Sunday, 17 September 2017

‘उबुंटू’ Ubuntu philosophy of Ubuntu in Marathi मराठी 

उबुंटू’ Ubuntu philosophy of Ubuntu in Marathi  मराठी 

                           ‘उबुंटू’ Ubuntu ऐकलाय ना शब्द….! ऐकला असेलच आणि नसेल ऐकला! वाचला तर आता तरी लक्षात आला असेलच……. उबुंटू वाचल्यावर काही विचीत्र आणि अनोखळी वाटतो मुळात आपल्या ओळखीच्या भाषेत ऐकल्यासारखं वाटत नाही किंवा आपल्या शब्द संग्रहातही कोठे सपडत नाही असो… नाराज होऊ नका.. आपल्या बुद्धी व शब्दसंपदेवर संशय घेऊ नका कारण ‘उबुंटू’ हा मुळात आपल्या भाषेतलं शब्दच नाहीये आणि त्यामुळे आपल्याला नवीन वाटतो..

                          पण तुमची उत्सुकता थोडी कमी करतो उबुंटू हा शब्द आफ्रिकेतील ‘झुलू’ भाषेतील शब्द ‘उबुंटू’ या शब्दाचा अर्थ  “I am beacuse We are.”  म्हणजेच “मी आहे कारण आम्ही आहोत.” शांतीदूत नेल्सन मंडेला यांच्यामुळे जगाला  कळलेला एक सुंदर शब्द……

                             आता तुमचा गोंधळ थोडा फार कमी झालेला असेल पण मग या ‘उबुंटू’चा आपल्याशी काय संबध किंवा याचा अर्थ आपल्याला कसा लागू पडतो. तर हा शब्द  कसा आला त्याची एक सुंदर छोटीशी गोष्ट सांगतो म्हणजे तुमच्या सर्व शंका दूर होतील… आफ्रिकेतील दारिद्र्य पाचवीला पुजलेले त्यामुळे सगळ्याच मुलभूत गरजांची वाणवा  त्यात अन्नाची गरज थोडी जास्तच … त्यामुळे अन्नाचा आणि खाद्यपदार्थांचा मोह थोडा जास्तच… अशाच एका छोट्या वस्तीवरील ही गोष्ट एके दिवशी एक फळांनी भरलेली पाटी त्या वस्तीवरील मुलांच्या समोर आणली पण एक अट ठेवली कि जो कोणी पळत जाऊन सर्वप्रथम त्या पाटीतील फळ घेईल त्या पाटीतील सर्व फळे त्याची … स्पर्धा आयोजकांचा पण उत्साह वाढला होता. अन्नासाठी होणारी स्पर्धा आणि धडपड त्यांना पहायची होती…. स्पर्धामध्ये ठराविक अंतरावर पाटी ठेवली मुले जमा झाली आणि स्पर्धेला सुरवात झाली पण………….

                       घडले ते अनपेक्षितच अन्न मिळवण्याच्या स्पर्धेसाठी न धावता त्या सर्व मुलांनी एकमेकांचे हात धरले व ती मुले एकत्र त्या फळाच्या पाटीजवळ पोहचले व मोठ्याने ओरडले ‘उबुंटू’……. व मिळून फळे खाल्ली…. या छोट्या मुलांनी जगण्याची एक मोठी रीतच जगाला शिकवली.. ‘मी’ च्या ऐवजी ‘आम्ही’ या संकल्पनेवर या छोट्यांनी मोठा भर दिला आणि खरोखरच सध्या आपल्याला I पेक्षा We ची गरज जास्त आहे…

मानवाच्या बदलत्या संस्कृती व जीवनशैलीनुसार प्रत्येकजण ‘I’ / ‘मी’ या भोवती गुरफटला आहे . मी, माझे, हे मला, ते मला… या सगळ्याभोवती त्याचा प्रवास सुरु आहे आणि आपल्या या वागण्याचे प्रतिबिंब पाल्याबरोबरच इतरांच्या व आपल्या पुढच्या पिढीवर म्हणजेच आपल्या पाल्यावर पडत आहे पूर्वी आपल्याकडे एकत्र कुटुंब पद्धती होती त्यामुळे सार्वजन एकत्र असल्यामुळे साहजिकच घरामध्ये मी पेक्षा आम्ही महत्वाचा होता पण हळू हळू एकत्र कुटुंब पद्धती नष्ट होत गेली आणि छोट्या त्रिकोणी, चौकोनी कुटुंबाचा उदय झाला अशा कुटुंबात मी अभिव्यक्ती वाढत गेली त्यामुळे सध्या पाल्याच्या मध्ये मी हि वृत्ती वाढत आहे

या मी मुळे ही मुले महत्वकांक्षी व आक्रमक बनतात फक्त मी आणि मलाच या त्याच्या अट्टाहासामुळे  स्वतःला व कादाचीत  दुसऱ्याला नुकसान पोहोचवता मी व्यतिरिक्त आम्ही हे त्यांना पटत नाही आणि मग त्यांच्यात न्यूनगंड व एकलकोंडेपणा वाढतो.

पालक व शिक्षक म्हणून आपली जबाबदारी आहे कि आपल्या पाल्याला  व विद्यार्थ्यांना ‘मी’ तून बाहेर कडून त्याला ‘आम्ही’ बनविणे उबुंटू हा शब्द आपल्याला हेच सांगतो कि ज्यावेळू आपण मी तून बाहेर पडून आम्ही असा विचार करू त्यावेळी आपली प्रगती व समानता दोन्ही घडेल आपल्या पाल्याच्या व विद्यार्थ्यांच्या बाबतीत हि आपल्या सर्वाना एकत्र घेऊन त्यांचा विकास करणे गरजेचे आहे. यासाठी आपणही मी पेक्षा आम्ही होऊन प्रयत्न करायला पाहिजेत पालक कुटुंब समाज शिक्षक या सर्व कड्या एकत्र येऊन ज्यावेळी एकसंघपणे काम करतील त्यावेळी पाल्याचा विकास व जडणघडण १०० % पूर्ण होईल.आपल्या बरोबर सर्वाना फायदा व्हायला पाहिजे हे ज्यावेळी आपण आत्मसात करू कोणी मागे राहणार नाहीत मी आहे कारण आम्ही आहोत हि संकल्पना प्रत्यक्षात जगण्यास ज्यावेळी सुरवात होईल  त्यावेळी  खरा मानवतावाद घडेल विद्यर्थ्यांच्या बाबतीत वर्गातील सर्व विद्यार्थी असा विचार करतील व जातील त्यावेळी वर्गातला एकही विद्यार्थी मागे राहणार नाही या गोष्टी स्वीकारल्या व आत्मसाद केल्या तर आपला समाजातही कोणी मागे राहणार नाही

उबुंटू(Ubuntu philosophy) हा छोटा शब्द जगण्याचा मोठा अर्थ शिकवितो I am  पेक्षा  We are  हे महत्वाचे हे दाखवून देतो म्हणून  आजपासून आपणही  I am  नाहीतर we are….

Written By Sandip Koli

Saturday, 9 September 2017

बाबुराव आणि सोनूची धूम

भावांनो मोरया.....विघ्नहर्ता, सुखकर्ता, बुद्धीचा अधिपती बाप्पा आपल्या घरी येऊन बघता बघता 11 दिवस होत आले,  आणि उद्या बाप्पा निघाले सुद्धा. गणपती आल्यानंतर साराच मौहोल कसा गजबजल्यासारखा होता. आणि आता बाप्पाला निरोप देताना मात्र मन उदास आहे.  घरगुती गणपतीनंतर उद्या मंडळाचे गणपती जाणार म्हणजे एकदम उदासी. एकदम मोकळं आणि सर्वत्र सन्नाटा.
          पण दोस्तांनो अजून उद्याचा दिवस शिल्लक आहेच की  बाप्पाचे आगमन, स्वागत व त्यानंतर चे टॉप चे काम म्हणजे बाप्पाची विसर्जन मिरवणूक. त्यामुळे ही मिरवणूक लक्षात राहण्यासारखी करण्यासाठी कार्यकर्ते फुल्ल जोशात आहेत. या वर्षी डॉल्बीला विरोध असल्यामुळे बहुसंख्य मंडळांनी पारंपरिक वाद्य ढोल, ताशा, लेझीम, झांज यावर भर दिला आहे. तरीही मिरवणूक स्पीकर आणि गाण्याशिवाय पूर्णच होत नाही. मंडळातील 8 वी-9 वी ची पोरं विचारत्यात " अध्यक्ष ढोलावर नाचायच कसं? गाणी पाहिजेतच की". त्यामुळे पारंपरिक वाद्यांबरोबर स्पीकर आणि गाणी असणार ही काळ्या दगडावरची रेख.
           बरं फक्त स्पीकर नाहीतर कार्यकर्त्यांची गाण्याची लिस्ट पण तयार आहे. विसर्जन मिरवणूक म्हंटले की काही विशिष्ट गाण्यांना प्रचंड मागणी असते. उडत्या चालीच्या गाण्यावर बेफाम होऊन नाचणारा एक गट प्रत्येक मंडळात असतोच. प्रत्येक वर्षी अशा खास ' फर्माइशी' गाण्यांनी मिरवणुकीत धमाल उडवून दिली आहे.
            यावर्षी 'सोनू तुला माझ्यावर भरोसा नाय काय?' हे फार्मात आहे. सगळ्या शब्दात आणि भाषेत गाण्याची क्रेझ आहे. त्याचबरोबर मोनू अजमेरी याचं या वार्षिचं फेमस गाणं 'आला बाबुराव' जोर धरू लागले आहे. याबरोबर प्रदीप कांबळे याचं 'सुया घे, पोत घे' हे गाणं ही भाव खाते. संजय लोंढेच 'शांताबाई' तर तुफान गाजलं होते त्याचा करिश्मा अजूनही कायम आहे. या वर्षी नवीन आलेले साजन बेंद्रे याचे ' पोरगं माझं गुणांचं, वाजव ढंगळांग टकळांग', गेल्या वर्षीचे गजानन पाचेगावकरचं ' मी तुझा परशा, तू माझी आरची' ही गाणी अजून पोराच्या तोंडात आहेत.
            या गाण्यासोबत ' अरे आपला भाऊ', वाट बघतोय रिक्षावाला', 'पारू नाच', 'आवाज वाढवा डीजे तुला', 'चिमणी उडाली भुर्र', 'डॉल्बीवाल्या बोलवं', 'बेबी ब्रिगीट ऑन', 'बानू बया', 'तुझ्या रुपात चांदणं पडलंय', 'जीव झाला येडा पिसा', 'चारशे चाळीस करंट माझा', 'बाई वाड्यावर या' यासारख्या मराठी गावरान तडखा जोरात आहे.
            'मैं हू डॉन', 'आ देखे जरा', 'नायक नही खलनायक हू मैं', 'सपने मे मिलती है', 'बिलनची नागीण निघाली', 'मी बाबुराव बोलतोय', 'दाजीबा', 'डोकं फिरलंया', 'कोंबडी पळाली', 'मुंगळा' ही ऑल टाइम फेव्हरेट गाणी लिस्टमध्ये टॉपवर आहेत.
         अजय-अतुल स्पेशल आणि सैराट ची गाणी विशेषतः झिंगाट आजही  ताल धरायला लावतात. अशा गाण्याची मागणी गणपती डान्सर कडून हट्टाने होते.
          संगीत कंपन्यांकडून सणाच्या मौक्यावर चौका मारत नवीन गाणी लॉन्च केली जातात. उद्याच्या मिरवणुकीत अजूनही नवी कोरी गाणी येतील. यंदाच्या मिरवणूकीत झक्कास गाणी वाजवा, त्यावर ताल धरा, भरपूर नाचा.
       "काय रे पोरांनो, कसली गाणी होती काल" असे कोणी दुसऱ्या दिवशी म्हंटले की समजा तुमची मिरवणूक झक्कास झाली आहे.
बाकी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या!

सोशल मोरया

मोरया....ज्याची वर्षभर आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो आपल्या सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे एकदम थाटात जल्लोषी आगमन झाले आहे. सारा महाराष्ट्र या बुद्धीच्या आणि कलेच्या अधिपती असणाऱ्या गणपतीच्या पूजनात मग्न झाला आहे. मूर्ती ठरवणे, मग ती नेहमीप्रमाणे की इकोफ्रेंडली यांचा निर्णय, सजावट, सजावटीच्या साहित्याची खरेदी, मग सगळ्याच्यापेक्षा वेगळी व आकर्षक सजावटीसाठी वेगवेगळ्या आयडिया लढवून खूप वेळा बदल करून केलेली निराळी आरास, बाप्पाचे आगमन, त्या दिवशीची लगबग, गोंधळ, स्पेशल ड्रेस कोड, सेल्फी, बाप्पाचे स्वागत ,आरती , खीर-मोदक वगैरे वगैरे सगळे अगदी भक्तिभावाने व मंगलमय वातावरणात पार पडले असेल. या वर्षी बाप्पा हि अगदी सात दिवस आपल्या घरी मुक्कामाला आहेत. बाप्पा घरी आले की अगदी उत्साहाचे वातावरण असते. घरातले सगळे या सणाच्या निमित्ताने एकत्र जमतात त्यामुळे घरातही धमाल असते. यावर्षी घरगुती गणपतीत पर्यावरणपूरक मूर्ती व सजावट यावर जास्त भर दिलेला दिसून येतो. सण-समारंभाबरोबर सामाजिक भान जपण्यासाठीही आपण कमी नाही हे आपण सर्वांनी दाखवून दिले आहे.
             घरगुती गणपतीच्या आगमनानंतर आपल्याला वेध लागतात ते मंडळाच्या गणपतीचे. या वर्षी नवनवीन तालासह ढोल-ताशा पथक, लेझीम, झांज, हालगी यासारख्या पारंपरिक वाद्यांनी स्वागताचा मिरवणुका गाजवल्या आहेत. सार्वजनिक गणपतीच्या देखाव्यात सजीव देखावे व तयार देखाव्याबरोबर विद्युत रोषणाई ही या वर्षीचे आकर्षण आहेत. यासाठी शहराबरोबरच ग्रामीण भागातूनही बहुसंख्य भाविक शहरात येतात. काहीजण बाप्पासाठी पुण्या-मुंबई ला ही जातात.आपल्या लाडक्या बाप्पा बरोबर सेल्फी काढण्याचीही मोठी क्रेझ आहे. बाप्पा बरोबरचा प्रत्येक क्षण कॅमेराबध्द करण्यात आपण सर्वजण व्यस्त आहोत.
              घरोघरी होणाऱ्या या गणेश पूजनाबरोबर सार्वजनिक पातळीवरील गणेश उत्सवाने सामाजिक अभिसरण घडवून आणले आहे. सुमारे सव्वाशे वर्षाच्या काळात सार्वजनिक गणेश उत्सवाने समाजाला एकत्र आणून सामाजिक सलोखा राखण्याचे जेवढे काम केले आहे तेवढेच काम एकमेकांची दुःखे समजून घेण्याचेही केले आहे. जाती, धर्म व पंथाच्या भिंती पाडून सर्व समाज एकत्र आणण्याचे काम या सणाच्या निमित्ताने झाले आहे. समाजाच्या सर्व स्तरातील माणसे या निमित्ताने एकमेकांच्या सानिध्यात येतात. सार्वजनिक गणपती उत्सव सुरु झाल्यापासून झालेल्या विविध सामाजिक उपक्रमामुळे समाज घडला आहे. गणपती उत्सव म्हणजे विद्येच्या देवतेचा, विचारांचा आणि कलांचा उत्सव असायला हवा. सामाजिक क्षेत्रात भरीव सकारात्मक बदल घडायला हवेत. पण काही घटनांमुळे या उत्सवाला वेगळीच किनार लाभते. उत्सवाच्या काळात समाज व लोकांना अडचणी येऊ नये याची काळजीही घ्यायला हवी. व्यसन, वर्गणीसाठी अडवणूक, वाहतुकीला अडथळा, कर्णकर्कश आवाज यासारख्या गोष्टी टाळायला हव्यात. बुद्धीच्या या नायकाला शरण जाताना लीन व्हायला हवे. समाजाचे तेजोवर्धन होण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणाऱ्या या बाप्पाच्या उत्सवाचे पावित्र्य सर्वांनी जपले पाहिजे. तरच बाप्पा आपल्यातील अनिष्टाला दूर करून आपल्याला सर्वच क्षेत्रात निखरायला व यशस्वी व्हायला सुबुद्धी देईल.
मोरया......

बाप्पासाठी कायपण

हे बघ भावा...इंतजार की घडिया खतम! आपल्या सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाला मोजून फकस्त चारच दिस उरल्याती. चर्चा तर होणारच. फुल्ल जोशाच वातावरण हाय सगळीकडं, गावात तर नुसता दंगा, योट हाय. असायला बी पाहिजेच की माझा बाप्पा यायलाय, जल्लोष तर होणारच. यंदाच् वरीस आमच्या मंडळाचं 25 वा वरीस हाय. ते रोप्य का काय ते म्हणत्यात कि नाय तसलं वरीस हाय त्यामुळं यंदा रुबाब फकस्त आमचा अन आमच्या बाप्पाचा. यंदाचं वरीस आमच्यासाठनं लई इम्पोरटंट असल्यानं अध्यक्षपदासाठनं बी लई इच्छुक हुत. परतेकला अध्यक्ष व्हावं वाटत हुत कारण आमचं मंडळ बी तसं नादखुळा अन गावात वट असणार हाय नव्ह. गावाचं युवा नेतृत्व, गावातलं बुलेट किंग संग्राम भाऊ जवा यात उतरलं तसं बाकी आंडु-पांडू गपगार कोपऱ्यात बसलं. त्यामुळं यंदाच्या पंचीसाव्या वर्षिचं मंडळाचं अध्यक्ष संग्राम भाऊच.
         संग्राम भाऊ म्हंजी मोठी असामी, भाऊंच्या नुसत्या हाकेवर शंभर भर पोरं जमा हुत्यात. यंदा भाऊ मंडळाला चार चाँद लावणारच. भाऊंच्या नेतृत्वाखाली आमी गणपती ठरवाया सांगली, वडगाव अन पार कोलापूर पालतं घातलं पण भाऊसनी काय मनासारखं मूर्ती भेटना. त्यात आमचं शिकलेलं 'पम्या' म्हण मूर्ती 5-6 फुटाची घ्याची ते पर्यावरणाची हानी बिनी हुतीय म्हण. तेच्या वरून मोठा वाद झालत्याला पंचीसाव वरीस अन बारकी मूर्ती अजिबात जमणार नाय. सगळं कार्यकर्त नाराज झालत्यालं. कमीत कमी 15-16 फुटाची तरी मूर्ती आणावं म्हणून सगळ्यांनी हट धरल्याला. शेवटाला भाऊंनी तोडगा काडत कराडला 12 फुटाची एकदम देखणी मूर्ती फायनल केली. मूर्तीसाठनं भाऊंनी सरपंचाना तयार केलयं. निवडणुका तोंडावर असल्यानं सरपंच बी लगेच तयार झालत.
            यंदा तुफान जल्लोष असल्यानं वर्गणी बी धडाक्यात गोळा करायची चालू हाय. ' बजेट किती बी असू दे खर्च आमी आमच्या पद्धतीनं करणार'. वर्गणी साठनं आमच्या मंडळाच्या इलाख्यातली कुळ बाजूला काडल्याती. कुणाकडं हजार, कुणाकडं पाचशे, कुणाकडं शंभर घ्याच याच जंगी नियोजन खजिनदारानं केलंय. वर्गणीसाठनं भन्नाट आयडिया काडल्याती. आमचं 'बंड्या' तर ' तुम मुझे वर्गणी दो मैं तुम्हे पावती दुगा' ची घोषणा सुरु केलीय.
            आमच्या मंडळाचा महाप्रसाद म्हंजी आख्या गावात चुलबंदी असतीया. अख्खा गाव जमतंय आमच्या बाप्पाच्या प्रसादला यंदा बी सुट्टी नाय.
            मंडपाची तयारी बी एकदम आवरत आलीय. आतलं डेकोरेशन एकदम झकास झालंय. लायटिंग एकदम झ्याक-प्याक केलीया. मंडपापासन चार बी बाजूला लाईटच्या माळा सोडल्याती. मंडळाचा चौक एकदम दिवाळी असल्यावाणी वाटतुया. रस्त्यावर कार्यकर्त्यांच्या फोटुच्या कमानी बी लावल्याती.
            मनोरंजनासाठनं बी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी धमाल नाटकाची जुळणी घातलीया. वरच्या गल्लीचं 'आज्या' त्याच डायरेक्टर हाय तेचि बी तालीम चालू हाय.
        अध्यक्ष परवा तालुक्याला गेलत्याल ते काय मंडळाची मिटिंग हुती म्हण. आल्यापासनं डॉल्बी आणायचं नाय म्हणत्यात तेच्या मूळ निम्या कार्यकर्त्यांचा उल्लास गेलाय. भाऊ म्हणत्यात मिरुवणुकीला झांज अन ढोलताशा पतक आणुया. पण पोरं म्हणत्यात झांज अन ढोलावर नागीण डान्स कसा कराचा. अन शांताबाई, आवाज वाढवा डीजे तुला..., सोनू... ही गाणी कवा वाजवायची. पण भाऊ म्हणत्यात काहीतरी पाईट असलं म्हणून यंदा मिरवणुक झांज, ढोल ताशावरच असणार. " हक्काने वाजवतो अन बाप्पाला नाचवतो, ढोल पण वाजणार अन पोरं बी नाचणार"
            कार्यकर्त्यांनी तर शाळा, कालेज, अन कामाला दांड्या मारायला सुरुवात केलीया. मागच्या गल्लीचं 'गोट्या' काम सोडून मंडळात असतंय म्हणून रंजना काकू काल वरडत आलंती.
             ही सगळी तयारी बाप्पाची. वर्षातन एकदाच येणाऱ्या लाडक्या सणाचा जल्लोष बी तसाच जोरात असणार. त्यामुळं तयारी युद्ध पातळीवर सुरु हाय. बारक्या पोरापासनं मोठ्या पर्यंत सगळ्यांच्या डोक्यावर सध्या हाच विषय हाय. बाप्पा हायच लाडका सगळ्याचा. तुमची तयारी आवरत आली असलंच. तुम्हा सर्वासनी लाडक्या सणाच्या शुभेच्छा...
       बाप्पा तुझ्याशिवाय आम्ही शुन्य
        आमी तुझे सेवक हेच आमचं पुण्य.

#गावाकडची हवा

आज : Today

📝 आज.......       आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...