Monday, 19 October 2020

कोविड योद्धयांचे योगदान

 

कोविड योद्ध्यांचे योगदान

 

             उत्क्रांतीच्या ओघात मानवाची प्रगती झाली आणि निसर्गाच्या चक्रातील मानव हा सर्वात बुद्धिमान व प्रगत सजीव ठरला. उत्क्रांती पासून अनेक अडचणींना मानवाने खंबीरपणे तोंड दिले. अनेक अडचणी या स्वतः मानवाने निर्माण केल्या होत्या तर काही निसर्गाने लादल्या होत्या. मानवाने प्रत्येक वेळी यातून धैर्य, संयम, सामर्थ्य व बुद्धीच्या जोरावर मार्ग काढला.

           इतरवेळेपेक्षा यावेळी युद्ध वेगळे होते. आपल्या चुकीमुळे म्हणा किंवा मानवाच्या खोडसाळ वृत्तीमुळे असेल अचानक एका विषाणूने आपल्यावर हल्ला केला. संपूर्ण जगाचे चक्र थांबले. नक्की काय करायचे? हे कोणाला समजेना. ‘कोरोना’ नावाच्या विषाणूमुळे जगभर थैमान घालायला सुरुवात केली आणि संपूर्ण मानव जातच अडचणीत आली.

             प्रत्येक प्रश्नाला उत्तर असते. प्रत्येक अडचणीतून पर्याय निघतो त्याप्रमाणे कोविड -19 चा प्रादुर्भावात गरज होती ती संयम, धैर्य, मदत आणि बुद्धीची..... या सर्व कसोटीवर पूर्णपणे खरे उतरून या जागतिक आरोग्य संकटात संयमाने सामना केला व आजही खंबीरपणे करत आहेत ते म्हणजे आपले कोरोना योद्धा......

           कोविड -19 च्या या महामारी मध्ये डॉक्टर व त्यांच्या सर्व वैद्यकीय सहकाऱ्यांनी केलेले कार्य व दिलेले योगदान म्हणजे समस्त मानव जातीवर केलेले खूप मोठे उपकार आहेत. स्वतःचा जीव धोक्यात घालून, कुटुंबापासून दूर  राहून जनसेवा करणारे सर्व वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग स्टाफ, सर्व वैद्यकीय कर्मचारी, आशा म्हणजे या कोरोना महामारी मध्ये प्रत्यक्ष देवदूतच ठरले आहेत. लोकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न असताना त्यांना मरणाच्या दाढेतून परत आणणारे वैद्यकीय कर्मचारी हे देवा पेक्षा कमी नाहीत.

              कोविड -19  च्या या संकटात आणखी एक कोरोना योध्यांचा यांचा गट प्रभावीपणे आपले योगदान देत आहेत ते म्हणजे आपली पोलीस बांधव  होय. कठीण कालखंडात 24 तास ड्युटी करून आपल्या स्वतःच्या जीवावर उदार होऊन समाजातील घटकांसाठी लढणारे पोलीस बांधव हे खरे कोरोना योद्धा होत.

                कोरोनाच्या या आरोग्य विपत्तीमध्ये स्वच्छतेचे महत्त्व आपण सर्वांनी जाणले व अनुभवले आहे. स्वच्छता ठेवणारे आपले सर्व स्वच्छता कर्मचारी हे कोरोना योद्धा आपल्यासाठी धावून आले. कोरोना च्या काळात स्वच्छता ठेवण्यात यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली आहे.

               सरकारी यंत्रणाही या संकटाच्या काळात लोकांच्या मदतीला धावली. प्रशासनातील सर्व घटक, सर्व सरकारी कर्मचारी या संकटात खंबीरपणे उभे राहून त्यांनी आपले योगदान दिले आहे. या सर्वांच्या बरोबर शिक्षकांची ही कोरोना योद्धा म्हणून भूमिका महत्त्वाची ठरली. ऑनलाइन शिक्षण, कुटुंब सर्वेक्षण, चेक पोस्ट ड्युटी यासारख्या कामातून शिक्षकांनी कोरोना काळात प्रभावी योगदान दिले आहे.

            कोरोनाच्या या अनपेक्षित आरोग्य संकटात डॉक्टर, नर्स, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, सफाई कर्मचारी, सरकारी यंत्रणा, शिक्षक व इतर घटक यांचे कोरोना योद्धा म्हणून असलेले योगदान आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचे ठरले आहे. त्याबद्दल आपण या सर्व कोरोना  योद्ध्यांच्या आजन्म ऋणात राहू या 

भीती घालवू, काळजी घेऊ

कोरोना संकटाला, धीराने तोंड देऊ

---------------------------------------------------------------------------------------------------------------------

संदिप कोळी

sandip.koli35@gmail.com


No comments:

Post a Comment

आज : Today

📝 आज.......       आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...