनी तुझ्या पिवळ्या रंगाच्या कार्डावर पत्र लिहायला शिकवले. त्यानंतर ही आवड  कायमच राहिली अगदी आठवी-नववीपर्यंत म्हणजे 2000- 2001 पर्यंत मी नियमित पत्र लिहित होतो . त्यानंतर मात्र आधुनिक साधनांचा जमाना आला. पत्र ते फोन या संक्रमणाच्या काळाचे आम्ही साक्षीदार आहोत पण येणाऱ्या पिढीचे किंवा आत्ताच्या पिढीचे काय? कदाचित हा तुझा भावनिक अनुभव आम्ही किंवा आपण शब्दात नाही मांडू शकणार.
           घरात नवीन गोष्ट आल्यावर पहिल्या गोष्टीकडे दुर्लक्ष होते ना अगदी तसंच तुझ्या बाबतीत झाला आणि हे दुर्लक्ष इतके वाढत गेले की कालांतराने तू कालबाह्य व्हायची वेळ आली.
         आताच्या पिढीची सुरुवातच मोबाइलसारख्या प्रभावी साधनाने झाली आहे. पण त्याला तुझी सर येणार नाही. पूर्वी तू येत होतास आपुलकी, प्रेम, जिव्हाळा घेऊन. पण आता फोन  येतो काम घेऊन. तू सुरुवात करत होतास आपुलकीच्या चौकशीने, आशीर्वादाने आता फोनची सुरुवात होते कुठे आहे? या प्रश्नाने. तंत्रज्ञानाने फक्त आम्हाला जवळ आणला आहे पण आपलेपणा, प्रेम आम्ही तुझ्याजवळच विसरून आलोय आणि आता तो परत आणणेही कठीण झाले आहे.
        तू आलास की तुला पाठवणारा माणूस समोर आहे असे वाटायचे पण ती सर आता फोनवर येत नाही. कदाचित या किंवा येणाऱ्या पिढीला हे पटणार नाही. व्हिडिओ कॉल च्या जमान्यात तुझा विषय हा चेष्टेचा भाग वाटेल पण मी तुझे आणि स्मार्टफोन या दोन्ही साधनाचे प्रतिनिधित्व केले आहे. दोन्हींचा  अनुभव घेतला आहे. कदाचित तुझ्याबद्दल हे मत मी माझ्या मुलाला किंवा या पिढीला पटवून देऊ शकणार नाही. ते स्पष्टही करून सांगू शकणार नाही कारण त्यांनी नाण्याची एकच बाजू बघितलेली आहे.
         असो पण तुझ्याबद्दलचा माझा भावनिक जिव्हाळा कायम राहील म्हणून तुझ्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे हे तुला लिहलेले पत्र....फक्त तुझ्यासाठी.... की ज्यामुळे मी लिहायला शिकलो...

संदीप....

Wednesday, 16 May 2018

चेहरा / face

"रोज सुबह उठता हूँ,
        खुद के असली चेहरे के साथ
मगर शाम होते होते हररोज
        दो-चार चेहरे बदल लेता हूँ।"

               आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याची हीच स्टोरी आहे. कमी-जास्त प्रमाणात आपण ही हेच आयुष्य जगतो. कधी स्वतःसाठी, कधी समोरच्यासाठी, कधी तिसऱ्याच कोणासाठी, तर कधी माहित नसलेल्यासाठीही. असे प्रत्येकासाठी आपण वेगवेगळे चेहरे घेऊन वावरत असतो व जगत असतो हे कधी आपण आपल्या इच्छेने करतो तर कधी आपल्या इच्छेविरुद्ध.....
              लहान असताना आपण आपल्या चेहऱ्याशी व वागण्यात प्रामाणिक होतो पण जस-जसे वय वाढत जाईल तसे आपण नवीन चेहरे घेऊन जगायला शिकलो. त्यामुळे आपल्या मनात एक, डोक्यात दुसरे व चेहऱ्यावर तिसरेच हावभाव असतात. समोरच्याला खुश ठेवण्यासाठी व त्याला आवडेल तसे वागण्याच्या प्रयत्नात आपण आपल्या मूळच्या स्वभावाचा गळा दाबलेला असतो. मग फक्त समोरच्याला बरे वाटावे म्हणून आपण मनात नसतानाही मुखवटे घेऊन वावरतो. या वागण्यात आपण आपल्या खऱ्या चेहऱ्याला कधी सर्वांसमोर आणतच नाही. बरं समोरची व्यक्तीही आपण त्याला बरे वाटावे असे वागतो तोपर्यंत आपल्याबद्दल चांगले मत करते. आपण एकदा जरी त्याच्या अपेक्षेपेक्षा विरुद्ध वागलो की आपण त्याच्या दृष्टीने स्वार्थी ठरतो. तसेही आयुष्यात आपण आपल्या संपर्कात असणाऱ्या सर्वांच्या अपेक्षा कधीच पूर्ण करू शकणार नाही. मग आपण हा खोटा अट्टाहास कशासाठी करतोय. आपण कितीही चेहरे घेऊन वावरलो तरी 'कही खुशी आणि काही नाराजी' राहणारच. मग आपल्या स्व ला मारून जगासाठी हे बेगडी चेहरे का वापरायचेत्यापेक्षा कमी लोक खुश राहिले तरी चालतील पण आपला स्वतःचा मूळचा चेहरा वापरायला काय हरकत आहे.
              ज्यावेळी आपण आपल्या आयुष्यात मागे वळून पाहतो त्यावेळी आपण वापरलेल्या चेहऱ्यामुळे आपण सर्वांना तर आनंदी ठेवूच शकलो नाही पण आपण स्वतःचा ही आनंद गमावून बसलो आहे
           आपल्या प्रत्येकाच्या आत आपले ओरिजनल वर्जन असते. विनाकारण आपण ते अपडेट करण्याच्या नादात  आपली ओरीजण्यालिटी गमावतो. त्यामूळे समोरचा खुश होईल पण आपण आपल्या आनंदावर मात्र विरजन घालतो. म्हणून 'दुनिया को मारो गोली' आपल्याला वाटते ते जगूया व आपल्या 'स्व' ला जपुया.

संदीप कोळी.....
9730410154
sandip.koli35@gmail.com


Sunday, 13 May 2018

मॉकटेलस्

हाय फ्रेंड्स, व्हाट्स अप... सगळे ओके आहे ना?  हा उन्हाळा जरा जास्तच तापला आहे म्हणून विचारले. बाकी परीक्षा, सुट्टीतील नियोजन, ट्रिप, समर कॅम्प आणि बरचं काही सुरू असेल किंवा सुरू होईल. पण उकाड्याने आणि घामाच्या धारांनी जिवाची घालमेल करून टाकली आहे. घरचे तर त्यावर अत्याचार करत आहेत. सकाळी झोपेतून उठविण्यासाठी आता हाक मारत नाहीत डायरेक्ट पंखाच बंद करतात राव, मग काय झोप त्याच क्षणाला उडून जाते.
        या वर्षी उन्हाळा जास्तच आहे असे दरवर्षी वाटते आणि ते खरे ही आहे तापमापीचा पारा यंदा 43 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आला आहे. अशा तपती गर्मीत शरीराला कूल ठेवण्यासाठी  आपण वेगवेगळे फंडे आजमावत असतो. यावर्षीही त्यात कमी नसणार हे नक्की. पोहायला जाणे, आईस्क्रीम, ज्यूस, सरबत, कोकम, ताक, लस्सी, कलिंगड, कैरीचे पन्हे यासारखे नेहमीचे उपाय आपण सुरु केले असतील. यातून शरीराला व मनाला थोडा गारवा नक्कीच मिळतो.
      गेल्या आठवड्यात उन्हापासून बचाव म्हणून झाडाच्या सावलीत गॅंग च्या गप्पा सुरु होत्या तोपर्यंत 'परश्या' उन्हातून धापा टाकत आला. " काय यार लईच उन्ह आहे या वर्षी". त्यावर "तर-तर जस काय गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यात स्विझरलँडलाच होतास." म्हणत 'सच्यानं' गुगली टाकली. परश्याला उन्हा बरोबर अपमानाचा मोठा तडाखा बसला. यावर परिस्थिती निवळण्यासाठी राहुल्या सर्वाना थंड देण्यासाठी घेऊन गेला. नवीन ठिकाणी  थंड पेय मॉकटेलस्...
       मॉकटेलस्,! ट्राय केलाय ना हा प्रकार. नक्कीच केला असेल. काही वेगळे नाही पण नाविण्य आहे. ८० च्या दशकात कॉकटेल नावाचा प्रकार फार प्रसिद्ध होता त्याचंच नवीन व्हर्जन म्हणजे मॉकटेलस्. वेगवेगळ्या चवीचे, वेगवेगळ्या फळांचे ज्यूस, सिरप, क्रीम यांचा एकत्रित प्रकार आपण यात अनुभवतो.ज्या प्रमाणे आपण इतर सॉफ्ट ड्रिंक्स चा आस्वाद घेतो त्यातीलच हा प्रकार. ऑरेंज, मँगो, लेमन, जिरा,  पाईनअँपल, कोकम अशा अनेक प्रकारांनी नटलेली हि ड्रिंक्स सध्या तरुणाईच्या पसंतीला उतरत आहेत. शहरात वेगवेगळ्या कॅफे मध्ये, स्पेशल ज्यूस सेंटर, आईस्क्रिम पार्लर मध्ये मॉकटेलस् व्हरायटीमध्ये आपल्याला उपलब्ध होतात. मिनी पार्टीसाठी तरुणाईची सध्या हि पहिली चॉईस आहे. स्टाईल स्टेटमेंट प्लस गारवा दोन्हीही उद्देश यातून साध्य होताना दिसतात. याशिवाय रस्त्याच्या कडेला असणाऱ्या सोडा मिक्स सरबत त्यांच्या नवीन आलेल्या गाड्यावर तरुणाईची गर्दी पाहायला मिळते.
        आपल्याकडील तापमान बघता सूर्यदेव यंदा वर्षाचं टार्गेट मे महिन्यातच पूर्ण करणार असे दिसतेय. बाकी उन्हाळा कितीही कडक असला तरी काळजी घ्या आणि मगच सुट्टी एन्जॉय करा. कारण प्रत्येक ऋतूचा आनंद हा वेगळाच असतो. हॅप्पी समर!
-------------------------------------------------------------------
संदीप

आज : Today

📝 आज.......       आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...