Monday, 19 October 2020

दसरा (विजयादशमी)

 दसरा (विजयादशमी)

धर्माचा अधर्मावर विजय, न्यायाचा अन्यायावर विजय,

चांगल्या विचारांचा वाईट विचारांवर विजय,

म्हणजेच विजयादशमी

                      भारत हा संस्कृती प्रिय देश आहे. आपण भाषा, जाती, प्रांत यामुळे वेगवेगळे असलो तरी सण समारंभ व संस्कृती यामुळे एकाच धाग्याने जोडलेले आहोत. हेच अखंड भारताचे सांस्कृतिक वैशिष्ट्य आहे.

                      भारतात आपण अनेक सण-उत्सव आवडीने व आनंदाने साजरे करतो. आपण साजरे करत असलेल्या विविध सणापैकी दसरा हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा व प्रमुख सण म्हणून साजरा केला जातो. दसरा या सणाला विजयादशमी किंवा अश्विन शुद्ध दशमी असे म्हटले जाते. प्रत्येक वर्षी दसरा हा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

                     दसरा हा सण साधारणपणे ऑक्टोबर महिन्यात येतो. भारतीय पंचांगानुसार आश्विन महिन्याच्या पहिल्या दिवसापासून नवरात्र साजरी केली जाते व त्यानंतरचा दहावा दिवस म्हणजे दसरा हा सण होय. दसरा हा दहा दिवसांचा सण मानला जातो. नऊ दिवस दुर्गा देवीची पूजा केली जाते व दहाव्या दिवशी दसरा साजरा करतात.

                    दसऱ्याच्या दिवशी प्रभू श्री रामचंद्रांनी रावणाचा वध करून विजय संपादन केला होता. तसेच याच दिवशी दुर्गादेवीने महिषासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता म्हणून दसरा या सणाला आपल्याकडे विशेष महत्त्व आहे.

                  भारताच्या विविध राज्यात दसरा वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. महाराष्ट्रात दसऱ्याच्या सणाला आपट्याची पाने एकमेकांना देऊन मोठ्यांचे आशीर्वाद घेतात. यालाच सोने लुटणे असेही म्हणतात. दसऱ्याच्या दिवशी सरस्वतीपूजन, अपराजितापूजन आणि शस्त्रपूजा केली जाते. संध्याकाळी आपट्याच्या झाडाची पूजा करून सोने लुटले जाते. दसरा या सणाच्या दिवशी झेंडूच्या फुलांनी पूजा करण्याची प्रथा आहे.            

               उत्तरेकडील पंजाब, उत्तर प्रदेश या सारख्या राज्यात दसऱ्याच्या दिवशी रावण दहन करून वाईट विचारावर चांगल्या विचारांचा विजय म्हणून दसरा साजरा करतात. दक्षिण भारतातील कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश या राज्यात ही दसरा हा सर्वात मोठा सण म्हणून साजरा केला जातो. या ठिकाणी नऊ दिवस देवीच्या अनेक रूपांची पूजा केली जाते. पहिले तीन दिवस लक्ष्मी, नंतरचे तीन दिवस सरस्वती व शेवटचे तीन दिवस दुर्गामातेची पूजा केली जाते. न, धान्य, कला, शिक्षण आणि शक्ती यांची उपासना केली जाते. मैसूर ची दसरा दसरा मिरवणूक जगप्रसिद्ध आहे.

                दसरा हा सण भारतीय संस्कृतीतील साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक आहे म्हणून या सणाच्या निमित्ताने नवीन वास्तू, गाडी, वस्तू, दागिने, जागा खरेदी केली जाते. याशिवाय नवीन करार, नवीन योजना यांचाही प्रारंभ केला जातो.

                दसऱ्याचे दुसरे नाव आहे विजयादशमी. अज्ञानावर ज्ञानाने, शत्रूवर पराक्रमाने, वैऱ्यावर प्रेमाने विजय मिळवायचा हे दसरा हा सण आपल्याला शिकवतो. आनंद, समाधान आणि सोबत संपदा मिळवून आणायची. यश, किर्ती प्राप्त करायची, धनसंपदा लुटायची व लुटवायचा  हा दसऱ्याच्या शुभ दिवस असतो.

              सण समारंभाच्या निमित्ताने इतिहासातील पैलू बरोबर संस्कृतीची जोपासना हा उद्देश घेऊन चला दसरा साजरा करूया.

                                          “दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा

-----------------------------------------------------------------------------------------------------

 संदिप कोळी

sandip.koli35@gmail.com

No comments:

Post a Comment

आज : Today

📝 आज.......       आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...