Tuesday, 21 April 2020

वसुंधरा आईने आपल्या सर्वात लाडक्या बाळाला लिहलेले पत्र

२२ एप्रिल  जागतिक वसुंधरा दिनानिमित्त......
 वसुंधरा आईने आपल्या सर्वात लाडक्या बाळाला लिहलेले पत्र........

प्रिय मानवा.....
               कदाचित तुला प्रिय म्हणावे की नाही हा प्रश्न बऱ्याचवेळा पडतो. आपल्या सूर्यमालेत आपल्याकडेच जीवसृष्टी अस्तित्वात आहे. आपल्यातील जैवविविधतेमुळे सूर्यमालेतील आपले महत्व अधोरेखित करण्यासारखे आहे.  विश्वाची निर्मितीत मी लाखो सजीवांना जन्म दिला, त्यांना सांभाळले, त्यांना वाढवले. माझ्या ठाई जे-जे होते ते-ते माझ्या सर्व लेकरांसाठी खुले केले. कोणताही भेदभाव न करता भरभरून दिले, देत आहे व देत राहील यात तीळ मात्र शंका नाही.
                प्रत्येक आईला आपली सर्वच आपत्य प्रिय असतात. काही शहाणी असतात तर काही खोडकर. पण कधीकधी हा खोडकरपणा इतका वाढतो की त्याचा त्रास व्हायला लागतो आणि अशावेळी मृदू आईलाही कठोर भूमिका घेऊन बाळाचे कान उपटावे लागतात. माझ्या सर्व बाळात तू पहिल्यापासूनच खूप खोडकर होतास.पण तुझ्या हुशार, कल्पक व वेगळ्या भूमिकेमुळे खोडकर असूनही लाडका होतास. पण या अतिलाडामुळे तू खूपच बिघडत चालला आहेस.जन्मदायी  म्हणून तुझा कान धरणे गरजेचे बनले आहे.
       प्रगतीच्या आणि आधुनिकरणाच्या नावाखाली तू माझे आणि पर्यायाने स्वतःचे ही अमाप नुकसान केले आहेत व करत आहेस. याची तुला जाणीव नाही फक्त मी, माझे,मला या स्वार्थी वृत्तीने तुला झपाटले आहे. या वेडापाई तू काय करतोयस याचे तुला भान राहिले नाही. तू इतर सजीवांच्यापेक्षा कित्येक पटीने बुध्दिमान, शहाणा आहेस तुला चांगले-वाईट यातील फरक समजतो पण तसे न करता आपला मनमानी कारभार सुरू ठेवला आहेस. प्रदूषण, बेसुमार वृक्षतोड, पाण्याचा अपव्यय, जैवविविधतेवर अतिक्रमण निसर्गाची चेष्टा यासारख्या गोष्टींमुळे तू स्वतःच तुझ्या पायावर दगड मारून घेत आहेस.  तुझ्या या हव्यासापोटी तू या  निरपेक्ष घटकांची बेमालूम कत्तल केलीस, डोंगर उजाड करून तुझा कथित स्वप्नांचे शहरे उभारलीस. प्राणी व पक्षांचा हक्काचा निवारा काढून घेतलास आणि याच वृक्षांचे महत्त्व सांगायला झाडांची कत्तल करून पुस्तके लिहिली मात्र त्यातले आचरणात काही आणले नाहीस. आजच्या घडीला तुला हे सगळे सांगण्याचे कारण म्हणजे तुझे खायचे व दाखवायचे दात वेगळे आहेत. प्रगतीच्या नावाखाली तू सर्वांना गौण समजून त्यांना दुर्लक्षित करीत  आहेस. तुझ्या वर्तनामुळे माझे व पर्यायाने तुझे खुप मोठे नुकसान करून घेत आहेस. हे सर्व तुला कळते पण वळत नाही.
             या पत्राच्या निमित्ताने तरी तू तुझा गांभीर्याने विचार करावा ही अपेक्षा आता तरी तो बदल करावा बाकी माझे तुझ्यावर प्रेम नेहमी होते व कायम राहील.

                                                   तुझी प्रिय आई....
                                            वसुंधरा  
      

1 comment:

मन ही आवरायला घेऊया

           वातावरणात बदलाचे वारे वाहू लागले आहे. आजूबाजूला उत्साहाचे उधाण आले आहे आणि मनामनात आनंदाच्या लहरी उमटत आहे. दिवाळी तोंडावर आली आह...