महात्मा गांधी
‘अहिंसा हा माझ्या श्रद्धेचा पहिला लेख आहे
तसेच तो माझ्या
संप्रदायाचा शेवटचा लेख आहे.’
सत्य आणि अहिंसा या दोन तत्त्वांच्या आधारे संपूर्ण आयुष्य
जगणारे व भारताला इंग्रजांच्या पारतंत्र्यातून स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये सिंहाचा
वाटा असणारे भारताचे लाडके राष्ट्रपिता महात्मा गांधी होय.
राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणजेच मोहनदास करमचंद गांधी
होय. लोक त्यांना प्रेमाने ‘बापू’ म्हणत असत.
महात्मा गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९
रोजी सध्याच्या गुजरात राज्यातील पोरबंदर या शहरात झाला. त्यांच्या
वडिलांचे नाव करमचंद गांधी होते. ते पोरबंदर मध्ये दिवाण होते, तर मोहनदास
यांच्या आईचे नाव पुतळीबाई होते. मोहनदास यांच्या बालपणावर व आयुष्यावर
घरातील धार्मिक वातावरणाचा खूप मोठा प्रभाव पडला. बालपणातच
अहिंसा, शाकाहार, सहिष्णुता, इतरांबद्दल करुणा या तत्त्वांचे बीज मोहनदास यांच्यात
रुजले गेले. सन १८८३ मध्ये वयाच्या १३ वर्षी मोहनदास व कस्तुरबा यांचा बालविवाह
झाला.
मोहनदास प्राथमिक शिक्षण पोरबंदर व
माध्यमिक शिक्षण राजकोट येथे झाले. शालेय शिक्षण संपवून सन १८८८ मध्ये
ते वकिलीचे
शिक्षण घेण्यासाठी लंडन युनिव्हर्सिटी कॉलेज येथे गेले. १८९१
मध्ये वकिलीचे शिक्षण पूर्ण करून ते भारतात परत आले. त्यानंतर
त्यांनी काही काळ दक्षिण आफ्रिकेत घालवला. त्याच ठिकाणी त्यांनी त्यांचा
राजकीय दृष्टिकोन व नेतृत्व कौशल्य विकसित केली.
सन १९१५ मध्ये गांधीजी कायमचे
भारतात आले. गांधीजी भारतात आले त्यावेळी भारतीय स्वातंत्र्य चळवळीने
चांगली गती घेतली होती. गांधीजीनी सुरुवातीला बिहारमधील चंपारण्य व गुजरातमधील
खेडा येथील शेतकऱ्यांना सत्याग्रहाच्या माध्यमातून न्याय मिळवून दिला. राष्ट्रीय
सभेचे प्रमुख नेते व गांधीजींचे
राजकीय गुरु गोपाळकृष्ण गोखले
यांनी गांधीजींना भारताविषयीची राजकिय मार्गदर्शन केले
लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर भारतीय
स्वातंत्र्याची पूर्ण सूत्रे १९२० मध्ये गांधींच्या हाती आली. राष्ट्रीय
सभेचे प्रमुख नेते म्हणून गांधीजी ओळखले जाऊ लागले. सत्याग्रह या अभिनव तंत्राचा वापर करत त्यांनी
स्वातंत्र्य लढ्याला आणखी गती दिली. १९२० ते २२ मधील असहकार चळवळ, १९३० ते ३२ मधील सविनय कायदेभंग व दांडी यात्रा, १९४० ते ४२ मधील वैयक्तिक सत्याग्रह, १९४२ ‘छोडो
भारत’ आंदोलन यामुळे
भारतीय स्वातंत्र्याला मूर्त रूप प्राप्त झाले.
असहकार चळवळ, सविनय कायदेभंग
यातून गांधीजींनी लोकांना स्वातंत्र्याप्रति प्रेरित केले. या दरम्यान त्यांनी अनेक वेळा
तुरुंगवास भोगला. गांधीजींनी अनेक उपोषणे केली, पण हे सर्व
भारताच्या अखंड स्वातंत्र्यासाठी सुरू होते. ९
ऑगस्ट १९४२ रोजी ‘करो या मरो’ ची घोषणा दिली व सर्व स्वातंत्र्यसैनिक पेटून उठले. सर्वांच्या अथक
प्रयत्नातून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले.
गांधीजींनी चळवळी बरोबर विपुल लेखन केले आहे. त्यांनी हरिजन, इंडिया, नवजीवन या
वृत्तपत्रांचे संपादन केले. ‘माझे सत्याचे प्रयोग’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध
आहे. याबरोबर त्यांनी अनेक पुस्तकांचे लेखन केले आहे. गुरुदेव
रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम गांधीजींना ‘महात्मा’ ही उपाधी दिली, तर सुभाषचंद्र
बोस यांनी १९४४ मध्ये पहिल्यांदा त्यांना ‘राष्ट्रपिता’ संबोधले असे
म्हणतात.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर
उसळलेल्या जातीय दंगली कमी करण्याचा गांधीजी
प्रयत्न करत होते. ३० जानेवारी १९४८ रोजी एका माथेफिरूने गांधीजींना गोळी घालून त्यांची हत्या
केली.
महात्मा गांधीजींनी
आपले संपूर्ण आयुष्य देशाच्या लोकांसाठी वेचले . स्वातंत्र्याबरोबर
स्वदेशीचा त्यांनी पुरस्कार केला. समाजसुधारक, राजकारणी, अर्थतज्ञ
याबरोबरच त्यांचा लोकांशी प्रचंड जनसंपर्क होता. भारतातील नव्हे
तर जगातील अनेक लोकांसाठी महात्मा गांधीजी एक अखंड प्रेरणा स्रोत होते व आहेत. त्यांचा जन्मदिन 2 ऑक्टोबर हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन’ म्हणुन साजरा
करतात. जगाला शांतीचा संदेश देणार्या अशा महात्मा गांधींना विनम्र
अभिवादन.......
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
संदिप कोळी
sandip.koli35@gmail.com
No comments:
Post a Comment