Monday, 18 January 2021

OTT Platform : ओटीटी प्लॅटफॉर्म

 

ओटीटी प्लॅटफॉर्म

 

                      सन 2020 चे नवीन वर्ष सुरू झाले आणि या दशकाच्या सांगतेला उत्साहाने सुरुवात झाली, पण या नवीन वर्षाच्या उत्साहात थोडी हूर-हूर  व धाक-धूक ही होतीच. कोरोना नावाचा महाभयंकर विषाणू कोविड -19 नावाचा आजार घेऊन अनेक देशात धोकादायक थैमान घालून आपल्या देशाच्या उंबरठ्यावर उभा होता. जानेवारी-फेब्रुवारी मध्ये आपण थोडे निर्धास्तच होतो. आपल्याकडे कोरोना येणार नाही, आपल्याला त्रास होणार नाही, आपल्या वातावरणात तो टिकणार नाही, असे खूप विषाणू आपण सहज पळवलेत अशा अनेक चर्चा आपल्याकडे अगदी गल्लीपासून दिल्लीच्या संसदेपर्यंत झाल्या होत्या.  सहाजिकच या सहानुभूतीच्या जोरावर आणि आपल्या बिनधास्त व निष्काळजी स्वभावामुळे आपण टीव्हीवर जगाच्या आरोग्य धावपळीच्या बातम्या बघत अगदी निवांत होतो.

                   मार्च उजाडला आणि आपल्या अतिआत्मविश्वासाचे पानिपत झाले. नाही-नाही म्हणत उंबर्‍यावर असणारा कोरोना विषाणू  कोविड-19 नावाचा आजार घेऊन आपल्या देशातच नाही, तर एकदम आपल्या घरातच घुसला. सर्वत्र गोंधळ माजला. खबरदारी व सुरक्षिततेचा उपाय म्हणून आपल्या संपूर्ण देशात पूर्णपणे लॉकडाउन अर्थात टाळेबंदीची घोषणा झाले. जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व काही बंद ठेवण्यात आले. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी व त्याची साखळी तोडण्यासाठी संपूर्ण जगात वापरला जाणारा हाच एकमेव नामी उपाय होता. सुरुवातीला काही दिवसच  चालेल असे वाटणारा हा टाळेबंद मात्र हनुमानाच्या शेपटी सारखा वाढतच राहिला.

                   सतत पायाला भिंगरी बांधले व स्वतःच्या मर्जीने जगणारे आपण या लॉकडाउनमुळे मात्र आपणच बांधलेल्या आपल्या घराच्या चार भिंतीत अडकलो. कुठेही बाहेर जायची मुभा नाही, मनसोक्त फिरणं नाही, शनिवार-रविवार विक एंड नाही, हॉटेलात जेवायला नाही, रस्त्यावरचे चमचमीत खाणे नाही, मित्र-मैत्रिणीबरोबर पार्टी नाही, म्हणजेच काय तर एकंदर आपल्याला सुट्टी मिळून देखील आपल्या मनासारखे जगून सुट्टीचा आनंद घेता येत नव्हता. या सर्वबरोबर मल्टिप्लेक्स, सिनेमागृह व नाट्यगृह बंद असल्यामुळे मनोरंजनावर पण विरजण आले होते. त्यामुळे या लॉकडाउनमध्ये आपली अवस्था अगदीच केविलवाणी झाली होती. जगतगुरू तुकाराम महाराजांच्या अभंगात सांगायचे झाले तर....

“ ठेविले अनंते तैसेचि रहावे

चित्ती असू द्यावे समाधान

                     या अभंगाप्रमाणे या कठीण काळात आपली मनस्थिती सांभाळून कोरोनापासून बचाव अशी दुहेरी कसरत सुरू होती. या वादळाच्या काळात ‘इंटरनेट’ हा आपला जिवाभावाचा आधार होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले मनोरंजन होत होते व वेळ जात होता, पण ‘भगवान के घर देर है अंधेर नही’ हेच खरे कोरोनाच्या आरोग्य संकटात व  लॉकडाउनच्या अडचणीत अडकलेल्या आपल्या सर्वांसाठी ‘ओटीटी प्लॅटफॉर्म’ हा काही वरदाना पेक्षा कमी नव्हता. समुद्रात तुफानात अडकलेल्या जहाजाला किनारा  दिसावा तसा ओटीटी प्लॅटफॉर्म आपल्यासाठी होता हे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.

                    आता हे सर्व नमनाला घडाभर तेल वाहिल्यानंतर आपल्याला पडलेला प्रश्न म्हणजे ‘ओटीटी प्लॅटफॉर्म’ म्हणजे काय रे भाऊ? त्याचे उत्तर म्हणजे, आपल्याला यातले सर्व काही माहित आहे, पण यालाच ओटीटी प्लॅटफॉर्म म्हणायचे हे नक्की माहीत नाही. साध्या, सोप्या व सरळ भाषेत सांगायचे झाले तर ‘ओटीटी प्लॅटफॉर्म’ म्हणजे ‘ओवर द टॉप मिडिया सर्विसेस’ अजूनही डोक्यावरून जात असेल तर ‘ओटीटी’ म्हणजे हॉट-स्टार, नेटफ्लेक्स, voot, अमेझॉन प्राईम, ALTBalaji, झी फाईव, यासारखी ॲप व आपण मनोरंजनासाठी त्याचा करत असलेला वापर.

                    आता आपल्या सर्वांना वाटले असेल अरे हे होय!!! होय, होय हेच आपल्या लॉकडाउनमधील मनोरंजनाचा सच्चा साथी.  सिनेमागृहे व इतर मनोरंजनाची साधने बंद असताना घरबसल्या आपला वेळ घालवून मनोरंजन करण्यात या प्लॅटफॉर्मचा खूप मोठा रोल होता. ओटीटी प्लॅटफॉर्म भारतात खूप आधीपासून आहेत पण त्याचा वापर व त्याचे महत्त्व वाढले ते कोरोनाच्या या लॉकडाउन काळात.  याआधी माझ्यासारख्याला आयपीएलची मॅच हॉटस्टारवर  दिसते व एस.टी त बसल्यावर फ्री मध्ये voot वर मालिका व सिनेमा दिसतात तेवढेच प्रकार माहीत होते. या वर्षी ओटीटी प्लॅटफॉर्मने  कमालीची प्रगती केली. अचानक उद्भवलेले आरोग्य संकटामुळे होऊ घातलेल्या अनेक सिनेमे, मालिका, वेब सिरीज अडचणी होत्या पण त्यांना आधार मिळाला तो ओटीटी प्लॅटफॉर्मचा आणि चाहत्यांनी तो आधार भक्कम ठेवला. अडचणीच्या या  काळात सर्वांचाच फायदा करून दिला.

                    सध्या भारतात ४० ओटीटी प्लॅटफॉर्म सुरू आहेत. प्ले स्टोअर वर  ॲपच्या स्वरूपात सहज उपलब्ध होतात. काही प्लॅटफॉर्म काही दिवस किवा काही महिने फ्री स्वरूपात सेवा देतात, पण नंतर मासिक किंवा वार्षिक वर्गणीदार होऊन आपण यावरील मनोरंजनाचा मनमुराद आनंद घेऊ शकतो. बहुतेक ओटीटी प्लॅटफॉर्मवर जाहिरात फ्री मनोरंजन असल्यामुळे आपल्याला ते  अधिक आकर्षित करत आहेत. गेल्या सहा महीन्याची हिस्ट्री जर आपण तपासली तर हे ओटीटी प्लॅटफॉर्म आपल्यासाठी सर्व काही होते.

                खास करुन तरुणाईसाठी वेळ घालवण्याची हीच हक्काची जागा होती. घरातले मोठे लोक कितीही ओरडले तरी फोन वरील ओटीटी प्लॅटफॉर्म हाच खरा सच्चा आधार होता. या लॉकडाउनमध्ये अनेक निर्मात्यांनी आपल्या अनेक सिनेमे या ॲपवर प्रदर्शित केले. यात आपण खूप आतुरतेने वाट पाहत असलेला मिर्झापूर, अक्षय कुमार व शरद केळकर यांची दमदार भूमिका असलेले लक्ष्मी, शेअर मार्केट वर आधारित ‘द बिग बुल’, सुशांतसिंह राजपूत चा शेवटचा सिनेमा ‘दिल बेचारा’, स्कॅम 1992, अमिताभ बच्चनचा ‘गुलाबो सिताबो’ यासारखे अनेक सिनेमे आपले मनोरंजन करून गेले. अनेक हिट सिनेमे व सिरीज या सहा महिन्यात आल्या व येणाऱ्या काही महिन्यात आणखी चांगल्या कलाकृती नंबरात आहेत.

                 पहिल्यांदाच प्रेक्षेकाविना खेळवले गेलेले आयपीएल देशाच्या बाहेर खेळले गेले पण हॉटस्टार च्या माध्यमातून एकमेकांच्या पासून सुरक्षित अंतर ठेवून आपण ते मनमुराद अनुभवले. याशिवाय मराठी, तेलगु ,तमिळ, बंगाली अशा देशातील अनेक वेगवेगळ्या भाषेतील अनेक लोकप्रिय चित्रपट आपण ओटीटी प्लॅटफॉर्मवर बघून घेतले असतील व बघत असू. विविध मालिका, वेब सिरीज, रियालिटी-शो हे ही सोबत होते व आहेत.

                   एकूणच कोरोनाच्या या आरोग्य महामारीत संपूर्ण जग आरोग्य संकटाने चिंताग्रस्त असताना लॉकडाउन व सोशल डिस्टनसिंगच्या  अडचणीत सापडली असताना व्हाट्सअप, युट्युब, फेसबुक यासारख्या सोशल मीडियाच्या मनोरंजनाबरोबर ओटीटी प्लॅटफॉर्म आपल्यासाठी वेगळी संजीवनी होती. प्रत्यक्ष सिनेमागृहासारखे मनोरंजन जरी अनुभवता आले नसले, तरी ‘दुधाची तहान ताकावर भागवण्यासारखा’ हा प्रकार निश्चित आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये कदाचित यामुळे मनोरंजनाच्या शाखा निश्चितच विस्तारतील यात तिळमात्र शंका नाही.

 धन्यवाद!!!

-----------------------------------------------------------------------------------------------------             

 संदीप कोळी

sandip.koli35@gmail.com

 

No comments:

Post a Comment

आज : Today

📝 आज.......       आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...