Monday, 19 October 2020

डॉ. अब्दुल कलाम Dr. Abdul Kalam

 

डॉ. अब्दुल कलाम

 

स्वप्न ते नव्हे, जे झोपल्यानंतर पडतात, तर खरे स्वप्न ते असतात,

जी पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला झोपू देत नाही.”

                         या तत्वाने आयुष्यभर जगणारे व भारताला जागतिक महासत्ता होण्याचे स्वप्न दाखवणारे भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ, भारतरत्न डॉ..पी.जे अब्दुल कलाम होय.

                      ब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव अब्दुल पाकीर जैनुलबदीन अब्दुल कलाम होय. त्यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी तामिळनाडू राज्यातील रामेश्वरम या छोट्या गावात एका मध्यमवर्गीय तमिळ कुटुंबात झाला. त्यांचे वडील रामेश्वरमला येणार्‍या यात्रेकरुंना नेण्याआणण्याचा व्यवसाय करत होते. त्यांच्या आईचे नाव अशियम्मा होते.

                       डॉ. कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरमला पूर्ण केले. डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून तसेच अन्य लहान मोठी कामे करुन पैसे मिळवून घराला आर्थिक मदत करीत असत. त्यांचे बालपण कष्टात गेले. शालेय जीवनात त्यांना गणित या विषयात अधिक आवड वाटू लागली. शालेय शिक्षणानंतर सेंट जोसेफ कॉलेज तिरुचिरापल्ली येथून त्यांनी बी.स्सी चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या ठिकाणी प्रवेश घेऊन एरोनॉटिक्स चा डिप्लोमा पूर्ण केला. या प्रसंगी त्यांना आर्थिक  अडचणीना तोंड द्यावे लागले.

                        शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील नासा या प्रसिद्ध संस्थेत महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले.  1958 ते 1963 या काळात डॉ. कलाम यांचा संबंध संरक्षण संशोधन व विकास संस्था (डीआरडीओ) बरोबर आला. 1963 मध्ये ते भारतीय संशोधन संस्था अर्थात इस्रो च्या क्षेपणास्त्र विकासातील संशोधनात भाग घेऊ लागले. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताच्या क्षेपणास्त्र विकास एकात्मिक कार्यक्रमाच्या वेळी डॉ. कलाम पुन्हा डीआरडीओ मध्ये आले.

                      इस्रो मध्ये डॉ.कलाम सॅटलाईट लोन्चिंग व्हेईकल-3  या प्रकल्पाचे प्रमुख होते. भारतातील विज्ञान तंत्रज्ञानाची आघाडी डॉ. कलाम यांनी यशस्वीपणे सांभाळली. अवकाश संशोधनात डॉ. कलाम यांनी भारताला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले.

                    वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर होता. आपल्या सहकाऱ्यातील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये होती. अग्नी या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले.  पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार व संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

                   भारत सरकारने त्यांच्या योगदानाबद्दल पद्मभूषण, पद्मविभूषण व भारतरत्न हा सर्वोच्च किताब देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. सतत देशाचा विज्ञानाचा विषय डोक्यात असणारे डॉ. कलाम अत्यंत साधे व संवेदनशील होते. डॉ.कलाम यांना रुद्रवीणा वाजण्याचा, मुलांना शिकवण्याचा व त्यांच्याशी गप्पा मारण्याचा छंद होता. डॉ. कलाम आयुष्यभर अविवाहित राहिले. अग्निपंख हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध व प्रेरणादायी आहे. त्यांनी भारतातील युवकांच्या भारताच्या महासत्तेचे बीज रोवले.

                   25 जुलै 2002 ते 25 जुलै 2007 या काळात त्यांनी भारताचे राष्ट्रपती म्हणून सर्वोच्च पद भूषवले. या काळात आपल्या वेगळ्या कार्यपद्धतीने व साधेपणामुळे ते लोकप्रिय राष्ट्रपती झाले. वेगवेगळ्या अडचणींना तोंड देत आपले शिक्षण पूर्ण करून देशाच्या अवकाश संशोधनात गरुड झेप घेणारे अब्दुल कलाम आयुष्यभर स्वतःला विद्यार्थी समजत होते. 27 जुलै 2015 रोजी डॉ. कलाम यांचे व्याख्यान देत असताना निधन झाले.

                 भारताला अवकाश संशोधनात मोठे यश मिळवून देणारे व युवकांसाठी सदैव प्रेरणा देणाऱ्या डॉ. .पी.जे अब्दुल कलाम यांना विनम्र अभिवादन

--------------------------------------------------------------------------------------------------------------------

संदिप कोळी

sandip.koli35@gmail.com



No comments:

Post a Comment

आज : Today

📝 आज.......       आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...